चिनी कापराचे दुष्परिणाम !

Article also available in :

कापूर

 

१. कापराच्या झाडाविषयी सामाजिक माध्यमांतून पसरवण्यात येत असलेला अपसमज !

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांमधून चिनी कापराच्या वृक्षांविषयी वेगाने संदेश पसरत आहे. कापूर तसा सर्वांनाच परिचित आहे; परंतु ‘तो कुठून मिळतो ? कसा निर्माण होतो ?’ याविषयी अनेकांना ठाऊक नाही. ‘कापराचे झाड आजूबाजूच्या अर्धा किलोमीटर परिसरातील हवा शुद्ध करते’, अशी अशास्त्रीय माहिती सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून पसरवली जात आहे. याविषयी सर्वांनीच जागरूकता बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच कळून चुकले आहे. त्यामुळे ‘वातावरणातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी २४ घंटे ऑक्सिजन देणार्‍या वनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे’, असे अनेक लोकांचे मत आहे. याचा अपलाभ घेत अशा प्रकारचे संदेश सामाजिक माध्यमांतून पसरवण्यात येत आहेत.

श्री. राहुल कोल्हापुरे

 

२. सर्वाधिक प्राणवायू देणारे वृक्ष !

वड, पिंपळ, औदुंबर आणि कडुनिंब यांसारखे वृक्ष सर्वाधिक ऑक्सिजन देतात. पृथ्वीवरील सर्व वनस्पती दिवसा कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन मानवाला शुद्ध प्राणवायू (ऑक्सिजन) देतात. तसेच वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: निर्माण करतात, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.

 

३. कापराचे प्रकार आणि नैसर्गिक कापूर मिळण्याचे ठिकाण !

‘नैसर्गिक कापूर’ आणि ‘कृत्रिम कापूर’ असे कापराचे २ प्रकार आहेत. नैसर्गिक कापूर विविध वनस्पतींपासून मिळवला जातो. नैसर्गिक कापराचे ४ प्रकार असून कृत्रिम कापूर हा केवळ रसायनांपासून निर्मिला जातो.

३ अ. भीमसेनी कापूर

भीमसेनी कापरालाच ‘बारूस’ किंवा ‘बोर्निया कापूर’ असेही म्हणतात. हा कापूर सुमात्रा बेटांवर आढळणार्‍या ‘ड्रायोबॅलेनॉप्स् ॲरोमेटिक’ वृक्षापासून मिळवतात. कापराचे स्फटिक झाडांच्या मध्यभागी, खोडात, जेथून फांद्या फुटतात तिथे आणि सालीच्या आत निर्माण होतात. इंडोनेशियातील बोर्निओ बेटातून हा कापूर भारतात येतो. प्राचीन काळापासून हा कापूर प्रख्यात असून वैदिक काळापासून धार्मिक कार्यासाठी आणि आयुर्वेदीय औषधनिर्मितीसाठी उपयोगात आणला जातो. आयुर्वेदात या कापराला ‘अपक्व कापूर’, असे म्हणतात. तसेच या कापराच्या पातळ द्रव्यास ‘कापूर तेल’ असे म्हणतात. हा कापूर पाण्यात टाकल्यावर बुडतो. तसेच हवेतील बाष्प शोषून घेत नाही. या कापूर वृक्षांची लागवड पूर्वी भारतामध्ये तमिळनाडू राज्यात केल्याच्या नोंदी काही धर्मग्रंथांमध्ये आढळतात.

३ आ. चिनी कापूर

चिनी कापराला ‘जपानी कापूर’ असेही संबोधतात. हा कापूर चीन, जपान, कोरिया, फार्मोसा या देशांत आढळणार्‍या ‘सिनॅमोमस कॅम्फोरा’ वृक्षापासून मिळवला जातो. हा कापूर पाण्यात न बुडता पाण्यावर तरंगतो. तसेच तो हवेतील बाष्पही शोषून घेतो. वृक्षांची पाने, डहाळ्या आणि फांद्या पाण्यात उकळून उर्ध्वपातन प्रक्रियेने हा कापूर मिळवतात. या कापूर वृक्षांची लागवड भारतामधील दक्षिण आणि पूर्व भागांतील राज्यांमध्ये अगदी अल्प संख्येने केली जात होती. महाराष्ट्रात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये चिनी कापराच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून येते. चिनी कापूर आयुर्वेदामध्ये उपयोगात आणतात. त्यास ‘पक्व कापूर’ असेही म्हटले जाते.

३ इ. पत्री कापूर

पत्री कापरालाच ‘देशी कापूर’ असेही म्हणतात. हा कापूर ‘ब्लुमिया बालसमीफेरा’, ‘ब्लुमिया डेन्सीफ्लोरा’ आणि ‘ब्लुमिया लॅसेरा’ या वनस्पतींपासून मिळतो. या सर्व वनस्पती भारतात आढळतात. ‘ब्लुमिया लॅसेरा’ हिलाच भारतीय भाषेत ‘भांगरुडी’ किंवा ‘भुरांडो’, असेही संबोधतात. ही वनस्पती महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. विशेष म्हणजे या वनस्पतींच्या पानांपासून कापूर मिळवतात.

३ ई. ‘भारतीय कापूर’

हा ‘लॅमिएसी’ वर्गातील क्षूपवर्गीय (झुडुपासारखी) वनस्पतींपासून मिळवतात. ही वनस्पती प्रामुख्याने भारतातील जम्मू, डेहराडून, कोलकाता, ओडिशा आदी राज्यांमध्ये आढळते.

 

४. कृत्रिम कापराचे उपयोग !

‘कृत्रिम कापूर’ हा ‘टर्पेंटाईन’ या रसायनावर प्रक्रिया करून निर्मिला जातो. हा कापूर आयुर्वेदीय औषधांमध्ये उपयोगात आणला जात नाही. पूजेसाठी भीमसेनी कापूर अत्यंत उपयोगी असतो; परंतु त्याची उपयोगिता ज्ञात नसल्यामुळे तो अल्प प्रमाणात पूजेसाठी उपयोगात आणला जातो. या कापराचा उपयोग प्रतिजैविके, बुरशीनाशक आणि कीटक परावर्तक म्हणूनही केला जातो.

 

५. चिनी कापराचे दुष्परिणाम !

भारत हा शेतीप्रधान देश आहे. कापूर वृक्षासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, तसेच कापूर वृक्षाचा भूमी, हवा, पाणी आणि इतर वृक्ष यांवर होणारा विशिष्ट दूरगामी परिणाम यांचाही अभ्यास आपल्या पूर्वजांनी केला असावा. आयुर्वेदामध्ये उपयोगात आणले जाणारे ‘भीमसेनी कापूर’ आणि ‘चिनी कापूर’ हे विदेशी वृक्षांपासून मिळतात. या कापराची आजही आयात केली जाते; मात्र भारतामध्ये या वृक्षांची लागवड अत्यल्प प्रमाणात केली जाते. चिनी कापूर वृक्षाचा भारतीय वृक्ष परिसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे अभ्यासले गेले आहे. सध्या चिनी कापराच्या वृक्षांची रोपे अनेक रोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत. चिनी कापूर वृक्षांविषयी पसरवण्यात आलेला संदेश आणि कापराचे धार्मिक महत्त्व यांमुळे ‘आपल्याकडेही हे झाड असावे’, असे अनेकांना वाटते. यामुळे सध्या चिनी कापूर वृक्षरोपांच्या विक्रीचा व्यवसाय तेजीत चालू आहे; परंतु विदेशी निलगिरी, ग्लिरिसिडीया, सुरु, ऑस्ट्रेलियन बाभूळ, विदेशी शमी यांसारख्या इतरही विदेशी वृक्षांच्या लागवडीमुळे निर्माण झालेल्या अडचणी आपण आजही सहन करत आहोत. याची जाणीव वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी बांधव यांनी ठेवली पाहिजे.

चिनी कापूर वृक्षांची फळे पक्षी खातात. त्यांच्या विष्ठेतून चिनी कापराच्या वृक्षाच्या बीचा प्रसार वेगाने होतो. या वृक्षांच्या बीची उगवण क्षमता प्रचंड आहे. तसेच ते वृक्ष कोणत्याही हवामानात चिवटपणे तग धरून रहातात, फुलतात आणि वाढतात. त्यामुळे हे वृक्ष कालांतराने स्थानिक वृक्षांना घातक ठरतात. याचे मुख्य कारण म्हणजे चिनी कापूर वृक्षांची पानगळ आहे. पानगळ झाल्यानंतर ती भूमीवर कुजतात. पानात असणारा कापराचा अंश भूमीत मिसळून इतर वनस्पतींच्या बींची उगवण क्षमता आणि जमिनीचा पोत नष्ट करतो. यांमुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातील देशांत या वृक्षांच्या लागवडीवर पूर्णत: बंदी घातली आहे. कापराचे वृक्ष नष्ट करून त्याला ‘उपद्रवी वृक्ष’ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.

 

६. भारतीय वृक्षांची लागवड करा !

भारतियांनी हे लक्षात घेऊन विदेशी वृक्ष आणि विदेशी वनस्पती यांच्या मोहजाळात अडकू नये. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसारित होणार्‍या अवैज्ञानिक संदेशांना बळी न पडता चिनी कापूर वृक्षांची लागवड जाणीवपूर्वक टाळावी. भारतीय वृक्षांची लागवड करून स्थानिक जैवविविधता संपन्न आणि सुदृढ बनवून जतन अन् संवर्धन करावी.’

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा

Leave a Comment