१. सामान्य व्यक्तीने आत्महत्या करणे
१ अ. इच्छामरण (आत्महत्या)
‘आत्महत्या म्हणजे प्राकृतिक मृत्यू नाकारून स्वतःची हत्या करणे. असाध्य रोगाने आजारी असलेल्या व्यक्तीने तिच्या इच्छेनुसार आत्महत्या करणे, याला ‘इच्छामरण’ म्हणतात. अशा प्रकारचे मरण व्यक्ती ऐहिक जीवनातील समस्यांना कंटाळून स्वीकारते.
१ आ. दयामरण
असाध्य रोगाने आजारी असलेला रुग्ण निर्णय घेण्यास असमर्थ असतांना कुटुंबियांच्या इच्छेनुसार डॉक्टरांनी आणलेल्या मृत्यूस ‘दयामरण’ म्हणतात.
अशा प्रकारे मृत पावलेल्यांना मृत्यूत्तर सद्गती लाभत नाही; म्हणून धर्मशास्त्रांनी आत्महत्येचा निषेध केला आहे.
१ इ. इच्छामरण किंवा दयामरण यांचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार
जगभर या संदर्भात विभिन्न कायदे आहेत. भारतात मात्र या संदर्भात कुठलाही कायदा नसल्याने काही मानवतावादी ‘रुग्णाला इच्छामरण किंवा दयामरण यांचा अधिकार देणारा कायदा करावा’, अशी मागणी करत आहे. या सूत्राचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे.
१ इ १. व्यक्तीचे मरण हे तिच्या जन्माप्रमाणे प्रारब्धाधीन आहे. ‘ते कधी यावे’, हे नियतीने ठरवलेले असते. असे असतांना रुग्णाच्या अथवा त्याच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार रुग्णाचा मृत्यू आणणे, हे ईश्वरी नियोजनात ढवळाढवळ करण्यासारखे आहे. मंद प्रारब्ध असेल, तरच हे शक्य होते.
१ इ २. प्रारब्धावर क्रियमाणाने मात करता येऊ शकते; मात्र रुग्णाच्या मृत्यूविषयी त्याने किंवा त्याच्या कुटुंबियांनी ठरवणे अयोग्य ठरते. मात्र आध्यात्मिक दृष्ट्या उन्नतांनी, म्हणजेच संतांनी असे करण्यास सांगितल्यास तसे अवश्य करावे; कारण संतांमध्ये त्याचे प्रारब्ध नष्ट करण्याची क्षमता असते.
२. प्रायोपवेशन करणे
प्रायोपवेशन म्हणजे अन्न, जल आणि औषधे यांचा त्याग केल्याने होणारा मृत्यू. जीवन सार्थक झाल्यावर काही सात्त्विक व्यक्ती प्रायोपवेशन करतात. असे करणार्यांत निराशा नसून आयुष्याच्या पूर्ततेचा आनंद असतो. त्यामुळे त्यांनाही मृत्यूत्तर सद्गती लाभते.
३. संतांनी समाधी घेणे, ही आत्महत्या नसणे
संतांनी समाधी घेणे याला ‘आत्महत्या’ म्हणत नाहीत. संतांनी समाधी घेण्यामागील कारण ऐहिक नसते. स्वतःच्या भूतलावरील कार्याची समाप्ती झाल्यानंतर संत ईश्वरेच्छेने समाधी घेतात. संत समाधी घेत असतांना त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा लाभ तेथे उपस्थित असलेल्या सहस्रो भाविकांना मिळतो. आत्महत्या करणार्याच्या संदर्भात तसे होत नाही, उलट तेव्हा रज-तमाचे प्रक्षेपण होऊन इतरांची हानी होते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले