स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमधून सुटले, त्याला २ मे २०२१ या दिवशी १०० वर्षे झाली. बाबाराव आणि तात्याराव सावरकर हे दोघे बंधू ३ सहस्र ५८६ दिवसांनंतर २ मे १९२१ या दिवशी अंदमानातून सुटले. याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानमध्ये केलेले कार्य, कवी सुधाकरपंत देशपांडे यांनी केलेली कविता आणि अन्य सूत्रे येथे देत आहोत.
१. हिंदु बंदीवानांना धार्मिक पुस्तके वाचण्याचा अधिकार मिळवून देणे
संत ज्ञानेश्वर यांची भक्ती, जगद्गुरु संत तुकाराम यांची प्रभक्ती, संत नामदेवांचा प्रचार आणि समर्थ रामदासांचा प्रतिकार ही ‘चतुःसूत्री’ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडे एकवटलेली होती; म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातील परिस्थितीला तोंड देऊ शकले. ते अंदमानात असतांना मुसलमान वॉर्डनकडेच काय पण बंद्यापाशीही कुराण असे आणि ते काम टाळण्यासाठी वाचत बसत; पण संत तुलसीदासांचे रामायण ५ किंवा १० हिंदू एकत्र बसून सुट्टीच्या दिवशी वाचत बसले, तरी मुसलमान बंडेल किंवा मिझा खान त्यांना दंडे लावून त्यांचे वाचन बंद करी. सावरकरांनी याचाही संघटित प्रतिकार करून हिंदु बंदीवानास धार्मिक पुस्तके वाचण्याचा अधिकार मिळवून दिला.
२. कारागृहात २ सहस्र पुस्तकांच्या ग्रंथालयाची निर्मिती करणे !
बंदीवानांना ‘राष्ट्रीय पुरुष कोण ?’, असे विचारल्यावर क्रांतीयुद्धातील फक्त लक्ष्मीबाईंचे नाव एकाने सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बरेच दिवस चर्चा संवाद व्याख्याने केल्यावर बंदीवानांंना तात्या टोपे, कुँवर सिंह, नाना पेशवे यांची ओळख झाली. यातूनच कारागृहात एक ग्रंथालय काढावे असे ठरले; पण बारी पुस्तकांची पाने फाडणे, शाई ओतणे, पार्सल आलेले न सांगणे इत्यादी गोष्टी करी. इतक्या अडचणी येऊनही सावरकरांच्या प्रयत्नाने २ सहस्र पुस्तकांचे ग्रंथालय कारागृहात निर्माण झाले.
३. अंदमानात मुलींसाठी पहिली हिंदी शाळा काढणे !
कारागृहाबाहेर अंदमानात मुलींसाठी पहिली हिंदी शाळा काढली. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदी पुस्तके मागवण्याचा व्यय करत; कारण हिंदी राष्ट्रभाषा म्हणून प्रत्येकाने शिकावी, असे त्यांचे प्रयत्न होते.
४. अंदमानात शुद्धीची चळवळ (शंखापुढे बांगेची नांगी ढिली पडली)
अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर कुराण वाचण्यासाठी उर्दू भाषा शिकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात शुद्धीची चळवळ केली. त्यांंनी वर्ष १९१३ मध्ये मुसलमान हिंदूंना बाटवत असतांना त्यांच्यावर पहिला खटला भरला. हे कार्य त्यांनी वर्ष १९२१ पर्यंत केले. मुसलमान बंदीवान बांग देऊन हिंदु बंदीवानांंना त्रास देत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदु बंदीवानांंना शंख आणून पहाटे त्याचा शंखध्वनी करण्यास सांगितले. शेवटी शंखापुढे बांगेची नांगी ढिली पडली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात हिंदी भाषेचा प्रचार केला. ‘सलाम’ जाऊन ‘राम राम’ आले. ‘शादी’ जाऊन ‘विवाह, लग्न’ हे शब्द आले आणि अंदमानातील टीचभर पठाणी राज्य जाऊन टीचभर हिंदु राज्य आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राज्य केले म्हणून अंदमानची फाळणी झाली नाही.
शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेची आज्ञा आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जवळील पुस्तके आणि इतर वस्तू वाटून टाकल्या. बंदीवानांनी आपल्या ५ रुपये वेतनातून आणलेल्या भेटवस्तू दारापाशी ठेवल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याही सर्वांमध्ये वाटल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना २ इष्ट मित्र भेटण्यास आले असता, त्यांनी त्यांना शपथ दिली.
एक देव, एक देश, एक आशा । एक जाती, एक जीव, एक भाषा ॥
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंदमानातील हे कार्य आपण कायम हृदयात आठवण म्हणून ठेवूया आणि म्हणूया,
सदा देशकार्या शरीर आपुले झिजावे ।
सदा हिंदु राष्ट्र मनी आपल्या वसावे ।
खरी देशभक्ती कृतीने दिसावी ।
मुखे वाच्यता भक्तीची त्या नसावी ।
हीच प्रार्थना त्या जगत्नियंत्रकाच्या चरणी ।
– आपला बंधुवत
श्री. विद्याधरपंत नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान
॥ दीपस्तंभ ॥
कारागृहाच्या गवाक्षातूनी डोकावे रवि आत । बंदी ग्रहाशी कधीही नव्हते तिमिराचे नाते । स्वातंत्र्याचे पिऊन बाळकडू जन्माला आला । बंधमुक्त करण्या मातेला यातनाही सोसल्या । – कवी सुधाकरपंत देशपांडे |