गुरुभक्तीचा आदर्श असलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे शिष्य प.पू. भास्करकाका !

प.पू. भास्करकाका

‘एप्रिल २००५ मध्ये मिरज आश्रमातून आम्ही ९ जण अहमदनगरजवळील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या वडाळा (महादेव) येथील आश्रमात गेलो होतो. तेव्हा प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी, त्यांचे शिष्य प.पू. भास्करकाका महाराज आणि पू. रामानंदनाथस्वामी यांच्या सहवासात आम्हाला आनंद जाणवला आणि खूप काही शिकायला मिळाले. तसेच प.पू. भास्करकाकांशी झालेल्या जवळीकतेतून त्यांनी त्यांची गुरूंशी झालेली प्रथम भेट, गुरूंची केलेली सेवा इत्यादींविषयी पूर्वायुष्यातील कुणालाही कधीही न सांगितलेले प्रसंग सांगितले. त्यांना प्रसिद्धीचा कसलाही मोह नसल्याने किंवा ते स्वतःविषयी काही बोलत नसल्याने त्यांनी हे सर्व आम्हाला सांगणे, ही देवाने समष्टीला दिलेली देणगीच आहे. हे प्रसंग साधना करणार्‍या आम्हा सर्वांनाच मार्गदर्शक ठरतील, असे आहेत. त्यातील काही प्रसंग येथे देत आहे.

कु. पूनम साळुंखे

प.पू. भास्करकाका यांचा परिचय

वडाळा महादेव (जिल्हा नगर) येथील महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका कुशाग्र आणि बुद्धीवान होते. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यांनी मद्रास (आयआयटी) येथेसुद्धा शिक्षण घेतले होते. त्यांनी महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची ३५ वर्षे निरंतर सेवा केली. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या १५० हून अधिक ग्रंथांचे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रकाशन करून गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार केला. डॉ. काटेस्वामी आश्रमाच्या माध्यमातून ते अन्नदान, गुरुपूजन, गोसेवा, यज्ञ असे अनेकविध उपक्रम राबवून अखंड कार्यरत राहिले.

महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामी

१. प.पू. भास्करकाका यांची गुरुमहाराजांशी (गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींशी)
प्रथम भेट – गुरूंच्या प्रथम दर्शनातच आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टीचे भान न उरणे

प.पू. भास्करकाका महाराज पूर्वी पाचगणी येथील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. त्या वेळी त्यांना त्यांची मातृभाषा तेलुगु आणि इंग्रजी या भाषांशिवाय कोणतीच भाषा येत नसल्याने त्यांना कुणाशी बोलता येत नसे. त्यामुळे त्यांना तेथे करमत नव्हते. तेथील रेड्डी सर त्यांच्या भागातील असल्यामुळे त्यांच्याशीच ते बोलायचे. एका सुटीच्या दिवशी ते सकाळी रेड्डी सरांकडे चालले असतांना तेच त्यांना वाटेत भेटले आणि त्यांनी सांगितले, ‘‘येथे एक मोठे संत आले आहेत. त्यांच्याकडे त्यांना दूध घेऊन चाललो आहे.’’ तेव्हा प.पू. काकाही त्यांच्यासोबत गेले. तेथे देवळाच्या कट्ट्यावर गुरुमहाराज (गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी) बसले होते. त्यांना भेटताक्षणी प.पू. काकांना इतका आनंद झाला की, त्यांनी गुरुमहाराजांना लोटांगण घालून नमस्कार केला आणि सांगितले, ‘‘माझा स्वीकार करा आणि मला गुरुमंत्र द्या.’’ महाराजांनी ‘हो’, म्हटल्यावर ते त्या क्षणी गेले आणि त्या देवळातील कुुंंडात त्यांनी अंगावरचे कपडे काढून आंघोळ केली अन् तसेच गुरुमंत्र घेण्यासाठी गुरुमहाराजांसमोर जाऊन बसले. त्यांना गुरूंच्या प्रथम दर्शनातच या कोणत्याच गोष्टीचे भान नव्हते. देवळात दर्शनासाठी आलेले सर्व लोक आश्‍चर्यचकितच झाले की, एवढी सूट-बूट मध्ये आलेली व्यक्ती एकदम अंगावरचे कपडे काढून कुणासमोर लोळण घेत आहे.

 

२. महाविद्यालयात शिकवणे बंद करणे आणि जमलेले पैसे गुरुसेवेत वापरणे

काही कालावधीनंतर प.पू. काकांचे महाविद्यालयामधे जाणे कमी कमी होऊ लागले. नंतर त्यांनी तेथे जाणे पूर्णच बंद केले. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांना प्रत्येक महिन्याला पगार आणि पत्र पाठवायचे आणि त्यात ‘तुम्ही नोकरीवर परत या’, असे सांगायचे. तरीही हे जायचे नाहीत. उलट नोकरीतून जमा झालेली रक्कम त्यांनी गुरुसेवेत वापरली. गुरूंना पायी प्रवास करावा लागू नये; म्हणून त्यांनी चारचाकी गाडी विकत घेतली. तिचा पेट्रोलचा खर्च भागवण्यासाठी ते कोठेतरी कामे करायचे आणि तो खर्च भागवायचे.

 

३. प.पू. भास्करकाका ८-९ वर्षे घरी न गेल्याने
त्यांची आई-बहीण त्यांना शोधत गावोगावी फिरणे,
अखेर त्यांची भेट झाल्यावर लोकाग्रहास्तव त्यांना घरी
जावेच लागणे आणि तेव्हाही त्यांना गुरुसेवाच दिसून त्यांनी घरी
जाण्याच्या बदल्यात लोकांकडून गुरुसेवेतील बंद पडलेली गाडी दुरुस्त करवून घेणे

गुरुमहाराजांच्या सर्व प्रकारच्या सेवा ते करायचे. त्यांच्यासाठी जेवणही तेच बनवायचे. गुरूंच्या सेवेत प.पू. काका स्वत:ची नोकरी, कुटुंब सर्व विसरून गेले. गुरुप्राप्ती झाल्यानंतर ८-९ वर्षे ते घरीच गेले नाहीत. कुटुंबातील लोकांनी चौकशी केल्यानंतर त्यांना समजले की, आपला मुलगा कुणा साधूच्या नादाला लागला आहे. त्यानंतर शेवटी ८-९ वर्षांनी प.पू. काकांची आई आणि बहीण त्यांना शोधण्यासाठी त्यांच्या वेंकटगिरी गावाहून महाराष्ट्रात आल्या. त्या वेळी गुरुमहाराजांचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचन, कार्यक्रम आयोजित केलेले असायचे आणि प.पू. काका त्यांना तेथे गाडीने घेऊन जात असत. ते ज्या दिवशी एखाद्या गावाहून निघत, त्याच दिवशी त्यांची आई आणि बहीण त्यांना शोधत शोधत तेथे पोचत अन् त्यांची आई आणि बहीण यांना निरोप कळे की, प.पू. काका आजच त्या गावाहून पुढे गेले. असे काही दिवस गेल्यानंतर महाड या गावी प.पू. काकांची गाडी बंद पडली. तिच्या दुरुस्तीसाठी बराच खर्च येणार होता. तेवढी रक्कम प.पू. काकांकडे नव्हती. ‘ती कशी जमा करूया’, या नियोजनात ते होते. तेथे मुक्काम लांबल्यामुळे त्यांची आई आणि बहीण तेथे पोहोचल्या. त्यांची आई तर ‘काका येणार नाहीत’, म्हणून सारखी रडू लागली. तिची प्रकृती खराब झाली. प.पू. काकांच्या आई-बहिणीची झालेली स्थिती पाहून त्या गावातील लोकांनी प.पू. काकांना समजावले आणि त्यांनी आई-बहिणीबरोबर जाण्याचाच निर्णय दिला. तेव्हाही त्यांना गुरुसेवाच दिसत होती. त्यांनी लोकांना जाण्यासाठी अट घातली, ‘मी जातो; पण माझ्या गुरूंची गाडी बिघडली आहे आणि तिच्या दुरुस्तीचा खर्च कुणीतरी केला, तरच मी जाऊ शकतो.’ त्यांची ही अडचण लोकांनी सोडवली आणि त्यांना गाडीत बसवून दिले. जाण्यापूर्वी ते गुरुमहाराजांना भेटले. तेव्हा गुरुमहाराज त्यांना म्हणाले, ‘‘या वेळच्या नवरात्रीच्या दुर्गासप्तशती अनुष्ठानासाठी तू नसणार का ? प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही ही पूजा आपण एकत्र केली असती, असे वाटले होते.’’ प.पू. काकांना गाडी दुरुस्त झाल्याचा आनंद होता; पण या कौटुंबिक अडचणीतून कसे सुटावे ?, हे त्यांना कळत नव्हते. जातांना ते जड पावलांनी गुरूंची वाक्ये मनात घेऊन गेले.

 

४. चार-पाच दिवस घरी राहिल्यावर गुरूंनी म्हटल्याप्रमाणे पूजेसाठी प.पू. भास्करकाका
फक्त अंगावरील कपड्यांनिशी घरातून निघणे, त्यानंतर‘आपण गुरूंच्या गावी
कसे पोचलो’, हे त्यांना न आठवणे आणि गुरूंनी त्यांच्यासाठी पूजेमध्ये सिद्धता करून ठेवणे

प.पू. काका घरी गेल्यावर सर्व नातेवाईक खूप आनंदी होते; पण काकांचे मन अस्वस्थ होते; कारण अवघ्या ७ दिवसांवर दुर्गासप्तशतीची पूजा होती. ‘गुरूंच्या इच्छेनुसार आपण त्या पूजेला कसे पोचणार’, हीच तळमळ त्यांना लागली होती. घरी ४-५ दिवस झाल्यानंतर ते एके रात्री घरातून जवळ एकही पैसा नसतांना फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी निघाले. पुढे त्यांना फक्त ते गाडीत बसलेले आठवते. त्यानंतर ते थेट महाड स्थानकावर आल्यानंतरचेच आठवते. ते  पूर्ण एक दिवसाचा प्रवास करून कसे पोचले, ते त्यांना अजूनही आठवत नाही आणि त्यांना ठाऊकही नाही. जेव्हा ते गुरुमहाराजांकडे पूजेसाठी पोचले, तेव्हा गुरुमहाराजांनी त्यांच्यासाठी जागा सिद्धच ठेवली होती आणि जणू त्यांना निश्‍चितीच होती की, काका तेथे पोचणारच आहेत.

 

५. कराड येथील गुरुमहाराजांचा कार्यक्रम २ वेळा रहित झाल्याने
गुरूंना झालेल्या त्रासामुळे प.पू. भास्करकाकांना खूप वाईट वाटणे
आणि त्यांनी आयोजकांकडे जाऊन अक्षरशः रडतच गुरूंना त्रास झाल्याचे
सांगितल्याने काही लोकांनी स्वतःहून गुरुमहाराजांचा कार्यक्रम आयोजित करणे

‘साधारण वर्ष १९८४-८५ मध्ये कराड येथे गुरुमहाराजांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. प.पू. काका गुरुमहाराजांसमवेत त्या कार्यक्रमाला पोचल्यानंतर कळले की, ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, तीच व्यक्ती परगावी गेली आहे. त्यामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही. त्या व्यक्तीने पुढचा दिनांक दिला. त्या दिवशीही काहीतरी अडचण आल्याने कार्यक्रम होऊ शकला नाही. आपल्या गुरूंना २ वेळा विनाकारण हेलपाटा झाला, याचे प.पू. भास्करकाकांना इतके वाईट वाटले की, ते तडक कार्यक्रम आयोजित करणार्‍या व्यक्तीच्या कार्यालयात गेले. तेथे  त्यांनी वरील सर्व प्रसंग सांगितला. गुरूंना झालेल्या त्रासाचे त्यांना इतके वाईट वाटले होते की, ते अक्षरशः रडत रडतच सर्व सांगत होते. एवढी सूट-बूट घालून आलेली व्यक्ती रडतांना पाहून तेथील इतर सर्व कर्मचार्‍यांना आश्‍चर्य वाटले आणि त्यांनी स्वतःहून गुरुमहाराजांचा कार्यक्रम आयोजित केला.’

 

६. गुरुमहाराज प.पू. भास्करकाकांशिवाय न जेवणे आणि गुरुमहाराजांनी उपाशी राहू
नये म्हणून प.पू. काका कितीही आजारी असले, तरी गुरुमहाराजांसाठी जेवण बनवत असणे

प.पू. काका कुठे बाहेरगावी गेले की, त्या दिवशी गुरुमहाराज जेवायचेच नाहीत. त्यांच्यासाठी ठेवलेले जेवणाचे ताट तसेच असायचे. प.पू. काका आजारी असतांनाही गुरुमहाराज इतर कुणी केलेले जेवणार नाहीत; म्हणून कितीही बरे नसले, तरी उठून गुरुमहाराजांसाठी जेवण बनवायचेच आणि शक्यतो त्यांना सोडून बाहेर जाणेही टाळायचे.

 

७. बद्रीनाथ-केदारनाथ येथे गेल्यावर बाहेर थंडीत झोपणे
आणि सकाळी उठल्यावर त्यांना त्यांच्या अंगावर गुरूंनी शाल घातलेली दिसणे

गुरुप्राप्तीनंतर ४-५ वर्षांनी प.पू. भास्करकाका गुरुमहाराजांसमवेत बद्रीनाथ-केदारनाथ येथे गेले होते. तेव्हा खोलीच्या भाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने एकच खोली भाड्याने घेणे त्यांना शक्य झाले. गुरुमहाराजांना सर्व सोवळ्यात आणि एकट्यानेच रहाण्याची सवय असल्याने ते खोलीत रहायचे अन् त्या कडाक्याच्या थंडीत प.पू. भास्करकाका बाहेर झोपायचे. तेव्हा सकाळी उठल्यावर त्यांना त्यांच्या अंगावर गुरूंनी शाल घातलेली दिसायची. याही स्थितीत त्यांना ‘गुरु आपली किती काळजी घेतात’, याबद्दल कृतज्ञताच वाटायची.

– कु. पूनम साळुंखे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

८. मी पाहिलेले गुरुदेव ! – प.पू. भास्करकाका

प.पू. गुरुदेव काटेस्वामी यांचे शिष्य प.पू. भास्करकाका यांनी ‘गुरु शिष्याची कशी काळजी घेतात ?’ याविषयीचा प्रसंग सांगितला.

अ. शिष्याची खडतर परीक्षा घेणारे आणि क्षणोक्षणी त्यांची काळजीही घेणारे गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !

प.पू. गुरुदेवांविषयी अथवा धर्माविषयी सांगितलेली ही घटना प्रत्येकाने हृदयस्थ करावी, अशीच आहे. सद्गुरु आपल्या शिष्यातील ज्ञानवैराग्याच्या बिजाला विवेकाचे खतपाणी घालून कसे अंकुरीत करतात आणि त्याचे ज्ञानवृक्षात रूपांतर होईल याची डोळ्यांत तेल घालून कशी काळजी घेतात ? हे या कथेत सांगितले आहे. प.पू. गुरुदेवांनीदेखील स्वत:च्या या सद्शिष्याची अशीच खडतर परीक्षा घेतली आणि नंतर क्षणोक्षणी त्याची काळजीही घेतली.

आ. लहानपणी देवाच्या शोधात घर सोडणारे प.पू. भास्करकाका !

प.पू. भास्करकाकांनी पाचवी-सहावीत असतांना एक गोष्ट वाचली होती. त्या गोष्टीचा त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की, ते देवाच्या शोधासाठी म्हणून घर सोडून गेले; परंतु वडिलांच्या लगेचच लक्षात आल्यामुळे त्यांनी काकांना शोधून घरी परत आणले. प.पू. भास्कारकाकांनी वाचलेली गोष्ट आणि त्यातून त्यांनी घेतलेला बोध आपण  पहाणार आहोत.

इ. गुरूंनी शिष्याला जगाचे यथार्थ दर्शन घडवणे !

१. शाळेत जाणार्‍या छोट्या मुलाची साधूबाबांशी भेट होणे : एक छोटेसे खेडेगाव होते. छोटी छोटी मुले शाळेत एकत्र मिळून जायची. शाळेत जाण्याच्या रस्त्यात एका साधूबाबांची झोपडी होती. सगळे जाता येता त्यांच्या कुटीकडे पाहून आदराने नमस्कार करीत. एक छोटा मुलगा मात्र तेवढ्यात धावत जाऊन त्या साधूबाबांच्या पाया पडायचा आणि मग शाळेत जायचा. घरी परतल्यावर हातपाय धुवून पुन्हा थोडा वेळ त्या बाबांच्या कुटीत त्यांच्या समोर जाऊन शांत बसायचा. काही संवाद होत नसे; परंतु मुलाला तेथे आनंद मिळायचा.

२. साधूबाबांनी मुलाला दिलेल्या गोळीमुळे तो निपचित पडणे : एक दिवस साधूबाबा अचानक म्हणाले, ‘‘आठ दिवसांत मी गाव सोडून जाणार बेटा.’’ मुलाचा चेहराच उतरला. दुसरे दिवशी तो हळूच म्हणाला, ‘‘मी पण आपल्या सोबत येऊ का ?’’ साधूबाबांनी प्रेमळपणे त्याच्याकडे पहात म्हटले, ‘‘नको.’’ हा मुलगा प्रतिदिन प्रश्‍न विचारायचा, साधूबाबा प्रतिदिन ‘नको’, असे म्हणायचे. एक दिवस साधूबाबा म्हणाले, ‘‘मी उद्या जाणार बेटा.’’ मग मात्र मुलगा रडायला लागला. ते पाहून साधूबाबा म्हणाले, ‘‘रडू नकोस. उद्या सकाळी घरीच देवाला नमस्कार कर आणि मी देतो ती एक गोळी खाऊन टाक. त्याने काम होईल.’’ मुलाने तसेच केले आणि त्यानंतर त्याचे डोळे बंद झाले. हात पाय हलेनात. त्याला केवळ कानाने ऐकू येत होते.

३. मुलाला जिवंत करण्यासाठी लोकांनी साधूबाबांकडे धाव घेणे : आईने पाहिले की, देवासमोर हा असा कसा निपचित पडला आहे. तिने आरडाओरडा केला. गाव जमा झाले. जाणत्या माणसांनी पाहिले, तर मुलाचे हातपाय गार पडलेत. ‘हा तर मेला असावा. गावात डॉक्टर नाही, तर काय करावे ?’ असा प्रश्‍न सर्वांना पडला. कुणी म्हणाले, ‘‘ते साधूबाबा काही करू शकतील.’’ लोक साधूबाबांना आणायला त्यांच्या कुटीत गेले. तेव्हा ते गाव सोडून जायलाच निघाले होते. लोक त्यांना मुलाच्या घरी घेऊन गेले. लोकांनी साधूबाबांना विचारले, ‘याला पुन्हा जिवंत करता येईल का ?’ साधूबाबांनी पाहून सांगितले, ‘हो. हा पुन्हा जिवंत होऊ शकेल; पण कुणी तरी स्वत:चा प्राण दिला, तर तो मी याच्या शरिरात घालून याला जिवंत करू शकेन.’ सगळे मी, मी म्हणणारे, मोठ्याने रडणारे एकदम शांत झाले. कुणाला मुलाची चिंता, पैशाची चिंता, नातेवाइकांची चिंता, अगदी म्हातारेपण नाही म्हणाले. जन्मदात्री आईही नाही म्हणाली.

४. साधूबाबांमुळे मुलाला भौतिक जगाची निरर्थकता लक्षात येणे आणि त्याने त्यांच्यासोबत जायचे निश्‍चित करणे : कुणी अतिशहाणा म्हणाला, ‘‘साधूबाबा तुम्ही तुमचाच प्राण द्या.’’ साधूबाबा म्हणाले, ‘‘मी प्राण देईन; पण मग याला जिवंत कोण करील ?’’ सर्वच शांत झाले. निपचित पडलेला मुलगा सर्व ऐकत होता. दुनियेचे यथार्थ दर्शन त्याला घडले होते. शेवटी साधूबाबा जायला निघाले. ते दारापर्यंत जात नाहीत तोच मुलाने डोळे उघडले, हातपाय हलवले आणि सरळ त्या साधूबाबांच्या मागे कुणाकडेही न बघता निघून गेला. सगळ्यांनी अडवले; पण त्याने कुणाकडेही वळून पाहिले नाही. सद्गुरूंनी गोळीद्वारे त्याला या जगाचे यथार्थ दर्शन घडवले होते. तो मनाच्या दृढ निश्‍चयाने त्यांच्या मागे गेला आणि त्याने जीवनाचे परमकल्याण साधले.

ई. प.पू. भास्करकाकांना प.पू. गुरुदेवांनी ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गात आणणे !

या गोष्टीद्वारे प.पू. भास्करकाकांना सद्गुरूंचे माहात्म्य पुरेपूर पटले होते. त्यामुळेच त्यांनी प.पू. गुरुदेवांचे थोरपण पहिल्या भेटीतच जाणले. प.पू. गुरुदेवांनीदेखील या शिष्यातील मुमुक्षत्व जाणले आणि त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांना पूर्ण स्वच्छ शब्दांत निःसंशय अशी उत्तरे दिली. त्यानंतरच्या पुढील घटना सांगतांना वंदनीय भास्करकाका म्हणाले, ‘‘प.पू. गुरुदेवांच्या सेवेत रुजू झाल्यापासून माझे जीवन लौकीकदृष्ट्या जरी अनिश्‍चित झाले, तरी प.पू. गुरुदेवांनी मात्र परमेश्‍वर प्राप्तीच्या मार्गात मला निश्‍चितच आणले. घरातील नातेवाईक मला परत नेण्यास कित्येकदा आले. बरेचदा मी त्यांना सापडू नये म्हणून दुसरीकडेच निघून जात असे. या घटनेविषयी प.पू. गुरुदेव मला कुठलाही प्रश्‍न विचारीत नसत.’’

एकदा घरच्यांनी गावी नेल्यावर काही दिवसांनी मी विशिष्ट वेळी म्हणजे गुरुदेवांच्या पूजेच्या वेळी परत आलो. त्या वेळी प.पू. गुरुदेव सहजपणे म्हणाले, ‘‘या भास्कर. आता पूजेला बसा !’’ अर्थात् प.पू. गुरुदेवांनीच आपल्या इच्छाशक्तीने मला परत आणले होते.

उ. प.पू. गुरुदेवांनी कलिकाळातही १०० टक्के धर्माचे पालन करून धर्माचरणाचे शिवधनुष्य पेलणे !

प.पू. गुरुदेवांच्या निर्वाणानंतर लगेचच वंदनीय भास्करकाका भंडार्‍याला आले होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि झोपेतही सावधपणे गुरुदेवांच्या सेवेत असणार्‍या भास्करकाकांना वाटणारे दुःख ते प.पू. गुरुदेवांच्या आठवणी सांगून प्रकट करत होते. सतत ३० वर्षांपेक्षा अधिक काळ रात्रंदिवस प.पू. गुरुदेवांच्या सेवेत असणारे प.पू. भास्करकाका एक वाक्य गुरुदेवांविषयी सहजच म्हणून गेले. ‘प.पू. गुरुदेवांनी स्वत:च्या आयुष्यात आजच्या विपरीत कलिकाळातही शंभर टक्के धर्म सांभाळला. हे केवढे कठीण काम होते; परंतु प.पू. गुरुदेव धर्माचरणाविषयी तितकेच कडवे आणि ठाम होते; म्हणूनच हे धर्माचरणाचे शिवधनुष्य त्यांनी सहजच पेलले.’

(घनगर्जित, जानेवारी २०२१)

Leave a Comment