खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथील भेंडवळची भविष्यवाणी !देशात यंदा पाऊस आणि पीक परिस्थिती साधारण असेल ! |
खामगाव – देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणार्या येथील भेंडवळची भविष्यवाणी १५ मे या दिवशी पुन्हा घोषित झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रतिवर्षी जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान यांविषयीचा अंदाज वर्तवला जातो. यंदा दळणवळण बंदीमुळे मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत घटमांडणी करून त्यातून झालेल्या हालचालींवरून भविष्यवाणी वर्तवण्यात आली. त्यानुसार ‘यावर्षी देशात पाऊस आणि पीक परिस्थिती साधारण असेल. देशाचा राजा कायम राहील; पण ताण वाढणार असून देशावर महामारी आणि आर्थिक संकट येणार आहे’, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली.
गेल्या ३५० वर्षांपासून भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तवण्यात येते. यंदा दळणवळण बंदीमुळे ही परंपरा खंडित होऊ नये, यासाठी केवळ चंद्रभान महाराज यांचे वंशज शिवाजी पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांसह ५ लोकांनी अक्षय्य तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली. सूर्योदयापूर्वी घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तवले.
भेंडवळ येथील भविष्यवाणी पुढीलप्रमाणे१. यंदा देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल. जून मासात साधारण पाऊस पडेल. जुलै मासातील पर्जन्यमान चांगले असेल, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर मासांत पाऊस अल्प पडणार आहे. २. अवकाळी पावसाचा प्रभाव यंदा अल्प असेल. यावर्षी ४ मासांत पावसाळा साधारण असून पीक परिस्थिती साधारण असेल. ३. ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन ही सर्व पिके सर्वसाधारण येतील. पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच मासात पीकपेरणी केली जाईल. चारा टंचाई भासेल. ४. संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात असतांना महामारीचे संकट आणखी गडद होणार आहे. ५. पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्तीही येऊ शकते. रोगराईचे संकट येईल. त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती कमकुवत होईल. ६. देशाची आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल. राजावरील ताण वाढेल, तसेच संरक्षण खात्यावरही ताण येईल. परकियांची घुसखोरी वाढेल. |