मृत्यूनंतर काही जणांच्या तोंडवळ्यावर किंवा शरिरावर
हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसण्यामागील कार्यकारणभाव
‘मनुष्य जीवनात प्रारब्धाचे भोग भोगत असतो. जेव्हा त्याचे प्रारब्धभोग भोगून संपतात, तेव्हा त्याचा मृत्यू होतो. प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी व्यक्तीला ऊर्जेची आवश्यकता असते. जर सात्त्विक जीव साधक साधना करत असेल, तर प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी त्याची साधना व्यय होत असते. जेव्हा सात्त्विक जिवांचा मृत्यू होतो, तेव्हा प्रारब्धभोग भोगण्यासाठी व्यय होणारे त्यांच्यातील चैतन्य वाचते. पिवळा रंग हा चैतन्याचे प्रतीक आहे. सात्त्विक जिवांच्या मृत्यूनंतर वातावरणातील काही अघोरी वाईट शक्ती तंत्रविद्येच्या साहाय्याने सात्त्विक जिवांचा स्थूल देह आणि लिंगदेह यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. सात्त्विक जिवाच्या पार्थिव देहाचे आणि त्याच्या लिंगदेहाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी सात्त्विक जिवातील चैतन्य तेजतत्त्वाच्या स्तरावर त्याच्या संपूर्ण पार्थिव देहावर किंवा तोंडवळ्यावर पसरून देहाभोवती चैतन्यदायी संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे मृत्यूनंतर काही जणांच्या तोंडवळ्यावर किंवा शरिरावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसते. हे चैतन्य सगुण-निर्गुण स्तरावरील असल्यामुळे ते दृश्य स्वरूपात पिवळसर रंगाच्या रूपाने दिसते. साधारण ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढील व्यक्तींचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचा तोंडवळा किंवा संपूर्ण पार्थिव देह यांच्यावर पिवळसर रंगाची छटा पसरलेली दिसते.’
मृत्यूनंतर काही जणांच्या तोंडवळ्यावर स्मित (मंद) हास्य दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र
‘जन्म आणि मृत्यू हे स्थुलदेहाशी संबंधित असून या दोन्ही अवस्था चिरकाल टिकणार्या नाहीत. ‘ज्याचा जन्म होतो, त्याचा कधी ना कधी मृत्यू निश्चितपणेच होतो’, हे सत्य साधना करणार्या जिवांच्या अंतर्मनावर बिंबलेले असते. केवळ साधना आणि भगवंताची कृपा हे आपल्या समवेत मृत्यूनंतरही येतात. त्यामुळे साधक मृत्यूचे भय न बाळगता भगवंतावर श्रद्धा ठेवून साधनारत असतो. त्यामुळे जेव्हा साधकाचा मृत्यू होतो, तेव्हा तो भगवंतावर श्रद्धा ठेवून हसतमुखाने मृत्यूला सामोरे जातो. आयुष्यभर केलेल्या साधनेमुळे साधकाच्या चित्तावर साधनेचा दृढ संस्कार झालेला असतो. त्याच्या आंतरिक साधनेमुळे तो मृत्यूलाही ईश्वरेच्छा मानून सहजतेने स्वीकारतो. साधक त्याच्या मृत्यूसमयीही भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहिल्यामुळे तो स्वत:च्या मृत्यूसमयीही आनंदच अनुभवत असतो. त्यामुळे जेव्हा काही जण आनंदाने मृत्यूला सामोरे जात असतात, तेव्हा त्यांच्या मनातील आनंद त्यांच्या तोंडवळ्यावरील स्मितहास्याच्या रूपाने व्यक्त होतो. त्यामुळे मृत्यूनंतर काही जणांच्या तोंडवळ्यावर स्मित (मंद) हास्य दिसते. त्यामुळे साधकाच्या पार्थिव देहाचे अंतिम दर्शन घेणार्या साधकांनाही पार्थिव देहाला पाहून आनंदाची अनुभूती येते.
अशा प्रकारे मृत्यूनंतर काही जणांच्या तोंडवळा किंवा शरीर यांच्यावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसणे आणि किंवा काही जणांच्या तोंडवळ्यावर स्मित (मंद) हास्य दिसणे, या दोन्ही घटनांतून मृत व्यक्तीचा लिंगदेह सात्त्विक आणि चैतन्यदायी असल्याची दैवी प्रचीती मिळते.’
मृत्यूनंतर पार्थिवावर पिवळसर रंगाची छटा येणे
आणि तोंडवळ्यावर स्मितहास्य दिसणे यांच्यातील भेद
तात्पर्य
यावरून ‘आयुष्यभर साधना केल्यामुळे जीवनाच्या शेवटी मृत्यूसारखी घटनाही किती आनंददायी असू शकते आणि वर्तमानकाळात राहून मनापासून आणि भावपूर्ण साधना करणे किती महत्त्वाचे आहे’, हे आपल्या लक्षात येते.
कृतज्ञता
भगवंताच्या कृपेमुळे ‘मृत्यूच्या वेळी देहाशी संबंधित दैवी प्रचीती मिळण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव लक्षात आला’, यासाठी भगवंताच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|