धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सप्तर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून
सनातनच्या तीन गुरूंची वेळोवेळी उलगडलेली दैवी वैशिष्ट्ये !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांशी बसलेल्या त्यांच्या उजवीकडे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि डावीकडे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

 

सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महती सांगून केलेला गौरव !

१. एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे ‘गुरु’ पृथ्वीवर नाहीत. पृथ्वीवर स्वतःला ‘गुरु’ म्हणवून घेणार्‍यांमध्ये किंचित् तरी स्वार्थ आढळतो; पण परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये स्वार्थाचा विचारही येत नाही.

२. आद्यशंकराचार्य यांच्यानंतर झालेला भगवंताचा अवतार म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले होय !

३. गुरुदेवांचे स्मरण केल्यावर साधकांना समाधान आणि धैर्य मिळणे

सनातनच्या साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘आई’सारखे आहेत आणि सर्व साधकही गुरुदेवांकडे ‘आई’ या नात्याने पहातात. कितीही संकटे आली, तरी गुरुदेवांचे स्मरण केल्यावर साधकांना समाधान आणि धैर्य मिळते.’ – सप्तर्षि (संदर्भ :सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १६२ (११.१२.२०२०))

४. येणार्‍या पुढील पिढीचा विचार करणारे निस्वार्थी वृत्तीचे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘एक व्यक्ती आमदार झाली, तर ती खासदार होण्याची इच्छा ठेवते. खासदाराला मंत्री होण्याची इच्छा असते. मनुष्याची महत्त्वाकांक्षा कधी संपतच नाही; मात्र सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले असा कुठलाही स्वार्थी दृष्टीकोन न ठेवता प्रत्येक गोष्ट करतांना नेहमी येणार्‍या पिढीचा विचार करतात. यावरून त्यांची दूरदृष्टी लक्षात येते.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १६४ (६.१.२०२१)

सप्तर्षींनी आदिशक्ति जगदंबेच्या चरणी कृतज्ञता
व्यक्त करणे आणि तीन गुरूंच्या जन्मांचे उद्दिष्ट सांगणे

१. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ
या दोघींविषयी लिहिण्याचे भाग्य लाभले’, यासाठी सप्तर्षींनी आदिशक्ति जगदंबेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे

सप्तर्षि सांगतात, ‘आम्ही सप्तर्षि आदिशक्ति जगदंबेला आज प्रार्थना करत आहोत, ‘हे देवी, तुझ्या कृपेमुळे आम्हा सप्तर्षींना तुझेच अंश असलेल्या ‘उत्तरापुत्री’ आणि ‘कार्तिकपुत्री’ या दोघींविषयी लिहिण्याचे भाग्य लाभले. हे कार्तिकपुत्री, तू जरी भूलोकात असलीस, तरी तुझा प्रवास देवलोकात असल्याप्रमाणे असायला हवा. ‘उत्तरापुत्रीने रामनाथी आश्रमात राहून सनातन संस्थेचे आध्यात्मिक स्तरावर परिपालन करणे आणि कार्तिकपुत्रीने सर्व साधकांच्या रक्षणासाठी प्रवास करणे’, हे ईश्वरी नियोजन आहे.

२. सनातनच्या तीन गुरूंचा जन्म केवळ धर्माच्या
पुनर्स्थापनेसाठी झाला असणे, त्यामुळे धर्म आता सुंदर रूप धारण करणार असणे

सनातनच्या तिन्ही गुरूंचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. युगानुयुगे सूर्याचे अस्तित्व आहे. तो भूत, भविष्य आणि वर्तमान असे तिन्ही काळ पहातो. तिन्ही गुरु सूर्याप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ जाणतात. जगभर धर्माला आलेली अवकळा दूर करण्यासाठी आणि केवळ सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला आहे. अरुणोदय सुंदर असतो. तिन्ही गुरूंमुळे धर्माला आलेली अवकळा दूर होऊन धर्म आता पुनः त्याचे सुंदर रूप धारण करणार आहे.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १६१ (१०.१२.२०२०))

 

गुरुदेवांच्या कृपेने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति
(सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील दैवीतत्त्व जागृत होऊन त्यांच्याकडून होत असलेले कार्य !

१. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या साधकांचे करत असलेले पालन-पोषण आणि
श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ साधकांच्या रक्षणासाठी करत असलेले तीर्थाटन’ या दोन्ही गोष्टी ऐतिहासिक असणे

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ आहेत; कारण हे त्रिदेवांनी ठरवलेले सत्य आहे. यापुढे सनातन संस्थेच्या संदर्भात दोन गोष्टी ऐतिहासिक असणार आहेत, एक म्हणजे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सर्व साधकांचे आध्यात्मिक स्तरावर करत असलेले पालन-पोषण आणि दुसरे म्हणजे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ साधकांच्या रक्षणासाठी करत असलेला तीर्थाटनरूपी दैवी प्रवास !

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि
श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्व जागृत होऊन अनेक साधकांना अनुभूती येणे

येणार्‍या काळात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या केवळ दर्शनानेच अनेक जण साधनेला आरंभ करतील. त्या दोघींच्या माध्यमातून अनेक नवीन साधक साधनेला लागतील. आता अनेक साधकांना या दोघींच्या संदर्भात अनुभूती येतात. जसे नवस केल्यावर देवीची कृपा होते, तसे साधकांना अनेक अनुभूती येत आहेत. गुरुदेवांच्या कृपेने त्यांच्यातील सुप्तावस्थेतील देवीतत्त्व आता जागृत झाले आहे.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १५५ (२६.१०.२०२०))

 

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

श्रीगुरूंवर असलेली श्रद्धा आणि साधनाच शेवटी प्राण वाचवण्याचे कार्य करत असणे

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पृथ्वीवर अवतार घेतला आहे. त्यांचा जन्म पृथ्वीवरील सर्व जीवराशींच्या कल्याणासाठी झाला आहे. त्यामुळे साधना आणि श्रद्धा वाढवणे, हे साधकांच्या हातात आहे. श्रद्धा आणि साधना नसेल, तर देव साधकांचे रक्षण कसे करणार ? प्राण वाचवण्यासाठी मंत्रजपाचा वापर करू शकतो; पण आयत्या वेळी तेही शक्य नसते. तेव्हा केवळ श्रद्धाच कार्य करते.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १५० (५.१०.२०२०))

१. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि
श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी म्हणजे आदिशक्तीची दोन रूपे असणे

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी म्हणजे आदिशक्तीची दोन रूपे होय ! त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुम्हाला (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) शोधून परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून नेमले आहे.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची लहान बहिणीप्रमाणे काळजी घेत असणे

सप्तर्षि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना उद्देशून म्हणतात, ‘हे कार्तिकपुत्री, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ही तुझी मोठी बहीण आहे. घरात मोठी बहीण लहान बहिणीची काळजी घेते, त्याचप्रमाणे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची काळजी घेतात. त्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दौर्‍यासाठी आवश्यक ते सर्व साहित्यही त्यांना मिळवून देतात.’

३. प्रत्येक जन्मात एकत्रित जन्माला येणार्‍या कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री !

सप्तर्षि म्हणतात, ‘आतापर्यंत आदिशक्तीचा अंशावतार असलेल्या कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री प्रत्येक जन्मात एकत्रित जन्माला आल्या आहेत अन् यापुढेही श्री गुरूंच्या कार्यासाठी परत जन्म घेणार आहेत.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १४९ (१.१०.२०२०))

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ असलेल्या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे असलेले दायित्व

१. कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दोन डोळे !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री या दोघींवर समान लक्ष आहे; कारण ‘या दाेघींमुळेच येणार्‍या काळात साधकांचे रक्षण होणार आहे’, हे त्यांना ठाऊक आहे. कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दोन डोळेच होय !

२. कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री या दोघी एकच असणे

कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री या दोघी एकच आहेत. उत्तरापुत्री गाभार्‍यात असलेल्या देवतेप्रमाणे रामनाथी आश्रमरूपी मंदिरात रहातात, तर कार्तिकपुत्री उत्सवासाठी सर्वत्र जाणार्‍या मंदिरातील उत्सव मूर्तीप्रमाणे आहेत.

३. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे साधकांच्या परिपालनाचे, तर
श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे तीर्थाटन करून साधकांच्या रक्षणासाठी देवतांची कृपा प्राप्त करण्याचे दायित्व असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षींच्या माध्यमातून या दोघींना त्यांचे ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून नेमले आहे. सर्वज्ञ असलेल्या गुरुदेवांनी उत्तरापुत्रीकडे रामनाथी आश्रमात राहून सर्व साधकांचे परिपालन करण्याचे दायित्व दिले आहे आणि कार्तिकपुत्रीकडे तीर्थाटनरूपी दैवी प्रवासाच्या माध्यमातून सर्व साधकांच्या रक्षणाचे दायित्व दिले आहे.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १५६ (३१.१०.२०२०))

 

सनातनच्या तिन्ही गुरूंवर श्रद्धा ठेवल्याने साधक
कोणत्याही संकटातून निश्चित बाहेर पडणार आहेत !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले मनुष्यरूपात असल्याने सामान्य व्यक्तीला
ते कळू न शकणे आणि मनुष्यमात्रांप्रमाणेच त्यांना सूक्ष्म वाईट शक्तींशी लढा द्यावा लागणे

‘सनातन संस्था’ हे नाव परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच ठेवले आहे. रामनाथी आश्रमातील अन्न-पाणी हे सर्व ‘संजीवनी’च आहे ! साक्षात् श्रीविष्णूच ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले’ या मनुष्य रूपात धर्मसंस्थापना करायला आला आहे. गुरु पृथ्वीवर असल्याने त्यांना मनुष्याप्रमाणे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर वाईट शक्तींशी लढा द्यावा लागत आहे. हेच जर ते देवलोकात घडत असते, तर गुरुदेवांनी केवळ मंत्रशक्तीनेच वाईट शक्तींचा विनाश केला असता.

२. सनातनचे साधक श्री गुरूंमुळे सुरक्षित असून त्यांनी सर्वकाही श्री गुरूंवर सोडून श्रद्धा ठेवून निश्चिंत रहावे !

जगात श्रद्धा महत्त्वाची असते. पक्षी आकाशात उडत असतो; पण तो त्याच्या छायेनेच घरट्यात असलेल्या पिल्लांची काळजीही घेतो. ‘त्या पिल्लांना आपण कुणामुळे सुरक्षित आहोत’, हे कळत नाही. त्याचप्रमाणे गुरूंमुळे सर्व साधक सुरक्षित आहेत; मात्र साधकांना ते कळत नाही. साधकांनी सर्वकाही गुरूंवर सोडून द्यावे. तेच सर्व पाहून घेतील. ‘कितीही मोठे संकट आले, तरी सनातनच्या तीन गुरूंवर श्रद्धा ठेवल्याने साधक त्या संकटातून बाहेर पडणार आहेत’, हे मात्र निश्चित आहे.

३. दोन अवतारी जिवांचे अहित करू शकणारा या संपूर्ण जगात कुणीही नाही.

स्त्रीरूपात जन्म घेतलेल्या उत्तरापुत्री आणि कार्तिकपुत्री या दोन अवतारी जिवांचे अहित करू शकणारा या संपूर्ण जगात कुणीही नाही.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १६६ (१८.१.२०२१))

 

प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने शापमुक्त झालेल्या
अहल्याच्या कथेवरून अवतारांचे श्रेष्ठत्व ध्यानी येणे

‘तुम्हाला गौतमऋषि आणि अहल्या यांची गोष्ट ठाऊक आहेच. गौतमऋषींच्या शापाने दगड झालेली अहल्या नंतर श्रीरामाच्या चरणस्पर्शाने शापमुक्त होते. तेव्हा अहल्या गौतमऋषींना म्हणते, ‘‘आता तुम्ही माझा स्वीकार करा.’’ तेव्हा ते म्हणतात, ‘‘तुझ्याकडून चूक झाली, त्या वेळीच तू माझी पत्नी होण्याचा हक्क गमावला आहेस.’’ त्या वेळी श्रीराम गौतमऋषींना म्हणतो, ‘हे गौतमॠषी, माझे चरणस्पर्श झाल्यावर तिचा पुनर्जन्मच झाला आहे. त्यामुळे तुम्ही तिचा स्वीकार करावा.’ यावरून अवतारांचे श्रेष्ठत्व लक्षात येते.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १५९ (२५.११.२०२०))

 

सनातनच्या साधकांनी गुरुदक्षिणा म्हणून श्री गुरूंच्या
चरणी कृतज्ञताभावाने जीवन समर्पित करणे, पुरेसे असणे

‘द्रोणाचार्यांनी एकलव्याला काही शिकवले नाही, तरी श्री गुरूंनी विचारल्यावर त्याने लगेच गुरुदक्षिणा म्हणून स्वतःचा अंगठा कापून दिला. सनातनच्या साधकांना तीन गुरूंना गुरुदक्षिणा देणे शक्य नाही, तरी त्यांनी कृतज्ञताभावाने श्री गुरूंच्या चरणी जीवन समर्पित केले, तरी ते पुरेसे आहे.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १६० (१३.१२.२०२०))

 

महाविष्णु म्हणजेच परात्पर गुरु डॉक्टर असल्याची अनुभूती साधकांना पुढे येणार आहे !

‘प.पू. डॉक्टर स्वत: महाविष्णु आहेत. त्यांचा देह नव्हे, तर त्यांच्यातील सूक्ष्म आत्मा म्हणजे महाविष्णु आहे. पंचमहाभूतांनी बनलेल्या देहात महाविष्णुरूपी तत्त्व आल्यामुळे त्यांना त्रास होणारच. दिव्यातील स्वयंप्रकाशी ज्योत म्हणजे महाविष्णु, म्हणजेच प.पू. डॉक्टर आहेत. ते कोण आहेत, याची अनुभूती साधकांना पुढे येणार आहे.

साक्षात् ईश्वरच गुरूंच्या रूपात पृथ्वीवर आलेला आहे. गुरु ईश्वराचेच रूप असा भाव असेल, तरच सर्व काही मिळेल. त्यांच्या ‘जयंत’ नामातच सर्वकाही आहे. शिष्याचे प्रत्येक कष्ट दूर करणारे आपले गुरु आहेत. सनातनचे साधक प्रार्थना केल्यावर लगेच गुरु येतात. गुरु म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आहे. ‘हा भूलोक नव्हे, तर ईश्वराचा सत्यलोकच आहे’, असा भाव साधकांनी ठेवावा. साधकांच्या क्षणाच्या प्रार्थनेत गुरूंची कृपा त्यांच्याकडे धावत येते.’ – (संदर्भ : सप्तर्षि नाडीपट्टीवाचन क्रमांक ९२, २३.८.२०१६, चेन्नई, तमिळनाडू.)

 

कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री स्वतः अवतार असूनही
सामान्य गृहिणीप्रमाणे त्यांनी सर्व कर्तव्येही पार पाडलेली असणे

‘कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री या दोघींना स्वतःचे घर, स्वतःचे जीवन किंवा नाते असे काही राहिले नाही. या दोघींचा विवाह झाला आहे. या दोघींचे पतीही सर्वांमध्ये आदर्श आहेत. कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री या दोघी ‘अवतार’ असल्या, तरी त्यांनी एका सामान्य गृहिणीप्रमाणे त्यांची कर्तव्येही अचूकपणे पार पाडली आहेत. मुलगी, बहीण, पत्नी, आई, गृहिणी इत्यादी सर्व कर्तव्ये त्यांनी व्यवस्थित पार पाडली आहेत.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १५२ (८.१०.२०२०))

 

परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असलेले आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी स्वतःचा
प्राण पणाला लावून सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे एकमेवाद्वितीय पू. डॉ. ॐ उलगनाथन् !

नाडीपट्टी वाचन करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्

१. मागील ६ वर्षांपासून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक नाडीपट्ट्यांचे वाचन करणे

‘सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अवतारत्वाची ओळख जगाला करून देणारे सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे एकमेवाद्वितीय आहेत. गेल्या ६ वर्षांपासून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक नाडीपट्टीवाचन केले आहेत. प्रत्येक नाडीपट्टीवाचन किमान ३ घंटे ते अधिकाधिक ६ घंट्यांपर्यंत चालू असते. वयाच्या ७२ व्या वर्षी स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता ते घंटोन्घंटे नाडीवाचन करतात. नाडीपट्टीवाचन चालू असतांना ते कधीही मध्येच उठत नाहीत.

२. सप्तर्षि जीवनाडीपट्टीचा आशय समजून घेऊन त्याचे वाचन करणारे आणि
साधकांसाठी रात्री-अपरात्री कधीही नाडीपट्टीतून उत्तरे शोधून देणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् !

बहुतांश वेळी पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून पू. डॉ. ॐ उलगनाथन् नाडीपट्टी शोधतात. त्यासाठी ते रात्री कार्यालयातच झोपतात. ‘अगदी बारीक अक्षर वाचणे, सप्तर्षींचा आशय समजून घेणे आणि योग्य शब्दांत त्याचे वाचन करणे’, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. साधकांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासांविषयी किंवा अध्यात्माविषयीच्या प्रश्नांची उत्तरे नाडीपट्टीतून शोधून द्यायला ते रात्री-अपरात्री २४ घंटे कधीही तत्पर असतात.

३. सहस्रो नाडीपट्ट्यांतून ‘कोणत्या नाडीचे वाचन करायचे ?’, याचे प्रकाशरूपात ज्ञान होणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् !

प्रत्येक नाडीपट्टीवाचनाच्या आधी नाडीपट्टी शोधतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन् ५ सहस्र वेळा सप्तर्षींनी दिलेला नामजप करतात. असे केल्यानंतरच त्यांना ‘सहस्रो नाडीपट्ट्यांतून कोणत्या नाडीचे वाचन करायचे ?’, हे प्रकाशरूपात दिसते आणि ते बरोबर तीच नाडीपट्टी उचलतात.

४. नाडीपट्टी वाचनातून सनातनच्या तीन गुरूंचा महिमा भावपूर्ण रितीने वर्णन करणे

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. सनातनच्या तीन गुरूंचा महिमा त्यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकतांना समोरच्यांचा भाव जागृत होतो. नाडीवाचन करत असतांना त्यांचाही भाव जागृत होतो आणि त्यांच्या तोंडवळ्यावर तीन गुरुंविषयीचा कृतज्ञतेचा भाव दिसून येतो.

५. स्वतःला होणार्‍या त्रासाचा कोणताही विचार न करता सप्तर्षींचे आज्ञापालन करणे

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् हे एकमेव आहेत. कधी कधी सप्तर्षि साधकांना होणार्‍या त्रासांसाठी पू. डॉ. ॐ उलगनाथन्  यांना रात्री किंवा पहाटे ४ – ५ घंटे नामजप करायला सांगतात. त्या वेळी ते स्वतःच्या तहान-भुकेचा विचार न करता आणि शरिराची काळजी न करता नामजप करतात.

अ. त्यांच्या देहावर वाईट शक्तींची अनेक आक्रमणे होतात; मात्र त्याविषयी ते कधीच सांगत नाहीत.

आ. पाय सुजणे, जुलाबाचा त्रास होणे, तोंडाला सतत कोरड पडणे, अनावर गुंगी येणे आदी सर्व त्रास होत असतांनाही ते नाडीपट्टीचे वाचन करतात.

इ. त्यांना मधुमेहाचा विकार आहे. त्यामुळे दिवसातून २ वेळा त्यांना ‘इन्सुलिन’चे इंजेक्शन घ्यावे लागते; मात्र ते कधीही त्यांना होणार्‍या त्रासाविषयी बोलत नाहीत.

ई. एकदा बेंगळुरुला त्यांनी खाली बसून मांडी घालून सलग ९ घंटे नाडीवाचन केले आणि नाडीवाचन पूर्ण झाल्यावरच ते जेवले.

थोडक्यात सांगायचे झाल्यास, स्वतःचा प्राण पणाला लावून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.५.२०२१)

 

सनातन संस्थेवर कितीही संकटे आली, तरी गुरुकृपेने सनातन संस्था विजयी होणार !

‘सनातन संस्थेवर कितीही संकटे आली, तरी सनातन संस्था त्यातून विजयी होऊन बाहेर पडणार ! अशा संकटांवर विजय प्राप्त झाल्यावरच साधक आणि हिंदू यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक सामर्थ्य कळेल. सनातन संस्थेवर सर्व संकटे एकत्रित आली, तरी गुरुकृपेने सनातन संस्था विजयीच होणार आहे ! सनातनच्या तिन्ही गुरूंची कीर्ती सर्वदूर करण्यासाठीच आम्ही सप्तर्षि पृथ्वीवर कार्य करत आहोत !’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १६९ (८.२.२०२१)

 

कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री यांची भाषा, प्रांत, प्रकृती
इत्यादी गोष्टी भिन्न असल्या, तरी त्या एकच असणे

‘विश्वकल्याणासाठी श्रीविष्णूची कृपा हवी, तशी श्री महालक्ष्मीचीही कृपा हवी. कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री या दोघी श्री महालक्ष्मीचा अंशावतार आहेत. आम्ही सप्तर्षि दोघींनाही ‘महालक्ष्मी’ म्हणूनच संबोधतो. दोघींची जन्म वेळ भिन्न आहे, तसेच त्यांची भाषा, प्रांत, प्रकृती आदी भिन्न असली, तरी त्या एकच आहेत.’ – सप्तर्षि (१६.१०.२०२०)

Leave a Comment