१. गुरुमहाराज (प.पू. काटेस्वामीजी) रस्त्यावरून जातांना
दिसताच धावत जाऊन त्यांना लोटांगण घालणे आणि त्या वेळी
स्वत: चिखलात असल्याचे किंवा अंगाला खडे टोचल्याची जाणीव नसणे
प.पू. भास्करकाका पाचगणी (जिल्हा सातारा) येथील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची भेट झाल्यानंतरही काही दिवस प.पू. काका महाविद्यालयामध्ये शिकवत होते. गुरुमहाराज (प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी) त्या कालावधीत पाचगणी येथे वास्तव्यास होते. प.पू. काका वर्गात शिकवत असतांना कधी गुरुमहाराज रस्त्यावरून जातांना त्यांना दिसले की, ते स्वतःचे भान हरपून जायचे आणि त्या क्षणी धावत जाऊन ते जेथे कुठे उभे असतील, तेथे जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार करायचे. उठल्यावर त्यांच्या लक्षात यायचे की, त्यांनी चिखलातच साष्टांग नमस्कार घातलेला आहे किंवा खाली दगड आहे; पण ते त्यांना दिसलेले नाहीत. उठल्यावर अंगाला घाण लागल्याचे किंवा खडे टोचल्याचे त्यांना कळायचे. त्यांची ही स्थिती पाहून महाविद्यालयामधील मुले त्यांना हसायची, तसेच त्यांच्यासमवेत शिकवणारे इतर त्यांना समजवायचे की, असे इतके वेड लावून घेऊ नका; पण तरीही त्यांना कशाचेच काहीही वाटत नव्हते.
२. प.पू. भास्करकाकांनी गुरूंना जंगलातून नेतांना प्रकाशासाठी
स्वत:च्या अंगावरील कपडे एक एक करून मशालीसारखे जाळणे,
सर्व कपडे संपल्यावर अंधारात जात असता त्यांचे दरीत पडणारे पाऊल
गुरूंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून थांबवणे आणि त्यानंतरही भीती न वाटता त्या वेळी
वीज चमकल्याच्या प्रकाशात दरीत दिसलेला टायर आणून तो जाळून त्यांनी गुरूंना घरी पोचवणे
प.पू. भास्करकाका एकदा उत्तर भारतात दर्शनासाठी जात असतांना बर्फ पडल्याने मुख्य रस्ता बंद झाला होता. त्या वेळी त्यांना डोंगरातून आणि जंगलातून जावे लागले. गुरुमहाराजांना रस्ता दिसावा; म्हणून विजेरीच्या उजेडात ते त्यांना नेत होते. काही अंतर गेल्यावर विजेरी बंद पडल्याने ‘आता उजेड कोठून आणायचा ?, महाराजांना वाटेत काही लागायला नको’; म्हणून त्यांनी त्यांची अंगावर घातलेली शाल काढून मशालीसारखी पेटवली. ती जळेपर्यंत तिच्या प्रकाशात त्यांनी गुरुमहाराजांना पुढे नेले. त्यानंतर एक-एक करत त्यांनी त्यांच्या अंगावरचे गंजीफ्रॉकपर्यंत सर्व कपडे काढून जाळले आणि त्या प्रकाशात त्यांना नेले. तेही संपल्यानंतर काही अंतर तसेच गेल्यानंतर त्यांनी पुढे टाकण्यासाठी उचललेले पाऊल तसेच अधांतरी असतांना एकदम त्यांच्या गुरूंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थांबवले. त्याच क्षणी वीज चमकली. त्या प्रकाशात त्यांना दिसले की, खाली खोल दरी आहे आणि त्यांचे ते पाऊल दरीत पडणार होते. गुरूंनी त्यांना वाचवले होते; पण याही स्थितीत त्यांना ‘आपण मरणार होतो’, याची काहीच भीती किंवा काळजी वाटली नाही. त्या वीज चमकल्याच्या प्रकाशात त्यांना दरीत काही अंतरावर एक टायर पडलेला दिसला. त्यांनी खाली उतरून तो आणला आणि तो जाळून त्या प्रकाशात महाराजांना रहात्या खोलीपर्यंत आणले.