अनुक्रमणिका
- ३. नोकरी
- ३ अ. एका आस्थापनातील नोकरभरतीविषयी समजणे आणि तिथे गेल्यावर नोकरीसाठी निवड होणे
- ३ आ. ‘ग्लॅक्सो’ आस्थापन नोकरीत कायम करत नसल्याचे लक्षात आल्यावर तिथल्या व्यवस्थापकांना ‘मी पदवीधर होत असून मला नोकरीत कायम करावे’, असे सांगणे आणि त्याप्रमाणे त्यांनी कायम केल्याचे पत्र देणे
- ३ इ. पहिले वेतन मिळाल्यावर वडिलांनी निगुडकर महाराज यांच्या मठात नेणे आणि त्यांनी ‘सर्वकाही चांगले होईल’, असा आशीर्वाद देणे
- ३ ई. नोकरी करत असतांनाच शिकवण्याही घेणे
- ३ उ. वरिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा देणे आणि त्यात उत्तीर्ण झाल्यामुळे वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती होऊन वेतनवाढ होणे
- ३ ऊ. ‘आयबीएम्’ या आस्थापनाकडून संगणक ‘प्रोग्रॅमिंग’चे प्रशिक्षण चालू होणे, त्याच कालावधीत बहिणीचे लग्न होणे, त्यामुळे २ दिवस प्रशिक्षण चुकणे आणि अंतिम परीक्षेत अनुत्तीर्ण होणे
- ३ ए. आस्थापनातील व्यवस्थापनात काम करण्याची संधी मिळणे
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://www.sanatan.org/mr/a/79862.html
३. नोकरी
३ अ. एका आस्थापनातील नोकरभरतीविषयी समजणे आणि तिथे गेल्यावर नोकरीसाठी निवड होणे
‘माहीम येथील कोळीवाड्यात रहात असतांना माझी ओळख मोझेस तालकर याच्याशी झाली. एक दिवस तो मला म्हणाला, ‘‘माझी बहीण वरळी येथील ‘ग्लॅक्सो’ या नामांकित आस्थापनात कामाला आहे. तेथे उद्या कामगार भरती करण्यात येणार आहे. तूही माझ्या समवेत ये.’’ घरी जाऊन मी याविषयी वडिलांना सांगितले. त्यानंतर तेथे माझी निवड झाली. त्या आस्थापनात पुष्कळ स्त्रियाच कामाला होत्या आणि त्यांतील बहुतेक सर्व जणी ख्रिस्ती होत्या. त्यामुळे मी थोडासा बुजल्यासारखा झालो होतो. त्या वेळी त्यांनी मला विक्री विभागात (सेल्स डिपार्टमेंटमध्ये) कामावर रुजू करून घेतले.
३ आ. ‘ग्लॅक्सो’ आस्थापन नोकरीत कायम करत नसल्याचे
लक्षात आल्यावर तिथल्या व्यवस्थापकांना ‘मी पदवीधर होत असून
मला नोकरीत कायम करावे’, असे सांगणे आणि त्याप्रमाणे त्यांनी कायम केल्याचे पत्र देणे
‘ग्लॅक्सो’ आस्थापन त्यांच्या काही कर्मचार्यांना प्रत्येक ३ मासांनी २ दिवसांसाठी घरी बसवायचे (‘सर्व्हिस ब्रेक’ द्यायचे). अशा प्रकारे ते नोकरीत कायम करायचे नाहीत. तेथे ८ मास नोकरी करतांना मलाही २ वेळा घरी बसावे लागले होते. या ८ मासांत मला ‘विक्री विभागा’तील (सेल्स डिपार्टमेंट’मधील) सर्व प्रकारचे काम करण्याचा अनुभव आला होता. मी तेथील ब्रिटिश व्यवस्थापकांना जाऊन भेटलो आणि म्हणालो, ‘‘मी ‘बी.एस्.सी.’ची परीक्षा दिली आहे. आता काही दिवसांतच मी उत्तीर्ण होऊन पदवीधर (‘ग्रॅज्युएट’) होणार आहे. तेव्हा मला आता आस्थापनात कायमची (‘पर्मनंट’) नोकरी हवी आहे. मला या आस्थापनात काम करायला आवडते.’’ त्यानंतर मला ‘कायम’ केल्याचे पत्र मिळाले. त्या पत्राद्वारे (डिसेंबर १९५६ मध्ये) त्यांनी माझी कनिष्ठ लिपिक (‘ज्युनिअर क्लार्क’) या पदावर नियुक्ती केली. तेव्हा माझे वेतन प्रती मास ११० रुपये होते.
३ इ. पहिले वेतन मिळाल्यावर वडिलांनी निगुडकर महाराज
यांच्या मठात नेणे आणि त्यांनी ‘सर्वकाही चांगले होईल’, असा आशीर्वाद देणे
पहिले वेतन मिळाल्यावर वडील मला घेऊन मुलुंड येथील निगुडकर महाराज यांच्या मठात गेले आणि मला त्यांचा आशीर्वाद घेण्यास सांगितला. महाराज मला आशीर्वाद देत म्हणाले, ‘‘तुझे सर्व चांगले होणार आहे. तू या आस्थापनात मन लावून काम कर. तुला वेतनही चांगले आहे. सर्वकाही चांगले होईल.’’ (‘त्या अडचणीच्या काळात हे सर्व घडवून घेऊन सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवच मला आशीर्वाद देत होते’, असे आता मला जाणवते.’ – पू. सामंतआजोबा)
३ ई. नोकरी करत असतांनाच शिकवण्याही घेणे
मी काही मुलांची शिकवणीही घ्यायचो. आस्थापनातील लोकांच्या एकमेकांशी होणार्या बोलण्यातून ‘मी चांगल्या प्रकारे शिकवणी घेतो’, हे इतरांच्या लक्षात आले.
१. ‘ग्लॅक्सो’ आस्थापनात माझ्या विक्री विभागामध्येच श्री. वकील या नावाचे साहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) होते. त्यांनी मला त्यांच्या दोन मुलांची (एक मुलगी आणि एक मुलगा यांची) शिकवणी घेण्याविषयी विचारले. तेव्हापासून मी प्रतिदिन सकाळी ७ वाजता त्यांच्या २ मुलांची शिकवणी घेण्यासाठी शिवाजीपार्क येथील त्यांच्या घरी जायचो. सकाळी ते मला त्यांच्याकडे अल्पाहार द्यायचे आणि शिकवणीनंतर त्यांच्या समवेत त्यांच्या गाडीतूनच मला आस्थापनात न्यायचे.
त्यामुळे सकाळी ७ ते रात्री ७ असा माझा दिनक्रम ठरलेला होता. घरी गेल्यानंतर आईला तिच्या कामात थोडेफार साहाय्य करावे लागायचे; मात्र आता भावंडे थोडीफार मोठी झाल्याने पूर्वीइतके साहाय्य करावे लागायचे नाही. प्रत्येक शनिवारी मारुतीच्या देवळात जाऊन तेल आणि नारळ अर्पण करणे चालू होते. घरची कठीण परिस्थिती सुधारत होती.
२. आमच्या आस्थापनातील श्री. कटकी (पारशी) वरिष्ठ लिपिक लेखा व्यवस्थापक (‘सिनिअर अकाऊंट्स मॅनेजर’च्या) पदावर होते. ते खुसरो बाग, कुलाबा येथे रहात होते. तेथे जाऊन मी त्यांच्या मुलाची शिकवणी घेत होतो. २ – ३ मास शिकवणी घेतल्यानंतर त्यांचा मुलगा उत्तम रितीने उत्तीर्ण झाला.
३. आमच्या आस्थापनाच्या मुंबई, मद्रास, कोलकाता आणि देहली येथे शाखा होत्या. आमच्या मुंबई शाखेचे मुख्य व्यवस्थापक श्री. शेट्टी यांनी मला त्यांच्या मुलीची (इयत्ता ६ वी) शिकवणी घेण्यासाठी विचारले. मुलीची शिकवणी झाल्यावर मला आस्थापनात पोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या गाडीची व्यवस्था केली होती.
३ उ. वरिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा देणे आणि त्यात उत्तीर्ण
झाल्यामुळे वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती होऊन वेतनवाढ होणे
आमच्या मुंबई शाखेमध्ये विक्री विभागात वरिष्ठ लिपिक पदावर नवीन नियुक्ती होणार होती. तसे सूचनाफलकावर (नोटीस बोर्डवर) लिहिले होते. त्यानुसार मी आवेदन भरले आणि त्यासाठी आवश्यक असलेली परीक्षाही उत्तीर्ण झालो. त्यानंतर मी वरिष्ठ लिपिक झालो. त्यामुळे माझ्या वेतनातही वाढ झाली.
३ ऊ. ‘आयबीएम्’ या आस्थापनाकडून संगणक ‘प्रोग्रॅमिंग’चे प्रशिक्षण
चालू होणे, त्याच कालावधीत बहिणीचे लग्न होणे, त्यामुळे २ दिवस प्रशिक्षण चुकणे आणि अंतिम परीक्षेत अनुत्तीर्ण होणे
वर्ष १९६३ मध्ये आमच्या आस्थापनात पहिल्यांदाच संगणक आणण्याचे ठरले. त्यासाठी आस्थापनातील काही जणांना प्रशिक्षण देऊन ‘प्रोग्रॅमर’च्या जागेसाठी परीक्षा घेण्याचे ठरले. या परीक्षेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. त्यानंतर ‘आयबीएम्’ या आस्थापनात एक मास संगणक ‘प्रोग्रॅमिंग’चे प्रशिक्षण चालू झाले. प्रशिक्षण चालू झाल्यानंतर १५ दिवसांनी माझ्या बहिणीचे लग्न झाले. तेव्हा २ दिवस मी प्रशिक्षणासाठी जाऊ शकलो नाही. त्यामुळे माझ्या प्रशिक्षणात खंड पडला. हे प्रशिक्षण घेण्यासाठी निरनिराळ्या आस्थापनांतून ३० – ४० जण येत होते. आमच्या आस्थापनातून आम्ही ५ जण जात होतो. हे प्रशिक्षण संपल्यानंतर ‘आयबीएम्’ने ‘प्रोग्रॅमर्स’ची अंतिम परीक्षा घेतली. त्यामध्ये मी अनुत्तीर्ण झालो.
३ ऊ १. आस्थापनात संगणकांचे ‘इन्स्टॉलेशन’ करण्यासाठी आलेल्या ‘पीटर डॉबसन’ या ब्रिटिश व्यक्तीने ५ – ६ दिवसांत संगणकाचे ‘प्रोग्रॅमिंग’ करायला शिकवणे
आस्थापनात संगणक ‘इन्स्टॉल’ करण्याचे ठरल्यावर इंग्लंड येथून ‘पीटर डॉबसन’ ही ब्रिटिश व्यक्ती आली. पीटर डॉबसन यांच्याकडे जगभरातील संगणकाच्या ‘इन्स्टॉलेशन’चे दायित्व होते. आमच्या विभागाच्या संगणक ‘प्रोग्रॅमिंग’च्या परीक्षेचे सर्वस्वी दायित्व त्यांच्याकडेच होते. मी सदर परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू काही काळजी करू नकोस. मी तुला ‘प्रोग्रामिंग’ शिकवतो; कारण मी तुझे अगोदरचे सर्व निकाल पाहिले आहेत. तुझी तार्किकदृष्ट्या विचार करण्याची पद्धत पुष्कळ चांगली आहे आणि ती ‘प्रोग्रॅमिंग’साठी पोषक आहे’, हे मी जाणतो.’’ त्यांनी अवघ्या ३ दिवसांत मला ‘प्रोग्रॅमिंग’ करायला शिकवले.
३ ऊ २. पीटर डॉबसन यांनी संगणकाचे ‘प्रोग्रॅमिंग’ करतांना त्यातील बारकावे शिकवून ‘अधिक चांगले कसे करायचे ?’, हे शिकवणे आणि त्यामुळे चांगला ‘प्रोग्रॅमर’ होऊ शकणे
त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी आणि मला समजेल अशी होती. त्यांनी मला थेट कृतीतूनच (प्रॅक्टीकल) ज्ञान दिले. ते मला सर्वकाही संगणकावरच शिकवत होते. मी ‘प्रोग्रॅमिंग’चे सर्व प्राथमिक कृतीशील ज्ञान त्यांच्याकडून शिकून घेतले. त्यानंतर अवघ्या ३ – ४ दिवसांत मी छोटे ‘प्रोग्रॅम’ करून त्यांना दाखवून घेत होतो. तेव्हा ते मला त्यातील बारकावेही शिकवत होते. ‘कशा रितीने अधिक चांगले ‘प्रोग्रॅमिंग’ करायचे ?’, याविषयीचे ज्ञानही त्यांनी मला दिले. संगणकीय ‘प्रोग्रॅमिंग’चे कृतीशील ज्ञान मिळाल्यामुळे ५ – ६ मासांतच मी चांगला ‘प्रोग्रॅमर’ झालो.
३ ऊ ३. आस्थापनातील वेगवेगळ्या विभागांचा एकमेकांशी ताळमेळ घालून ‘सॉफ्टवेअर’ सिद्ध करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आस्थापनाकडून पवई येथील NIIT आस्थापनात पाठवले जाणे आणि त्यानंतर बढती मिळणे
माझ्या आस्थापनाने २ – ३ वर्षांनी माझी या विषयातील प्रगती पाहून मला NIIT पवई येथे संगणकीय ‘प्रोग्रामिंग’चे अद्ययावत् ज्ञान घेण्यासाठी पाठवले होते. हे (कोर्स) शिकवण्यासाठी निरनिराळ्या आस्थापनांमधील अधिकारी येत होते. येथे संपूर्ण ‘सिस्टीम’चे ज्ञान दिले जात असे. तेथे ‘आस्थापनातील निरनिराळ्या विभागांतील कामांची जोडणी कशी करायची ? आरंभापासून ते एकमेकांशी कसे जोडायचे ?’, येथपासून ते त्याचा अंतिम अहवाल (रिपोर्ट) निघेपर्यंत एकमेकांशी संपूर्ण जोडणी करून त्याद्वारे अपेक्षित निकाल (रिझल्ट) कसे सिद्ध करायचे ?’, याचे पूर्ण तात्त्विक (थिअरी) आणि कृतीशील (प्रॅक्टिकल) ज्ञान आम्हाला देण्यात आले. ही २ मासांची शिकवणी (कोर्स) पूर्ण करून मी माझ्या आस्थापनात परत आलो. थोडक्यात आम्हाला ‘प्रोग्रॅमिंग’द्वारे आस्थापनातील विभागांचा एकमेकांशी ताळमेळ घालून आस्थापनासाठी उपयुक्त ‘सॉफ्टवेअर’ कसे सिद्ध करायचे ?’ याचे प्रशिक्षण दिले गेले होते. त्यामुळे केवळ ५ – ६ मासांतच मला बढती मिळून मी ‘सिस्टीम एक्झिक्युटीव्ह’ झालो. त्यानंतर मी आस्थापनामध्ये (मॅनजमेंटमध्ये) ‘सिस्टीम ॲनालिस्ट’ म्हणून काम पाहू लागलो.
३ ऊ ४. ‘डेटामॅक्टीस’ या आस्थापनात ‘प्रोग्रॅमिंग’ शिकवण्याची संधी मिळणे
नंतर माझ्या कामाचे क्षेत्र वाढले. त्या वेळच्या नामांकित ‘डेटामॅक्टीस’ या आस्थापनाने मला संगणकाचे ‘प्रोग्रॅमिंग’ शिकवण्यासाठी बोलावले. त्यांच्या बोलावण्यानुसार आठवड्यातून ३ दिवस १ घंटा ‘प्रोग्रामिंग’ शिकवण्याची संधी मला उपलब्ध झाली. त्या शिकवणीसाठी त्यांनी मला ‘प्रत्येक मासाला २ सहस्र रुपये आणि प्रवासाचा व्यय द्यायचे’, असे ठरले. मी ‘ग्लॅक्सो’ आस्थापनातील कामाव्यतिरिक्त ‘डेटामॅक्टीस’ची आठवड्यातून ३ दिवसांची ‘प्रोग्रॅमिंग’ची शिकवणी करू लागलो.
३ ए. आस्थापनातील व्यवस्थापनात काम करण्याची संधी मिळणे
मी आतापर्यंत आस्थापनात कर्मचारी (स्टाफमध्ये) होतो; मात्र त्यानंतर माझ्या जीवनाला नवी कलाटणी मिळून मी व्यवस्थापनात (मॅनेजमेंटमध्ये) गेलो. त्यासाठी मला श्री. मधुर वैद्य (मार्केटिंग मॅनेजर) यांचे पुष्कळ साहाय्य झाले.’
– (पू.) श्री. सदाशिव सामंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.९.२०२०)