कठीण परिस्थितीत आत्मबळाद्वारे गरुड भरारी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज !
आत्मबळ कसे असावे ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना २० वर्षांत कष्ट करून मिळवलेले एका वर्षात गमवावे लागले. त्याव्यतिरिक्त स्वतःचे, पोटच्या गोळ्याचे आणि सर्व आप्तस्वकीयांचेच नव्हे, तर आपल्या जीवलग सहकार्यांचे आयुष्यही पणाला लावून अत्यंत कपटी, क्रूर आणि शत्रूसमोर जाऊन उभे रहावे लागले. औरंगजेबाच्या नजरकैदेत रहावे लागले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वय होते ३६ वर्षे ! अशा कठीण परिस्थितीतही महाराजांचे आत्मबळ दृढ होते. त्यांनी युक्ती योजून सहकार्यांना सुखरूपपणे बाहेर काढले आणि नंतर स्वतः त्यातून अलगद निसटले. धैर्य, संयम आणि सतर्कता यांनी आपल्या वाटचालीत सातत्य ठेऊन स्वतःच्या जन्मस्थानी सुखरूप पोचले.
२० वर्षांच्या अविरत कष्टाने उभारलेले जे गमावले होते, ते पुढील केवळ १ वर्षात पुन्हा मिळवले. इतकेच नाही, तर त्या शत्रूलाही आपल्या अतुल पराक्रमाने खडे चारले. पुढच्या ८ वर्षांतच जे गमावले त्यांच्यासह ३६० गड उभे केले.
संकटावर उपाय आत्महत्येत नाही, तर गरुड भरारीमध्ये शोधण्यामध्ये आहे, ही शिकवणच छत्रपती शिवाजी महाराजांनी या घटनेतून दिली. निराश होऊन धोकादायक पाऊल टाकण्याआधी शिवस्मरण करणे, छत्रपतींचा आदर्श समोर ठेवणे, ही आज परिस्थितीची आणि काळाचीसुद्धा मागणी आहे !