साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असलेले कृपावत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सध्याचा काळ किती भयावह आहे, हे कळण्यासाठी वर्तमानपत्रांचे काही मथळेही पुरेसे आहेत. ‘दुर्दैवाचा भयावतार’, ‘नरक म्हणतात, तो हाच का ?’, यांसारख्या मथळ्यांतूनच सध्या सामाजिक स्थिती किती भयावह आहे, हे समजू शकते. प्रत्येक व्यक्ती अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहे. ‘ऑक्सिजनची कमतरता’, ‘औषधांची कमतरता’, ‘पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव’, असे हीन-दीन चित्र आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड अत्याधुनिकीकरण झालेले असतांना, विदेशी आस्थापनांचा भारतात शिरकाव झाल्यापासून लोकांच्या खिशात भरपूर पैसा खुळखुळत असतांना, प्रत्येकाकडे भ्रमणभाष असल्याने चांगली संपर्कयंत्रणा असतांना, घरोघरी आरोग्य विमा असतांना आज आपण एका विषाणूपुढे एवढे हतबल का झालो आहोत ?

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

आजच्या हतबलतेचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ‘काळ’ हेच उत्तर आहे’, असे जाणवते. सध्या कलियुगांतर्गत ईश्‍वरी राज्याची स्थापना होण्याचा परिवर्तनाचा काळ चालू आहे. भगवंताने गीतेत सांगितल्याप्रमाणे हा धर्मग्लानीचा काळ आहे. कलियुगात धर्म लोपल्यामुळे वातावरणातील नकारात्मक शक्तींचे प्राबल्य वाढले आहे. त्यांच्यापुढे तग धरू शकेल असा सात्त्विक, आत्मबळसंपन्न समाज नसल्यामुळे आज हाहाःकार माजल्याचे चित्र आहे. या समस्येशी दोन हात करायचे, तर केवळ भौतिक सुविधा उभारून चालणार नाही, तर त्यांच्यासमवेत आध्यात्मिक स्तरावर राहून उपाययोजना काढणे आवश्यक आहे आणि नेमके हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जाणले अन् त्यांनी तात्काळ त्यावर उपाययोजना काढण्यासाठी प्रयत्न केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक वर्षांपूर्वीच आपत्काळ येणार असल्याचे जाणून साधकांना आध्यात्मिक बळ वाढवण्यास प्रेरित केले. त्यांनी काळाची प्रतिकूलता पाहून ‘आध्यात्मिक स्तरावरील वेगवेगळे उपाय कसे करायचे ?’, हे साधकांना सांगितले. अशा प्रकारे साधकांचे आध्यात्मिक स्तरावर रक्षण होण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. आपत्काळात कोणताही स्थुलातील अथवा प्रत्यक्ष आधार नसतांना साधक ईश्‍वरावरील श्रद्धेमुळे आध्यात्मिक बळावर सुरक्षित रहावेत, त्यांच्याभोवती ईश्‍वरी कृपेचे कवच सदैव असावे, यांसाठी ते गेल्या अनेक वर्षांपूर्वीपासूनच प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच वातावरणातील किंवा सामाजिक नकारात्मकतेचा प्रभाव सनातनच्या साधकांवर अत्यल्प झाल्याची अनुभूती सहस्रो साधक घेत आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले हे कार्य हा केवळ इतिहास नसून साधकांना कलीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी दिलेला लढा आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांतील येथे देत असलेले प्रसंग केवळ स्थुलातील आहेत. साधकांचे रक्षण होण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्म स्तरावर आमच्यासाठी काय काय केले आहे, हे कळण्याची आमचीही क्षमता नाही. तरीही जे लक्षात आले, त्यांतील काही प्रमुख सूत्रेच शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

संकलक : सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आपलेसे करायला सांगणे


परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना फार पूर्वीपासून सांगायचे, ‘तुम्ही चुका करत राहिलात आणि अयोग्य वागत राहिलात, तर देवाला तुम्ही आपले वाटाल का ? देवाचे लक्ष तुमच्याकडे जाईल का ? संकटकाळात देव तुमचे रक्षण करेल का ?’ ही वाक्ये त्यांनी साधकांवर बिंबवली. साधकांचे मन, बुद्धी आणि चित्त यांची शुद्धी होण्यासाठी त्यांनी साधकांना स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया शिकवली. साधक ही प्रक्रिया गेल्या दोन दशकांपासून राबवत आहेत. ही प्रक्रिया सर्वांनाच आत्मसात करण्यासाठी त्यांनी त्यावरील ग्रंथही प्रकाशित केले आहेत. आध्यात्मिक स्तरावर देह शुद्ध होऊ लागल्यावरच आपण एकाग्रतेने देवाचे नामस्मरण करू शकतो, तसेच आपल्याकडून साधना होऊ शकते. साधकांनी ही प्रक्रिया मनापासून राबवल्याने अनेक साधकांची उन्नती होऊन ते संतपदाला पोचले आहेत. ‘मन, बुद्धी आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय आपण देवाशी एकरूप होऊ शकत नाही’, हे तत्त्व आहे. अशा प्रकारे देवाला आपलेसे करायला शिकवून परात्पर गुरु डॉ. आठवले हे साधकांकडून आपत्काळाची सिद्धता फार पूर्वीपासूनच करवून घेत आहेत.

 

विशिष्ट त्रासासाठी विशिष्ट देवतेचा नामजप

सनातनच्या साधकांना वाईट शक्तींमुळे आध्यात्मिक त्रास होऊ लागला, तेव्हा ‘सनातनचे साधक ईश्‍वरी राज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेसाठी कार्यरत असल्यानेच साधकांना बहुतांश त्रास भोगावे लागत आहेत’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला वेळोवेळी सांगितले. त्या वेळी साधकांचे त्रास दूर होण्यासाठी कोणता विशिष्ट नामजप केला, तर लाभ होईल, हे परात्पर गुरुदेव स्वतः शोधत असत. आता आध्यात्मिक उन्नती केलेले सनातनचे काही साधक, संत आणि सद्गुरु हेही विशिष्ट त्रासांवर विशिष्ट नामजप शोधून साधकांना साहाय्य करत आहेत. मला प्रेरणा देऊन परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त -श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः -ॐ नमः शिवाय ।’ हा कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ वाढवणारा नामजप शोधून घेतला. हा नामजप अत्यंत परिणामकारक असल्याच्या अनुभूती शेकडो साधकांनी घेतल्या आहेत.

या व्यतिरिक्तही अन्य शारीरिक व्याधींवर, अडचणींवर मात करण्यासाठी शोधलेले नामजप या आपत्कालीन परिस्थितीत साधकांसाठी वरदान ठरत आहेत. आपत्काळात होणार असलेली औषधांची अनुपलब्धता लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वीच परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘विकार-निर्मूलनासाठी नामजप’, ‘नामजपांमुळे दूर होणारे विकार’, हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. या संदर्भात अद्यापही संशोधन चालू आहे.

सध्याची बाह्य परिस्थिती पहाता व्याधींवर औषधे आहेत, समाजाच्या हातात पैसा आहे; मात्र रुग्णांपर्यंत ही औषधेच पोचू शकत नाहीत. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा एकीकडे तुटवडा आणि दुसरीकडे काळा बाजार चालू आहे. या सर्व परिस्थितीत ‘अनेक लहान-मोठ्या व्याधींवर शोधलेले नामजप ही संजीवनीच आहे’, असा साधकांचा भाव आहे.

 

संतांनी सांगितलेले उपाय


पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर जेव्हा संतांची भेट घ्यायचे, तेव्हा ते संतांना साधकांचे त्रास, काळाची प्रतिकूलता यांविषयी सांगून साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची विनंती करायचे. त्यांच्यावरील प्रेमापोटी अनेक संतांनी साधकांचे त्रास दूर होण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले. गेल्या काही वर्षांपासून अनेक संत, अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती रामनाथी आश्रमात येतात. त्याही संतांनी सांगितलेले सर्व उपाय, विधी, अनुष्ठाने परात्पर गुरु डॉक्टर अत्यंत गांभीर्याने आणि भावपूर्ण करतात. श्री शतचंडी याग, संकटांचे निवारण करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने श्‍वासाची लय पकडून देवतेचा जप करणे, श्री सप्तशती पाठाचे वाचन करणे ही त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण अनुष्ठाने आहेत. असे सहस्रो लहान-मोठे उपाय परात्पर गुरु डॉक्टरांनी अत्यंत श्रद्धेने केले आहेत. संतांच्या आज्ञेने केलेली अनुष्ठाने, धार्मिक विधी यांमुळे त्रासांचे निवारण झाल्याच्या अनुभूतीही साधकांनी घेतल्या आहेत.

 

प्राणशक्तीवहन उपायपद्धत शोधणे


आपल्या मनाला कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती प्राणशक्ती (चेतना) वहन संस्था पुरवते. तसेच आपल्या शरिरात कार्यरत असलेल्या रक्ताभिसरण, श्‍वसन, पचन इत्यादी संस्थांनाही जी शक्ती लागते, ती प्राणशक्तीवहन संस्था पुरवते. तिच्यात एखाद्या ठिकाणी अडथळा आल्यास संबंधित इंद्रियांची कार्यक्षमता अल्प झाल्याने विकार निर्माण होतात. अशा वेळी इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी आयुर्वेदीय, ‘अ‍ॅलोपॅथिक’ आदी औषधे कितीही घेतली, तरी त्यांचा विशेष उपयोग होत नाही. त्यासाठी प्राणशक्तीवहन संस्थेत निर्माण झालेला अडथळा दूर करणे, हाच एकमेव मार्ग असतो. आपल्या हातांच्या बोटांतून प्राणशक्ती बाहेर पडत असते. तिचा वापर करून विकार बरे करणे, हे प्राणशक्तीवहन उपायपद्धतीचे मर्म आहे. ही अत्यंत सोपी उपायपद्धत परात्पर गुरुदेवांनी साधकांसाठी शोधली आहे.

रोगनिवारणाच्या संदर्भात बिंदूदाबन, रिफ्लेक्सॉलॉजी आदी उपायपद्धतींमध्ये पुस्तक किंवा जाणकार यांचे साहाय्य आवश्यक असते. पिरॅमिड, चुंबक आदी उपायपद्धतींमध्ये ती ती साधने आवश्यक असतात. या पार्श्‍वभूमीवर कुणाच्याही साहाय्याची आणि कोणत्याही साधनांची आवश्यकता न भासणारी प्राणशक्तीवहन संस्था उपायपद्धत भीषण आपत्काळाचा विचार करता अधिक स्वयंपूर्ण ठरते. तेव्हा आधुनिक वैद्य, मार्गदर्शक साधक आदी उपलब्ध होणे कठीण होईल, तेव्हा या प्राणशक्तीवहन उपायपद्धतीमुळे साधक स्वतःच स्वतःवर उपाय करू शकतील. ज्या साधकांना असे उपाय शोधता येत नाहीत, त्यांना इतर काही साधक उपाय शोधून देत आहेत. तसेच या उपायपद्धतीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दूर अंतरावरील रुग्णावर, म्हणजे तो रुग्ण जगाच्या पाठीवर कुठेही असला किंवा तो ‘आय.सी.यू.’मध्ये (अतीदक्षता विभागात) जरी असला, तरी त्याच्यावर आवश्यक असे उपाय उच्च आध्यात्मिक स्तराची व्यक्ती स्वतःवर करून त्या रुग्णाला बरे करण्यास साहाय्य करू शकते.

 

समष्टीसाठी अत्यंत परिणामकारक
असलेले आणि वातावरणाची काही किलोमीटर अंतरापर्यंत शुद्धी करणारे यज्ञ-याग !


पुढे तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वातावरण अत्यंत अशुद्ध होणार आहे. ‘कोरोना महामारी’सारखी रोगराई पसरल्यानेही वातावरण दूषित होते. वातावरणाची शुद्धी होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. यज्ञ-यागांमुळे काही किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाची शुद्धी होते, तसेच यज्ञ-यागामध्ये आवाहन केलेल्या देवता प्रसन्न होऊन त्यांचे आशीर्वादही मिळतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, युद्ध अशा संकटकाळात रक्षण होते. हे लक्षात घेऊन काळानुसार यज्ञ-साधना करण्यास परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २००१ पासूनच आरंभ केला होता. वर्ष २००० मध्ये साधकांना वाईट शक्तींचे आध्यात्मिक त्रास चालू झाल्यानंतर फोंडा, गोवा येथील ‘सुखसागर’ येथे काही यज्ञ करण्यात आले. नंतरच्या काळातही वेगवेगळ्या संतांच्या मार्गदर्शनाखाली ‘उच्छिष्ट गणपति याग’, ‘साग्निचित् अश्‍वमेध महासोमयाग’, ‘चंडीयाग’, ‘धन्वन्तरि याग’ आदी वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पार पडले. आता साधकांचे रक्षण होणे, धर्मप्रसाराच्या कार्यात येणार्‍या संकटांचे निवारण होणे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने करता येणे, यांसाठी गेली ४ वर्षे महर्षि वेगवेगळ्या देवतांसाठीचे यज्ञ करण्यास सांगत आहेत. महर्षींच्या आज्ञेने आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाने हे यज्ञ अत्यंत भावपूर्ण वातावरणात होत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरही वर्ष २०१७ मध्ये यासंदर्भात म्हणाले होते, ‘सध्या आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या साधकांना होणार्‍या त्रासांचे स्वरूप एवढे तीव्र आहे की, संतांनी सांगितलेल्या उपायांचाही विशेष परिणाम होणार नाही. हे ओळखूनच महर्षि साधकांच्या रक्षणासाठी सातत्याने यज्ञ करण्यास सांगत आहेत.’

खरोखरच एप्रिल २०२१ पर्यंत सनातनच्या आश्रमांत २६७ हून अधिक यज्ञ झालेले आहेत. या सर्व यागांमध्ये ‘साधकांचे आपत्काळात रक्षण होऊ दे’, हा संकल्प करण्यात आला. ‘संसर्गजन्य रोगांपासून रक्षण व्हावे’, यासाठी केलेले ‘संजीवनी होम’, पंचमहाभूतांच्या प्रकोपापासून रक्षण होण्यासाठी केलेला ‘पंचमहाभूत याग’, ‘आरोग्य चांगले रहावे’, यासाठी केलेला ‘धन्वन्तरि याग’, ‘प्राणशक्ती वाढावी’, यासाठी केलेला ‘श्री गणेश याग’ हे साधकांच्या आरोग्यरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

मुळातच यज्ञांची परिणामकारकता अधिक असते, त्यातून तो सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाने होणे, हे दैवी आहे. यज्ञात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, कधी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह अन्य सद्गुरु आणि संत यांचा सहभाग असतो. अर्थार्जनासाठी नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी पौरोहित्य करणारे सनातनचे पुरोहित यज्ञनारायणाची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच या यज्ञांमुळे शेकडो साधकांना चांगल्या अनुभूती आल्या आहेत. हे सारे घडत आहे, ते केवळ आणि केवळ परात्पर गुरु डॉक्टरांना असलेल्या समष्टीच्या रक्षणाच्या तळमळीमुळे !

 

देवतांचे आशीर्वाद लाभण्यासाठी
श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे देश-विदेशांतील तीर्थक्षेत्री भ्रमण !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या गेली ९ वर्षे देश-विदेशांत भ्रमण करत आहेत. महर्षींच्या आज्ञेने विविध तीर्थक्षेत्री भ्रमण करून त्रासांचे निवारण होण्यासाठी, आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी त्या विविध विधी, परिहार करत आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत त्यांचा ९ लाखांहून अधिक किलोमीटर प्रवास झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेकदा संकटे येण्यापूर्वीच महर्षि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून विविध विधी करवून घेतात. श्रीगुरूंची कृपा आणि महर्षींचे आशीर्वाद यांमुळे हे विधी फलद्रूप होऊन अनेक त्रास दूर होत आहेत. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आतापर्यंत सहस्रो विधी केले आहेत. त्यातील आपत्काळात साधकांचे रक्षण होण्याच्या दृष्टीने केलेले काही वैशिष्ट्यपूर्ण विधी आणि प्रार्थना उदाहरणासाठी देत आहोत.

 

‘साधकांचे ज्वरभय दूर व्हावे’, यासाठी श्री ज्वरहरेश्‍वर देवाला अभिषेक करणे

गेल्या काही वर्षांत जगभरात विविध संसर्गांच्या माध्यमातून अनेक जण रुग्णाईत होत आहेत. असे असतांना ‘सनातनच्या साधकांना कोणत्याही ज्वराने ग्रासून भय वाटू नये’, यासाठी महर्षींच्या आज्ञेने १०.३.२०२० या दिवशी ‘श्री ज्वरहरेश्‍वर देवा’ला फळांच्या रसाचा अभिषेक करण्यात आला. ईरोड (तमिळनाडू) येथील भवानी गावात कावेरी, भवानी आणि अमृतावाहिनी (गुप्तनदी) या ३ नद्यांचा संगम आहे. श्री ज्वरहरेश्‍वर मंदिर या संगमाच्या ठिकाणी आहे.

 

आपत्काळात साधकांना अन्न अल्प पडू नये, यासाठी श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे


‘४.४.२०१९ या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी काशी (उत्तरप्रदेश) येथील काशी विश्‍वनाथाच्या मंदिर परिसरातील अन्नपूर्णादेवीचे दर्शन घेतले. त्यांनी देवीला प्रार्थना केली, ‘येणार्‍या आपत्काळात आणि युद्धाच्या वेळी साधकांना अन्न कधीही न्यून पडू देऊ नकोस.’ त्यानंतर त्यांनी देवीच्या चरणांवर वाहिलेले तांदूळ घेतले आणि रामनाथी आश्रमातील अन्न साठ्यात ठेवण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आणखी एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे ते पाठवून दिले.

अशा प्रकारे साधकांसाठी अनेक स्तरांवर उपाय चालू आहेत.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
वास्तविक परात्पर गुरुदेवांचा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा आहे की, त्यांच्या केवळ अस्तित्वानेही साधकांचे रक्षण होणार आहे. असे असले, तरी साधकांना हे एक अनोखे शास्त्र शिकायला मिळावे, पुढील अनेक पिढ्यांना ‘समस्यांशी आध्यात्मिक स्तरावर कसे लढायचे’, हे कळावे, यासाठी ते हे सर्व करत आहेत. या आपत्काळात गांभीर्याने आणि श्रद्धापूर्वक साधना करत रहाणे, हीच त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता आहे !’
टीप : या लेखात यज्ञ किंवा प्रार्थना ही साधकांच्या रक्षणासाठी असे म्हटले असले, तरी त्याचा अर्थ केवळ ‘सनातनच्या साधकांच्या रक्षणासाठी’, असा मर्यादित नसून या उपायांमुळे ‘एका साधकाप्रमाणे आचरण असलेल्या समाजातील व्यक्ती, ईश्‍वराचे भक्त, संत या सर्वांच्या रक्षणासाठी’, असा अभिप्रेत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment