अनुक्रमणिका
१. पांडुरंगाचे कर्नाटकातून पंढरपूरला येणे
१ अ. मूळ आदिम (अ-नागर) असलेला देव ‘पंडरिगे’ या गावी येऊन ‘पंढरीचा पांडुरंग’ होणे
महाराष्ट्रात धर्माला फार महत्त्व दिले जाते. धर्मतेज जागवणारा पंढरीचा विठोबा हा महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. काही जण म्हणतात, ‘हा धनगरांचा देव आहे. हा मूळ ‘आदिम’ (आदिवासी), अ-नागर देवच पुढे धनगरांसह ‘पंडरिगे’ या गावी आला आणि पुढे तो ‘पांडुरंग’ झाला.’ पंडरिगे या गावाची ‘पंढरी’ झाली. पूर्वी तेथे धनगरांच्या वस्त्या होत्या; परंतु नंतर नागरवस्तीमुळे पुढे या पंढरीला ‘पंढरपूर’ या नावाने संबोधण्यात येऊ लागले. अशा रितीने पंढरीचे पंढरपूर झाले.
१ आ. कर्नाटकाचा ‘सावळा विठ्ठलु’ भक्ताच्या प्रेमापोटी पंढरपूरला येणे
पुंडलिकाच्या वेळी पंढरपूरला स्थापन झालेली पांडुरंगाची ही मूर्ती पुढे कर्नाटकातील विजयनगरच्या राजाने त्याच्या साम्राज्यात नेली. त्याने त्या मूर्तीची तुंगभद्रेच्या तिरावर स्थापना केली. त्या काळी महाराष्ट्रातील पैठण येथील संत भानुदास (संत एकनाथ महाराज यांचे आजोबा) हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. त्यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता. एकदा विठ्ठलाने प्रसन्न होऊन त्यांना दृष्टांत दिला आणि ‘मी कर्नाटकात आहे. तू मला पंढरपुरात नेऊन माझी स्थापना कर’, असे त्यांना सांगितले. विठ्ठलाने सांगितल्याप्रमाणे संत भानुदास यांनी विजयनगरच्या राजाकडे जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीची मागणी केली. राजालाही दृष्टांत झाला होता. त्यामुळे संत भानुदासांचे विठ्ठल प्रेम आणि भक्ती पाहून राजाने ती मूर्ती त्यांना दिली. संत भानुदासांनी ती मूर्ती पंढरपूरला आणून तिची प्रतिष्ठापना केली.
१ इ. शैव आणि वैष्णव दोघांचाही देव !
पांडुरंग हा शैव आणि वैष्णव दोघांचाही देव आहे. याला शैव आणि वैष्णव दोघेही भजतात. शैव पंथीय पांडुरंगाला ‘वीरभद्र’ म्हणजेच ‘विठ्ठल’ म्हणतात, तर वैष्णव त्याला ‘गोपाळकृष्ण’ असे म्हणतात. तो विष्णु आणि शिव यांचा अवतार आहे; म्हणूनच तो ‘हरिहर’ आहे. असा हा पांडुरंग श्रीकृष्णाचाच अवतार आहे.
१ ई. बौद्ध आणि जैन यांनाही विठ्ठल ‘आपला देव’ वाटणे
काही जण ‘विठ्ठल हा भगवंताचा नववा अवतार बुद्ध आहे’, असेही म्हणतात. (आद्यशंकराचार्यांच्या काळात भारतात काही नवीन धार्मिक प्रवृत्तींचा उदय होऊन जैन, बौद्ध इत्यादी धर्मपंथ उदयास आले होते. महाराष्ट्रातही बौद्ध धर्माचा प्रभाव असल्याचे दिसून येते; कारण कोकण किनारपट्टी, घाटमाथा, मराठवाडा येथील सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये बुद्धाच्या कलाकृती असलेल्या गुंफा दिसतात.)
जैन विठ्ठलाला ‘तो बाविसावा तीर्थंकर नेमीनाथ आहे’, असे मानतात. नेमीनाथ आणि कृष्ण हे दोघेही गोपाळच होते. ते यदुकुलोत्पन्नच होते. नेमीनाथ हाही विठ्ठलासारखा वर्णाने सावळा होता. नेमीनाथांचे शंख हे चिन्ह विठ्ठलानेही धारण केले आहे. त्यामुळे या सर्व लक्षणांवरून ‘विठ्ठल हा दिगंबर नेमीनाथ असावा’, असे जैनांचे मत आहे.
२. कानडा राजा पंढरीचा !
२ अ. विठ्ठल हाच ‘दाक्षिणात्यांचा श्रीव्यंकटेश, म्हणजेच तिरुपती बालाजी’ असणे
दक्षिणेला हाच गोपाल ‘श्रीव्यंकटेश ऊर्फ तिरुपती बालाजी’ म्हणून प्रसिद्ध आहे; कारण व्यंकटेशाची पत्नी पद्मावती आहे, तर विठ्ठलाच्या पत्नीचेही नाव पद्मावती (पदुबाई) आहे. व्यंकटेशाची पत्नी पद्मावती त्याच्यावर रूसून तिरूयानूर येथे चिंचेच्या वनात रहायला गेली, तर विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी ही दिंडीर वनात (चिंचेच्या वनात) जाऊन बसली होती.
‘विठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हणतात’, तसेच व्यंकटेशालाही कर्नाटकातील पर्वताच्या स्थलनामावरून ‘वेंगडम्’ असे म्हणतात. त्यामुळेच त्याला ‘विठ्ठलेश्वर अथवा व्यंकटेश’ असेही म्हणतात.
२ आ. विठ्ठल आणि तिरुपति यांच्यातील साम्य
कुरूबा (‘कुरूबा’ समाज हा धनगर पोटजातीपैकी एक आहे.) आणि धनगर यांचा देव एकरूप होऊन त्यातून ‘विठोबा’ निर्माण झाला. शिला प्रतिमेतून ही जी सांगोपांग मूर्ती घडली, ती मात्र या दोन्ही जमातींनी शतकानुशतके त्याच रूपात जपून ठेवली असली पाहिजे; म्हणूनच विठ्ठल आणि तिरुपति या दोन्ही मूर्तींत पुष्कळ साम्य आढळते. पंढरीचा विठोबा दोन्ही हात कटीवर ठेवून उभा आहे, तर कर्नाटकात तो एक हात कटीवर आणि दुसरा हात वरद मुद्रेत असलेला अशा स्वरूपात अनेक ठिकाणी पहायला मिळतो. त्यामुळेच संतांनी ‘सावळा हो विठ्ठलु कर्नाटकु’, असे त्याचे वर्णन केले आहे. संतांनी त्याला ‘कानडा’ म्हणूनही हाक मारली आहे. चैतन्याची ज्या अनुसंधानातून आराधना केली जाते, त्या स्वरूपात ते प्रगट होते.
ज्याचा जसा भक्तीभाव असेल, तशी त्याला देव अनुभूती देतो. बंगालमधील कोलकाता येथील कोळ्यांच्या राणीने दक्षिणेश्वरीदेवीची स्थापना केली होती. त्या देवळात तिने श्रीरामकृष्ण परमहंस यांची पुजारी म्हणून नियुक्ती केली होती. श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या भक्ती-भावामुळे देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना दर्शन दिले. अनेकांना वाटते, ‘दगडात देव असतो का ?’; परंतु ‘भक्ती-भावाने दगडालाही पाझर फुटतो’, हे ध्यानात घ्यायला हवे.
३. पांडुरंगाचा मोहक सावळा रंग
३ अ. कृष्णाप्रमाणेच अद्वैताचे प्रतीक असलेला पांडुरंगाचा सावळा रंग
पांडुरंग हे सामान्यांचे दैवत आहे. पांडुरंगाचा रंग सावळा आहे आणि कृष्णही सावळाच आहे. काळा रंग हा अद्वैताचा आहे. वृंदावनातील गोपी कृष्णाला म्हणत, ‘‘अरे कृष्णा, तू अमावास्येला अंगावर काळी घोंगडी घेऊन यमुनाकाठी कदंब वृक्षावर बसलास की, तू आम्हाला दिसतच नाहीस; कारण रात्र काळी, यमुना काळी, तू काळा आणि घोंगडीही काळीच ! अशा वेळी हे सर्व अद्वैत होऊन जाते.’’
३ आ. सगुण-निर्गुण रूपी पांडुरंग
संत ज्ञानदेव म्हणतात, ‘तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ।’ म्हणजेच तो सगुण आहे आणि निर्गुणही आहे. त्याचे सगुण स्वरूप हे निर्गुणच आहे. तो स्वच्छ म्हणजे निर्मळ आहे. त्याची इंद्रिये विकाररहित आणि स्वच्छ आहेत. तो आत-बाहेर स्वच्छ आहे; म्हणून तो ‘पांडुरंग’ आहे.
एकदा लहानपणी संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई खेळत असतांना मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणाली, ‘‘अरे दादा, तू या पांडुरंगाला निर्गुण म्हणतोस; परंतु हा तर सगुण स्वरूपात येथे कटीवर हात ठेवून उभा आहे.’’ त्यावर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘‘मुक्ता, मी तुला गुरुमुखातून सांगतो. अगं, हा निर्गुणी बुंद (बिंदु) सगुणी उतरला आहे.’’
एकूणच हा निर्गुणच सगुण स्वरूपात इथे दिसत आहे. तो कष्टकरी, शेतकरी, सामान्यजन आणि अनाथ यांचा कैवारी आहे; म्हणून तो (उन्हात कष्ट करून रापलेला असा) काळ्या रंगाचा झाला आहे. असा हा सगुण-निर्गुण रूपी पांडुरंग आहे.
४. एकादशीचे माहात्म्य
४ अ. आषाढ आणि कार्तिक मासांतील एकादशींचे महत्त्व
कोणत्या तरी विशिष्ट वारीला, तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. तो काळ त्या देवतेचा काळ मानला जातो, उदा. शिवाचा सोमवार, दत्ताचा गुरुवार, तशी श्रीविष्णूची एकादशी. वर्षभरात २४ वेळा येणार्या एकादशींच्या तुलनेत आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.
५. संत एकनाथ महाराज यांनी एकादशीविषयी केलेले वर्णन
५ अ. ‘एकादशीचा ज्या ज्या वेळी जो-जो उत्सव केला जातो, तो-तो भगवंताला पोचतो, यात संशय धरू नये. भगवंत म्हणतो, ‘जो एकादशी व्रत करतो, त्याच्या घरी मी नित्य रहातो. एकादशी सर्व पर्वकाळात श्रेष्ठच आहे. एकादशी व्रत करणारा सर्व व्रते आणि तीर्थे यांचा राजाच आहे. तो माझ्या परिवारातीलच एक आहे. मला तो फार प्रिय आहे.’
५ आ. चातुर्मासातील सर्व एकादशी तिथी आणि निरनिराळ्या जयंती यथाशास्त्र करणे योग्य आहे. शयनी, प्रबोधिनी, पवित्रा इत्यादी एकादशी, तसेच कटिनी, निराजनी, वसंतदमनका रोपणी इत्यादी जयंती यांच्या विविध पर्वकाळी नाना प्रकारच्या पूजा बांधाव्यात. आरती आणि दीपमाळा प्रज्वलित कराव्यात. टाळ आणि मृदंग वाजवून मोठा उत्सव करावा. मोठ्या उत्साहाने दिंड्या, पताका, ध्वज इत्यादी घेऊन नामाचा घोष करत पांडुरंगाच्या दर्शनयात्रेला जावे; कारण या देवाच्या यात्रेला जो जातो, तो जणू देवच आपल्या घरी आणतो आणि आपल्या आवडत्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो.’(साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय ११, ओवी १२६६ ते १२८२)
५ इ. एकनाथ महाराज म्हणतात, ‘भागवताच्या अकराव्या स्कंधाच्या अकराव्या अध्यायात भगवंताची अकरा पूजास्थाने सांगितली आहेत. सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय, वैष्णव, आकाश, वायु, जल, पृथ्वी, स्वतःचा आत्मा आणि सर्व प्राणिमात्र अशी अकरा पूजास्थाने आहेत.’ (साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय ११, ओवी १३२८)
६. एकादशीमधील अकरा (११) या अंकाचे वर्णन
६ अ. ‘अकराव्या पूजास्थानाची, म्हणजे सर्व भुतांची पूजा करावी’, असे संत एकनाथांनी म्हटले आहे. पहिला १ हा ‘पूज्य’ (भगवंत, परमात्मा) आणि दुसरा १ हा ‘पूजक (आत्मा) आहे.’ पूज्य आणि पूजक दोन्हीकडे ‘एकच (१)’ आहे, म्हणजे ऐक्य झाले. ११ हा आकडा १० इंद्रिये आणि १ मन मिळून देहातील जाणिवेचे प्रतीक आहे. ती जाणीव सर्व प्राणिमात्रांत आहे; म्हणून त्याने सर्व भुतांची पूजा होते. जो स्वतःचे सर्व भोग भगवंताला अर्पण करण्याची भावना ठेवतो, तोच आत्मतत्त्व जाणतो. तेच सर्वत्र समत्वाने आहे.’ (साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय ११, ओवी १४४७ ते १४४९)
६ आ. ‘हे यदुश्रेष्ठ उद्धवा, सर्व भूतमात्रांची समत्वभावाने पूजा करणे ही माझीच पूजा आहे. त्या पूजेने माझा भक्त आवडीने मद्रूप होतो. या अकराही पूजा समत्वरूपच आहेत.’ (साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय ११, ओवी १४५५)
६ इ. दहा इंद्रिये आणि एक मन संपूर्णत पांडुरंगाला अर्पण करणे म्हणजे ‘एकादशी’. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या तिथींना पंढरपूरची यात्रा असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकर्यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची. या ओढीनेच तो वारकरी या ठरलेल्या वाराला पांडुरंगाकडे जाण्यासाठी निघतो; म्हणून ती ‘वारी’ आणि अशा भावनेने अन् पांडुरंगाच्या ओढीने ही वारी नियमितपणे प्रतिवर्षी करणारा तो ‘वारकरी !’
संकलक : परात्पर गुरु परशराम माधव पांडे
संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’
७. विठ्ठलाची उपासना भक्तीभावाने करण्यास सांगणारे सनातनचे ग्रंथ !अ. पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)
आ. लघुग्रंथश्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादन यांच्या ‘ऑनलाइन’ खरेदीसाठी संपर्क : ९३२२३१५३१७ |
वा सुंदर आसे लेख वाचून मनःपूर्वक आपले आभार मानतो महाराज, आसेच भक्ती लेख आम्हाला सतत यावे हि विनंती
khuup chaan Maahiti waachun, Adnyaanaachyaa andhaaraatun Nyaanaachyaa prakaashaachi kirane prapt zaalit.yaa pavitra parvkaalaatali hi moththi upalabdhich aahe.Mothhach Thewaa….Namaskaar…sarwe bhawantu sukhinaahaa…