प्रारब्ध

Article also available in :

भक्त, संत आणि ईश्वर, अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र, चार पुरुषार्थ अशा विविध विषयांवर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पू. अनंत आठवले यांनी सोप्या भाषेत उलगडलेले ज्ञान येथे देत आहोत. यातून वाचकांना अध्यात्मातील तात्त्विक विषयाचे ज्ञान होऊन त्यांच्या शंकांचे निरसन होईल आणि ते साधना करण्यास प्रवृत्त होतील.

पू. अनंत आठवले

प्रश्न : असे म्हणतात की, मनुष्य जन्माला येतांना विधाता, ब्रह्मदेव मनुष्याच्या ललाटावर (कपाळावर) त्याचे भाग्य लिहीतो. हे भाग्य कसे ठरते ?

उत्तर : आपल्या सनातन धर्मात आणि इतरही अनेक विचारसरणींत ‘कर्मफलन्याय’ मानतात, म्हणजे ‘आपण जे कर्म करू, त्याचे फळ भोगावे लागते’, असा सिद्धांत आहे.

 

१. कर्मफल

१.अ. सत्कर्मांचा चांगला परिणाम होतो. त्यांचे पुण्य हे फळ असते.

१.आ. दुष्कर्मांचा वाईट परिणाम होतो. त्यांचे पाप हे फळ असते.

१.इ. अनेक कर्मे अशी असतात की, ती तत्काळ फळ देऊन संपतात. त्यांनी पाप-पुण्य लागत नाही, उदा. कपडे धुतले, तर कपडे धुण्याच्या कर्माचे ‘कपडे स्वच्छ होणे’, हे फळ लगेच मिळते. तिथे पाप-पुण्य निर्मित होत नाही. दिवसभरातील आपली बहुतेक कर्मे अशीच असतात.

 

२. संचित कसे बनते ?

एका जन्मात केलेल्या कर्मांमुळे मिळणारे पाप-पुण्य त्याच जन्मात भोगून संपते, असे नाही, उदा. एका व्यक्तीने तीन हत्या केल्या. एका प्रकरणात ती पकडली जाऊन तिला शिक्षा झाली, तर त्या जन्मात केलेल्या अन्य दोन हत्यांचे पाप भोगायचे तिचे शिल्लक राहील.

२ अ. संचित : अशा अनेक जन्मांमधील भोगायच्या शिल्लक राहिलेल्या पाप-पुण्याला ‘संचित’ म्हणतात.

२ आ. क्रियमाण : ह्या जन्मातील आपल्या कर्मांनी, म्हणजे क्रियमाणाने नवीन पाप-पुण्य बनते आणि भोगून उरलेले संचित कर्मात जोडले जाते. हे सर्व संचित पुढच्या काही जन्मांमध्ये भोगावे लागते.

 

३. प्रारब्ध

एकूण संचित इतके अधिक असते की, सामान्यतः पुढच्या एका जन्मात ते भोगून संपणार नाही. तेव्हा आताच्या एका जन्मात भोगण्यासाठीचा संचिताचा जो भाग, त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. ह्यालाच ‘विधीलिखित’, ‘दैव’, ‘भाग्य’, ‘प्राक्तन (नशीब)’ असेही म्हणतात.

 

४. संचित आणि प्रारब्ध नष्ट करण्याचे उपाय

चांगले संचित, म्हणजे पुण्य नष्ट करण्यात कोणालाच रुची नसते. दुष्कृत्यांचे फळ, म्हणजे पाप नष्ट करण्याची इच्छा असते. असे संचित नष्ट करणे सहसा आपल्या हातात नाही. प्रारब्ध मुख्यतः भोगूनच संपवावे लागते; पण सनातन धर्मात काही उपायही सांगितलेले आहेत. ते पुढे दिले आहेत.

४ अ. वेगवेगळ्या पापांवर वेगवेगळी प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत.

४ आ. स्वतः पूर्ण प्रयत्न करून प्रारब्धावर विजय मिळवणे

वसिष्ठमुनी श्रीरामाला सांगतात,

प्राक्तनं चैहिकं चेति द्विविधं विद्धि पौरुषम् ।
प्राक्तनोऽद्यतनेनाशु पुरुषार्थेन जीयते ।।

– योगवासिष्ठ, मुमुक्षु व्यवहारप्रकरणम्, सर्ग ४, श्लोक १७

अर्थ : ‘दैव आणि कर्म हे दोन्ही पुरुषार्थ आहेत’, असे जाण. आपल्या आताच्या पुरुषार्थाने (कर्तृत्वाने) प्राक्तनावर (प्रारब्धावर) मात करू शकतो.

