सीता हीच भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श आहे ! – स्वामी विवेकानंद

१. स्त्री-शिक्षण देतांना ‘धर्म’ हा केंद्रस्थानी ठेवल्यास
स्त्रियांमध्ये शील निर्माण होणे आणि वेळप्रसंगी शीलभ्रष्ट होण्यापेक्षा
स्वतःच्या जीविताचाही स्वाहाकार करण्यात त्यांना काडीचेही भय न वाटू शकणे

‘स्त्री-शिक्षणाचा प्रचार हा धर्माला केंद्र करूनच व्हावयास हवा. इतर सर्व शिक्षण, वळण धर्माच्या तुलनेत गौणच असावयास हवे. धर्मशिक्षण, शीलसंवर्धन आणि कठोर ब्रह्मचर्यपालन यांकडे लक्ष पुरवावयास हवे. ‘सतीत्वा’चा अर्थ हिंदु स्त्रियांना सहज समजू शकतो; कारण त्याचा वारसा घेऊनच त्या जन्मास येत असतात. इतर कोणत्याही गोष्टीवर भर देण्यापेक्षा आधी त्यांच्यात हा आदर्श सुप्रतिष्ठित करण्याचा कसून प्रयत्न करा. त्यायोगे त्यांच्यात असे अत्युन्नत शील निर्माण होईल की, ज्याच्या बळावर जीवनाच्या विवाहित किंवा अविवाहित (अविवाहित रहाण्याचे त्यांनी ठरवल्यास) अवस्थेत शीलभ्रष्ट होण्यापेक्षा आपल्या जीविताचाही स्वाहाकार करण्यात त्यांना काडीचेही भय वाटणार नाही.

 

२. एकमेव ‘सीताचरित्रा’तूनच पूर्ण स्त्रीत्वाचे भारतीय
आदर्श विकसित झालेले असल्याने सीता ही भारतीय स्त्रीत्वाचा यथार्थ आदर्श असणे

सीतेच्या पदचिन्हांचे अनुसरण करूनच आर्यावर्तातील (भारतातील) स्त्रियांनी आपल्या प्रगतीचा मार्ग आखणे योग्य आहे. सीतेचे चारित्र्य केवळ अनुपम होय. यथार्थ भारतीय स्त्रीत्वाचा सीता म्हणजे नमुनाच होय; कारण त्या एकमेव ‘सीताचरित्रा’तूनच पूर्ण स्त्रीत्वाचे भारतीय आदर्श विकसित झालेले आहेत.

 

३. सीताचरित्रापासून स्त्री-जीवन दूर नेऊन त्यात आधुनिकता
आणण्याचा कोणताही प्रयत्न तात्काळ निष्फळ ठरतो, हे निर्विवाद असणे

पावित्र्याहून पवित्र, सहनशीलतेची, सहिष्णुतेची मूर्तीमंत पुतळी ती महिमाशालिनी सीता त्या पदावर अगदी अढळ राहील ! जिने ते कटुकठोर दु:खमय जीवन एक अवाक्षर तोंडातून न काढता व्यतीत केले, ती सदाशुद्ध आणि परम पतिव्रता सीता ही आर्यजनांची आदर्श देवता आणि आमची राष्ट्रदेवता आमच्या हृदयसिंहासनावर चिरकाल अधिष्ठित राहीलच राहील ! सीतेचा आदर्श आमच्या अगदी रोमारोमांतून भिनलेला आहे. सीताचरित्रापासून आमचे स्त्री-जीवन दूर नेऊन त्यात आधुनिकता आणण्याचा कोणताही प्रयत्न तात्काळ निष्फळ ठरतो, हे आपण प्रत्यक्षही पहातच आहोत.

– स्वामी विवेकानंद (शिक्षण, पृ. ६३-६५) (संदर्भ : जीवन-विकास, ऑक्टोबर २००१)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment