‘अयोध्येसारख्या पवित्र भूमीत जन्म झालेले आणि एकत्र कुटुंबात वाढलेले श्री. नंदकिशोर वेद यांना पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड होती. उत्तम स्मरणशक्ती आणि अभ्यासू वृत्ती असल्याने त्यांनी पुष्कळ परिश्रम घेऊन शिक्षण घेतले. त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय आतंकवाद’ या विषयावर शोधप्रबंध सादर करून ‘पी.एच्.डी.’ ही पदवी मिळवली. त्यांनी आणखी २ पुस्तकेही लिहिली आहेत. अध्यापनाची सेवा करतांना त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांवर पुत्रवत् प्रेम केले. ‘पी.एच्.डी.’ करणार्या विद्यार्थ्यांना त्यांनी विनाशुल्क मार्गदर्शन केले. यातून त्यांची नि:स्पृह आणि निरपेक्ष वृत्ती दिसून येते. यातून त्यांची कर्मयोगानुसार साधना झाली.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असतांना त्यांनी आपल्या कुटुंबियांकडे कधी दुर्लक्ष केले नाही. त्यांनी मुलींना चांगले शिक्षण देण्यासोबत चांगल्या संस्कारांचे बाळकडूही दिले. ‘आदर्श पुत्र’, ‘आदर्श बंधू’, ‘आदर्श शिक्षक’ आणि ‘आदर्श पिता’ अशी सर्वच नाती त्यांनी उत्तम प्रकारे निभावली.
वर्ष २००० पासून अयोध्या (फैजाबाद) येथे सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर डॉ. नंदकिशोर वेद यांनी तळमळीने सेवेला आरंभ केला. त्यांचा अहं मुळातच अल्प होता. त्यामुळे स्वतःच्या उच्च शिक्षणाचा किंवा प्रतिष्ठेचा कोणताही विचार न करता ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने ते सेवा करू लागले. त्यांचे निवासस्थान जणू साधकांसाठी आश्रमच बनले. अयोध्येत सनातनचे कार्य वाढावे, यासाठी त्यांनी सर्व स्तरांवर तळमळीने प्रयत्न केले. यामुळे ते ‘आदर्श साधक’ही बनले आणि वर्ष २०१८ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले.
डिसेंबर २०१९ मध्ये त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. व्यष्टी-समष्टी साधनेचा चांगला पाया आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा असल्यामुळे त्यांनी कर्करोगाचे कटू वास्तव स्वीकारले. असह्य वेदना होत असतांनाही त्यांची ईश्वरावरील निष्ठा कधी ढळली नाही. सतत भावविश्वात आणि अनुसंधानात राहून ते आंतरिक आनंद अनुभवत होते. त्यामुळे आजारपणातही त्यांची आध्यात्मिक उन्नती झपाट्याने होत राहिली. जेव्हा साधना अंतर्मनातून होऊ लागते, तेव्हा बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी साधनेत अखंडत्व येते, तसेच देहप्रारब्धाकडे साक्षीभावाने पहाता येते.
आजार बळावत गेल्याने ११.५.२०२१ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात डॉ. नंदकिशोर यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असतांनाही त्यांनी तळमळीने आणि भावपूर्ण साधना केल्याने मृत्यूच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के झाली. आज त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. या १२ दिवसांत त्यांची पातळी आणखी २ टक्क्यांनी वाढली आहे. मागील गुरुपौर्णिमेच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होती, म्हणजे अवघ्या १० मासांत त्यांची पातळी ९ टक्क्यांनी वाढली. एवढ्या जलद गतीने आध्यात्मिक उन्नती झाल्याचे सनातनच्या इतिहासातील हे पहिलेच उदाहरण आहे.
साधनेची तीव्र तळमळ आणि ईश्वराप्रती दृढ श्रद्धा असलेल्या डॉ. नंदकिशोर वेद यांनी आज ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘सनातनचे समष्टी संत’ म्हणून १०७ वे संतपद प्राप्त केले आहे.
पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचा पूर्ण परिवार साधना करत आहे. त्यांची मुलगी सौ. क्षिप्रा हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून अन्य सर्व कुटुंबियांची साधनाही चांगल्या प्रकारे चालू आहे.
‘पू. डॉ. नंदकिशोर वेद यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
दुर्धर आजारामुळे मरणप्राय वेदना सहन करतांना
‘गुरुस्मरण, गुरुध्यान आणि गुरुभक्ती’ या त्रिसूत्रींचे पालन
करून गुरुकृपेची अखंड अनुभूती घेत संतपदावर विराजमान झालेले पू. डॉ. नंदकिशोर वेद !
१. वेदकाकांची परात्पर गुरु डॉक्टरांवरील अनन्य
श्रद्धा आणि त्यामुळे सुसह्य झालेले त्यांचे आजारपण
१ अ. ‘रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर)’ झाल्याचे निदान
झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे शब्द आठवून शांत आणि स्थिर होणे
‘डिसेंबर २०१९ मध्ये प्रकृती ठीक नसल्याने डॉ. नंदकिशोर वेदकाका अयोध्येहून रामनाथी आश्रमात वास्तव्याला आले. आधुनिक वैद्यांनी त्यांच्या रक्ताची चाचणी केल्यावर त्यांना ‘रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर)’ झाल्याचे निदान झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘प्रारब्धभोग भोगूनच जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त व्हायचे आहे’, हे शब्द आठवून ते शांत आणि स्थिर झाले.
१ आ. गुरुवचनावर पूर्ण श्रद्धा असलेल्या वेदकाकांनी
कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही अखंड आणि भावपूर्ण साधना करणे
वेदकाकांना असह्य वेदना होत. एरव्ही व्यक्तीला थोडेसे जरी दुखत असले, तरी ती अस्वस्थ होते, चिडचिड करते; पण गुरुवचनावर पूर्ण श्रद्धा असलेल्या वेदकाकांनी या आजारातही अखंड आणि भावपूर्ण साधना केली. ‘गुरुस्मरण, गुरुध्यान आणि गुरुभक्ती’ या बळावर स्थिर राहून ते प्रारब्धभोग भोगू लागले. ते अखंड गुरुमाऊलीच्या अनुसंधानातच असायचे. ते गुरुमाऊलीला आर्ततेने आळवून आणि शरणागत होऊन हाक मारायचे. अशी आर्ततेने हाक मारल्यावर ती हाक दयाळू गुरुमाऊलीपर्यंत पोचणार नाही का ? गुरुमाऊलीच्या कृपेमुळे वेदकाकांना होणार्या मरणप्राय वेदनांची तीव्रता उणावत असे.
१ इ. मृत्यू डोळ्यांना दिसत असतांनाही अखंड गुरुस्मरणात
रहाणार्या वेदकाकांच्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व असणे
अध्यात्माची तात्त्विक माहिती असणे, प्रकृती स्वस्थ असतांना साधना करणे, हे वेगळे आणि तीव्र वेदना सहन करत असतांना, मृत्यू डोळ्यांना दिसत असतांना साधना अन् गुरुचरणांचे अखंड स्मरण करणे वेगळे ! अशा स्थितीतही वेदकाका वेगवेगळे भावप्रयोग करून भावावस्थेत रहायचे. त्यांच्या मनात सतत गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव असायचा. त्यामुळेच त्यांनी केलेल्या साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेदकाका इतके आनंदात असायचे की, त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘ते आजारी आहेत’, असे वाटायचेही नाही. जणू गुरुभक्तीमुळे त्यांच्याभोवती एक कवच निर्माण झाले होते.
२. वेदकाकांचा देहत्याग आणि त्यांच्या देहात
अन् कक्षात चैतन्याच्या स्तरावर झालेले पालट
२ अ. अत्यवस्थ स्थितीतील वेदकाकांना पहातांना ‘ते ईश्वराच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवणे
११.५.२०२१ या दिवशी वेदकाकांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे मी त्यांना भेटायला आश्रमातील त्यांच्या निवासकक्षात गेले. त्या वेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काही वेळाने त्यांचा श्वास एका लयीत होऊ लागला. त्यांच्याकडे पहातांना ‘ते ईश्वराच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते आणि त्यांतून कृतज्ञताभाव प्रकट होत होता.
२ आ. ‘मृत्यूसमयी वेदकाकांच्या देहात चैतन्याच्या स्तरावर पालट होणे,
हे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असल्याचे द्योतक आहे’, असे वाटणे
मृत्यूसमयी डॉ. वेद यांच्या पायाच्या पोटरीच्या भागावरील त्वचेला पिवळसर छटा आली होती, तसेच त्यांची त्वचा अत्यंत मृदू अन् पारदर्शक झाली होती. मृत्यूसमयी त्यांच्या देहात चैतन्याच्या स्तरावर झालेले पालट पाहिल्यावर ‘आजारपणातही त्यांनी चांगल्या प्रकारे साधना केल्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असल्याचे हे द्योतक आहे’, असे मला वाटले.
२ इ. डॉ. वेदकाकांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती
११.५.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.५६ वाजता वेदकाकांनी देहत्याग केला. काही वेळाने मी त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा मला त्यांच्या मुखावर हास्य दिसले. त्यांच्या कक्षातील प्रकाश पुष्कळ वाढला होता आणि तेथे सुगंध येत होता.
३. डॉ. नंदकिशोर वेदकाका संतपदी विराजमान होणे
३ अ. आश्रमात राहिल्यामुळे प्रारब्धभोगाची तीव्रता न्यून होणे आणि वेदकाकांनी
केलेल्या भावपूर्ण साधनेमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होऊन आध्यात्मिक पातळी ७१ टक्के होणे
मागील दीड वर्षापासून वेदकाका रामनाथी आश्रमात रहात होते. आश्रमात राहिल्यामुळे त्यांच्या प्रारब्धभोगाची तीव्रता न्यून झाली, तसेच त्यांनी अखंड अन् तळमळीने साधना केल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नतीही झपाट्याने झाली. ‘शेवटचा दीस गोड व्हावा’, अशी प्रत्येक ईश्वरभक्ताची इच्छा असते. वेदकाकांच्या आयुष्यातील शेवटचा दिवसही गोड ठरला. मृत्यूच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्क्यांवरून ६९ टक्के झाली. मृत्यूनंतरही त्यांची प्रगती जलद गतीने होऊन या १२ दिवसांत त्यांची आध्यात्मिक पातळी आणखी २ टक्क्यांनी वाढली आणि आज ते आता संतपदावर विराजमान झाले आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे घडलेली ही एक अलौकिक घटना आहे.
वेदकाकांच्या संदर्भात ‘गुरुस्मरण’ हेच औषध रामबाण, करून घेतली प्रगती विहंगम ।’, असे म्हणावे लागेल.
धन्य ते पू. डॉ. नंदकिशोर वेदकाका, ज्यांनी ‘अत्यवस्थ स्थितीतही साधना कशी करता येते ?’, हे आपल्या उदाहरणातून साधकांना शिकवले आणि धन्य ते परात्पर गुरु डॉक्टर, ज्यांनी पू. डॉ. वेदकाका यांच्यासारखे संतरत्न घडवले !
सनातनला उत्तमोत्तम संतरत्ने प्रदान करणार्या विष्णुस्वरूप परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी शरणागतभावाने नमस्कार आणि कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
‘डॉ. नंदकिशोर वेद यांच्याशी गेली जवळपास १७ वर्षे आमचे जवळचे संबंध होते. आम्ही सर्वजण त्यांना प्रेमाने ‘नंदकिशोरकाका’ म्हणायचो. मी उत्तरभारतमध्ये सेवेला असल्यापासून ते अयोध्या येथील केंद्राचे दायित्व पहात होते. त्यामुळे विविध सेवांच्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क व्हायचा. अयोध्या येथील साकेत महाविद्यालयात ते प्राध्यापक असल्याने समाजात ते सन्माननीय व्यक्ती म्हणून परिचित होते. डॉ. नंदकिशोर वेद यांचे ११.५.२०२१ या दिवशी देहावसान झाले. कै. डॉ. नंदकिशोर वेद यांचा आज निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक संकलित केलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. अयोध्या येथील वेद कुटुंबीय गुरुकार्यासाठी पूर्णपणे समर्पित
असणे आणि त्यांच्या निवासस्थानी गेल्यावर आश्रमात गेल्याचा आनंद अन् प्रेम मिळणे
‘स्वतःच्या निवासस्थानाचा आश्रम कसा बनवायचा ?’, याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे डॉ. नंदकिशोर वेद. ते आणि त्यांचा परिवार यांच्या भावामुळे त्यांनी घरात आश्रमासारखे वातावरण निर्माण केले होते. सनातनचे संत किंवा साधक प्रसाराच्या उद्देशाने अयोध्या येथे गेल्यास सर्वांच्या निवासाची सोय आणि अन्य व्यवस्था त्यांच्याच निवासस्थानी असायची. त्यांचा पूर्ण परिवार साधना करत आहे. त्यांचे कुटुंब हे अयोध्या येथील गुरुकार्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे. त्यांच्या निवासस्थानी गेल्यावर आश्रमात गेल्याचा आनंद आणि प्रेम मिळते.
