शांत, संयमी आणि प्रेमभाव या गुणांमुळे गावकर्‍यांना आधार वाटणारे अन् औषधनिर्मिती आणि वैद्यकीय व्यवसाय सेवाभावाने करणारे पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) !

पू. वैद्य विनय नीळकंठ भावे      

१. प्रेमळ

‘मला समजू लागल्यापासून मी पू. बाबांना कुणावरही चिडलेले पाहिले नाही. प्रसंगी एखाद्याला एखादी गोष्ट शिकवण्यासाठी किंवा त्याने ती चूक पुन्हा करू नये; म्हणून पू. बाबा त्या व्यक्तीला रागावून सांगत असत; पण दुसर्‍याच क्षणी तो प्रसंग विसरून ते पुन्हा नेहमीप्रमाणे त्या व्यक्तीशी प्रेमाने वागत आणि बोलत असत.

 

२. सात्त्विकतेची ओढ

पू. बाबांना सात्त्विकतेची ओढ होती. ‘आहार, पोषाख, बोलणे, चालणे हे सगळे सात्त्विकच असले पाहिजे’, यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करावे लागत नसत. या गोष्टी त्यांच्याकडून आपोआप होत असत.

 

३. जिज्ञासूंच्या प्रश्नांना शांतपणे आणि संयमाने उत्तरे देणे

श्री. विक्रम भावे

३ अ. एखाद्या व्यक्तीने एकच प्रश्न पुनःपुन्हा विचारला,
तरी पू. बाबांनी त्या प्रश्नाचे उत्तर शांतपणे आणि अत्यंत संयमाने देणे

पूर्वी पू. बाबा रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सत्संग घेण्यासाठी जात असत. कित्येकदा पू. बाबांना सत्संगात नव्याने आलेले जिज्ञासू अनेक प्रश्न विचारत. काही जण पुनःपुन्हा तेच तेच प्रश्न विचारत असत; पण पू. बाबा प्रत्येकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर शांतपणे द्यायचे.

३ आ. एका जिज्ञासूने २ वर्षांहून अधिक काळ सतत
प्रश्न विचारूनही शांतपणे आणि संयमाने उत्तरे देणे अन् नंतर त्या जिज्ञासूने
‘भावेकाकांच्या संयमापुढे मी हरलो. माझ्या सगळ्या शंका आणि प्रश्न संपले’, असे सांगणे

वर्ष १९९८-९९ मध्ये पू. बाबा रायगड जिल्ह्यातील एका गावात सत्संग घेण्यासाठी जायचे. तेव्हा तेथील एक जिज्ञासू पू. बाबांना सतत प्रश्न विचारत असत. प्रत्येक सत्संगात त्या जिज्ञासूचे अनेक प्रश्न असायचे. पू. बाबा त्यांच्या प्रश्नांना शांतपणे आणि संयमाने उत्तरे देत असत. हा प्रकार २ वर्षांहून अधिक काळ चालू होता. एके दिवशी त्या जिज्ञासूने हात जोडून सांगितले, ‘‘माझे सगळेच प्रश्न किंवा शंका जिज्ञासेपोटी नव्हत्या. कित्येकदा मी शब्दच्छलही करत होतो; पण मागील २ वर्षांत मी भावेकाकांना एकदाही रागावून उत्तर देतांना पाहिले नाही. भावेकाकांच्या संयमापुढे मी हरलो. आता माझ्या सगळ्या शंका आणि प्रश्न संपले.’’

 

४. ‘कारखाना गुरूंचा असून तेच तो चालवतात
आणि त्याचे रक्षणही तेच करतात’, असा भाव असल्यामुळे
कारखान्याला कधीही कुलूप न लावणे अन् तेथे कधी चोरीही न होणे

पू. बाबांनी चालू केलेल्या आयुर्वेदाच्या औषधनिर्मितीच्या कारखान्याला ‘श्री अनंतानंद औषधालय’, असे नाव दिले होते. प.पू. अनंतानंद साईश हे प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु ! ‘हा कारखाना गुरूंचा असून तेच तो चालवतात आणि त्याचे रक्षणही तेच करतात’, असा पू. बाबांचा भाव होता. त्यामुळे पू. बाबांनी कारखान्याला कधीही कुलूप लावले नाही. लाखो रुपयांची औषधे आणि कच्चा माल कारखान्यात असे; मात्र तेथे कधीही चोरी झाली नाही.

 

५. गरिबांकडून औषधांचे पैसे न घेणे

आमच्या गावाच्या आसपास अनेक आदिवासी वाड्या आणि वस्त्या होत्या. तेथील आदिवासी लोक औषध घेण्यासाठी पू. बाबांकडे येत असत. पू. बाबा त्यांना औषधे देत; मात्र त्यांच्याकडून कधीही औषधाचे पैसे घेत नसत. ते म्हणत, ‘‘त्यांच्याकडे जेवायला पैसे नाहीत. ते औषधाचे पैसे कसे देणार ?’

 

६. रुग्णांना औषधांच्या समवेत
नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास सांगणे

पू. बाबांकडे आलेल्या रुग्णांना ते औषधांसह नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपायही करण्यास सांगत असत.

पू. बाबा रुग्णांना समजावून सांगत असत, ‘‘या जन्मी शरिराला जे रोग जडतात, त्यांच्या मुळाशी जन्मोजन्मींचे राग, लोभ आदी संस्कार असतात. त्यामुळे केवळ औषधाने गुण येणार नाही. त्यासाठी औषधांना साधना आणि उपासना यांचीही जोड हवी.’’

 

७. रुग्णांना औषधे देतांना
किंवा औषधनिर्मिती करतांना ‘आयुर्वेदाची सेवा’ असा भाव असणे

७ अ. प्रतिस्पर्धी असणार्‍या किंवा भविष्यात
‘प्रतिस्पर्धी होऊ शकेल’, अशा वैद्याला किंवा व्यक्तीलाही स्वतःजवळील सर्व ज्ञान आणि माहिती देणे

पू. बाबांचा रुग्णांना औषधे देतांना किंवा औषधनिर्मिती करतांना ‘आयुर्वेदाची सेवा’ असा भाव असायचा. ते अन्य वैद्यांना औषधनिर्मिती किंवा चिकित्सा यांविषयी शिकवतांना कधीही हातचे राखून शिकवत नसत. बाबा व्यवसायात त्यांचा प्रतिस्पर्धी असणार्‍या किंवा ‘भविष्यात प्रतिस्पर्धी होऊ शकेल’, अशा वैद्याला किंवा व्यक्तीलाही त्यांच्या जवळील सर्व ज्ञान द्यायचे. त्यांना ‘प्रतिस्पर्धी व्यवसायात माझ्यापुढे जाईल’, अशी चिंता कधीही वाटली नाही. ते म्हणायचे, ‘‘मी आयुर्वेदाची सेवा करत आहे. श्री धन्वन्तरिदेवता माझ्या पोटाची काळजी घेईल.’’

७ आ. एका वैद्यांना भस्मनिर्मिती शिकवतांना
त्यांनी दिलेला लाखो रुपयांचा धनादेश नाकारणे आणि त्यांना
‘भस्मनिर्मिती करतांना शास्त्राशी किंवा शास्त्रातील संहितेशी तडजोड करू नका’, असे सांगणे

एका प्रथितयश वैद्यांना सुवर्णभस्म बनवणे अवघड जात होते. तेव्हा त्यांनी पू. बाबांना भस्मनिर्मिती शिकवण्याची आणि त्याचे चित्रीकरण करू देण्याची विनंती केली. त्यामुळे नंतर त्यांना भस्म करण्यासाठी पू. बाबांवर अवलंबून रहावे लागणार नव्हते. याची कल्पना असूनही पू. बाबांनी त्या वैद्यांना ‘सुवर्णभस्म कसे बनवावे ?’, हे शिकवले आणि त्याचे चित्रीकरणही करू दिले. भस्मनिर्मिती शिकवून झाल्यावर त्या वैद्यांनी पू. बाबांना लाखो रुपयांचा धनादेश देऊ केला; मात्र पू. बाबांनी तो नाकारला. ते त्यांना म्हणाले, ‘‘मी सर्व आयुर्वेदाची सेवा म्हणून करतो. त्यामुळे हे पैसे मला नकोत. माझ्या भाग्यात असलेले पैसे मला कुठल्याही माध्यमातून मिळतील; मात्र ‘आपण भस्मनिर्मिती करतांना शास्त्राशी किंवा शास्त्रातील संहितेशी तडजोड करू नका’, एवढीच अपेक्षा आहे.’’

 

८. गावात चोर्‍या आणि दरोडे यांचे प्रमाण वाढले असता
पू. भावेकाकांनी गावातील लोकांनीच पहारा करून गावाचे रक्षण करण्याची कल्पना
मांडणे अन् गावातील लोकांनी पाळीपाळीने पहारा केल्यावर चोर्‍या अन् दरोडे पूर्णपणे थांबणे

काही वर्षांपूर्वी आमच्या गावात (वरसई, पेण येथे) चोर्‍या आणि दरोडे यांचे प्रमाण वाढले होते. तेव्हा पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे लक्षात आल्यावर पू. बाबांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांना एकत्र आणले आणि गावकर्‍यांनीच पहारा करून गावाचे रक्षण करण्याची कल्पना मांडली. लोकांनाही ती पटली. त्याप्रमाणे गावातील लोकांनी पाळीपाळीने पहारा केला. या सर्व गोष्टी पू. बाबांनी चालू केल्या आणि त्याची नोंदवही घातली गेली. जवळजवळ २ मास गावातील लोकांनी पहारा केला. त्यामुळे चोर्‍या आणि दरोडे पूर्णपणे थांबले.

 

९. गावातील लोकांना पू. बाबांचा आधार वाटणे

आमच्या गावात (वरसई, पेण) ४०० वर्षांपेक्षा अधिक जुने शिवाचे मंदिर आहे. तेथे महाशिवरात्रीचा उत्सव होतो. त्या उत्सवाला २०० वर्षांपेक्षा मोठी परंपरा आहे. मागील काही वर्षांपासून पू. बाबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या उत्सवात सक्रीयपणे सहभागी होणे शक्य होत नव्हते; मात्र उत्सवाची व्यवस्था पहाणारे ग्रामस्थ पू. बाबांना म्हणत असत, ‘‘तुम्ही प्रत्यक्ष काहीच करू नका. केवळ उत्सवाच्या ठिकाणी आसंदीत बसून रहा. आम्हाला तुमचा आधार वाटतो.’’

 

१०. अनेक संतांशी जवळीक असणे

पू. बाबांची अनेक संतांशी जवळीक होती. अनेक संत आमच्या कुटुंबाचे सदस्य असल्याप्रमाणे आहेत. त्यामुळे घरातील यज्ञ-यागादी शुभकार्याच्या वेळी अनेक संत आणि त्यांचे साधक किंवा भक्तमंडळी घरी येत असत. त्यामुळे घरातील शुभकार्य खर्‍या अर्थाने ‘शुभ’ होते.

 

११. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता

११ अ. मार्गावर उभे असलेले जोडपे हे मृतात्मे
असल्याचे ओळखणे आणि गुरूंवरील श्रद्धेमुळे न घाबरता स्थिर रहाणे

वर्ष १९९६ मध्ये पू. बाबा आणि मी रायगड जिल्ह्यातील एका गावात सत्संग घेण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन गेलो होतो. पू. बाबा गाडी चालवत होते. सत्संग झाल्यावर आम्ही घरी परत येण्यास निघालो. रात्री ११ वाजून गेले होते. मार्गावर फारशी रहदारी नव्हती. एका ठिकाणी मार्गाच्या कडेला एक जोडपे दुचाकी लावून उभे होते आणि ते आमच्या गाडीला हात दाखवत होते. ‘त्यांची गाडी बंद पडली असावी’, असे मला वाटले. त्यामुळे मी पू. बाबांना म्हणालो, ‘‘इतक्या रात्री यांची गाडी बंद पडली आहे. त्यांना आपण त्यांच्या घरी सोडूया का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘आपण त्यांच्या समोरून पुढे गेल्यावर तू मागे पहा.’’ पू. बाबांनी गाडी चालूच ठेवली. त्या जोडप्याच्या समोरून आम्ही पुढे निघून गेल्यावर मी खिडकीतून मागे पाहिले, तर ते जोडपे दिसेनासे झाले होते. मला धक्का बसला. मी पू. बाबांना विचारले, ‘‘ते कोण होते ?’’ ते म्हणाले, ‘‘ते जोडपे फार पूर्वी अपघातात गेले होते; पण आपल्या पाठीशी गुरु आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.’’

११ आ. अनेक नातेवाइकांनी अनेक वेळा असे सांगितले की, आम्ही जेव्हा भावेकाकांची आठवण काढतो, तेव्हा आम्हाला भावेकाकांचा भ्रमणभाष येतो.

११ इ. मित्राला त्याच्या घरात काही पालट करण्यास सांगितल्यावर त्याच्या घरातील अडचणी सुटणे

एकदा पू. बाबांच्या एका मित्राने मला सांगितले, ‘‘नाना, (पू. भावेकाका) माझ्या घरी आले होते. माझ्या घराची रचना पाहून त्यांनी ‘घरात कुठे कुठे दोष आहेत आणि काय पालट करायला हवा ?’, हे सांगितले. त्याप्रमाणे केल्यावर माझ्या घरातील अडचणी सुटत गेल्या. आता आम्ही समाधानी आहोत.’’

११ ई. मित्राला हृदयविकाराचा झटका येणार असल्याचे
सांगणे आणि त्याप्रमाणे १० दिवसांत त्याला हृदयविकाराचा झटका येणे

वर्ष २००७ मध्ये एकदा सायंकाळी पू. बाबा अंगणात नामजप करत बसले होते. समोरील मार्गावरून पू. बाबांचा एक मित्र जात होता. त्याला पाहून पू. बाबांनी त्याला हाक मारली आणि सांगितले, ‘‘प्रकृतीची काळजी घे. तुला हृदयविकाराचा झटका येणार आहे आणि हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल.’’ त्या मित्राने पू. बाबांचे हे म्हणणे गांभीर्याने घेतल्याचे वाटले नाही; मात्र १० दिवसांनंतर खरोखर त्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्या हृदयाची शस्त्रक्रियाही करावी लागली.’

 

१२. अनुभूती

सत्संगासाठी जातांना गाडीला अल्प इंधन लागणे

पू. बाबा रायगड जिल्ह्यातील विविध गावांत सत्संग घेण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन जात असत. मी अनेकदा एका गोेष्टीचे निरीक्षण केले आहे, ‘पू. बाबा सत्संग घेण्यासाठी ज्या मार्गावर प्रवास करायचे, त्या प्रवासासाठी लागणारे इंधन हे अन्य कामासाठी गाडी नेली असता लागणार्‍या इंधनापेक्षा अल्प लागायचे.’

– श्री. विक्रम विनय भावे, मोर्डे, जि. रत्नागिरी.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment