साधकांना ‘पुढे येणार्या आपत्काळामध्ये आपले आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण कसे होणार ?’, अशासारख्या अनेक गोष्टींची काळजी असते. त्या वेळी साधक हे विसरतात की, ज्या देवाने आपल्याला जन्माला घातले आहे, तोच आपले रक्षण करणार आहे. आपण केवळ भगवंताच्या अनुसंधानात राहून भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह सेवा करतांना लक्षात आलेल्या काही उदाहरणांमधून जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांनी कक्षाच्या आगाशीमध्ये घरटे करणार्या चिमणीला
साहाय्य करणे आणि ती पिल्ले मोठी होऊन उडून जाईपर्यंत प्रतिदिन त्यांची काळजी घेणे
परात्पर गुरु डॉक्टर ग्रंथलिखाणासाठी बसतात त्या कक्षाच्या आगाशीमध्ये एक जळमटे काढण्याचा झाडू होता. त्या झाडूवर एक चिमणी घरटे बांधू लागली. ‘अभ्यासिकेच्या आगाशीमध्ये चिमण्या अधूनमधून घरटे बांधतात’, हे ठाऊक असल्यामुळे त्यांना बांधण्यासाठी सोपे जावे म्हणून सौ. जान्हवी शिंदे यांनी गवत आणून आगाशीमध्ये एका खोक्यात ठेवले होते. तो खोका परात्पर गुरु डॉक्टरांच्या ग्रंथलिखाणाच्या पटलाच्या समोरील खिडकीत ठेवला होता; परंतु चिमणीने त्या खोक्यातील गवतामध्ये अंडी न घालता त्यातील काड्या घेऊन खिडकीच्या शेजारी असलेल्या जळमटे काढण्याच्या झाडूवर घरटे बांधण्यास आरंभ केला. ती चिमणी खिडकीच्या खोक्यातील एकेक काडी घेऊन उडून झाडूवर जायची. अशा प्रकारे ती सातत्याने खाली-वर उडत होती. चिमणीला सातत्याने खाली-वर उडायला लागू नये, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी खोक्यातील काही काड्या उचलून त्या चिमणीच्या घरट्यावर नेऊन ठेवल्या. त्यामुळे चिमणीचे श्रम वाचले आणि तिने त्या काड्या घेऊन घरटे बांधले. साधकांकडून चिमणीचे घरटे खाली पडून पिल्लांना दुखापत होऊ नये, यासाठी त्यांनी त्या झाडूच्या काठीवर ‘येथे चिमणीचे घरटे आहे. कृपया कोणी हात लावू नये’, अशी चिठ्ठी चिकटवायला सांगितली. ती पिल्ले मोठी होऊन उडून जाईपर्यंत प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टर त्या घरट्याकडे जाऊन पिल्ले सुखरूप आहेत ना, हे पहायचे.
परात्पर गुरु डॉक्टर एका घरट्यातील चिमणीची आणि तिच्या पिल्लांची
एवढी काळजी घ्यायचे, तर तन-मन-धनाचा त्याग करून साधना करणार्या
साधकांची गुरुदेव काळजी घेणार नाहीत का ? त्यामुळे साधकांनी निःशंक मनाने साधना करावी.
– कु. प्रियांका लोटलीकर
तमिळनाडू येथील मंदिरात स्वच्छतेची
सेवा करणार्या वयोवृद्ध वसुमतीआजींना संत घोषित
करून त्यांच्या अंतसमयी त्यांना खाऊ आणि भेटवस्तू पाठवणे
पू. वसुमतीआजी (वय ८५ वर्षे) तिरुवटटार, जि. नागरकोविल, तमिळनाडू येथे रहात होत्या. त्या श्री आदिकेशव मंदिरात स्वच्छता इत्यादी सेवा करायच्या. त्याचे त्यांना प्रतिमास १०० रुपये मिळायचे. त्या ज्या गावामध्ये रहायच्या, तेथे जवळपास कोणी साधक किंवा सनातन संस्थेच्या संपर्कात आलेले हिंदुत्वनिष्ठ इत्यादी कुणीही रहात नव्हते. त्यामुळे कुणालाही त्यांच्याविषयी माहिती नव्हती. काही काळाने मध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ तमिळनाडू येथे गेल्या होत्या. त्यांनी पू. वसुमतीआजींना मंदिरातील केर काढतांना पाहिले. त्या वेळी त्यांना आजींमध्ये काहीतरी वेगळेपण जाणवले; म्हणून त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना वसुमतीआजींच्या संदर्भात सांगितले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या संत असल्याचे सांगितले. त्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एका कार्यक्रमाद्वारे वसुमतीआजी संत असल्याचे घोषित करून त्यांचा सन्मान केला. त्या वेळी त्यांचे वय ८१ वर्षे होते. नंतर आम्ही केरळ येथे दौर्यावर असतांना आमचे नागरकोविल, तमिळनाडू येथे जाण्याचे नियोजन झाले. त्या वेळी आम्ही पू. वसुमतीआजींना भेटून त्यांच्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली भेटवस्तू आणि खाऊ दिला. तेव्हा त्यांना आजारपणामुळे उठताही येत नव्हते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून ‘जणू त्या या भेटीसाठीच थांबल्या होत्या’, असे जाणवले; कारण काही दिवसांनीच पू. वसुमतीआजींनी देहत्याग केला.
परात्पर गुरु डॉक्टर केवळ साधकांच्या घराचीच नव्हे, तर साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करून शेवटच्या क्षणापर्यंत आणि नंतरही सूक्ष्मातून काळजी घेणारच असल्याने साधकांनी भक्तीभाव वाढवणे आवश्यक
कोण, कुठल्या मंदिरात केर काढण्याची सेवा करणार्या पू. वसुमतीआजी ! परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना शोधून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले आणि त्यांच्या अंत्यसमयी त्यांना प्रसाद आणि भेटवस्तू पाठवणारी आपली गुरुमाऊली आहे. यावरूनच आपल्या लक्षात येईल की, साधकांच्या केवळ घराचीच नाही, तर साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करून शेवटच्या क्षणापर्यंत आणि नंतरही परात्पर गुरु डॉक्टर आपली सूक्ष्मातून काळजी घेणारच आहेत. त्यामुळे साधकांनो, भक्तीभाव वाढवा !’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |