‘कोरोना’ महामारीच्या कालावधीत, तसेच भीषण आपत्काळात मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार करण्याच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्या !

Article also available in :

‘व्यक्ती मृत झाल्यानंतर धर्मशास्त्रानुसार स्मशानात शवावर मंत्रोच्चारपूर्वक अग्निसंस्कार होणे आवश्यक असते. सध्या ‘कोरोना’ महामारीच्या जागतिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अशा वेळी ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्या दृष्टीने व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्यास मृताच्या नातेवाइकांना शव दिले जात नाही, तसेच त्यावर अंत्यविधी करता येत नाहीत. त्यामुळे या कठीण काळात ‘मृतावर अंत्यसंस्कार कसे करावेत ?’, याविषयी समाजात संभ्रमाची स्थिती आहे. यासाठी सांप्रतकाळाशी सुसंगत, असे आपत्कालीन पर्याय पुढे दिले आहेत.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मृतावर अग्निसंस्कार करणे

१. ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यावर मृतदेहाचे दहन करतांना मंत्रपूर्वक अग्निसंस्कार करता येत नाहीत अथवा विद्युत् दाहिनीमध्ये शवाचे दहन केल्याने अग्निसंस्कार होत नाहीत. अशा वेळी मृताच्या नातेवाइकांनी अस्थी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. अस्थी मिळाल्यावर मृत्यूनंतरच्या ९ व्या अथवा १० व्या दिवशी अस्थींवर ‘अग्निसंस्कार विधी’ करावा. यानंतर दशक्रिया आदी विधी नेहमीप्रमाणे करावेत.

२. मृताच्या अस्थी मिळाल्या; पण तेथे पुरोहित उपलब्ध नसतील, तर मृताच्या नातेवाइकांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत अस्थी विसर्जन कराव्यात.

३. ‘कोरोनाग्रस्त असणे, अलगीकरणात असणे, दूर रहात असणे, दळणवळण बंदीचे नियम’ इत्यादी कारणांमुळे मृताच्या घरातील सर्वच नातेवाइक विधीसाठी येऊ शकत नसल्याने वरीलप्रमाणे विधी करता येत नाहीत. अशा परिस्थितीत मृताजवळ असलेल्या संबंधित व्यक्तीने अस्थी विसर्जन कराव्यात आणि मृताचे नातेवाइक उपलब्ध झाल्यावर मृतासाठी ‘पालाश विधी’ करावा.

– पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पालाश विधी संदर्भात वाचा… पालाश विधी

 

मृत व्यक्तीला उत्तम गती मिळावी’, यासाठी करावयाचे नामजपादी उपाय !

येणार्‍या भीषण आपत्काळात मृतासाठीचे धार्मिक विधी करण्यासाठी पुरोहित उपलब्ध होतीलच, असे नाही, तसेच ‘मृताला अग्नी दिला जाईल कि नाही ? त्याच्या अस्थी मिळतील कि नाही ?’, हेही सांगता येत नाही. अशा वेळी ‘मृत व्यक्तीला उत्तम गती मिळावी’, यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वांनी पुढीलप्रमाणे नामजपादी उपाय करावेत.

अ. धर्मशास्त्रानुसार मृत व्यक्तीचे छायाचित्र घरात असू नये. ते असल्यास विसर्जन करावे. मृताच्या कुटुंबियांची तसे करण्याची सिद्धता नसल्यास मृताचे छायाचित्र घराच्या भिंतीवर न लावता ते दत्तगुरूंच्या चित्राला किंवा नामपट्टीला बांधून ठेवावे. असे केल्याने देवतेच्या चित्रातील सात्त्विकता त्या लिंगदेहाला मिळत राहील. काही कालावधीनंतर मृत व्यक्तीचे छायाचित्र किंवा दत्तगुरूंचे चित्र खराब झाल्यास ते विसर्जित करू शकतो.

आ. व्यक्ती मृत झाल्याच्या पहिल्या दिवसापासून पुढील १४ दिवस कुटुंबातील सर्वांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ९ माळा करावा. हा नामजप करण्यासाठी बसतांना शक्य असल्यास श्री दत्तात्रेय अथवा श्रीविष्णु यांच्या चित्रासमोर बसावे. हे शक्य नसल्यास स्वतःच्या गुरूंचे छायाचित्र समोर ठेवून नामजप करावा.

मृताच्या कुटुंबियांना सूतक असल्यामुळे त्यांनी आराध्यदेवतेच्या चित्राची पूजा करू नये आणि त्याला फुले वाहू नयेत.

इ. देवतेचे कोणतेही चित्र उपलब्ध झाले नाही, तरी मृताच्या कुटुंबियांनी बसून नामजप करावा. हा नामजप करतांना ‘मृत व्यक्तीला चांगली गती प्राप्त होऊ दे. मृत व्यक्तीची कुटुंबियांशी असलेली आसक्ती दूर होऊ दे. मृत्यूनंतर लिंगदेहाचा प्रवास चांगला होऊ दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना करावी. दुपारी १२ वाजता मृत व्यक्तीच्या उद्देशाने घराबाहेर अथवा आगाशी यांठिकाणी दहीभात किंवा साधा भात ठेवावा.

ई. व्यक्ती ज्या तिथीला मृत झाली आहे, त्या प्रत्येक मासाच्या तिथीला कुटुंबातील सर्वांनी वरीलप्रमाणेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ९ माळा करावा, उदा. चैत्र मासाच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथीला व्यक्ती मृत झाली असल्यास वैशाख मासातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीला, त्या पुढील मासात ज्येष्ठ कृष्ण पक्ष पंचमीला इत्यादी, अशा प्रकारे प्रत्येक मासातील कृष्ण पक्ष पंचमीला कुटुंबातील सर्वांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ९ माळा करावा. असे वर्ष पूर्ण होईपर्यंत करावे, म्हणजे चैत्र कृष्ण पक्ष पंचमी या तिथीला व्यक्ती गेल्यास पुढील वर्षी याच तिथीपर्यंत नामजप करावा.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment