विजयपताका श्रीरामाची झळकली अंबरी ।
दुमदुमली हिंदु राष्ट्राची ललकारी ॥
रामनाथी (गोवा) – अक्षय्य तृतीया हे अविनाशी तत्त्वाचे प्रतीक आहे. या शुभदिनी (१४.५.२०२१ या दिवशी) सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. प्रारंभी चैतन्यमय वातावरणात धर्मध्वजाचे विधीवत् पूजन करण्यात आले. त्यानंतर शंख आणि घंटा यांच्या नादघोषात ध्वजारोहण करण्यात आले. या विधीचे पौरोहित्य सनातनचे पुरोहित श्री. अमर जोशी आणि श्री. चैतन्य दीक्षित यांनी केले.
सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून या ध्वजावर एका बाजूला प्रभु श्रीरामाचे चित्र, तर दुसर्या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामरूपातील चित्र घेण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार हा कापडी ध्वज बनवण्यात आला. ‘हा धर्मध्वज हे हिंदु राष्ट्र समीप आल्याचे प्रतीक आहे. या धर्मध्वजाच्या स्थापनेमुळे सर्वत्र हिंदु धर्माची पुष्कळ कीर्ती होईल आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल’, असे आशीर्वचन सप्तर्षींनी दिले आहे.