४ इ. ईश्वराची कृपा प्राप्त करणे

तुकाराम महाराज सांगतात,

 ‘तुटे भवरोग । संचित क्रियमाण भोग ।।
ऐसे विठोबाचें नाम । उच्चारिता खंडे जन्म’ ।।

४ ई. काही मंत्रांनीसुद्धा पंचमहापापे सोडून इतर संचित पापे नष्ट होऊ शकतात.

४ उ. आत्मज्ञानरूपी अग्नीने संचित कर्म भस्मसात् करणे

भगवान् श्रीकृष्ण गीतेत सांगतात,

 ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ।।

                                                 – गीता, अध्याय ४, श्लोक ३७

अर्थ : ‘आत्मज्ञानरूपी अग्नी सर्व संचित कर्मांना भस्मसात् करतो.’

ज्ञानी निष्काम असल्याने त्याच्या कर्मांनी नवे क्रियमाण घडत नाही. प्रारब्ध भोगून संपते. ज्ञान झाले की त्यानंतर केलेली सर्व कर्मे निष्काम कर्म होतात. त्यामुळे क्रियमाण होत नाहीत. तसेच प्रारब्ध भोगून संपवावे लागते. परिणामी ज्ञानरुपी अग्नीने संचित भस्मसात झाले, की मग पुनर्जन्म नाही.

 

५. निष्काम कर्म केल्याने प्रारब्ध आणि संचित यांत भर न पडणे

एक गोष्ट निश्चितपणे आपल्या हातात आहे. ती ही की, आचरण शुद्ध ठेवून शक्य तर निष्काम होऊन क्रियमाण करणे, नवे पाप-पुण्य निर्मित न होऊ देणे, म्हणजे प्रारब्ध आणि संचित यांत भर पडणार नाही.

 

६. प्रारब्धाची तीव्रता आणि उपायांची परिणामकारकता

६.अ. प्रारब्ध मंद असेल, तर वरील उपायांनी ते नष्ट होऊ शकते.

६.आ. प्रारब्ध मध्यम असेल, तर वरील उपायांनी त्रास कमी होऊ शकतो.

६.इ. प्रारब्ध तीव्र असेल, तर ते भोगावेच लागते आणि भोगूनच ते संपते.

– अनंत आठवले (१०.२.२०२१)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

संदर्भ : आगामी काळात प्रकाशित होणारा ग्रंथ

2 thoughts on “प्रारब्ध”

  1. मागल्या जन्मातील कर्माचे फळ या जन्मी फेडायचे हि संकल्पना मनाला कशी पटवून घ्यायची ते सांगा.

    Reply
    • नमस्कार,

      काही वेळा लोकांकडून चुका होतात. उदा. खोटे बोलणे, भ्रष्टाचार करणे इ. तेव्हा ते पकडले गेले नाही तर लोकांना वाटते की आपल्याला कोणी बघितले नाही, आपण सुटलो. पण देवाकडे याची नोंद झालेली असते. योग्य वेळ आली की आपल्याला त्या चुकीसाठी भोगावे लागते. उदा. एखाद्या श्रीमंत व्यक्तीचे उदाहरण घेतले तर ती व्यक्ती तिच्या पूर्व पुण्याईमुळे सुख उपभोगत असते, पण पूर्व जन्मांच्या पापांमुळे तिला आजार किंवा पारिवारिक दुःख यांना सामोरे जावे लागते. तसेच एखाद्या गरीब व्यक्तीचे उदाहरण घेतले तर तिला पूर्व जन्मीच्या पापांमुळे या जन्मी आर्थिक अडचणींना समाेरे जावे लागले तरी तिला तिच्या पुण्याईमुळे पारिवारिक अडचणी अल्प असू शकतात.
      पाप-पुण्याचे फळ कसे प्राप्त होते याची माहिती पुढील लिंकवरील काही लेखांमध्ये दिली आहे –
      https://www.sanatan.org/mr/a/category/spirituality/types-of-spiritual-practice/karmayog

      सविस्तर माहितीसाठी सनातनचे यासंबंधी ग्रंथ वाचू शकता. ते पुढील लिंक वर उपलब्ध आहेत –
      https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-spiritual-practice-for-god-realisation/mr-karmayoga/

      पूर्व जन्मीचे पाप फेडण्यासंदर्भात आपल्याला श्री भीष्म पीतामह यांचे उदाहरण सर्व परिचित आहे. अशी अनेक उदाहरणे पुराणांमध्ये गोष्टीरूपात आढळतात. तसेच आपल्या आजुबाजूला पण घडत असतात. त्याविषयी जागृक राहिल्यास आपल्याला लक्षात येऊ शकते. ( उदा. खूप प्रयत्न करूनही एखादी गोष्ट न मिळणे.)

      आपली,
      सनातन संस्था

      Reply

Leave a Comment