२. प्रसारदौरा चालू झाल्यावर त्यांचे आश्रमरूपी निवासस्थान केंद्र असणे
आमचा प्रसारदौरा चालू झाला की, त्यांचे आश्रमरूपी निवासस्थान आमचे केंद्र असायचे. आम्ही ३-४ जण त्यांच्या घरी गेल्यावर ते स्वतः लक्ष घालून आमची रहाण्याची, न्याहारी, भोजन इत्यादी व्यवस्था भावपूर्ण करायचे. ‘आम्हाला काहीच न्यून पडू नये’, अशी व्यवस्था ते तळमळीने आणि प्रेमाने करायचे. त्यात कुणी साधक आजारी पडला, तर त्याला आधुनिक वैद्यांकडे घेऊन जाणे, औषधोपचार करणे हेही ते तेवढ्याच दायित्वाने पहायचे.
३. सात्त्विक उत्पादनांचे ते स्वतःच स्थानिक वितरक असणे
त्यांना पाठ आणि कंबर दुखण्याचा त्रास तीव्र होता, तरी केंद्रासाठी आलेला ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा, सात्त्विक उत्पादने यांची पार्सले बसस्थानकावर जाऊन घेणे, ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, अशा सेवा ते वेळेत करायचे. सात्त्विक उत्पादनांचे ते स्वतःच स्थानिक वितरक होते. त्यामुळे त्याचा साठाही त्यांच्या निवासस्थानी असायचा. ते स्वतः त्याचे साधकांना आणि समाजात वितरण करायचे. अयोध्या येथे साधकसंख्या अल्प असल्याने दायित्व घेऊन प्रसारकार्य पहाणारे अन्य कुणी नव्हते. त्यामुळे प्रसाराच्या संदर्भातील सर्व सूचना ते कृतीत आणायचा प्रयत्न करायचे.
४. स्वतःच्या चारचाकी वाहनाने ७ घंट्यांचा प्रवास करून उत्साहाने
वाराणसीला येणे आणि तेथील सेवाही आवश्यक तेवढे दिवस राहून पूर्ण करणे
वाराणसी येथील सेवाक्रेंद्रात साधकांची शिबिरे, हिंदु राष्ट्र (कलियुगांतर्गत सत्ययुग) अधिवेशन, गुरुपौर्णिमा महोत्सव, धर्मप्रेमी कार्यशाळा इत्यादी आयोजन झाल्यावर नंदकिशोरकाका यांच्यासाठी एखादी विशेष सेवा ठरलेली असायची. त्यासाठी ते सहपरिवार स्वतःच्या चारचाकी वाहनाने ७ घंट्यांचा प्रवास करून उत्साहाने वाराणसीला यायचे आणि आवश्यक तेवढे दिवस राहून सेवा पूर्ण करून जायचे. त्यांना शारीरिक त्रास असल्याने ते अयोध्येहून येतांना आणि जातांना एक वाहनचालक घेऊन यायचे. वाराणसीला आल्यावर ते त्यांचे चारचाकी वाहन आश्रमसेवेसाठी उपलब्ध करून द्यायचे.
५. शारीरिक त्रास असतांनाही प्रसारदौर्यावर येण्याच्या संदर्भात विशेष उत्साही
असणे आणि दौर्याच्या वेळी निरपेक्षभावाने मिळेल त्या परिस्थितीत स्वतःला सामावून घेणे
शारीरिक त्रास असतांनाही प्रसारदौर्यावर येण्याच्या संदर्भात ते विशेष उत्साही असायचे. आम्ही अयोध्या येथे गेल्यावर तिथूनच त्यांचे चारचाकी वाहन घेऊन लखनऊ, कानपूर, सुलतानपूर अशा ठिकाणी प्रसारासाठी जायचो. तेव्हा नंदकिशोरकाकाही आमच्या समवेत असायचे. त्यांना त्या भागातील भौगोलिक अभ्यासही चांगला होता. त्याचाही उपयोग प्रसारासाठी व्हायचा. त्यांना शारीरिक त्रास असतांनाही दौर्याच्या वेळी ते निरपेक्षभावाने मिळेल त्या परिस्थितीत स्वतःला सामावून घ्यायचे, हे विशेष होते.
६. श्री. प्रशांत जुवेकर (श्री. वेदकाका यांचे जावई)
यांना मडगाव स्फोट प्रकरणाच्या (खोट्या) आरोपाखाली
अटक केली असता त्यांनी या कठीण प्रसंगी जराही न डगमगता
स्थिर राहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून परिवाराला आधार देणे
त्यांचे जावई श्री. प्रशांत जुवेकर यांना मडगाव स्फोट प्रकरणाच्या (खोट्या) आरोपाखाली अटक केली होती. तेव्हा त्यांची कन्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि श्री. प्रशांत यांचा विवाह होऊन काही मासच झाले होते. अशा कठीण प्रसंगीही ते डगमगले नाहीत आणि त्यांची श्रद्धा किंचितही ढळली नाही. त्याही वेळी त्यांनी स्थिर राहून आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून परिवाराला आधार दिला अन् स्वतःची साधना आणि सर्व प्रकारच्या सत्सेवा चालू ठेवल्या. त्या कालावधीतही त्यांच्या घरी सनातनचे संत किंवा साधक गेल्यास त्यांनी परिवारासह मनापासून सेवा केली.
७. सनातनच्या हिंदी भाषेतील ग्रंथनिर्मितीच्या कार्यात मोलाचा वाटा
असणे आणि अनेक ग्रंथांचे व्याकरण अन् मुद्रितशोधन पडताळण्याची सेवा करणे
नंदकिशोरकाका यांचे हिंदी भाषा आणि व्याकरण यांवर विशेष प्रभुत्व होते. यामुळे सनातनच्या हिंदी भाषेतील ग्रंथनिर्मितीच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अनेक हिंदी ग्रंथांचे व्याकरण आणि मुद्रितशोधन पडताळण्याची सेवाही त्यांनी केली आहे.
८. सर्व साधकांचा प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन साप्ताहिक व्यष्टी
साधनेचा आढावा नियमितपणे घेणे आणि प्रकृती ठीक नसतांनाही
ठरलेल्या दिवशी साधकांचा आढावा घेऊन स्वतःच्या साधनेचाही आढावा देणे
अयोध्या केंद्रात साधकसंख्या अल्प असली, तरी ते सर्व साधकांचा प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन साप्ताहिक व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे घेत होते. तसेच स्वतःच्या व्यष्टी साधनेचा आढावाही साधकांना द्यायचे. एकदा आम्ही दौर्यावर होतो आणि त्यांची प्रकृती बिघडली होती, तरी त्यांनी ठरलेल्या दिवशी साधकांच्या साधनेचा आढावा घेतला आणि स्वतःचाही आढावा त्यांना सांगितला. याद्वारे त्यांनी सर्व साधकांच्या मनावर व्यष्टी साधना आणि साधनेतील सातत्य ठेवणे हा संस्कार दृढ केला.
९. एकदा प्रसारदौर्यावर असतांना साधकाची प्रकृती बिघडल्यावर
वेदकाकांनी अधिक वेळ गाडी चालवणे अन् त्या वेळी ते उत्साही अन् आनंदी असणे
एकदा प्रसारदौर्यावर असतांना आम्हाला ‘कानपूर ते अयोध्या’, असा चारचाकीने रात्रीचा प्रवास करायचा होता. त्या वेळी माझी प्रकृती फार बिघडली होती. प्रवास चालू झाल्यावर ती आणखी बिघडली. हायवे असल्याने रात्री बरीच मोठी वाहने ये-जा करत होती. त्यामुळे चार घंट्यांचा प्रवास सात घंट्यांचा झाला. तेव्हा मला त्रास होऊ नये; म्हणून काकांनी जवळपास साडेचार ते पाच घंटे स्वतः वाहन चालवले. त्या वेळी ते उत्साही, आनंदी आणि निरपेक्ष होते.’
– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, वाराणसी सेवाकेंद्र.
समाजात मानाचे स्थान असूनही धर्मप्रसाराच्या उद्देशाने
समाजात जाऊन अर्पण गोळा करण्यामध्ये त्यांना जराही अहं नसणे
समाजात त्यांना मानाचे स्थान होते, तरी धर्मप्रसाराच्या उद्देशाने समाजात जाऊन अर्पण गोळा करणे, गुरुपौर्णिमेसाठी विज्ञापने घेणे या सेवा ते स्वतः करायचे आणि या संदर्भात केंद्रातील पुढील दायित्वाचा भाग ते स्वतःच पूर्ण करून पाठवत असत. गुरुपौर्णिमा स्मरणिकेसाठी ते एकटेच चाळीस ते पंचेचाळीस विज्ञापने आणायचे. अयोध्या केंद्रात धर्मप्रेमींची एखादी कार्यशाळा, गुरुपौर्णिमा महोत्सव असे कार्यक्रम ठरल्यास समाजातून सभागृह, भोजन इत्यादींचे प्रायोजक मिळवणे इत्यादीही सेवा ते करायचे. समाजात मानाचे स्थान असतांनाही त्यांना त्याचा अहं नव्हता. अयोध्या येथील ‘सनातन प्रभात’चे वाचक, हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्थेचे हितचिंतक यांच्या समवेत त्यांचे आदरपूर्वक अन् प्रेमपूर्वक संबंध होते.