१. सर्व साधु, संत सांगतात की मायेत अडकू नका. पण त्यासाठी काय करायचे ?
दुसर्यांवरील अवलंबित्व कमी केल्याने टप्प्याटप्प्याने मायेतून सुटत जाण्यास साहाय्य होणे
आपण जगात राहतो. जगातील वस्तू, व्यक्ती, परिस्थितीशी आपली देवाण-घेवाण होतच असते. त्यांच्यावरील आपले अवलंबून राहणे कमी कमी करत जायला हवे. आपल्या जीवनात त्यांची आवश्यकता आणि अपरिहार्यता जितकी कमी करत जाऊ, तितके मायेच्या पकडीतून सुटत जाऊ. पूर्वी आपल्याकडे ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास अशा चार आश्रमांची पद्धत होती. प्रौढावस्था आली की मुलांवर कारभार सोपवून लोक वानप्रस्थ घेत असत. गावापासून, नातेवाईकांपासून दूर वनात जाऊन ते राहत असत. त्याचा एक लाभ, दुसर्यांवरील अवलंबित्व कमी होणे, हा सुद्धा असे. हे टप्प्या-टप्प्याने मायेतून सुटत जाण्यासाठी होते. आता आपण वनात तर नाही जाऊ शकत, पण आपल्या वस्तु, नातलग इत्यादींमधील आपला मोह कमी करत जाऊ शकतो.
२. पण जगण्यासाठी पैसे, अन्न, कपडे इत्यादी तर
लागणारच ना ? चाकरी-धंदा करावाच लागणार.
मनाने निर्लिप्त आणि निरिच्छ राहून व्यवहार केल्यास मन मायेत गुंतणार नाही !
आवश्यक ते मिळवण्यात आणि आवश्यक तितकेच वापरण्यात काहीच अडचण नाही. त्यांच्या मोहात पडायचे नाही, एवढेच. त्यांची आवड-निवड, आवश्यकता आपल्यावर वरचढ झाले नाहीत की झाले.
तुकाराम महाराजांनी सांगितले आहे ना
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ।
उदास विचारे वेंच करी ।।
व्यवहार चोख करून पैसे मिळवावेत आणि त्यांच्यात आसक्ती न ठेवून त्यांचा व्यय करावा.
हे ‘उदास’ असणे महत्त्वाचे आहे. उदास = उद् + आस. म्हणजे वर, वेगळा, अलिप्त असलेला; त्यात न गुंतलेला. मनाने निर्लिप्त आणि निरिच्छ राहून व्यवहार करायचा, म्हणजे मायेत गुंतणार नाही.’