व्यायाम आणि योगासने यांचे मानवी जीवनातील महत्त्व !

Article also available in :

अनुक्रमणिका

 

१. शरिराचा प्रत्येक घटक सुदृढ रहाण्यासाठी व्यायाम आवश्यक

‘व्यायाम आनंददायक आहे. शरिराच्या रचनेमध्ये आपले अवयव, स्नायू, हाडे, रक्तवाहिन्या, त्वचा, मेंदू, मज्जारज्जू आणि मज्जातंतू हे सर्व अंतर्भूत असतात. ‘शरीर सुदृढ असावे’, असे आपल्याला नेहमी वाटत असते; परंतु या सर्व अवयवांची कार्यक्षमता चांगली रहाण्यासाठी  व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाचे अनेक लाभ आहेत.

 

२. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी मनाचे आरोग्यसुद्धा उत्तम
असावे लागते आणि गुरुकृपेमुळे मन स्वच्छ अन् निरिच्छ होते.

डॉ. अजय जोशी

 

३. साधना करण्यासाठीही शरीर सुदृढ ठेवणे आवश्यक !

३ अ. व्याधी निवारणासाठी आणि साधना नीट करता येण्यासाठी व्यायाम आवश्यक असणे

काहीजण म्हणतात, ‘आपण साधना करतो. तेव्हा व्यायाम कशाला करायला हवा ?’ साधनेने सर्वच प्राप्त होते; पण यालासुद्धा नियम आहेत. ‘याच जन्मात मला परिपूर्ण साधना करून मोक्षाला जायचे आहे. माझ्या व्याधी माझ्या देवाण-घेवाण हिशोबामुळे अर्थात् कर्म संचितामुळे निर्माण झालेल्या आहेत. आधिभौतिक व्याधींवरही व्यायाम उपयुक्त ठरतो. त्यासाठी साधना वाढवणे आवश्यक आहे.’ साधना अधिक कालावधीसाठी करण्यासाठी शरीर सुदृढ असणे पुष्कळ आवश्यक आहे.

३ आ. प्रारब्धभोग भोगण्यासाठी शरीर आणि मन
यांची दुर्बलता घालवणे आवश्यक असल्याने साधनेसह नियमित व्यायाम करणे आवश्यक !

शरिराचे भोग हे प्रारब्धानुरूप असतात. साधनेने प्रारब्धसुद्धा न्यून होत जाते. आपण जर अध्यात्मजीवन जगत असू, तर शरीररचनेतील बिघडलेली एखादी क्रियाही गुरुकृपेने आपण पूर्ववत् आणू शकतो आणि प्रारब्धावर मात करू शकतो. त्यासाठी योग्य क्रियमाण वापरणे आवश्यक असते. त्यासाठी आळस न करता साधनेसमवेत नियमित व्यायाम करणेही तितकेच आवश्यक असते.

 

४. वयस्कर व्यक्तींसाठीही व्यायाम उपयुक्त असणे

काही वयस्कर म्हणतात, ‘आम्हाला व्यायामाची आवश्यकता नाही’; पण त्यांनाही व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. व्यायामाने स्नायूंमध्ये लवचिकता येते. शरीर सक्षम ठेवता येते. पचनसंस्था उत्तम ठेवता येते. वृद्धावस्थेत ७५ टक्के तक्रारी पचनाच्या संदर्भात असतात. त्यांवर आपण व्यायामाने मात करू शकतो. त्यामुळे वयस्करांनीही वैद्यांच्या सल्ल्याने त्यांना झेपेल तो व्यायाम करावा.

 

५. व्यायाम आणि योगासने यांमुळे शरिराच्या सर्व क्रिया चांगल्या होऊन शरीर लवचिक रहाणे

आपण बहुतेक जण बहुतेक वेळा बैठी सेवा करतो. आपण सतत एका स्थितीत असतो. काही जण इतर सेवाही करतात; परंतु त्यांचीही शरिराची हालचाल सर्व अवयवांना पूर्णतः चालना देणारी असत नाही. प्रकृती चांगली रहाण्यासाठी झोप, आहार, योग्य प्रमाणात पाणी पिणे अन् साधना करणे आवश्यक आहे. हृदयाच्या स्नायूंची क्षमता वाढवणारे व्यायाम २० ते ३० मिनिटे करावेत. त्यामुळे हृदय आणि फुप्फुसे यांची क्षमता वाढण्यासह त्वचा चमकदार होते.

 

६. व्यायामाचे लाभ

अ. व्यायामाने ऊर्जा वाढते. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता वाढते.

आ. स्नायूंना बळकटी येते.

इ. व्यक्तीला लवकर आणि गाढ झोप लागते.

ई. व्यायामामुळे मन आणि शरीर हळूहळू तणावमुक्त होतात.

उ. मानसिक संतुलन होते.

ऊ. स्वास्थ्य चांगले झाल्याने आत्मविश्वास वाढतो.

ए. शरीर आणि मेंदू शांत रहातात.

साधना करण्यासाठी आणि आपत्काळाच्या दृष्टीने शरीर सुदृढ ठेवण्यासाठी सर्वांनी नियमित व्यायाम, प्राणायाम, बिंदूदाबन, योगासने इत्यादींचा अवलंब करणे अनिवार्य आहे. कोरोना महामारीच्या या काळात आपल्याला आपली प्रतिकारक्षमताही वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यकच आहे. साधनेच्या आपल्या या प्रवासात व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. शारीरिक त्रासांसमवेतच आध्यात्मिक त्रासातून त्वरित बाहेर पडण्यासाठी गुरुदेवांच्या कृपेने बिंदूदाबनाची प्रक्रिया साधकांना शिकवण्यात येत आहे. ‘या सगळ्याचा लाभ आम्हाला करून घेता येऊ दे’, हीच गुरुचरणी प्रार्थना आहे.’

– प्राण्यांचे आधुनिक वैद्य अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

७. आजपासून नियमित व्यायाम करूया !

वैद्य मेघराज माधव पराडकर

‘नियमित व्यायाम केल्याने शारीरिक क्षमता वाढते. त्यासह मनाचीही क्षमता वाढते. नियमित व्यायाम करणार्‍याचे मन ताणतणाव सहन करण्यास सक्षम होते. व्यायाम करणार्‍याला वातावरणातील किंवा आहारातील पालट सहसा बाधत नाहीत. व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवल्यास साथीच्या रोगांचाही प्रतिकार करण्यास साहाय्य होते. व्यायाम करण्यासाठी कोणताही व्यय (खर्च) येत नाही. रोगनिवारणाचा असा विनामूल्य उपचार प्रत्येकाला करणे सहज शक्य असतांना केवळ ‘आळस’ या एका स्वभावदोषामुळे तो नियमित केला जात नाही. चला ! आजपासून नियमित व्यायाम करूया !’

 

८. व्यायामामध्ये सातत्य राखण्यासाठी करायचा सोपा उपाय

‘व्यायामाचे महत्त्व समजल्यावर बहुतेकजण उत्साहात व्यायाम चालू करतात; परंतु हा उत्साह ३ – ४ दिवसांत मावळू लागतो. उत्साहाच्या ऐवजी आळस प्रबळ होतो आणि ‘आज असो. उद्या करू’, हा विचार डोके वर काढतो. व्यायामामध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृतीच्या स्तरावरील एक सोपा उपाय म्हणजे ‘५ मिनिटांचा नियम’ वापरणे. ‘कोणतीही कृती अगदीच न करण्यापेक्षा ५ मिनिटे करूया; म्हणून आरंभ करणे’, म्हणजे ‘५ मिनिटांचा नियम वापरणे’. जेव्हा ‘आज व्यायाम नको करूया’, असा विचार मनात येईल, त्या वेळी ‘५ मिनिटेच व्यायाम करूया’, असे म्हणून व्यायाम चालू करावा. व्यायाम चालू केल्यावर आपोआप उत्साह येतो आणि कधी अर्धा घंटा व्यायाम होतो, ते समजतही नाही. त्यातही आळस पुष्कळ प्रबळ झालाच, तर आपण ५ मिनिटांनंतर थांबू; परंतु अगदी काहीच केले नाही, असे तरी होणार नाही. व्यायामाचा सुपरिणाम दिसू लागल्यावर व्यायामाची गोडी लागेल आणि मग आपोआप व्यायामात सातत्य राहील.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०२२)

Leave a Comment