एखादे व्रत केल्यावर, त्याचे फळ अजून कसे मिळत नाही ?, म्हणून कोणी मनात विकल्प आणू नये. कोणाला लवकर, तर कोणाला उशिरा; पण फळ निश्चित मिळते. व्रताचे फळ प्रामुख्याने पुढील मुद्यांवर अवलंबून असते.
व्रताचे फळ
१. भक्तीभाव
व्रतामधे भक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. भक्तीशिवाय केलेला व्रताचार एक यांत्रिक कर्म ठरते.
२. संकल्प
‘श्री. राजाभाऊ परांजपे, ठाणे हे श्री गुरुमहाराजांचे शिष्य-अनुग्रहित आणि श्री बाबामहाराजांचे भक्त. त्यांना श्री गुरुचरित्र पारायणापासून काही लाभ होत नव्हता. त्यांनी ही शंका श्री बाबामहाराजांना विचारली. ते म्हणाले, ‘‘आपण पुण्याला गेलो म्हणजे श्री गुळवणी महाराजांकडेच हा विषय बोलू.’’ पुढे श्री. परांजपे आपल्या गाडीतून श्री बाबांना घेऊन चिंचवड करून पुण्यास आले. श्री गुरुमहाराजांसमोर ते श्री. राजाभाऊ परांजपे यांना म्हणाले, ‘‘विचारा तुमचा प्रश्न.’’ श्री. परांजपे यांनी प्रश्न विचारला.
श्री गुरुमहाराज म्हणाले, ‘‘संकल्प सोडून पारायणाला सुरुवात करता, कि तसेच सुरू करता ?’’ श्री. परांजपे म्हणाले, ‘‘संकल्प वगैरे काही येत नाही, माहीत नाही. तसेच पारायण सुरू करतो.’’ मग श्री गुरुमहाराजांनी श्री. परांजपे यांना संकल्प शिकविला, पंचांग शिकविले. नंतरच्या पारायणापासून त्यांना उत्तम अनुभव येऊ लागले.’
३. कालमाहात्म्य
गणपतीच्या शुद्ध व वद्य चतुर्थी, म्हणजे विनायकी व संकष्टी चतुर्थी, या मंगळवारी आल्यास त्यांना ‘अंगारकी’ म्हणतात. एका अंगारकीने जे फळ मिळते, तसे वर्षभरच्या विनायकी किंवा संकष्टीने मिळते.
निर्जला एकादशीचे फळ चोवीस एकादश्यांच्या फळाइतके आहे. बहुतेक व्रते शुद्ध प्रतिपदा ते सप्तमी किंवा अष्टमीपर्यंत असतात; कारण तेव्हापासून चंद्र जास्त वाढत जातांना दिसतो, तसेच व्रताचा उद्देश सफल होण्याची संधीही उत्तरोत्तर वाढत जाते.
४. उन्नतांचा संकल्प व हास्यास्पद आधुनिक व्रते
प्रत्येक व्रतामागे एखाद्या उन्नतांचा संकल्प असतो, बहुधा अध्यात्मातले काही तत्त्व असते; म्हणून त्याचे फळ मिळते. कोणीतरी आधुनिक व्रते म्हणून ‘शाळा बांधा, रोग्यांची शुश्रूषा करा’, असे म्हणेल तर त्याचे फळ मिळणार नाही.
अडचणींमुळे व्रत पूर्ण करणे अशक्य असेल, तर काय करावे ?
अ. काही अडचणींमुळे व्रत करता येणे अशक्य असेल, तर पती, पत्नी, पुत्र, भाऊ, बहीण, शिष्य यांच्याकडून ते करवावे. हे शक्य नसेल, तर पुरोहित किंवा मित्र यांच्याकडून व तेही शक्य नसेल, तर ब्राह्मणाकडून ते पूर्ण करून घ्यावे.
आ. अशौच, रजस्वलादोष किंवा ज्वरादी रोग आले असता, शारीरिक नियम स्वतः करावे आणि पूजा वगैरे विधी दुसर्याकडून करून घ्यावे.
इ. काम्य कर्म प्रतिनिधीच्या द्वारे करू नये. नित्य व नैमित्तिक कर्मे मात्र केली तरी चालतात.
ई. एकापेक्षा अधिक व्रते एका काळी आली असता, ज्या गोष्टी विरुद्ध असतील, त्या क्रमाने कराव्या. तसेच नक्तभोजन व उपोषण अशी विरुद्ध असतील, तेव्हा एक आपण करावे आणि दुसरे प्रतिनिधीच्या द्वारे करावे.