सनातनचे ९ वे संत पू. सदानंद (बाबा) नाईक !

अनुक्रमणिका

१. पू. सदानंद (बाबा) नाईक यांनी संत झाल्यावर व्यक्त केलेले मनोगत

२. सनातनचे संत पू. सदानंद (बाबा) नाईक यांचा बालपणापासून ते सनातन संस्थेपर्यंतचा साधनेचा प्रवास

३. पू. सदानंद नाईक यांनी त्यांच्या साधनेच्या प्रवासातील सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

४. पू. सदानंद (बाबा) नाईक यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे

५. पू. सदानंद बाबांना त्यांची कन्या कु. नंदा यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र

६. वयाच्या ७१ व्या वर्षीही तरुण-साधकांना लाजवेल, अशी सेवावृत्ती असणारे पू. बाबा (सदानंद) नाईक !

७. अध्यात्मातील प्रेमळ आणि खरे मित्र पू. सदानंद (बाबा) नाईक !

८. पू. सदानंद (बाबा) नाईक संत झाल्यावर त्यांच्या कर्णेंद्रियांची क्षमता पूर्ववत होणे

९. पू. सदानंद (बाबा) नाईक यांच्या संदर्भातील अनुभूती


पू. बाबा (सदानंद) नाईक

पू. बाबा (सदानंद) नाईक

‘कार्तिक शुद्ध द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी पू. सदानंद (बाबा) नाईक हे संतपदाला पोहोचल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्त सनातनच्या रामनाथी आश्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत, तसेच त्यांचा साधनेतील प्रवास, त्यांच्याविषयी त्यांची साधक-मुलगी कु. नंदा यांनी आणि इतर साधकांनी लिहून दिलेली माहिती येथे देत आहोत. त्यावरून पू. बाबा नाईक यांनी स्वतः साधना कशी केली आणि इतर साधकांनाही कसे घडवले, हे लक्षात येईल.

१. पू. सदानंद (बाबा) नाईक यांनी संत झाल्यावर व्यक्त केलेले मनोगत

१ अ. सन्मान सोहळ्याच्या काही दिवस आधीपासून साधकांशी बोलतांना
शब्दांत आपोआप शक्ती आणि चैतन्य येऊन त्यांच्यावर उपाय होत असल्याचे लक्षात येणे

कार्तिक शुद्ध द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी मला रामनाथी आश्रमातील ध्वनीचित्रीकरण कक्षात बोलवले होते. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना पाहून मला आनंद वाटत होता. पू. कुवेलकरआजींचा सन्मान होत असतांना मला आतून आनंद जाणवत होता. त्यानंतर माझाही सन्मान झाला. काही दिवसांपासून मी साधकांशी बोलतांना ‘माझ्या शब्दांत आपोआप शक्ती आणि चैतन्य येत आहे, तसेच साधकांवर उपाय होत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मला माझी प्रगती होत असल्याचे जाणवले. तेव्हा मी मनोमन प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ राहू लागलो.

१ आ. पू. गाडगीळकाका, पू. संदीपदादा आणि पू. अनुराधा वाडेकर हे संतपदाला
पोहोचल्याचे आधीच जाणवणे अन् ‘या संतांकडून विभागातील साधकांवर उपाय होतील’, असे वाटणे

माझ्यानंतर पू. गाडगीळकाका आणि पू. संदीपदादा यांचा सन्मान झाला. त्या दोघांची पातळी वाढल्याचे मला आधीच जाणवले होते. त्यानंतर पू. अनुराधा वाडेकर संत झाल्याचे घोषित झाल्यावर माझे मन आनंदाच्या लाटांवर आरूढ झाले. ताईंचीही पातळी वाढल्याचे मला आधीच जाणवले होते. सर्व संतांना पाहून ‘या संतांकडून त्यांच्या विभागातील साधकांवर उपाय होतील’, असे मला आतून जाणवत होते. माझ्या विभागातील साधकांवरही ‘माझ्या माध्यमातून उपाय होतील’, असे वाटले. प.पू. डॉक्टरांना अजूनही त्रास असणार्‍या साधकांवर लक्ष ठेवावे लागते. आपण त्यांचा थोडासा भार हलका करू शकतो. त्यामुळे प.पू. डॉक्टरांना त्यांचे महान कार्य करायला वेळ मिळेल, असे वाटले.

१ इ. ६० टक्के पातळी गाठलेल्या सर्व साधकांचे सन्मान करावे
लागतील का, असा विचार मनात येणे आणि प.पू. डॉक्टरांनीही तसेच करायला सांगणे

कार्तिक शुद्ध पंचमी, कलियुग वर्ष ५११३ (३१.१०.२०११) या दिवशी मला श्री. क्षत्रियकाका यांनी ६१ टक्के पातळी गाठल्यामुळे त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली. ‘आता येथून पुढे ६० टक्के पातळी गाठलेल्या सर्व साधकांचे सन्मान मला करावे लागतील का’, असा माझ्या मनात प्रश्न आला. त्याच दिवशी संध्याकाळी पू. संदीपदादा प.पू. डॉक्टरांकडे गेले असता ते म्हणाले, ‘‘आता येथून पुढे कोणाचे सन्मान करायचे असतील, तर बाबा नाईक करतील. आता मी सुटलो.’’ हे ऐकून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

१ ई. मनातील विचार

१ ई १. साधकांवर प्रीती करणे

प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात जाऊन त्याला समजून घेणे, त्याच्या अडचणी समजून घेणे, साधकांवर प्रीती करणे, ही माझी साधना असल्याचे मला ६६ टक्के पातळी झाल्यापासूनच वाटत होते. ते आता अधिक तीव्रतेने वाटत आहे.

१ ई २. साधकांना आधार देणे

प्रत्येक साधकामध्ये प.पू. डॉक्टरांचे रूप असल्याने त्याला आधार देऊन पुढे घेऊन जावे, असे मला वाटते.

१ ई ३. कोणताही साधक साधनेत पुढे गेला, तर मला अतिशय आनंद वाटतो
१ ई ४. मनाने संघटित झाल्यास वाईट शक्ती त्रास देऊ न शकणे

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’, म्हणजे ‘कलियुगात संघटित रहाण्याने शक्ती, सामर्थ्य प्राप्त होते’, या उक्तीप्रमाणे सनातनचे सर्व साधक मनाने एकत्रित आले, तर वाईट शक्ती आपल्याला अधिक काळ त्रास देऊ शकणार नाहीत. आपण सर्व साधक आनंदी झालो, तर प.पू. डॉक्टरांनाही अतिशय आनंद होईल.

‘संतकृपा झाली, इमारत फळा आली ।’ या ओवीनुसार ईश्वराने मला आपल्या चरणांशी घेतले आणि संत बनवले, यासाठी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– पू. सदानंद (बाबा) नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. सनातनचे संत पू. सदानंद (बाबा) नाईक
यांचा बालपणापासून ते सनातन संस्थेपर्यंतचा साधनेचा प्रवास

२ अ. बालपण

२ अ १. मी ६ वर्षांचा असल्यापासून वडिलांसह आनंदाश्रम मठ, कुर्टी, फोंडा येथे (दत्त मठ) मठाधिपती सीताराम महाराज आणि त्यांच्या पत्नी सौ. जानकीआई यांच्याकडे जात असे.
२ अ २. मठात द्यावयाचे दूध सांडल्यावर दुधात पाणी घालून दिल्यावर सौ. जानकीताईंनी ‘असे करू नये’, असे सांगणे

मी ८-१० वर्षांचा असल्यापासून या दत्तमठात घरचे दूध घालण्यासाठी जात असे. त्या वेळी ते दोघेही माझे पुष्कळ लाड करायचे. एक दिवस दूध नेतांना आडवाटेने जातांना वाटेत मी पडलो आणि सगळे दूध सांडले. त्यात केवळ १-२ चमचे दूध राहिले होते. माझे काका नेहमी मठात जायचे. ते मला दूध सांडल्यामुळे मारतील, या भीतीने मी त्या दोन चमचे दुधात पाणी घातले आणि ते दूध मठातल्या ठिकाणी ठेवून निघणार तेवढ्यात सौ. जानकीआई आल्या आणि त्यांनी माझे कान पकडून सांगितले, ‘‘असे पुन्हा करू नकोस.’’

२ अ ३. दत्तमठात कोणतीही सेवा नाम घेत करायची, अशी शिस्त असून तसे न करणार्‍यास शिक्षा होणे

दत्तमठात जी सेवा सांगितले जाते, ती सेवा मोठ्याने नाम घेतच करायची, अशी तिथे शिस्त होती. तिथे वयस्क साधक असायचे, ते नामाच्या बळावर जड दगड उचलून कुंपणाची भिंत बांधत असता रस्त्याने जाणारे लोक आश्चर्याने गाडी थांबवून पहात असत. तिथे कुणीही दोघे मिळून गप्पागोष्टी करत असतील, तर महाराज त्यांच्या डोक्यावर लाकडी खडावा मारायचे. तेथे रक्त यायचे. जेवतांनाही हीच शिस्त असे.

२ आ. संतांची सेवा आनंदाने करणे

काही वर्षांनी मी जड वाहन चालवण्याचे अनुज्ञप्ती पत्र काढले. काही वेळा महाराजांच्या मुलास मुंबई-गोवा वा इतर ठिकाणी घेऊन जात असे. मी गाडी भाड्यानेही चालवत असे. त्यामुळे माझा सगळी तीर्थक्षेत्रे आणि दिल्लीपर्यंत प्रवास झाला. त्या वेळी बर्‍याच संतांना गाडीतून प्रवास घडवायचा योग मला लाभला. काही वेळा संत आमच्या घरीही रहायला यायचे. संत जितके दिवस घरी रहात तितके दिवस मी त्यांची आनंदाने सेवा करत असे.

२ इ. एका संतांनी सिद्धीच्या बळावर तोंडातून चांदीच्या पादुका आणि लिंग काढून
भक्तांना पूजेत ठेवण्यास देणे; परंतु एकदा त्यांचा हा प्रयोग फसल्यावरही त्यांच्याशी आदराने वागणे

एक दिवस मुंबईचे एक संत गोव्यात भेटले. त्यांनीही माझ्यावर पुष्कळ माया केली. ते आमच्या घरी चार चार दिवस येऊन रहायचे. ते सिद्धीच्या बळावर तोंडातून चांदीच्या पादुका आणि लिंग काढून साधकांना पूजेत ठेवण्यास देत असत. एक दिवस घरातील आरतीच्या वेळी त्यांनी मला सिद्धीप्रयोग दाखवण्यासाठी हाती आरती घेऊन प्रयत्न केला; पण त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांच्या हातून आरतीचे निरांजन खाली पडले. त्या वेळी त्यांना आमची कुलदेवी कामाक्षीदेवीने साक्षात्कार दिला आणि त्यांना सांगितले, ‘इकडे तुझे काही चालणार नाही, हा भक्तीमार्गी आहे.’ त्यावर त्यांनी देवीची क्षमा मागितली. त्यानंतरही मी त्यांच्याकडे जात असे. त्या वेळी ते मला आदराने आत घेऊन जायचे.

२ ई. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर ‘या साधनेचा सर्वांनाच लाभ होईल’, याची जाणीव होणे

एक संत मला त्यांच्या संप्रदायात बोलवायचे; पण मला संप्रदायातील अनुयायांच्या वागण्यामुळे ती साधना करावीशी वाटली नाही. मी वयाच्या ५४ व्या वर्षी सनातनच्या संपर्कात आलो. तेव्हा ‘या साधनेचा मला लाभ होईल आणि सर्वांतच पालट होईल’, याची मला जाणीव झाली.

– पू. सदानंद नाईक, रामनाथी, सनातन आश्रम, गोवा.

३. पू. सदानंद नाईक यांनी त्यांच्या साधनेच्या प्रवासातील सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

३ अ. सेवेचे महत्त्व

३ अ १. न थकता सेवा करता येणे

२००० मध्ये पूर्णवेळ साधनेला सुरुवात केली. कितीही सेवा केली, तरी जागरणाचे त्रास व्हायचे नाहीत, तसेच थकवा येत नव्हता. माझ्या सेवेतील आणि इतर संप्रदायांतील लोकांच्या सेवेतील फरक लोकांना कळायचा.

३ अ २. सेवेत केवळ नाममात्र रहाणे

मी सेवेत नाममात्र होतो, प.पू. डॉक्टरच माझ्याकडून सर्वकाही करून घ्यायचे.

३ अ ३. फलनिष्पत्ती वाढवण्याकडे पहिल्यापासूनच कल असणे

मला दिलेली सेवा लवकर कशी संपवायची, असे प्रयत्न करायचो. त्यामुळे फलनिष्पत्ती पहिल्यापासूनच अधिक होती. पूर्वी जाहिरसभेतील सेवा करून संपली की, संस्थेच्या गाड्या धुवायला सुरुवात करत होतो. कधीच सेवेविना रिकामा बसत नव्हतो.

३ अ ४. सेवेतील भाव

‘वेडा झाला म्हणून हिणविती मजला ।’, या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनाप्रमाणे मला ‘सेवेत वेडे व्हायचे आहे’, असे वाटायचे.

३ आ. साधनेतील नामजपाचे महत्त्व

३ आ १. नाम हाच वाटाड्या

नामानेच मला वाट दाखवली. ‘नाम हाच मार्गदर्शक आहे’, असे प्रथमपासूनच वाटायचे. नामजप सतत होईल, यासाठी प्रयत्न करत होतो.

३ इ. पू. बाबांचा भाव दर्शवणारी वाक्ये

३ इ १. सर्व ईश्वरच करतो, असा भाव !

‘सर्व ईश्वरच करतो’, असा भाव पहिल्यापासूनच होता. ‘ईश्वराचे कार्य ईश्वरच करून घेतो’, अशी दृढ श्रद्धा होती. प्रत्येक सेवेत ‘मी’पणाची भावना कमी होती.

३ इ २. सहसाधकांविषयी असलेला कृतज्ञता भाव !
३ इ २ अ. मार्गदर्शक साधकांचे सूक्ष्मातून पाय चेपणे

डॉ. पांडुरंग मराठे, श्री. प्रकाश जोशी, डॉ. नंदिनीताई, डॉ. दुर्गेश सामंत, श्रीहरिभाई आणि सौ. दीपा मामलेदार यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले. ते मी सर्व आचरणात आणले. त्यांनी मला साधनेत आणले म्हणून अजूनही मी त्यांचे पाय सूक्ष्मातून चेपतो.

३ ई. प.पू. डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेची उदाहरणे !

३ ई १. तत्त्वनिष्ठता

प.पू. डॉक्टरांच्या दर्शनानेच सर्व प्रश्न सुटतात. मला माझ्या समस्या त्यांना सांगण्याची गरजच वाटत नाही. या सर्व समस्या आत्मनिवेदनानेही सुटतात, याचा मला अनुभव आहे.

३ ई २. प.पू. डॉक्टरांच्या शब्दांवर १०० टक्के विश्वास असणे

‘प.पू. डॉक्टरांनी सांगितले आणि मी केले’, एवढेच सूत्र मला कळत होते. ‘मला हे जमणार नाही’, असे मी प.पू. डॉक्टरांना कधीच सांगितले नाही. त्यांनी सांगितले, तर ती प्रत्येक गोष्ट होणार. ती गोष्ट होणार नाही, असे होत नाही. ती कशी करायची याचा विचार आपण केला पाहिजे. प.पू. डॉक्टर काय सांगतात, त्यावर माझा १०० टक्के विश्वास आहे. त्यावर विश्वास ठेवून त्याचा अभ्यास करतो, तशी प्रार्थना करतो आणि त्याप्रमाणे अनुभूती येतात.

३ ई ३. सेवा करतांना प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे

वाळूची भरलेली गाडी आश्रमात आली की, मी ती पहाटे ४ वाजताच एकटा जाऊन रिकामी करायचो. प्रत्येक वेळी मी एकटा आहे, असे मला वाटायचे नाही. ‘माझ्याबरोबर प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून येतात’, असे जाणवत असल्याने सेवा करत असतांना आम्ही दोघे सतत बरोबर असायचो.

३ ई ४. प.पू. डॉक्टरांनी चुका दाखवणे

सेवेत चुका होत असतांना प.पू. डॉक्टर त्या चुका मला सूक्ष्मातून दाखवायचे. ते माझ्या बाजूलाच उभे असतात. त्यांचा आशीर्वादच माझ्याकडून सर्व करून घेतो.

३ ई ५. प.पू. डॉक्टरांनी रक्षण करणे

गाडी चालवतांना वाईट शक्ती मला पकडायला यायच्या. कधी कधी ‘माझा अपघात होतो कि काय’, असे मला वाटायचे. मी प्रार्थना करून प.पू. डॉक्टरांना हाक मारली की, त्या नष्ट व्हायच्या.

३ ई ६. प.पू. डॉक्टरांचा सहवास हेच नाम !

नामजप कमी झाला तरी सेवा करतांना ‘प.पू. डॉक्टर सतत बाजूला आहेत’, असे वाटते. ‘त्यांचा सहवास हेच नाम आहे’, असे जाणवते.

३ उ. आध्यात्मिक स्तर वाढत गेला, तसे पू. बाबांमध्ये व्यापकत्व येत जाणे आणि याची उदाहरणे

३ उ १. वाणीतील चैतन्य वाढणे

६४ टक्के पातळीला वाणीतील चैतन्य वाढत आहे, असे जाणवू लागले; कारण मी सांगेन, ते सर्व साधक ऐकायला लागले. बोलत असतांना शब्द आतून येतात, ते मी केवळ अनुभवतो. अनुभव हेच माझे शिक्षण !

३ उ २. बांधकाम विभागातील साधक स्वतःच्या मुलांप्रमाणे आहेत, असे वाटणे

‘बांधकाम विभागात सेवा करतांना तेथील सहसाधक ही माझीच मुले आहेत’, असे वाटू लागले. ‘ती मुले आपणहून काय करणार, मलाच त्यांच्याकडून साधना करवून घेतली पाहिजे, मी त्यात कुठेही कमी पडू नये’, यासाठी माझे प्रयत्न सुरू झाले. प्रत्येक साधकात ईश्वर बघणे, जमू लागले.

३ उ ३. प्रत्येक गोष्टीत आनंद अनुभवास येणे

जे मला येते, ते ईश्वराला अर्पण झाल्याशिवाय पुढचा मार्ग आपल्याला मिळत नाही. पूर्वीच्या प्रतिक्रियात्मक गोष्टी आता मला आठवत नाहीत. आता प्रत्येक गोष्टीत मी आनंद अनुभवतो. प्रत्येकाला विचारतो, ‘नाम आणि प्रार्थना चालू आहे का ?’

३ उ ४. आध्यात्मिक उपाय करण्याची क्षमता निर्माण होणे

वाईट शक्तींवर उपाय होण्यासाठी मी केवळ माध्यम असतो. मला वाईट शक्तींची जाणीव होते. त्या मला सावलीसारख्या दिसतात.

३ उ ५. नामजपाच्या नादासारख्या उच्च स्तराच्या अनुभूती येणे

नामजपाचा नाद ऐकायला येतो. नाम एवढे होते की ‘नामात देव आहे’, याची मला अनुभूतीयेते. मी कुठेही गेलो, तरी नाम माझ्या बरोबर असते.

३ ऊ. पू. बाबांनी आचरणात आणलेली इतर सूत्रे

३ ऊ १. व्यायामाचे पटलेले महत्त्व

व्यायामामुळे मी इतकी सेवा करू शकतो. पोटाचे व्यायाम अधिक केल्याने मी बर्‍याच व्याधींपासून दूर राहू शकलो आहे.

३ ए. संतपद येण्यापूर्वी स्वतःत होत असलेले पालट जाणवणे आणि त्याविषयीची सूत्रे

३ ए १. साक्षीभाव

सर्वत्र साक्षीभावाने पाहू लागलो.

३ ए २. साधकांप्रती भाव वाढणे

साधकांचे गुण पाहू लागलो, त्यामुळे प्रत्येक साधकाप्रती भाव वाढू लागला.

३ ए ३. सर्वांशी अंतर्मनाने एकरूप होणे

मनाने एकत्र आलो, तर अनिष्ट शक्तींपासून दूर राहू शकतो. अंतर्मनातून आपण एकरूप झाले पाहिजे, असे वाटू लागल्याने मी सर्वांशी मिळूनमिसळून वागू लागलो. त्यामुळे एकदम माझ्यात पालट झाला.

३ ए ४. तळमळ आणि अंतर्मुखता वाढणे

या २-३ महिन्यांत अचानक ईश्वरप्राप्तीची तळमळ खूप वाढली. ‘प.पू. डॉक्टरांना, प.पू. भक्तराज महाराजांना प्रत्येक गोष्ट सांगतो, विचारतो. सूक्ष्मातून विचारल्याने मी अधिक अंतुर्मख दिसतो.

३ ए ५. वाणी देवाचीच होणे

माझे शिक्षण नाही, तरी देव माझ्याकडून सर्व करून घेतो. मी सांगायचो, त्या गोष्टी मलाच सांगतांना अनुभवास येतात; कारण देवच माझ्याकडून सांगून घेतो. माझ्या शब्दांत वेगळीच शक्ती निर्माण झाली आहे.

३ ऐ. संतपद प्राप्त झाल्यावर मनात आलेले विचार

१. संतपद आल्यावर मी जे जे करत होतो, त्याचे मला उत्तर मिळाले.

२. गुरुकृपा मी अनुभवत आहे.

३. माझ्या संतपदाचा साधकांना लाभ होऊ दे, असे वाटले.

३ ओ. पू. सदानंदबाबांनी साधकांना दिलेला संदेश !

१. नम्रतेचा भाव वाढवा आणि तो प्रत्येकाच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवा.

२. साधकाचे दोष न पहाता त्यांचे गुण पहा.

३. प्रत्येक साधक पुढे जावा, असे प्रयत्न हवेत, तरच ईश्वर आपल्याला साहाय्य करेल.

४. साधकांकडून चुका झाल्या, तरी होऊ द्या, त्या दुरुस्त कशा करायच्या, हे पहा !

५. प्रत्येक साधकाला घेऊन पुढे जायचे आहे, हे लक्षात ठेवा.

६. उपायांना बसतात, तेथे झोपू नका. मान सरळ असते, ते ध्यान. मान आडवी पडली की ती झोपच असते.

७. अध्यात्मशास्त्र हे कृतीचे शास्त्र आहे. भाव आणि नम्रता असली, तरी कृतीही करायला हवी.

८. ‘सनातन प्रभात’ या दैनिकावर १०० टक्के विश्वास ठेवा आणि तसेच वागा.

९. भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारा. त्याला निवेदन करा, तरच तुमचे त्रास कमी होतील.

१०. मनात विकल्प आणू नका, विकल्पामुळे सेवेचा लाभ होत नाही.

११. ‘या सेवेच्या माध्यमातून माझ्यावर उपाय होऊ देत’, अशी प्रार्थना करा, म्हणजे उपाय करण्यात धर्मकार्यातील अमूल्य वेळ जाणार नाही.

१२. वाईट शक्तींशी क्षात्रभावाने लढा.

१३. ‘मला काही कळत नाही’, असे म्हणा !

१४. चूक झाल्यास संस्थेची हानी होणार नाही, तर स्वतःची हानी होईल. ती होऊ नये यासाठी काळजी घ्या.

प्रार्थना !

‘भावाचा कळस, म्हणजे पू. नाईकबाबा !’, असे वाटले आणि त्यांचा साधनेतील प्रवास ऐकतांना आणि तो ध्वनीमुद्रित करतांना पुष्कळ भावजागृती झाली. आमच्या अवतीभवती सहज वावरणारे असे चैतन्यदायी संत देवाने आम्हा साधकांना दिले आहेत, ‘त्यांच्या सहवासाचा आम्हाला लाभ करून घेता येऊ दे’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करून पू. बाबांविषयीचे कृतज्ञतेचे बोल संपवते.

– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (कार्तिक शु. ३, कलियुग वर्ष ५११३ (२९.१०.२०११))

४. पू. सदानंद (बाबा) नाईक यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे

४ अ. प्रार्थनेच्या बळावर अनेक कठीण प्रसंगांना तोंड देणे

‘पू. बाबा (श्री सदानंद नाईक) सनातन संस्थेत येण्यापूर्वीपासून देवाची भक्ती करायचे. एखादी नवीन गोष्ट करायची असेल, तर ते आधी प्रार्थना करायचे. त्यामुळे त्यांचे कार्य लगेच व्हायचे. ते आम्हा सर्वांना सांगायचे की, ते गाडी चालवायचे, तेव्हा त्यांना गाडीमागे भुते दिसायची आणि प्रार्थना केल्यानंतर ती नाहीशी व्हायची. त्यांनी प्रार्थनेच्या बळावर अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे; पण ते कधी डगमगले नाहीत.

४ आ. सेवेचा ध्यास असणे

एखादी सेवा मनाप्रमाणे होत नाही, तोपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. दिलेली सेवा चांगली आणि प.पू. डॉक्टरांना आवडेल, अशी करण्याचा त्यांना सतत ध्यास लागलेला असतो. सेवा देवाला आवडेल, अशी झाली की, त्यांना आनंद होतो.

४ इ. सतत इतरांचा विचार करणे

एखाद्या साधकाला एखादी सेवा जमत नसेल किंवा सेवा करतांना काही अडचण असेल, तर त्याच्या जवळ जाऊन विचारपूस करून त्याची अडचण ते लगेच सोडवतात. कोणी काय केले, तर त्याची साधना चांगली होईल, हे त्यांना आधीपासून कळायचे आणि ते त्या व्यक्तीला प्रेमाने तसे समजावून सांगायचे. सर्वांची साधना चांगली व्हावी, अशी त्यांना तळमळ असते, उदा. एका साधकाचे त्याच्या विभागसेवकाशी पटत नव्हते. त्यामुळे विभागसेवक काय सांगतो, ते त्याला कळायचे नाही आणि मनात विकल्प यायचे. त्यामुळे त्याची साधना होत नव्हती. तेव्हा पू. बाबांनी त्याला ‘विभागसेवकात प.पू. डॉक्टरांना पहा’, असा दृष्टीकोन दिला. त्या साधकाने तसे प्रयत्न केले आणि त्याच्या मनात येणारे विकल्प बंद होऊन त्याला सेवेत आनंद मिळू लागला.’

– कु. नंदा नाईक (पू. सदानंद नाईक यांची मुलगी), फोंडा, गोवा.

५. पू. सदानंद बाबांना त्यांची कन्या कु. नंदा यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र

५ अ. इतरांच्या दोषांकडे लक्ष न देणे

कन्या कुंदा आणि नंदा यांनी मला अडचणींवर मात कशी करायची, ते शिकवले. ‘इतरांच्या दोषांकडे लक्ष दिल्यास त्यांची साधना होणार नाही’, याची जाणीव दोघींनी मला सतत करून दिली. एकदा कु. नंदाची काही साधक पुष्कळ थट्टा करत असतांना बाबांनी पाहिले. नंतर बाबांनी कु. नंदाला त्याविषयी विचारले, ‘‘तुला वाईट वाटले नाही का ?’’ त्यावर कु. नंदाने सांगितले, ‘‘कोणाला काय बोलायचे ते बोलू दे. त्यांच्याकडे लक्ष दिले, तर माझी साधना होणार नाही.’’ – पू. सदानंद नाईक, रामनाथी, सनातन आश्रम, गोवा.

६. वयाच्या ७१ व्या वर्षीही तरुण-साधकांना लाजवेल,
अशी सेवावृत्ती असणारे पू. बाबा (सदानंद) नाईक !

‘पू. बाबा नाईक हे सर्व साधकांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. ते साधकांच्या साधनेचा आढावा भावाच्या स्तरावर घेतात आणि इतरांनाही प्रत्येक कृती भावपूर्ण करायला सांगतात. ते वयाच्या ७१ व्या वर्षीही आश्रमाच्या परिसरातील स्वच्छता नियमित करतात. तसेच आश्रमाच्या लागवड-विभागात जाऊन सेवा करतात. त्यांच्यासमवेत सर्व साधक उत्साहाने सेवा करतात. प्रत्येक सेवा शिकवतांना पू. बाबा स्वतः कृती करून दाखवतात आणि तशी कृती साधकांकडून करवून घेतात.’ – बांधकाम-विभागातील सर्व साधक

६ अ. संस्थेच्या कार्यात तरुण मुलांना सहभागी करून घेणे

‘१९९८ साली श्री. बाबा नाईक यांची प्रथम भेट झाली होती. तेव्हा ते साखळी केरी येथे रहात होते. त्या वेळी बाबा संस्थेच्या मार्गदर्शक साधकांसोबत विविध ठिकाणी वाहन चालक म्हणून जायचे. ते घरी असायचे, तेव्हा ते गावातील मुलांना साधना सांगणे, सत्संग चालू करण्यासाठी प्रयत्न करणे, साप्ताहिकाचे वर्गणीदार बनवणे आणि ग्रंथ वितरण करणे, अशा सेवा करायचे. ते जेथे रहात होते, त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेला सत्संग घेण्यासाठी काही दिवस मी जात होतो. त्या गावातील मंदिरात ते ग्रंथ प्रदर्शन लावायचे. तेथील मुलांना सोबत घ्यायचे. त्यांच्याकडूनही सेवा करून घ्यायचे. त्या गावात त्यांनी बर्‍याच ठिकाणी प्रवचने आयोजित करून सत्संग चालू केले होते. सत्संगात येणारे अनेकजण नंतर विविध ठिकाणी सेवेसाठी यायचे. यातून बाबांची सर्वांना साधनेकडे वळवण्याची तीव्र तळमळ होती, हे लक्षात आले.

६ आ. पू. बाबांचा भाव आणि शिकण्याची वृत्ती यामुळे समष्टीला लाभ होणे

पू. बाबा आश्रमातील बांधकाम विभागात सेवेसाठी आल्यावर त्यांना प्रत्यक्ष प.पू. डॉक्टरांचा सत्संग लाभला. सुखसागर ते रामनाथी आश्रम असे ते प.पू. डॉक्टरांच्या सत्संगात राहिले आणि अजूनही आहेत. त्यांच्यामधील शिकण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी प.पू. डॉक्टरांसोबत सेवा करतांना दैनंदिन जीवनाचे अध्यात्मिकरण कसे करायचे, हे शिकून घेतले. त्यामुळे आजही बांधकाम-विभागात सेवा करणार्‍या साधकांना ते अनेक प्रसंगांमध्ये ‘दृष्टीकोन कसा ठेवायचा’, हे सांगतात. हे सांगत असतांना प.पू. डॉक्टरांसोबतचा प्रत्येक प्रसंग त्यांनी किती बारकाईने टिपला आहे, हे लक्षात येऊन भाव जागृत होतो.’

– श्री. गौतम गडेकर

६ इ. गुरुकार्य वेळेच्या आधीच पूर्ण व्हावे, अशी तळमळ

आश्रमाच्या बांधकामाच्या सेवेला काही कारणामुळे उशीर होत आहे, असे लक्षात आल्यास पू. बाबांचा जीव तगमगायचा. त्या संदर्भात ते म्हणायचे, ‘‘प.पू. डॉक्टरांनी दिलेली सेवा लवकर पूर्ण करून दुसर्‍या सेवेला उपस्थित राहिले पाहिजे.’’ – श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ.

६ ई. सहसाधकांची वाट न पहाता सकाळीच सेवा आरंभ करणे

बांधकामाच्या अंतर्गत वाळू चाळणे, बांधकामावर पाणी मारणे अशा अनेक सेवा असतात. त्या वेळी पू. बाबा पहाटे लवकर उठून सहसाधकांची वाट न पहाता वाळू चाळायची सेवा करत असत. तसेच बांधकामावर पाणीही मारत असत. शारीरिक कष्टाची सेवा असतांनाही केवळ प.पू. डॉक्टरांवरील श्रद्धेमुळे त्यांनी कधीही शारीरिक कारण सांगितले नाही. सतत सेवारत असणे, हेच पू. बाबांचे ध्येय आहे. – श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ.

६ उ. सहसाधकांशी प्रेमाने बोलणे

सहसाधकांशी पू. बाबा रागाने बोलले, असे कधी जाणवले नाही. सेवा झाल्यानंतर साधक दमलेले असल्यास पू. बाबा ‘बाळांनो, जाऊ या ना सेवेला’, असे प्रेमाने बोलून हाक मारायचे. तसेच कोणी दिसला नाही, तर आपुलकीने चौकशी करत असत. – श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ.

६ ऊ. ‘प.पू. डॉक्टरांनी, ईश्वराने एकदा हात धरला की, तो कधीच सोडत नाही’, असे पू. बाबांनी सांगणे

एकदा पू. बाबांच्या संदर्भात पिंगुळी आश्रमात एक बैठक झाली. त्या वेळी काही साधकांनी पू. बाबांच्या संदर्भात सूत्रे सांगितली. त्या सूत्रांवर पू. बाबा स्वतःचे जे मत होते ते सांगायचा प्रयत्न करत होते. तेव्हाही ते मला स्थिर जाणवले. दुसर्‍या दिवशी समजले, ‘पू. बाबा गोवा येथे निघून गेले.’ काही दिवसांनी मी रामनाथी आश्रमात दूरध्वनी करून पू. बाबांची चौकशी केली. तेव्हा ते घरी असल्याचे समजले; म्हणून मी त्यांना घरी संपर्क केला. तेव्हा भ्रमणभाषवर बोलतांना पू. बाबा म्हणाले, ‘‘घरची काही कामे होती, ती पूर्ण करण्यासाठी थांबलो आहे.’’ त्यानंतर मी काही न विचारताच ते म्हणाले, ‘‘ प.पू. डॉक्टरांनी, ईश्वराने एकदा हात धरला की, तो कधीच सोडत नाही. घरची कामे झाल्यानंतर मी आश्रमात जाणार आहे.’’ – श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ.

६ ए. कठीण प्रसंगांना स्थिरतेने सामोरे जाणे

पू. बाबांची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यात त्यांना कु. नंदा हिच्याकरता खोली घेऊन रहावे लागे. भाडे फार द्यावे लागे, तरी ते कधीच गडबडलेले दिसले नाहीत. दुसरा प्रसंग म्हणजे त्यांचे जावई काही दिवसांपूर्वीच वारले. त्या वेळीसुद्धा त्यांनी सर्व गोष्टी एका त्रयस्थाच्या भूमिकेतून केल्या आणि लगेच आश्रमात सेवेला उपस्थित झाले.’ – श्री. प्रकाश मराठे

६ ऐ. वयाच्या ७१ व्या वर्षी विविध सेवा उत्साहाने करणे

पू. बाबांचे १९९८ मध्ये वय ६० वर्षे होते, आता ते ७१ वर्षांचे झाले आहेत, तरी त्यांचा सेवेचा उत्साह पूर्वीएवढाच आहे. ते दुचाकीने फोंड्याला ये-जा करून बांधकामासाठी लागणारे साहित्य घेऊन येत असतात. ते आवश्यकतेनुसार ट्रकही चालवतात, कामगारांकडे लक्ष देणे, लागवड-विभागात प्रतिदिवशी जाऊन प्रत्यक्ष पहाणी करणे अशा सेवा ते करत असतात. सर्वांनी पहाटे उठून आवरून सेवा करावी, असा त्यांचा आग्रह असतो.’ – कु. गौतम गडेकर

६ ओ. साधकांची प्रगती होण्याविषयी तळमळ वाटणे

‘मागील २-३ मासांपासून (महिन्यांपासून) पू. बाबांची तळमळ पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे जाणवत होते. त्यामुळे ते आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, ‘‘ईश्वरी राज्याची स्थापना तुम्ही (तरुण साधकच) करणार आहात. माझे आता वय झाले आहे; म्हणून तुम्हा सर्वांची प्रगती होणे अधिक आवश्यक आहे.’’ – सौ. शौर्या मेहता

६ औ. प.पू. डॉक्टरांचे पू. बाबांविषयीचे उद्गार !

‘प.पू. डॉक्टर बांधकाम-विभागातील साधकांना ‘पू. बाबांचे ऐकत चला, म्हणजे प्रगती होईल. बाबांचा जास्तीत जास्त लाभ करून घ्या’, असे नेहमी सांगत असतात.

६ अं. पू. बाबांनी साधनेविषयी सांगितलेली सूत्रे

१. ‘प्रार्थना करतांना देवाचे (श्रीकृष्णाचे) चरण दिसले पाहिजेत. एकदा प्रार्थना करून दिसले नाहीत, तर पुन्हा प्रार्थना करा. जोपर्यंत भावपूर्ण प्रार्थना होत नाही, श्रीकृष्णाचे चरण दिसत नाहीत, तोपर्यंत प्रार्थना करा !

२. सेवा करतांना आनंद मिळाला पाहिजे, उदा. एखाद्या ठिकाणी झाडू मारला, तर मागे वळून झाडलेल्या ठिकाणी पाहिल्यानंतर समाधान वाटले पाहिजे, म्हणजेच परिपूर्ण सेवा केली पाहिजे.

३. आपण सेवा करतांना ‘प.पू. डॉक्टर आपल्याला बघत आहेत’, असा भाव ठेवला पाहिजे.

४. आपला क्षणोक्षणी भाव जागृत झाला पाहिजे.

५. आपल्या वाणीत चैतन्य आले पाहिजे. चैतन्य आले, तरच समोरच्यावर परिणाम होतो.

६. समोरचा काय चुकतो, हे न बघता ‘आपण स्वतः काय चुकलो’, हे बघायला हवे.

७. कोणाविषयीही मनात पूर्वग्रह बाळगू नका. प्रत्येकाचे गुणच बघा.’

– श्री. ज्ञानेश्वर गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६ क. पू. बाबांशी बोलल्यावर होणारे लाभ

६ क १. अडचणीतून मार्ग सापडणे

‘एकदा मला काही अडचणी होत्या आणि मनात नकारात्मक विचार यायचे. त्याविषयी बाबांशी बोलून घेतल्यावर माझे नकारात्मक विचार नष्ट झाले आणि मला आनंद मिळाला.’ – श्री. प्रकाश सुतार

६ क २. बाबांनी मार्गदर्शन केल्यावर त्यानुसार लगेच कृती होणे

‘गेल्या तीन मासांपासून बाबांनी सांगितलेली कृती लगेचच होऊन जाते. बाबांशी माझ्या ‘राग येणे’ या दोषाविषयी बोलल्यापासून माझा राग न्यून झाला. बाबांनी सांगितल्याप्रमाणे कृती केल्यावर श्रीकृष्णाचे चरण दिसू लागले. हात दुखत असतांना त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी त्यावर उपाय सांगितल्यावर लगेच पालट जाणवला आणि मी सेवा करू लागलो.’ – श्री. सुरेश कदम

६ क ३. बाबांशी बोलल्यावर शारीरिक अडचणी दूर होऊन स्वभावदोषही दूर होणे आणि अंतर्मुखता वाढणे

‘मला पाठदुखीचा त्रास होत असतांना बाबांनी नामजप सांगितल्यावर पाठदुखी न्यून झाली. बाबा सकाळी व्यायामाचे प्रकार सांगत असतांना त्याप्रमाणे केल्यावर डोके दुखायचे न्यून झाले. बाबांनी पाठीवर हात फिरवल्यावर पाठदुखी न्यून झाली. माझ्यात रागाचे प्रमाण पुष्कळ होते. बाबांशी बोलल्यावर राग न्यून होऊन अंतर्मुखता वाढली. मी लक्ष्मीला काहीही सांगतांना तिला मारून सांगत असे; परंतु ‘तिच्याजवळ कशा पद्धतीने वागायला पाहिजे’, हे त्यांनी सांगितल्यावर मारण्याचे प्रमाण न्यून झाले. घरची काही मंडळी साधनेत नसल्यामुळे ते बडबड करायचे. ते बाबांना सांगितल्यावर त्यांनी अपेक्षा न ठेवता कृती कर, असे सांगितल्यावर त्याप्रमाणे कृती केल्यावर त्यांची बडबड न्यून झाली आणि जो मानसिक त्रास होत होता तो न्यून झाला.’ – श्री. मंजुनाथ दोडमणी

६ क ४. पू. बाबांच्या बोलण्यातील चैतन्यामुळे त्यांनी सांगितलेली कोणतीही कृती सहज होणे

अ. ‘एक दिवस बाबांनी मला सांगितले, ‘‘आपण इतरांमध्ये प.पू. डॉक्टरांचे रूप पाहून वागले पाहिजे.’’ यापूर्वीही हे सूत्र मी अनेक वेळेला ऐकले होते आणि तसे करण्याचा प्रयत्नही केला होता; परंतु त्यात सातत्य रहात नव्हते. बाबांनी सांगितल्यापासून अनेक प्रसंगांमध्ये असे आपोआप व्हायला लागले. त्यातून ‘बाबांच्या वाणीत चैतन्य आले आहे’, हे शिकता आले. – श्री. गौतम गडेकर

आ. ‘प.पू. डॉक्टरांनी विभागातील प्रलंबित सेवा शिकायला सांगितली, तेव्हापासून बाबा सगळ्यांना सेवा करण्यासाठी स्फूर्ती देत असत. पू. सदानंद (बाबा) यांच्या बोलण्यात इतके चैतन्य आहे की, त्यांनी सांगितलेली गोष्ट सहज होते, फार प्रयत्न करावे लागत नाही. बाबांशी बोलत असतांना सातत्याने उपाय होत असतात. बाबांना त्रासासंबंधी विचारल्यावर बाबा जे काही उपाय सांगतात, त्यामुळे लगेच परिणाम होतो.’ – श्री. सिद्धेश पुजारी

इ. ‘श्री. बाबा साधनेविषयी बोलतांना ती सूत्रे एकदम आतमध्ये भिडतात आणि लगेच कृती होते. पूर्वी त्याच गोष्टी मला कठीण वाटायच्या. मनात एखाद्या सेवेविषयी विचार येतो, तोच बाबा सांगतात. एकदा मला मरगळ आली होती. त्या वेळी मनात विचार आला, ‘किती दिवस झोपून रहायचे ?’ याविषयी मी बाबांशी काहीही न बोलता ते म्हणाले, ‘‘काही काळजी करू नकोस.’’ ते असे म्हणताक्षणी मला उत्साह आला.’ – श्री. सुरेश कदम (२०.२.२०११)

ई. ‘पू. बाबा संत व्हायच्या सात दिवस आधीपासून मी साधनेत कुठे अल्प पडते, यासंदर्भात ते सांगत होते. तेव्हा मला त्यांचे म्हणणे सहन होत नसे. त्रासामुळे मला काही समजत नसे. त्यांचे बोलणे माझ्या बुद्धीला पटतही नसे. ही गोष्टही मी त्यांना सांगितली; परंतु माझ्या हे लक्षात आले नाही की, त्यांनी सांगितलेल्या सूत्रांवर त्या क्षणी अंतर्मनातून प्रयत्नांना आरंभ झाला आहे. दोन दिवसांनी माझ्या लक्षात आले की, पू. बाबांनी सांगितलेले प्रयत्न माझ्याकडून आपोआप आणि मनापासून होत आहेत. त्यामुळे ‘पू. बाबांच्या तळमळीमुळेच माझी प्रगती होत आहे’, असे मला वाटते.’ – सौ. शौर्या मेहता

६ ख. पू. बाबांचा प.पू. डॉक्टरांप्रतीचा भाव

६ ख १. प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून सांगितलेल्या गोष्टी कृतीत आणणे

‘पू. बाबा नियमित व्यायाम करतात. त्यांना प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून सांगितले की, तुम्ही त्यांच्याकडून (बांधकाम- विभागातील साधकांकडून) कृती करून घ्या. आमच्याकडूनही व्यायाम व्हावा, यासाठी ते एक आठवड्यापासून घरून सकाळी ४.४५ वाजता येतात आणि आश्रमाच्या ५ व्या मजल्यावर आमच्याकडून व्यायाम करून घेतात. पू. बाबांना म्हटले की, बाबा तुम्हाला घरून यायला त्रास होईल, तेव्हा ते म्हणाले की, जोपर्यंत तुम्हाला सवय लागत नाही, तोपर्यंत मी येत जाईन. तेव्हापासून ते सकाळी पहाटे उठून आश्रमात ५ व्या मजल्यावर येऊन साधकांना भूपाळी किंवा श्लोक म्हणून उठवतात आणि आमच्याकडून व्यायाम करून घेतात.’ – बांधकाम-विभागातील सर्व साधक

६ ख २. प.पू. डॉक्टरांप्रती असलेला भाव

पिंगुळी (कुडाळ) आश्रमाच्या इमारतीचे बांधकाम चालू होते. त्या वेळी पू. बाबा हे नेहमी प.पू. डॉक्टरांच्या आठवणी सांगून ‘त्यांनी बांधकामाची सेवा कशी शिकवली’, हे सांगायचे. त्या वेळी प.पू. डॉक्टरांविषयी बोलण्यास आरंभ केल्यावर लगेच त्यांचा कंठ दाटून येत असे. त्यांना पुढे काय बोलावे, हेही सुचत नसे. – श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ.

६ ख ३. प.पू. डॉक्टरांच्या हातांना फोड आलेले पाहून कळवळणारे पू. बाबा

बांधकामाच्या अनेक आठवणी सांगतांना प.पू. डॉक्टरांनी एकदा चिरे कसे लावायचे, कसे तासायचे हे शिकवले. त्या वेळी त्यांच्या हातांना फोड आले होते. हा प्रसंग सांगतांना पू. बाबांचे डोळे आणि मन भरून आले. ते म्हणाले, ‘‘आम्हाला शिकवण्यासाठी प.पू. डॉक्टर किती त्रास घेतात. प्रत्येक गोष्ट स्वतः कृती करून शिकवतात.’’

– श्री. संजय जोशी, पिंगुळी, कुडाळ.

६ ख ४. प.पू. डॉक्टरांना कचर्‍यातून जावे लागले; म्हणून रडणे

‘कलामंदिरात काम चालू असल्याने अस्वच्छता होते. एकदा प.पू. डॉक्टर अचानक कलामंदिर पहाण्यासाठी आले. ते कचर्‍यातून फिरले. हे पाहून बाबा पुष्कळ रडत होते की, माझ्या देवाला आमच्या चुकीमुळे कचर्‍यातून, मातीतून चालत जावे लागले.

६ ख ५. प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचे आज्ञापालन सगळ्यांना करायला लावणे

प.पू. डॉक्टरांनी सांगितलेआहे की, आपण रात्री ११.३० वाजता झोपलो पाहिजे. असे केलेतर ‘प.पू. डॉक्टरांचे आज्ञापालन होणार’, असे बाबा सगळ्यांना सतत सांगत असतात.’ – श्री. ज्ञानेश्वर गावडे

६ ख ६. चांगले सुचण्याचे कर्तेपण प.पू. डॉक्टरांना देणे

‘बांधकाम विभागात ते बर्‍याच कल्पना सुचवत असत. तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो, ‘‘बाबा चांगलं सुचलं !’’ त्यावर ते म्हणायचे, ‘‘हे सर्व मला प.पू. डॉक्टरांनी सुखसागरमध्ये शिकवले आहे.’’ अधून मधून बैठकीत किंवा अन्य वेळी ते म्हणत, ‘‘ते प.पू. डॉक्टरांनीच मला शिकवले आणि तेच आपणाकडून सर्व सेवा करवून घेतात.’’

– श्री. श्रीहरी मामलेदार आणि श्री. प्रकाश मराठे

६ ग. इतर सूत्रे

१. त्यांच्या मनात कोणत्याच साधकाप्रती भेदभाव नसतो.

२. ते सतत ‘बालपण देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।’, असे सांगून दायित्व असणार्‍या साधकांशी शरणागतभाव ठेवूनच बोलावे, असे सांगतात.

३. ‘बांधकाम विभागाच्या साधकांमध्ये संघटितभाव अल्प असल्यामुळे त्यांनी दिवसातून तीन वेळा सामूहिक प्रार्थना आणि आठवड्यातून एक दिवस आढावा घेण्यास भाग पाडले’, असे ते सांगतात.

– सर्वश्री राहुल, ज्ञानेश्वर, गोसावीकाका, सत्यवान सुतार, वासुदेव, जगदीश पाटील आणि भुजंग पाटील

७. अध्यात्मातील प्रेमळ आणि खरे मित्र पू. सदानंद (बाबा) नाईक !

७ अ. अध्यात्मातील मित्र

‘गेली सहा वर्षे मी पू. बाबांच्या सहवासात आहे. पू. बाबा माझे अध्यात्मातील मित्र आहेत. जेव्हा माझ्या मनात नकारात्मक विचार यायचे किंवा मला निराशा यायची, त्या त्या वेळी मला पाहूनच बाबांच्या ते लक्षात यायचे आणि ते स्वतःहून मला विचारायचे, ‘‘आता काय झाले ? तोंडवळा पार पडला आहे.’’ त्या वेळी मी मनातील सर्व गोष्टी त्यांना सांगायचो. तेव्हा ते म्हणायचे, ‘‘इतरांना काय वाटते याच्याकडे लक्ष देऊ नकोस. ‘प.पू. डॉक्टरांना काय अपेक्षित आहे’, याचा विचार कर. आपण येथे कशासाठी आलो ? स्वत:चे कल्याण करून घेण्यासाठी.’’ असे सांगून ते माझी समजूत काढायचे आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी प्रथम भेट झाल्यावर माझी स्थिती विचारायचे आणि म्हणायचे, ‘‘आपण रडायचे नाही, तर लढायचे.’’ पू. बाबांच्या या वाक्यांनी मला उभारी यायची आणि पुन्हा जोमाने साधना अन् सेवा चालू व्हायची.

७ आ. पू. बाबांनी शिकवलेली काही सूत्रे

७ आ १. आश्रम माझा आहे आणि तेथील प्रत्येक वस्तूची काळजी घेणे, हीच माझी साधना आहे

हा आश्रम माझा आहे, तर आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, याचे चिंतन आणि कृती करायला पू. बाबांनी मला सर्वप्रथम शिकवले, उदा. आश्रमाच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करून घेतला. ते प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवायचे. सिमेंट, खडी, वाळू योग्य रितीने कशी ठेवायची, ते स्वत: करून दाखवले आणि माझ्याकडून करवून घेतले.

७ आ २. रेती पावसाच्या पाण्याने वाहून जाऊ नये, यासाठी उपाय शोधणे

२९.१०.२०११ या दिवशी मोठा पाऊस आला. तेव्हा खडी आणि रेती पावसाच्या पाण्याने वाहून जाऊ लागली. तेव्हा पू. बाबा मी सेवा करत असलेल्या ठिकाणी आले आणि मला म्हणाले, ‘‘महेश, वाळू वाहून जात आहे. आपण काय उपाय करूया ?’’ या प्रसंगातून बाबांचे प्रत्येक गोष्टीकडे किती बारीक लक्ष असते, हेही शिकता आले. असेच लक्ष ठेवण्यासाठी ते मलाही शिकवतात.

७ आ ३. रात्री २ – २.३० वाजता पाऊस चालू होण्यापूर्वी सिमेंटच्या ३५ ते ४० गोण्या आतमध्ये आणणे

चार वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आहे. रात्रीचे २ – २.३० वाजले होते. पुष्कळ जोराचा पाऊस येणार होता. पाऊस चालू होण्यापूर्वी विजा चमकून गडगडाट होत होता. तेव्हा पू. बाबा उठले आणि मला उठवले. मी आणि त्यांनी सिमेंटच्या ३५ ते ४० गोण्या आतमध्ये आणल्या. त्या वेळी अन्य काही साधकही साहाय्याला आले होते. या प्रसंगातून बाबांची गुरुकार्याची तळमळ शिकता आली.

७ आ ४. दायित्व घेऊन सेवा करणे

बांधकाम विभागात इतरांकडून सेवा करून घेणे, विभागातील सर्व साहित्य व्यवस्थित ठेवणे, सेवांचे नियोजन करणे, प्राधान्य ठरवणे अशा गोष्टी पू. बाबांकडून मला शिकायला मिळाल्या.

७ आ ५. सेवेची तळमळ आणि फलनिष्पत्ती वाढवणे

सकाळी लवकर उठून स्वतः सेवा करायची, तसेच इतरांकडून ती कशी करवून घ्यायची, हे मी पू. बाबांकडून शिकलो. प्रारंभी त्यांनी मला विभागात जाऊन वाळू चाळायला सांगितले.

७ आ ६. स्वच्छता केल्यास तेथे प.पू. डॉक्टर येतात, असा भाव ठेवणे

सेवा चालू असलेल्या ठिकाणी स्वच्छता का ठेवायची, तर ‘‘तेथे प्रत्यक्ष प.पू. डॉक्टर येत असतात’’, असे बाबा सांगायचे. तेव्हापासून मी सेवा करत असलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवायला लागलो. आता मला तशी सवय लागली आणि हे करतांना मला अतिशय चांगले वाटते. यातून ‘प्रत्यक्षात प.पू. डॉक्टर तेथे येतात’, याची प्रचीती बाबांमुळे आली.

७ आ ७. पू. बाबांची दूरदृष्टी

आश्रमाच्या कडेला असलेली मातीची भिंत पावसाच्या पाण्याने कोसळू नये; म्हणून बाबांनी लगेच तिकडे पक्के बांधकाम करून घेतले. यातून त्यांची दूरदृष्टी लक्षात येते.

७ इ. बाबांचे पूजनीय बाबा झाल्यावर आनंद अनावर होऊन रडावेसे वाटणे

प.पू. डॉक्टरांनी त्यांना ‘पूज्य बाबा’ म्हणून घोषित केले, तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला आणि भरपूर रडावे, अशी इच्छा झाली. आजपर्यंत माझ्या जीवनातील आनंद किंवा दुःख मी केवळ बाबांना सांगितले आहे. अन्य कोणाला नाही. असे माझे बाबा ! त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. महेश गोजगेकर, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (कार्तिक शु. दशमी, कलियुग वर्ष ५११३ (५.११.२०११))

८. पू. सदानंद (बाबा) नाईक संत झाल्यावर त्यांच्या कर्णेंद्रियांची क्षमता पूर्ववत होणे

‘गेल्या वर्षभरापासून पू. बाबांना नीट ऐकू येत नव्हते; म्हणून त्यांच्याशी बोलणार्‍यांना मोठ्याने बोलावे लागत असे. त्यामुळे ते स्वतःही मोठ्याने बोलत असत. तसेच ते श्रवणयंत्रही वापरत होते; परंतु ते संत झाल्यापासून यात पालट झाल्याचे त्यांच्याशी बोलणार्‍यांच्या, तसेच त्यांच्याही लक्षात आले. कार्तिक शु. अष्टमी (३.११.२०११) या दिवशी झालेल्या बांधकाम विभागाच्या साधनेसंदर्भातील आढावा सत्संगात हे लक्षात आले.’ – श्री. गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

९. पू. सदानंद (बाबा) नाईक यांच्या संदर्भातील अनुभूती

९ अ. पूर्वसूचना

९ अ १. पू. बाबांच्या हस्ते कलामंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे वाटणे

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या हस्ते श्री. राणेआजोबांचा सत्कार झाला. तेव्हा त्यांची आध्यात्मिक पातळी६८ टक्के झाल्याचे घोषित झाले. त्याच दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘आपल्या कलामंदिराचे उद्घाटन अंदाजे जानेवारी २०१२ मध्ये होण्याची शक्यता आहे. हे उद्घाटन पू. नाईकबाबांच्या हस्ते होईल.’ हा विचार मी बांधकाम विभागातील काही साधकांजवळ बोलून दाखवला. त्यानंतर चारच दिवसांनी प.पू. डॉक्टरांनी बाबा संत झाल्याचे घोषित केले. ही बातमी ऐकल्यावर झालेला आनंद अवर्णनीय होता. पू. बाबांनी आजपर्यंत आम्हाला पुष्कळ प्रेम दिले आणि साधनेत साहाय्य केले, यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’ – श्री. गौतम गडेकर

९ अ २. त्यांच्या तोंडवळ्यावर तेज दिसून त्यांची प्रगती होत असल्याची इतरांना जाणीव होणे

‘त्यांच्या तोंडवळ्यावर आता वेगळेच तेज दिसायला लागले आहे. तेव्हा मला जाणवले की, बाबांची योग्य प्रकारे प्रगती होत आहे. त्याच काळात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. राणेआजोबा यांचा सत्कार पू. बाबांच्या हस्ते झाला आणि त्या दिवशीच्या ‘दैनिक सनातन प्रभात’ मध्ये पू. बाबांची ६८ प्रतिशत पातळी झाल्याचे कळले. हे ऐकून आनंद झाला आणि थोड्याच दिवसांत प.पू. डॉक्टरांनी पू. बाबा संत झाल्याचे घोषित करून अत्यधिक आनंद दिला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो, ‘जशी पू. बाबांची प्रगती झाली, तशीच त्यांच्या सान्निध्यात राहून आम्हा सर्व साधकांची प्रगती होवो.’ – श्री. नाना आग्रे

९ आ. पू. बाबांनी एकदा पाठीवर हात फिरवल्यावर उपाय होऊन शरीर हलके होणे

‘बाबा समोर आल्यावर या महिन्याभरात प्रार्थना आपोआपच होत होती. त्यासाठी काही प्रयत्न करावे लागले नाहीत. बाबांनी एकदा भोजनकक्षात पाठीवर हात फिरवला. त्याचा परिणाम दीड दिवस उपाय झाल्यासारखे वाटून शरीर हलके झाले. प.पू. डॉक्टरांप्रती श्रद्धा आणि भाव कशा प्रकारे वाढवायला पाहिजे, या संदर्भात वारवार सांगत असतात. त्यामध्ये ‘स्वतःकडे कर्तेपण घ्यायचे नाही’, असे ते सतत सांगत असतात.’ – श्री. सिद्धेश पुजारी

९ इ. पू. बाबा (सदानंद) नाईक म्हणजे भावजागृतीचा चालता बोलता ग्रंथ आहे, असे वाटणे

‘पू. बाबा संत झाल्यावर त्यांनी केलेल्या प्रयत्नांविषयीच्या मुलाखतीचे चित्रीकरण चालू होते. त्या वेळी त्यांच्याकडे नुसते पाहूनही भावजागृती होत होती. पू. बाबा प्रयत्नांविषयी सांगत असतांना ‘ते म्हणजे भावजागृतीचा चालता बोलता ग्रंथ आहे’, असे वाटले. त्यांच्या प्रत्येक वाक्यातूनच भावजागृती होत होती.’ – सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

९ ई. ‘पू. बाबा नाईक यांच्याकडे पाहून प.पू. भक्तराज महाराजांची
आठवण झाली. त्यांची ‘पूर्ण शरणागत स्थिती आहे’, असे जाणवले.

– श्री. रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Leave a Comment