अनुक्रमणिका
भगवंताने वेदांची निर्मिती सर्वप्रथम केली. नंतर सृष्टीची निर्मिती केली. त्याच भगवंताने मानवाची निर्मिती केली. काळानुसार वेदांचे ज्ञानही ऋषिमुनींच्या माध्यमातून मानवाला दिले. वेदांचाच एक भाग आयुर्वेद आहे. भारतातील बहुतांश वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म आहेत. काही वनस्पतींमध्ये इतकी सात्त्विकता आहे की, त्यांना देवत्वच प्राप्त झाले आहे. तुळशीसारख्या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म अधिक आहेत. वनस्पतींची मुळे, खोड, साली, फांद्यांच्या काटक्या, पाने, फुले, फळे आणि बिया असे प्रत्येक अंगच मानवासाठी उपयुक्त ठरले आहे !
प्राचीन भारतीय समृद्ध औषधी विद्या इंग्रजांनी दाबून टाकल्या आणि स्वातंत्र्यानंतरही तत्कालीन काँग्रेस सरकारने त्या जाणीवपूर्वक वर येऊ दिल्या नाहीत. पाश्चात्त्यांच्या व्यापारी प्रभावाने सफरचंद हे ‘प्रत्येक दिवशी खाण्याचे फळ’ झाले. प्रत्यक्षात त्याचा मानवाला उपयोग नसून आवळ्यासारख्या बहुगुणी फळाचा पुष्कळ उपयोग आहे, हे पुढे येत आहे; मात्र आयुर्वेदाने हे प्राचीन काळापासूनच जाणले आहे.
आता जगामध्ये आयुर्वेदाला मोठ्या प्रमाणावर मान्यता मिळत असतांना भारतियांनीही डोळे उघडून आयुर्वेदाचा पुरस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी अनेक रोगांवर उपयुक्त असणार्या काही वनस्पती किंवा फळे यांचे उपयोग येथे पाहूया.
१. बहुगुणी महाऔषध – आले !
आले (आर्द्रक) सुंठपूड
आल्याचे झाड एक हात उंच वाढते. त्याच्या मुळ्यांना आले म्हणतात. आले सुकवून त्याची सुंठपूड करतात. सुंठीला महौषध (मोठे औषध) आणि विश्वभेषज (सर्व विकारांवर उपयोगी) असेही म्हणतात.
गुण
आले हे पाचक, सारक, अग्निदीपक आमपाचक, वातशामक, वातानुलोमक, शूलनाशक, रुचिप्रद आणि कंठास हितकर आहे. सुंठ लघु, स्निग्ध तिखट पण मधुर विपाकाची आणि उष्णवीर्य आहे. गुरु, तीक्ष्ण, तिखट आणि उष्ण आहे.
उपयोग
सूज, घशाचे रोग, खोकला, दमा, पोटफुगी, उलटी आणि पोटदुखी
१. खोकला, दमा, भूक न लागणे आणि अग्नीमांद्य यांवर उपयोगी आलेपाक !
आलेपाक
आल्याच्या रसात चौपट पाणी आणि साखर घालून पाक होईपर्यंत उकळावे. नंतर त्यात केशर, वेलची, जायफळ, जायपत्री आणि लवंग यांचे चूर्ण घालून तो भरून ठेवावा.
२. अजीर्ण आणि भूक लागण्यावर
आल्याच्या रसात लिंबाचा रस आणि सैंधव घालून द्यावे.
३. अजीर्ण
सुंठ आणि जवखार यांचे चूर्ण गरम पाण्यासह द्यावे.
४. ओकारी
आले आणि कांदा यांचा रस प्रत्येकी २-२ चमचे एकत्र करून द्यावा.
५. आमांश (आव)
सुंठ, बडीशेप, खसखस आणि खारीक यांचे चूर्ण गरम पाण्यासह द्यावे.
६. कृमी आणि अग्निमांद्य
सुंठ आणि वावडिंग यांचे चूर्ण मधासह द्यावे.
७. शूल (पोटदुखी)
सुंठ, सज्जीक्षार (सोडा बायकार्ब) आणि हिंग यांचे चूर्ण गरम पाण्यासमवेत द्यावे.
८. परिणाम शूल
सुंठ, तीळ आणि गूळ एकत्र कुटून गायीच्या दुधात शिजवून द्यावी.
९. संग्रहणी आणि आव, प्लीहावृद्धी
सुंठीच्या काढ्याने सिद्ध केलेले तूप द्यावे.
१०. मूळव्याध
सुंठीचे चूर्ण ताकासमवेत द्यावे.
११. पडसे
आले किंवा सुंठ, दालचिनी आणि खडीसाखरेसमवेत द्यावे.
१२. खोकला, दमा
अ. आल्याचा रस मधासह घ्यावा.
आ. आल्याचा रस दुप्पट खडीसाखर किंवा गुळाबरोबर द्यावा.
१३. ताप
जीर्ण ज्वर – सुंठ ताकाच्या निवळीत उगाळून २१ दिवस द्यावी.
१४. सूज
अ. गुडार्द्रक योग – अर्धा चमचा आल्याचा रस आणि १/२ चमचा जुना गूळ पहिल्या दिवशी. नंतर प्रतिदिन १ चमचा याप्रमाणे वाढवीत. दहाव्या दिवशी ५ चमचे आल्याचा रस आणि ५ चमचे गूळ द्यावा. असे एक मास द्यावे.
आ. सुंठीची पूड गुळांत कालवून पुनर्नव्याच्या रसात किंवा काढ्यात द्यावी.
१५. आमवात
सुंठ ४ भाग + बडीशेप १ भाग एकत्र करून गुळासह खावे.
१६. कंबर, मांड्या, पाठ, माकडहाड दुखत असल्यास
आल्याच्या रसात किंवा महाळुंगाच्या रसात तूप घालून द्यावे.
१७. अर्धशिशी
आल्याचा रस नाकात पिळावा.
१८. अर्धांग वात
लसूण आणि सुंठीचे चूर्ण यांनी सिद्ध केलेले गायीचे तूप – १ ते २ चमचे प्रमाणात द्यावे.
१९. श्वेतप्रदर
सुंठी सिद्ध दूध – गायीचे दूध १४० मि.लि. + पाणी २१० मि.लि. + सुंठ ८ ग्रॅम + साखर ८ ग्रॅम पाणी आटेपर्यंत उकळावे. सकाळ-संध्याकाळी २१ दिवस घ्यावे.
२०. वीर्यवृद्धीसाठी
सुंठ १० ग्रॅम २० ग्रॅम तुपात तळावी. नंतर त्यात १० ग्रॅम गूळ आणि ५० मि.लि. पाणी घालून पाणी आटेपर्यंत उकळावे. सकाळी आणि संध्याकाळी द्यावे.
२१. लघवीचे प्रमाण वाढल्यास
आल्याचा रस खडीसाखर घालून दोन वेळा द्यावा.
२२. लघवीत खर पडणे
सुंठीच्या काढ्यात हळद आणि गूळ घालून प्यावा.
निषेध : ग्रीष्म आणि शरद ऋतूत, रक्तपित्त आणि पंडुरोगात देऊ नये.
(मात्रा : आल्याचा रस ५ ते १० मि.लि. सुंठ चूर्ण १ ते २ ग्रॅम)
२. सात्त्विक तुळशीचे वरदान !
तुळशीचे झुडूप १ ते ३ फूट उंचीचे असते. तुळशीची पाने, मूळ आणि बिया यांचा औषधांत उपयोग करतात.
गुण
तिखट, कडू, लघु, रुक्ष, उष्ण, दुर्गंधनाशक, हृदयोत्तेजक. तुळशीचे बी लघवीचे प्रमाण वाढवणारे आणि लघवीची आग न्यून करणारे आहे.
मात्रा
स्वरस १० ते २० मिलिलिटर, बियांचे चूर्ण ३ ते ६ ग्रॅम.
उपयोग
विषमज्वर, सर्दी, खोकला, दमा, पार्श्वशूल, उलटी, पाठीत दुखणे तुळशीचे रोगांवरील सविस्तर उपयोग
१. विषमज्वर
काळ्या तुळशीच्या पाल्याच्या रसात मिरपूड घालून द्यावी. तुळशीची ३ पाने गुळात गोळा करून खावीत किंवा गुळात तुळशीच्या पानांचा रस घालून गोळी करून द्यावा. तुळशीची ३ पाने सुंठ आणि खडीसाखर यांच्या काढ्यासह घ्यावीत.
२. वायू (पोटात गॅसेस)
काळी तुळस ६ भाग + निर्गुंडी ४ भाग, माका ६ भाग, वायवर्णा १ भाग यांचे चूर्ण ३ ग्रॅम मधातून घ्यावे.
३. ओकारी
तुळशीच्या रसात मध घालून सकाळी घ्यावा.
४. ओकारी आणि अतिसार, रक्तातिसार
तुळशीचे बी वाटून गायीच्या दुधातून घ्यावे किंवा तुळशीचा रस वेलचीचे चूर्ण घालून घ्यावा.
५. गॅसेस
तुळशीचा रस आणि आल्याचा रस, मिरपूड, तूप आणि मध घालून घ्यावा.
६. शीतपित्त
अंगावर पित्ताच्या गांधी येणे : तुळशीचा रस अंगास चोळावा.
७. कान फुटणे
काळ्या तुळशीचा आणि माक्याचा रस एकत्र करून कानात घालावा.
३. दिव्य फळ – आवळा (आमलक) !
आवळ्याचे झाड २० ते २५ फूट उंच असते. त्याचे फळ म्हणजेच आवळा.
गुण
आवळ्याचे सर्व गुण हिरड्यासारखेच आहेत; पण आवळा शीत आहे, तर हिरडा उष्ण आहे. आवळा सर्व रसायनांत श्रेष्ठ आहे. त्रिदोषशामक आहे. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्व धातूंना बलदायक आहे. आंबट पदार्थ सामान्यतः पित्तवर्धक असले, तरी आवळा आणि डाळिंब आंबट असूनही पित्तशामक आहेत. आवळा हिरड्यापेक्षा रक्तपित्त (रक्तस्रावाची प्रवृत्ती), प्रमेह, जननेंद्रियांना बलदायक आणि रसायन गुणात श्रेष्ठ आहे. आवळ्यात खारट सोडून बाकी सर्व रस म्हणजे गोड, आंबट, तिखट, कडू आणि तुरट रस असतात. आवळा, डाळिंब, द्राक्षे अन् महाळुंग ही फळे सर्व फळांत श्रेष्ठ आहेत.
उपयोग
पचन चांगले होणे, केसांचे आरोग्य, शक्ती देणारा
१. ताप
घरी, अंगणी, भूखंडी । लावा औषधी वनस्पती ।। आवळा, नागमोथा आणि गुळवेल याचा काढा द्यावा.
२. सर्व तापांवर
आवळा, हिरडा, पिंपळी, चित्रक आणि सैंधव यांचे चूर्ण सर्व तापांवर उपयोगी आहे.
३. तापांत घसा सुकणे आणि अरूची
आवळा, द्राक्षे आणि साखर यांची चटणी करून तोंडात धरावी.
४. हृद्रोग
डाळिंबाचे दाणे १ भाग, आवळा १ भाग आणि मूग ६ भाग एकत्र करून त्यांचे कढण प्यावयास द्यावे.
५. पंडुरोग आणि कावीळ
धात्र्यावलेह – आवळा, लोहभस्म, सुंठ, मिरी, पिंपळी, हळद, मध अन् साखर यांचा अवलेह बनवावा.
६. कावीळ
१. आवळ्याचा रस मनुकांसमवेत घ्यावा.
२. गुळवेल, आवळा आणि मनुका यांनी सिद्ध केलेले तूप द्यावे.
७. त्वचारोग
दाह – आवळा, द्राक्षे, नारळ आणि साखर यांचे सरबत प्यावे.
८. तारुण्यपिटिका
आवळकाठी, लोघ्र किंवा वड, पिंपळ यांच्या सालींच्या काढ्याने तोंड वारंवार धुवावे.
९. पचन संस्था
तहान : तोंडास कोरड पडणे
१. आवळा, कमळ, कुष्ठ, वडाचे अंकूर आणि लाह्या याचे चूर्ण मधासह वाटून त्याची गोळी करून तोंडात धरावी.
२. आवळ्याच्या रसासह चंदन आणि मध द्यावा.
उलटी
मनुका, साखर आणि आवळा प्रत्येकी ४० ग्रॅम घेऊन त्याची चटणी करावी. त्यात ४० ग्रॅम मध आणि अडीच लिटर पाणी घालून ढवळावे आणि गाळून घ्यावे. हे पाणी थोडे थोडे प्यावयास द्यावे.
उचकी
आवळ्याचा रस मध आणि पिंपळी घालून द्यावा.
१०. मूत्रेंद्रिये
११. मूत्रावरोध
लघवी तुंबणे – आवळ्याच्या चटणीचा ओटीपोटावर लेप करावा.
१२. लघवी करतांना त्रास होणे (मूत्रकृच्छ)
अ. आवळ्याचा रस मधासह घ्यावा.
आ. आवळ्याचा रस गुळासह किंवा उसाच्या रसासमवेत घ्यावा.
इ. आवळ्याच्या रसातून वेलदोड्यांचे चूर्ण द्यावे.
ई. आवळा, द्राक्षे, विदारीकंद, ज्येष्ठमध आणि गोखरू यांचा काढा साखर घालून प्यावा.
१३. लघवीतून रक्त येणे
आवळ्याचा रस मधासह द्यावा.
१४. योनीदाहावर
आवळ्याचा रस साखर घालून प्यावा.
१५. केस काळेभोर करण्यासाठी
३ आवळे, ३ हिरडे, १ बेहडा, ५ आंब्यांचा गर आणि २० ग्रॅम लोहभस्म वाटून मिश्रण करून रात्रभर लोखंडाच्या कढईत ठेवावे. त्याचा लेप लावल्याने केस काळेभोर होतात.
१६. स्थूलता
विडंग, सुंठ, जवखार, मण्डूर भस्म, जव आणि आवळाचूर्ण मधासह चाटावे.
१७. प्रमेह
हळद, आवळ्याचा रस, मध हे मिश्रण सर्व प्रकारच्या प्रमेहांत उपयोगी आहे.
१८. मज्जासंस्था
१. मूर्च्छा : उकडलेले आवळे, मनुका आणि सुंठ एकत्र वाटून मधासह चाटण करावे. (निघंटु रत्नाकर – भाग २)
२. आवळा किंवा हिरड्याच्या काढ्याने सिद्ध तूप प्यावे.
१९. अंधत्व
त्रिफळा, शतावरी, कडू पडवळ, मूग, आवळा आणि जव यांचे कढण जुन्या तुपासह घ्यावे.
२०. डोळ्यांची आग होणे, डोळे दुखणे
शतावरी, नागरमोथा, आवळा, कमळ बकरीच्या दुधात घालून तूप सिद्ध करावे आणि १-१ चमचा दोनदा घ्यावे.
झोप येत नसल्यास : आवळकाठी, सुंठ आणि खडीसाखर यांनी सिद्ध केलेली कण्हेरी द्यावी. (अष्टांगहृदय चि. १/२३)
४. रसायन
१. आवळकाठीचे चूर्ण आणि तिळाचे चूर्ण समभाग घेऊन तूप आणि मधासह द्यावे.
२. आवळकाठीचे चूर्ण + अश्वगंधा चूर्ण तूप आणि मध यांसह द्यावे.
३. आवळाचूर्ण २० ग्रॅम + गोखरू २० ग्रॅम + गुळवेल सत्त्व १० ग्रॅम तूप साखरेसमवेत घ्यावे.
४. आवळ्याचा रस, मध, खडीसाखर आणि तूप ही द्रव्ये एकत्र करून खावी म्हणजे म्हातारपण लवकर येत नाही.
५. आवळा चूर्ण, असनाचा नार, तेल, तूप, मध आणि लोहभस्म एकत्र करून नित्य सेवन केल्यास चिरकाल तारुण्य टिकते.
६. आवळा काळ्या तिळासह वाटून खाल्यास चिरकाल तरुण रहाता येते.
७. १ हिरडा, २ बेहडे आणि ४ आवळे मध आणि तुपासह खावे. म्हणजे म्हातारपण लवकर येत नाही (चरक चिकित्सा १-९)
८. ज्येष्ठमध, वंशलोचन, पिंपळी, मध, तूप आणि खडीसाखर यांच्यासह त्रिफळा घ्यावे. हे रसायन आहे.
९. लोहभस्म, सुवर्णभस्म, वेखंड, मध, तूप, वावडिंग, पिंपळी, त्रिफळा आणि सैंधव एकत्र करून १ वर्ष सेवन केले असता बलदायक, बुद्धी, स्मृती आणि आयुष्य वाढवणारे होते. (चरक चिकित्सा १९)
१०. आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या रसाची भावना द्यावी आणि ते चूर्ण तूप, मध अन् साखर यांच्यासह चाटावे.
११. आवळ्याचे चूर्ण आणि सुवर्णाचा वर्ख एकत्र खलून मधासह चाटवावे. रोग्याची गंभीर परिस्थिती असून अरिष्ट चिन्हे असली तरी जगतो.