साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
एका शहरातील काही ग्रामस्थांनी एका आस्थापनाकडून सौर यंत्रणा (सोलर सिस्टिम) लावून घेतली. यंत्रणा उभारतांना या आस्थापनाने ग्राहकांची पुढीलप्रमाणे फसवणूक केली.
१. ग्राहकांची फसवणूक करण्याच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे
अ. दोन ‘किलोवॅट’च्या (KW) सौर यंत्रणेची मागणी केली असता २ ‘किलो व्होल्ट अॅम्पियर’ची (KVA) यंत्रणा बसवली.
आ. यंत्रणेमध्ये न्यूनतम १,५०० वॅटचे सौरपत्रे (३०० वॅटचे ५ पत्रे) लावणे अपेक्षित असतांना केवळ ४ पत्रे लावून दिले. ‘अल्प पत्र्यांमध्येच काम होईल’, असे सांगण्यात आले.
इ. ‘सौरयंत्रणा किती घंट्यांचा ‘बॅकअप’ देईल ?, सौरपत्रे, इन्व्हर्टर आणि बॅटरी कोणत्या आस्थापनांची असेल ?’, हे आस्थापनाने स्पष्ट केले नाही.
ई. निकृष्ट गुणवत्तेचा ‘चार्ज कंट्रोलर’ (प्रभार नियंत्रक) वापरण्यात आला.
‘या आस्थापनाने एकाच वेळी अनेकांची कामे घेऊन ती अपूर्ण ठेवली आहे’, असेही लक्षात आले.
२. सौरयंत्रणा लावतांना पुढील सूचनांचे पालन करा !
अ. ‘घर वा कार्यालय यांसाठी किती वॅटची सौर यंत्रणा उभारायला हवी ? तेथे किती पॉवरचा वापर होतो ?, विद्युत यंत्रणा नसल्यास न्यूनतम किती पॉवरची आवश्यकता आहे ?’, आदींचा प्रथम अभ्यास करावा. यासाठी माहितीजालाचा वापर करता येईल.
आ. ‘कोणते आस्थापन न्यूनतम व्ययात वरील यंत्रणा स्थापित करून देईल ?’, हे प्रथम अभ्यासावे. या संदर्भात आस्थापनांकडून निश्चिती करून घ्यावी. यंत्रणा बसवण्यासाठी जे आस्थापन निवडणार, ‘ते चांगल्या गुणवत्तेचे काम करते का ?’, याची जाणकारांकडे चौकशी करावी.
इ. ‘कोणत्या आस्थापनाची बॅटरी, इन्व्हर्टर, पॅनेल्स चांगल्या गुणवत्तेचे आहेत ?’, याचाही अभ्यास करावा.
ई. एकाच आस्थापनाचे पत्रे, बॅटरी आणि इन्व्हर्टर घेतल्यास त्यावर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आकारला जातो; पण वेगवेगळ्या आस्थापनांचे घेतल्यास अनुक्रमे ५, १८ आणि २८ टक्के वस्तू आणि सेवा कर आकारला जातो. या दृष्टीने विचार करावा.
उ. कोणत्याही आस्थापनाला सौर यंत्रणा लावण्यास होकार देण्यापूर्वी त्यांचे अंतिम दरपत्रक मागवून करार करावा आणि त्याची एक प्रत स्वतःजवळ ठेवावी.
‘सौर यंत्रणा बसवणार्या आस्थापनांनी आपल्या अनभिज्ञतेचा
अपलाभ घेऊन फसवणूक करू नये’, यासाठी वरील सूचनांचे पालन करा आणि आपली आर्थिक हानी टाळा !
[email protected] या संगणकीय पत्त्यावर चांगल्या गुणवत्तेची सौर यंत्रणा बसवणारी विश्वसनीय आस्थापने ठाऊक असल्यास त्याची माहितीपाठवावी. म्हणजे ती सर्वांना कळवता येईल. |