१. ‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची काळजी
घेण्यासाठी आचरणात आणायचे विविध उपाय !

सध्या सर्वच ठिकाणी ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू झाले आहे. अगदी बालवाडीपासून ते पदवीपर्यंत सर्वच जण ऑनलाईन शिकत आहेत. कुठेही बाहेर न जाता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण सद्यःस्थितीतही शिक्षण चालू ठेवले आहे. त्यामुळे मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वजण संगणक आणि भ्रमणभाष यांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. या अमर्याद वापरामुळे डोळ्यांवर सर्वाधिक विपरीत परिणाम होत आहेत. बहुतांश जणांचे सतत संगणक किंवा भ्रमणभाष वापरणे, झोपून भ्रमणभाष वापरणे, अंधार्या खोलीत किंवा अगदीच मंद प्रकाशात काम करणे, तहान-भूक हरपून आणि शरिराकडे दुर्लक्ष करून काम चालू असते.
यामुळे डोळे कोरडे पडणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोके दुखणे, मान दुखणे, व्यवस्थित पचन न होणे, आम्लपित्त (ॲसिडिटी होणे), मलबद्धता होणे, उत्साह न्यून होणे, झोप व्यवस्थित न होणे, स्वभाव चिडचिडा होणे, धरसोड वृत्ती वाढीस लागणे आदी सर्व लक्षणे निर्माण होतात. या सर्व लक्षणांवरून संगणक आणि भ्रमणभाष यांच्या अमर्याद वापराचे घातक परिणाम आपल्या लक्षात येतील. त्यामुळे डोळ्यांसह संपूर्ण शरिराचा एकूण विचार करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. सध्याच्या ‘ऑनलाईन’च्या काळात डोळ्यांची, तसेच सर्व शरिराची काळजी कशी घ्यावी ? यासाठी हा लेख…

१. सर्वप्रथम डोळ्यांना योग्य प्रकारे आराम द्या. व्यवस्थित झोप घेणे, हाच यावरील रामबाण उपाय आहे. रात्रीचे जागरण आणि दिवसाची झोप टाळावी.
२. डोळ्यांना व्यवस्थित पोषण मिळण्यासाठी संतुलित आहार घ्या. जेवणामध्ये स्निग्ध पदार्थांचा (तूप) वापर जरूर करावा. जंकफूड कटाक्षाने टाळावेत.
३. तहान लागली की, पाणी प्यावे. एकाच वेळी जास्त पाणी पिणे टाळावे, तसेच इतर शारीरिक वेगांना (मल-मूत्र) टाळू नये.
४. काम करतांना बसण्याची जागा व्यवस्थित असावी. संगणक डोळ्यांपासून दीड ते दोन फूट अंतरावर डोळ्यांच्या पातळीच्या खाली असावा.
५. काम करतांना खोलीमध्ये पुरेसा प्रकाश आणि हवा खेळती रहाणे आवश्यक आहे.
६. संगणक आणि भ्रमणभाष यांचा ‘ब्राईटनेस’ डोळ्यांना व्यवस्थित दिसेल, असा करून घ्यावा. वाचतांना ‘ब्लू लाईट फिल्टर’ जरूर वापरावा.
७. जर चष्मा असल्यास पुन्हा एकदा नेत्रतपासणी करून ‘ब्लू ब्लॉक कोटिंग’चा चष्मा घ्यावा. त्यामुळे डोळ्यांना अतीनील किरणांपासून संरक्षण मिळते.
८. संगणकीय काम करतांना प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंदासाठी डोळ्यांना आराम देऊन बाहेरची अथवा दूरची २० फुटांवरील वस्तू पहाणे, हा नियम कटाक्षाने पाळावा, असे जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ सुद्धा सांगत आहेत. यामुळे डोळ्यांच्या पेशींवरील ताण न्यून होऊन डोळ्यांना आराम मिळतो.
९. अधूनमधून डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करावी. त्यामुळे डोळ्यांचा ओलावा टिकून रहातो.
१०. डोळे अधूनमधून थंड पाण्याने धुवावेत. तोंडामध्ये पाणी भरून (गाल फुगवून) बंद डोळ्यांवर साधारण २१ वेळा पाणी शिंपडावे. नंतर तोंडातील पाणी थुंकावे. यामुळे डोळ्यातील उष्णता न्यून होऊन डोळे तजेलदार होतात. यालाच आयुर्वेदात ‘नेत्रसेचन’ किंवा ‘नेत्रप्रक्षालन’ म्हणतात.
११. आयुर्वेदोक्त ‘गंडूष क्रिये’चा (Oil pulling) वापर करावा. सकाळी दात घासल्यावर कोमट तीळतेल तोंडामध्ये साधारण १५ मिनिटे धरून ठेवावे आणि नंतर ते थुंकून गरम पाण्याने चूळ भरावी. यामुळे डोळ्यांना विशेष लाभ होतो.
१२. आयुर्वेदोक्त ‘अंजन’ वैद्यकीय सल्ल्याने जरूर वापरावे. त्यामुळे डोळ्यातील विकृत दोष बाहेर येण्यास साहाय्य होते.
१३. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावे. त्यामुळे शिकतांना आणि शिकवतांना लागणारा वेळ वाचून डोळ्यांना आराम मिळेल. शिक्षकांनी शिकवतांना स्वतः मध्ये अल्पविश्राम (ब्रेक) घेऊन मुलांना ही अल्पविश्राम घेण्यास प्रवृत्त करावे.
१४. काम करतांना थोडी विश्रांती घेऊन, तसेच जागेवरून उठून पाय मोकळे करावेत. प्रतिदिन व्यायाम, योगासने, प्राणायाम यांचा अवश्य अवलंब करावा.
१५. डोळ्यांसाठी उपयुक्त असे व्यायाम (डोळ्यांच्या हालचाली) करावेत, तसेच योगामधील ‘त्राटक क्रिया’ करावी. डोळ्यांना आराम देण्यासाठी तळहात एकमेकांवर घासून ते बंद डोळ्यांवर जास्त जोर न देता ठेवावेत. यामुळे डोळ्यातील रक्ताभिसरण सुधारते.
या सर्वांचा अवलंब ऑनलाईन शिकतांना किंवा शिकवतांना जरूर करावा. त्यामुळे डोळ्यांचे रक्षण होईल, तसेच काही तक्रार असल्यास नेत्ररोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार घेऊन डोळे, शरीर आणि मन यांचे आरोग्य अबाधित ठेवावे.
– डॉ. निखिल माळी, आयुर्वेद नेत्ररोगतज्ञ, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी
१६. अक्षरांचा आकार मोठा ठेवावा.
१७. मासातून २ – ३ दिवस भ्रमणभाष अथवा भ्रमणसंगणक बंद ठेवून डोळ्यांना पूर्ण विश्रांती द्यावी.
१८. दोन मिनिटे थांबून डोळ्यांचे व्यायाम करावेत, म्हणजे आजूबाजूला किंवा वर-खाली पहावे आणि थोडा वेळ डोळे बंद करावेत.
१९. डोळे ओले रहावेत; म्हणून विशिष्ट प्रकारचे थेंब (वैद्यकीय समुपदेशानुसार) डोळ्यांत टाकावेत.
२०. संगणकाच्या पडद्यापासून २२ ते २८ इंच लांब बसावे. अतिजवळ किंवा अतिलांब बसण्याने डोळ्यांवर ताण पडतो.
२१. टंकलेखन करतांना मनगट सरळ रेषेत राहील, असे पहावे.
२२. उंची उणे-अधिक करता येणारी आसंदी वापरावी. तुमचे पाय सतत भूमीला टेकलेले असावेत.
२३. ‘संगणकाच्या पडद्यावर प्रकाश परावर्तित होत नाही ना ?’, हे पहावे.
२४. मनगट आणि हात भूमीला समांतर रहातील, अशा पद्धतीने कळफलक (कीबोर्ड) ठेवावा.
२५. मध्ये मध्ये उठून थोडा वेळ इकडे-तिकडे फिरावे.
– होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता
२. आदर्श दिनचर्या : डोळे निरोगी ठेवण्यासाठी !
डोळे निरोगी ठेवण्यासाठी दिवसभरात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करणे महत्त्वाचे असते. डोळे निरोगी रहाण्यासाठी आदर्श दिनचर्या कशी असावी ? याविषयी जाणून घ्यायला हवे. आयुर्वेदाने प्रथम याच गोष्टींना महत्त्व दिले आहे. आधुनिक वैद्यकीय शास्त्राचे जनक विलियम ओसलर यांचेही हेच म्हणणे आहे- ‘One of the first duties of the physician is to educate the masses not to take medicine.’ (अर्थ : रुग्णांना थेट औषधे देण्यापेक्षा त्यांना आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शिक्षित करणे, हे डॉक्टरांचे आद्यकर्तव्य आहे.)
आपल्या दिनचर्येमध्ये पुढीलप्रमाणे पालट केल्यास डोळ्यांचे आरोग्य नक्कीच टिकून राहील आणि भावी काळातील आजारांची तीव्रताही न्यून होईल.
१. सकाळी शक्य तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी साहजिकच रात्री लवकर झोपावे. रात्री जागरण करू नये किंवा दिवसाही झोप घेऊ नये. दुपारी जेवल्यानंतर लगेचच झोपणे टाळावे.
२. दात घासल्यानंतर डोळ्यांवर थंड पाणी शिंपडावे. तत्पूर्वी मुखामध्ये पाणी भरून घ्यावे आणि नंतर पाणी शिंपडून झाल्यावर मुखातील पाणी थुंकून द्यावे. त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी असलेली उष्णता न्यून होऊन त्यांना थंडावा मिळतो.
३. अंघोळ करण्यापूर्वी अभ्यंग म्हणजेच सर्व अंगाला आणि डोक्याला तेल लावले.
४. डोक्यावरून अंघोळ करताना शक्यतो थंड पाण्याने करावी, डोक्यावरून अंघोळ करण्यासाठी गरम पाणी वापरल्याने डोळे आणि केस यांची हानी होते.
५. वैद्यकीय सल्ल्याने डोळ्यांना अंजन (काजळ) लावावे. त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते.
६. उन्हामध्ये बाहेर जातांना डोके व्यवस्थित झाकून घ्यावे, तसेच डोळ्यांसाठी गॉगल्सचा वापर करावा.
७. पायामध्ये पादत्राणे घालावीत. शक्यतो प्लास्टिकच्या चप्पल किंवा सॅण्डल वापरणे टाळावे.
८. दिवसातून ३ ते ४ वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.
९. बाहेरून घरी आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य टिकून रहाते.
१०. रात्री झोपतांना तळपायाला तेल लावायला विसरू नये. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य अबाधित रहाते.
वरील सर्व गोष्टींचा अवलंब अवश्य करावा. यातील जवळजवळ सर्वच गोष्टी आयुर्वेदोक्त दिनचर्येत आल्या आहेत. त्यांचे आचरण केल्यास डोळ्यांचे आरोग्य टिकून रहाते.