शिव रुद्राक्षाची माळ धारण करतो. ‘रुद्राक्ष’ हे बीज सात्त्विक आहे. त्यामध्ये २ टक्के शिवतत्त्व कार्यरत असते. रुद्राक्षामध्ये चांगली स्पंदने धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अनेक ऋषिमुनी रुद्राक्षाच्या माळा धारण करतात. रुद्राक्षाने लोलकाप्रमाणे प्रयोग करून ‘एखादी वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती सात्त्विक आहे कि नाही ?’, याचे परीक्षण करू शकतो.
१. व्यक्तीची इडा, पिंगळा किंवा सुषुम्ना नाडी चालू असेल, तर त्याप्रमाणेही रुद्राक्ष फिरणे
व्यक्तीने रुद्राक्षाचा लोलक हातात घेतल्यावर व्यक्तीची जी नाडी चालू आहे, त्याप्रमाणे रुद्राक्ष हलतो, उदा. इडा नाडी चालू असेल, तर रुद्राक्ष डाव्या बाजूकडे आडवा फिरतो आणि पिंगळा नाडी चालू असेल, तर रुद्राक्ष उजव्या बाजूकडे आडवा फिरतो. व्यक्तीची सुषुम्ना नाडी चालू असेल, तर रुद्राक्ष डावीकडून उजवीकडे वर्तुळाकारात वेगाने फिरतो. एखादी वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती सात्त्विक आहे का ? याचे परीक्षण करण्यासाठी सुषुम्ना नाडी चालू असणार्या म्हणजे, चांगली साधना करणार्या व्यक्तीने रुद्राक्ष हाताळणे योग्य आहे. अनिष्ट शक्तींचा त्रास नसणार्या आणि सकारात्मक ऊर्जा असणार्या व्यक्तीने रुद्राक्षाने परीक्षण केल्यास ते अधिकाधिक अचूक येते, उदा. वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांतून त्रासदायक स्पंदने येत असल्यास रुद्राक्ष घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो आणि सकारात्मक स्पंदने येत असल्यास घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो.
२. रुद्राक्षाची हालचाल न होणे याचा अर्थ
एखाद्या वस्तूचे परीक्षण करतांना त्यातून चांगली किंवा त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अत्यल्प असेल, तर रुद्राक्षाची हालचाल होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीमध्ये चांगली आणि त्रासदायक स्पंदने सारख्याच प्रमाणात असतील, तरीही त्या व्यक्तीचे परीक्षण करतांना रुद्राक्षाची हालचाल न होता तो स्थिर रहातो.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. |