कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा उत्कृष्ट संगम असलेले सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांंचा साधनाप्रवास !

सनातनचे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.

पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर

 

१. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या
परम कृपेने संतपदाला पोचणे आणि ‘अजून प्रगती करायची आहे’, याची जाणीव होणे

‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या परम कृपेने माझी आध्यात्मिक पातळी ७१ टक्के घोषित होऊन मी संतपदाला पोचलो आहे. यापुढेही मला अजून प्रगती करायची आहे. जेव्हा जेव्हा मी रामनाथी आश्रमातून संभाजीनगरला घरी जायला निघतो, त्या वेळी चारचाकीने गोव्यातून बाहेर निघतांना रस्त्यावर एके ठिकाणी असलेला मैलाचा दगड सांगतो, ‘औरंगाबाद ६६० किलोमीटर !’ हे वाचून चालकाला आनंद होत नसला, तरी त्याला किती दूर जायचे हे लक्षात येते. ‘जर विलंब होत असेल, तर वेळ वाया घालवणे बरोबर नाही’, हेही कळते. त्याप्रमाणेच ‘माझ्या आयुष्याचा किती वेळ उरला आहे’, हे मला ठाऊक नाही; पण ‘कुठे जायचे आहे ?’, हे मला ठाऊक आहे. त्यासाठी मात्र पुष्कळ अल्प वेळ उरला आहे; म्हणून उरलेल्या आयुष्यात पुढे पुढे जाण्यासाठी माझा प्रयत्न असेल.

 

२. वर्ष २०१० मध्ये आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित होणे

आरंभी वर्ष २००७ ते २०१० या काळात सर्व न्यायालयीन कामकाज पहाणे आणि सनातनच्या दबल्या गेलेल्या (कायद्याचे साहाय्य आवश्यक असलेल्या) साधकांना कायद्याविषयी ज्ञान देणे, हे माझे काम होते. मी संस्थेचे प्रलंबित असलेले न्यायालयीन कामकाज पाहिले. वर्ष २०१० मध्ये मी गोव्याला गेलो, तेव्हा माझा आध्यात्मिक पातळी ६० टक्के असल्याचे सांगण्यात आले.

 

३. सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार ३ वर्षे साधना करणे
आणि बुद्धीच्या मर्यादा लक्षात येऊन शरणागती वाढणे

मी नेहमी म्हणतो की, सनातन हिंदु धर्मासाठी जितके उपयोगी पडता (जितके कार्य करता) येईल, तितके मी करीन.

एकदा मी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना दूरध्वनी केला आणि त्यांना सांगितले, ‘‘मी माझे संचित आणि प्रारब्ध बरोबर घेऊन आलो होतो, ते संपले आणि मी येथपर्यंत आलो; परंतु यापुढे मला अडचणी असल्याचे लक्षात येत आहे.’’ त्या वेळी त्यांनी मला काही सूत्रे समजावून सांगितली. त्यानंतर काही दिवसांनी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका संभाजीनगरला आले होते. त्यांनी मला मार्गदर्शन केले. मी ३ वर्षे त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केली. आमच्या घरातील वातावरण धार्मिक होते. आमच्याकडे काही खास कर्मकांड असे होत नसे. आमच्या तीन पिढ्या अधिवक्ता आहेत. आतापर्यंतचे माझे सर्व काम बुद्धीच्या स्तरावर चालत होते; परंतु कालांतराने मोठ्या कष्टाने ही गोष्ट माझ्या लक्षात आली की, बुद्धीने काम करून साधनेत पुढे जाणे शक्य नाही; कारण बुद्धीला मर्यादा आहेत.

महाभारतात द्रौपदीने वस्त्रहरणाच्या प्रसंगी सभेत काही प्रश्‍न उपस्थित केले आणि कुणीही त्यांचे उत्तर दिले नाही. कुणीही तिला वाचवले नाही. सर्वांत शेवटी ती भगवान श्रीकृष्णाला शरण गेली. त्या वेळी श्रीकृष्णाने तिला वाचवले.

 

४. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना स्वभावदोष
आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी विचारणे, तेव्हा
‘आपले स्वभावदोष लक्षात न आल्यास अहं वाढणार’, असा विचार मनात येणे

एका टप्प्यावर बुद्धीने विचार करण्याचा स्तर संपतो आणि तेथून पुढे भावाचा स्तर चालू होऊन ‘शरणागतभाव’ निर्माण होतो. गोव्यात आल्यावर मला सांगितले गेले की, तुम्हाला भावाच्या स्तरावर जाणे थोडे अवघड आहे. संभाजीनगर येथील साधक मला ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेसाठी तुम्ही येथे आलात का ?’, असे विचारत असत. एकदा मी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना विचारले, ‘‘ही प्रक्रिया म्हणजे काय आहे ?’’ सद्गुरु (सौ.) ताईंनी मला सांगितले, ‘‘आपल्यात काही स्वभावदोष असतात. ते दूर करण्यासाठी इथे चर्चा करून उपाय सांगितले जातात.’’ मला वाटले, ‘माझे स्वभावदोष कोण सांगणार ?’; कारण मी एखाद्याला ‘माझ्यात काही दोष आढळतात का ?’, असे विचारले, तर समोरची व्यक्ती म्हणते, ‘तुमच्यात काही दोष असूच शकत नाहीत.’ त्यामुळे ‘स्वभावदोष लक्षात आले नाहीत, तर अहं वाढणार’, असा विचार माझ्या मनात आला.

 

५. सद्गुरु जाधवकाका यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा सत्संग
यांमुळे स्वभावदोष लक्षात येऊन त्यासाठी प्रयत्न होऊ लागणे

नंतर मी एकदा सद्गुरु जाधवकाकांशी बोललो. मी त्यांना विचारले, ‘‘माझे स्वभावदोष दुसर्‍यांनी सांगण्याआधी माझ्या लक्षात येण्यासाठी मी काय करू ?’’ त्यानंतर त्यांनी मला मार्गदर्शन केले. प्रत्येक दोन मासांनी (महिन्यांनी) मी स्वभावदोष निर्मूलन सत्संगात जात होतो. हळूहळू माझे स्वभावदोष माझ्या लक्षात येऊ लागले आणि मी ते दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागलो. ‘हे दोष माझ्यात कुठून आले ?’, याचा मी मुळाशी जाऊन विचार करू लागलो आणि एकएक करून माझे स्वभावदोष दूर होऊ लागले.

 

६. आश्रमातील साधकांचे व्यक्तिमत्त्व आणि सेवाभाव
पाहून प्रभावित होणे आणि त्यांच्याप्रमाणे बनण्यासाठी साधनेच्या मार्गावर पुढे जाणे

रामनाथी आश्रमातील साधकांना बघितल्यावर मला वाटायचे, ‘हे माझ्यापेक्षा पुष्कळ पुढे आहेत.’ काहींचे व्यक्तीमत्त्व पाहिल्यावर मला वाटायचे, ‘मी यांच्यासारखा कधीही बनू शकणार नाही. माझे प्रयत्न पुष्कळ न्यून आहेत.’ आश्रमातील साधकांचा सेवाभाव बघून मी पुष्कळ प्रभावित झालो होतो. काही लोक मला ओळखतही नव्हते; परंतु त्यांच्या वागण्याने मी प्रभावित झालो. याची त्यांनासुद्धा कल्पना नव्हती; परंतु मी त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करत होतो.

मी परात्पर गुरुदेव, माझे वैयक्तिक मार्गदर्शक असलेले २ सद्गुरु आणि साधक या सर्वांचा ऋणी आहे. साधनेच्या प्रयत्नांत मला पुष्कळ दूर जायचे आहे. वेळ अल्प आहे. साधनेचा जो मार्ग मला मिळाला आहे, जसा मिळाला आहे, त्या मार्गावर मी भगवान श्रीकृष्णालाच शोधत शोधत इथपर्यंत येऊन पोचलो आहे. आता मार्ग तर मिळालाच आहे. प्रयत्न करत पुढे पुढे जायचे आहे.’

– (पू.) श्री. सुधाकर चपळगावकर (वर्ष २०१९)

 

पू. सुधाकर चपळगावकर यांनी संतपद
गाठल्यानंतर सनातनचे सद्गुरु आणि संत यांनी व्यक्त केलेले मनोगत

 

१. सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधव
१ अ. साधना आणि धर्म यांविषयी जिज्ञासेने वेळोवेळी विचारून घेणे

‘७ – ८ वर्षांपूर्वी संभाजीनगर येथे मी पहिल्यांदा पू. चपळगावकर यांना भेटलो. त्यांनी नामजपासंदर्भात मला काही प्रश्‍न विचारले. ‘नामजप कसा करायचा ? कोणता करायचा ?’ यासंदर्भात मी त्यांना माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी नामजप करण्यास आरंभ केला. जेव्हा मी संभाजीनगरला जायचो, त्या वेळी ते त्यांच्या मनातील शंका विचारत असत. कधी ते दैनिकातील एखाद्या लेखाविषयी विचारायचे, तर कधी ते मला त्यांच्या मनात ‘साधना आणि धर्म’ यांविषयी येणार्‍या विचारांविषयी सांगायचे. हे सर्व ऐकतांना त्यांच्यातील ‘जिज्ञासा’ हा गुण माझ्या लक्षात आला.

१ आ. वयोमानानुसार येणार्‍या अनेक अडचणींना ईश्‍वरेच्छेने स्वीकारून स्थिर रहाणे

कितीतरी प्रसंगांतून त्यांच्या मनाची स्थिरता लक्षात येते. त्यांच्या डोळ्यांचे शस्त्रकर्म झाले आहे. वयोमानानुसार त्यांना ऐकू येण्यातही अडचण आहे. ‘जे होत आहे, ते ईश्‍वरी इच्छेने होत आहे’, असे मानून या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या आहेत.

१ इ. इतरांच्या चुका प्रेमाने सांगणे

काही वेळा संभाजीनगर येथील सेवाकेंद्रात रहाणार्‍या साधकांच्या चुका त्यांच्या लक्षात येतात. त्या वेळी ते स्थिर राहून त्यांना चुका सांगतात आणि ‘त्यांनी काय करणे अपेक्षित आहे?’, हेसुद्धा सांगतात. त्यांच्यात असलेला प्रेमभाव निरनिराळ्या प्रसंगांतून लक्षात येतो.

१ ई. पू. चपळगावकरकाकांचा प्रेमभाव

१ ई १. सौ. सुनंदा जाधव यांचे शल्यकर्म होण्यापूर्वी आणि शल्यकर्म झाल्यावर त्याविषयी विचारपूस करणे : काही दिवसांपूर्वी माझ्या पत्नीचे (सौ. सुनंदा जाधव यांचे) संभाजीनगर येथे शस्त्रकर्म करण्याचे ठरले होते. त्या वेळी त्यांनी ‘ते कुठे करणार ?’, हे विचारून घेतले, तसेच ‘काही साहाय्य पाहिजे असल्यास सांगा’, असेही सांगितले. पत्नीचे शस्त्रकर्म झाल्यानंतर ‘ते कसे झाले ? आधुनिक वैद्य काय म्हणाले ?’, यांविषयीही त्यांनी विचारपूस केली. त्या वेळी शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडल्याचे आणि एप्रिल मासात आधुनिक वैद्यांनी परत तपासणीसाठी बोलावले असल्याचे मी त्यांना सांगितले. मी मे मासात अधिवेशनासाठी गोव्याला येण्याआधी संभाजीनगरला गेलो होतो. त्या वेळी पू. चपळगावकरकाकांनी मला दूरध्वनी करून विचारले, ‘आधुनिक वैद्यांनी बोलावले आहे, तर काकू कधी येणार आहेत ?’ मी मात्र ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेलो होतो; परंतु पू. काकांनी ते लक्षात ठेवले होते.

१ ई २. आजपर्यंत त्यांनी अनेक साधकांना साहाय्य केले आहे. त्यांनी अनेक संस्थांना कायद्याच्या दृष्टीने आवश्यक ते साहाय्य केले आहे. त्यांच्यात प्रेमभाव पुष्कळ असल्याचे जाणवते.

१ उ. नम्रता

पू. काकांची प्रकृती ठीक नव्हती. त्या वेळी मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही मला भेटण्यासाठी घरी येता. हे मला बरे वाटत नाही. खरेतर, मी तुम्हाला भेटायला आले पाहिजे. पुढच्या वेळी तुम्ही संभाजीनगरला आल्यावर मला तुमचे वास्तव्याचे ठिकाण कळवा. मी तुम्हाला तिथे भेटायला येईन.’’ यावरून त्यांच्यातील ‘नम्रता’ हा गुण लक्षात येतो.

पू. काकांमधील प्रेमभाव, नम्रता, जिज्ञासा हे गुण असून अहं अल्प आहे. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे परात्पर गुरुदेवांनी त्यांना संतपदावर विराजमान केले आहे.’

 

२. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संभाजीनगर

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी
२ अ. पू. चपळगावकर यांचा संबंध वकिलीच्या माध्यमातून येणे

‘मी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात वकिली करतो. वर्ष १९९६ मध्ये पू. चपळगावकरकाका तेथे आले. त्या वेळेपासून स्वतःचे वैयक्तिक जीवन असो, पक्षकारांसमवेत वकिली करणे असो किंवा एखादे धर्मकार्य असो, आम्ही दोघे नेहमी एकत्र असतो.

२ आ. सनातन संस्थेचे साधक धर्मकार्यातील अडचणींविषयी साहाय्यासाठी पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्याकडे येत असल्याचे पाहून पू. काकांनी त्याविषयी विचारणे आणि स्वतः साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवून साधनेस आरंभ करणे

वर्ष २००३ ते २००४ या काळात सनातन संस्थेचे साधक मला भेटायला येत असत. सनातनच्या साधकांची वागण्याची पद्धत आणि नम्रतेने बोलणे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. हे पाहून पू. चपळगावकरकाकांनी एकदा मला विचारले, ‘‘ हे कोण लोक तुम्हाला वेळोेवेळी भेटायला येत असतात ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘हे धर्मकार्य करणारे लोक आहेत. त्यांच्या कार्यात त्यांना प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते यांच्याकडून बर्‍याच अडचणी येत आहेत.’’ माझ्याकडे सनातनच्या काही धारिका होत्या, तसेच या (केसेस) मी उच्च न्यायालयात हाताळत होतो. प्रत्येक वेळी मी याविषयी पू. काकांशी चर्चा करत असे. काही दिवसांनी त्यांनी मला सांगितले, ‘‘न्यायालयाचे हे प्रकरण तू माझ्याकडे सोपव. तुझ्याकडे अन्य सेवाही आहेत, तसेच भांडण करण्याची तुझी प्रवृत्ती नसल्याने तू या प्रकरणी लढू शकणार नाहीस.’’ अशा प्रकारे त्यांचा सनातनशी संपर्क आला आणि साधनेचा प्रवास चालू झाला. मी वर्ष २००७ पासून आणि पू. काका वर्ष २०१० पासून सनातन संस्थेशी जोडलो गेलो.

२ इ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची अचूक उत्तरे देणे आणि त्याच वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली असल्याचे घोषित करणे

ईश्‍वराच्या नियोजनानुसार पू. चपळगावकरकाका प्रथमच रामनाथी आश्रमात आले होते. घरी परत जाण्यापूर्वी प्राणशक्ती अल्प असलेल्या परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या समवेत त्यांची थोड्या वेळासाठी भेट ठरली होती; परंतु त्यासाठी पू. काकांनी नापसंती व्यक्त केली; कारण त्यांना वाटत होते की, ‘केवळ १० मिनिटेच भेट न होता ती अधिक वेळ व्हावी.’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मला देता आली नाहीत; परंतु पू. काकांना ते शक्य झाले. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली असल्याचे घोषित केले. त्या वेळी पू. काकांना ‘६० किंवा ७० टक्के आध्यात्मिक पातळी’ यांविषयी कसलेही ज्ञान नव्हते. मी आध्यात्मिक पातळीविषयी सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला आणि मलाही पुष्कळ आनंद झाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment