अनुक्रमणिका
वर्ष २०१५ मध्ये सप्तर्षींनी नाडीभविष्याद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व उलगडले; मात्र सनातनच्या साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाविषयी फार पूर्वीपासून अनुभूती येतात. पूर्वीपासूनच समाजातील संत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची अवतारी वैशिष्ट्ये जाणली होती. सूर्य उगवल्याचे सर्वांना सांगावे लागत नाही, ते आपोआपच कळते, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाची अनुभूती सर्वांना येते !
१. कल्याण, ठाणे येथील संत योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
यांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे भावोद्गार !

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांना विचारले, ‘‘ईश्वराच्या इच्छेप्रमाणे हिंदु राष्ट्र येणारच आहे, तरीही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मी जिवंत रहावे, यासाठी तुम्ही एवढी प्रयत्नांची पराकाष्ठा का करता ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘तुमच्यातच ‘राम’ असल्याने रामराज्याच्या स्थापनेसाठी तुम्ही हवे आहात. तुम्ही गेलात, तर सर्व कोसळेल.’’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०१७, सकाळी १०.५९)
२. परात्पर गुरु डॉक्टर आठवले हेच ईश्वरी राज्याची स्थापना करणार आहेत !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत. तेच ईश्वरी राज्याची स्थापना करणार आहेत. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून सनातनचे साधक श्रीकृष्णाची चित्रे सप्तचक्रांवर लावतात.’
– प.पू. देवबाबा, शक्तीदर्शन योगाश्रम, कर्नाटक (दैनिक सनातन प्रभात, ३१.१०.२०१७)
‘परात्पर गुरु (डॉ.) आठवले हे आत्माराम आहेत; ते अवतार आहेत.’
– प.पू. आनंदसिद्ध महाराज, कोल्हापूर (१४.५.२०१९)
३. प.पू. ताई कर्वे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले
यांना त्यांच्या आश्रमातील श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या
हातातील बासरी देऊन ‘बासरी वाजवल्यावर लाखो साधक सनातनकडे येतील’,
असे सांगणे आणि १० वर्षांनी रामनाथी आश्रमात गोपींसारखा भाव असणार्या साधिका येणे
‘कृष्ण लहानपणापासूनच माझ्याशी बोलतो. तो मला सांगतो, त्याप्रमाणे मी कृती करते. कृष्णाने मला सांगितले, ‘बासरी वाजवल्यावर गोप-गोपी जसे एकत्र येतात, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्या हातात असलेली बासरी वाजवल्यावर लाखो साधक सनातनकडे येतील.’ वर्ष २००१ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्या आश्रमात आले होते. त्या वेळी मी आश्रमातील श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या हातात असलेली बासरी, श्रीकृष्णाचे चित्र असलेले पदक, तसेच एक घड्याळ त्यांना दिले. हे घड्याळ देण्यामागील उद्देश म्हणजे, कृष्ण सांगत आहे की, वेळ झाल्यावर मी येईन.’
– प.पू. ताई कर्वे, बदलापूर, ठाणे. (फोंडा, गोवा येथील आश्रमातील सत्संग : २ जानेवारी २००२)
४. परात्पर गुरु डॉ. आठवले हे
‘संभवामि युगे युगे ।’ या वचनाचे मानकरी ! – भागवताचार्य श्री. बाळासाहेब बडवे, पंढरपूर

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे पुजारी आणि माजी विश्वस्त भागवताचार्य श्री. बाळासाहेब बडवे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८.५.२०१७ या दिवशी परात्पर गुरुदेवांना गंध लावून साक्षात् श्री विठ्ठलाचा तुळशीहार घातला. त्या वेळी श्री. बाळासाहेब बडवे म्हणाले, ‘‘चतु:श्लोकी भागवतातील ‘एतावदेव जिज्ञास्यंतत्त्व…’ या ४ थ्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे स्वत:तील आत्मतत्त्व आपल्यासमोर सिंहासनावर विराजमान आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा तुळशीहार आज श्रीकृष्णालाच घातला. यावरून दोन्ही तत्त्वे एकत्र आली आहेत, हेच दिसते. ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।’ हा योग आज सार्थकी लागला. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ‘संभवामि युगे युगे ।’ या वचनाचे मानकरी आहेत.’’ (दैनिक ‘सनातन प्रभात’, २१.५.२०१७)
५. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे त्याने
परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने पृथ्वीवर पुनश्च अवतार घेतला आहे !

‘परात्पर गुरु डॉक्टरांचे शरीर म्हणजे श्रीमन्नारायण आणि त्यांच्या शरिरातील प्राण म्हणजेच भगवान शंकर ! त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमाच्या परिसरातील एकेका झाडामध्ये एकेका देवतेचे तत्त्व आहे. अनेक झाडांमध्ये श्री महालक्ष्मीचे तत्त्वही आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे, ‘संभवामि युगे युगे ।’, म्हणजे ‘मी प्रत्येक युगात पुनः पुन्हा अवतार घेतो’ त्याप्रमाणे त्याने परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार घेतला आहे ! आजचा राजा धर्मभ्रष्ट झाला असून प्रजा धर्माचरण विसरली आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने भगवान विष्णूने भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतला आहे’, हे लक्षात आले. अधर्माचरणामुळे समाज तामसिक आणि राजसिक आहाराकडे वळला आहे. परात्पर गुरु डॉक्टर समाजातील अशा लोकांनाही सात्त्विक आहाराकडे वळवत आहेत. या त्यांच्या दैवी कार्यास मी सर्वतोपरी साहाय्य करणार आहे !’
– सिद्धाचार्य वैद्य पुण्यमूर्ती, तंजावुर, तमिळनाडू (११.६.२०१६)
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना महर्षींनी ‘अवतार’ म्हणण्याचे लक्षात आलेले असेही एक कारण

‘परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘माझ्यात श्रीविष्णूचे अंशअंशात्मक तत्त्व आहे.’ पृथ्वीवर असे अनेक सिद्धमहात्मे असतील की, ज्यांच्यात त्यांच्या उपासनेप्रमाणे त्या त्या देवतेचे तत्त्व साधनेच्या प्रकारानुसार आलेले असते; परंतु त्यांच्यामध्ये आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये एक महत्त्वाचा भेद आहे आणि तो म्हणजे हे सिद्ध व्यष्टी साधनेत रमणारे आहेत, तर परात्पर गुरु डॉ. आठवले मात्र सार्या पृथ्वीवरच धर्मसंस्थापना करण्याचे समष्टी उद्दिष्ट घेऊनच जन्माला आलेले आहेत. धर्मसंस्थापनेचे कार्य करणार्या देवत्वालाच केवळ ‘अवतार’ म्हटले जाते, उदा. श्रीराम आणि श्रीकृष्ण. या अवतारांनी रावणाचे आणि कंस-कौरवांचे आसुरी राज्य उलथवून सार्या प्रजेला सुखी केले. अगदी हेच कार्य डोळ्यांसमोर ठेवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रत्येक पाऊल धर्मसंस्थापनेच्या दिशेने पडत आहे; म्हणूनच त्यांनी पृथ्वीवर याआधी कुणीही मांडली नाही, ती हिंदु राष्ट्राची, म्हणजे ईश्वरी राज्याची संकल्पना वर्ष १९९९ मध्ये ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ प्रकाशित करून सर्वप्रथम मांडली. कलियुगात असे प्रथमच घडले; म्हणून देवतेचे तत्त्व अंगी असणार्या प्रत्येकालाच महर्षि अवतार म्हणत नाहीत, तर केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच अवतार म्हणतात. त्यामुळे तेच अवतार का ? याचे कारणही थोड्याफार प्रमाणात वाचकांच्या लक्षात येण्यास यातून साहाय्य होईल.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (६.४.२०१७)
‘प.पू. डॉक्टर हे कलियुगातील कल्की अवतारच आहेत.’
– श्री. गुरुप्रसाद सुखटणकर, अध्यक्ष, ‘ॐ श्री आदी गुरु दत्तात्रय स्वामी महाराज दत्तात्रय चॅरिटेबल ट्रस्ट, इंडिया
‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्वयं श्रीरामच आहेत. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !’
– कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज, रामपूर (कर्नाटक) (१६.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |