पुन्हा इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष !

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष

मागील १ मासापासून जेरूसलेम येथे चालू असलेल्या ज्यू आणि अरब यांच्यातील संघर्षाने उग्र रूप धारण केले आहे. जेरूसलेम हे ज्यू, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासाठी पवित्र स्थान आहे आणि तिन्ही धर्मातील लोक त्यावर स्वतःचा हक्क सांगत असतात. त्यामुळे येथे संघर्ष हा होतच असतो. मागील मासात रमझानच्या निमित्ताने शहरातील अक्सा मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी आलेल्या जमावाला इस्रायली पोलिसांनी हटकले, तसेच तेथील पॅलेस्टिनी लोकांना शहरातील जागा खाली करण्याचा आदेश दिला. त्यामुळे तेथे हिंसक कारवाया झाल्या. त्यातच पॅलेस्टाईनच्या ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलच्या काही शहरांवर १ सहस्र ४०० रॉकेटचा मारा केला. असे आक्रमण म्हणजे देशाच्या अस्तित्वावर आक्रमण, असे इस्रायल मानतो. त्यामुळे इस्रायलने पूर्ण त्वेषाने हमासला प्रत्युत्तर देत हवाई आक्रमण केले. त्यात हमासचे ११ कमांडर, तर पॅलेस्टाईनचे ७० नागरिक ठार झाले. अलीकडच्या काळात म्हणजे वर्ष २०१४ मध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात असाच संघर्ष झाला होता. तो ५० दिवस चालला. त्या वेळी इस्रायलने पॅलेस्टाईनवर ६ सहस्र हवाई आक्रमणे केली होती. यात २ सहस्र २५० पॅलेस्टिनी ठार झाले होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांत १ सहस्र ५०० हे सामान्य पॅलेस्टिनी नागरिक होते. या युद्धात १८ सहस्र पॅलेस्टिनी नागरिकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. तसेच उद्ध्वस्त झालेल्या ७३ टक्के इमारती या लोकांना आरोग्यसेवा पुरवणार्‍या यंत्रणेशी निगडित होत्या. थोडक्यात इस्रायलवर आक्रमण करण्याचे परिणाम पॅलेस्टाईनला नेहमीच भोगावे लागले आहेत. आताही जे युद्ध छेडले आहे, ते किती दिवस चालेल, त्याचा अंदाज नाही. ते अधिक काळ टिकू नये, यासाठी अनेक देशांनी पुढाकार घेत इस्रायलला शांती आणि संयम बाळगण्याचा (फुकाचा) सल्ला दिला आहे. अशा सल्ल्यांना इस्रायल केराची टोपली दाखवतो, हे वेगळे सांगायला नको. आता हमासला अद्दल घडवून इस्रायलचा सूडाग्नी जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत युद्ध चालूच राहील ! येथे भारतासाठी महत्त्वाचे आहे, ती ‘अस्तित्वाची लढाई’ हे सूत्र. शत्रूराष्ट्राने एखादा इस्रायली नागरिक किंवा सैनिक यांना मारणे; म्हणजे ‘देशाच्या अस्तित्वावरच घाला घालण्यात आला आहे’, असेच इस्रायलला वाटते. त्यामुळे शत्रूराष्ट्रांकडून असे काही झाल्यास इस्रायल पेटून उठतो. इस्रायलप्रमाणे भारत फार अल्प वेळा ‘पेटून’ उठतो आणि लगेच ‘शांत’ही होतो. चीन, पाक, बांगलादेश आणि आता नेपाळ भारताच्या विरोधात ज्या कुरघोड्या करतात, त्याला अंत नाही. जिहादी आतंकवादी वेगवेगळ्या प्रकारे भारतात थैमान घालत आहेत. असे असतांना भारत इस्रायलप्रमाणे कधी पेटून उठणार ?

 

संघर्षाचे दूरगामी परिणाम ?

शत्रूराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी इस्रायल कधीच आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदे काय आहेत, ते पहात नाही. ‘जशास तसे’ उत्तर देणे, हीच इस्रायलची नीती. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार युद्धाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी लोकांना लक्ष्य करणे चुकीचे आहे. त्यामुळे वर्ष २०१४ मध्ये इस्रायलने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलवर खटला चालू आहे. त्याचे इस्रायलला सुवेर-सुतक नाही; कारण तो आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा सदस्य नाही. त्यामुळे तेथील न्यायनिवाड्यांना तो मानत नाही. गोळीला गोळीनेच प्रत्युत्तर देते, हेच त्याला ठाऊक आहे.

या युद्धात आता इस्लामी राष्ट्रांनीही उडी घेतली आहे. ‘इस्रायलला धडा शिकवायला हवा’, असे तुर्कस्तानचे राष्ट्रपती तय्यप एर्दोगन यांनी रशियाला कळवले आहे. पाकनेही पॅलेस्टाईनला समर्थन दिले आहे. जागतिक स्तरावरील घडामोडी पहाता इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाला वैश्विक स्वरूप प्राप्त होईल का, ते पहावे लागेल. असे जरी झाले, तरी इस्रायलला त्याची चिंता नाही. ‘पॅलेस्टाईन किंवा अन्य इस्लामी राष्ट्रांशी दोन हात करतांना कुठले राष्ट्र आपल्या समवेत आहे आणि कुठले नाही’, याचा विचार करत बसण्यापेक्षा त्या देशाला स्वतःच्या युद्धसज्जतेच्या बळावर वठणीवर कसे आणायचे, याचा तो विचार करतो. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांनी कितीही थयथयाट केला, तरी त्याला इस्रायल भीक घालत नाही. इस्रायलला ‘शांत’ करायला अमेरिका किंना अन्य देश यशस्वी होतात का, ते आता पहायचे.

 

येथे मानवाधिकारांना थारा नाही !

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष झाल्यावर नेहमीच ‘इस्रायल सार्वजनिक ठिकाणी क्षेपणास्त्रे डागून निरपराध लोकांचा जीव घेतो’, अशी टीका त्याच्यावर केली जाते. आताही इस्रायलने एका १४ मजली इमारतीवर आक्रमण करून ती जमीनदोस्त केली. इस्रायलची भूमिका स्पष्ट असते. ‘ज्या ठिकाणी इस्रायलविरोधी कारवाया चालतात, ते ठिकाण उद्ध्वस्त केले जाईल’, अशी चेतावणी तो नेहमीच देत असतो. पॅलेस्टाईन बर्‍याचदा सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी सैन्य तळ उभारतो. इस्रायलच्या सैनिकांनी हा तळ टिपताच इस्रायल त्यावर प्रतिआक्रमण करतो. ‘आताही जी १४ मजली इमारत उद्ध्वस्त करण्यात आली, त्यात इस्रायलविरोधी कारवाया चालू होत्या’, असे इस्रायलचे म्हणणे आहे. पॅलेस्टाईन या घटनांचा वापर जागतिक मंचावर करून इस्रायलला मानवाताविरोधी दाखवण्याचा प्रयत्न करतो; मात्र नेहमीप्रमाणे इस्रायल अशा गोष्टींकडे कानाडोळा करतो. ‘जर सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य न करणे, हा आंतरराष्ट्रीय नियम आहे, तर सार्वजनिक ठिकाणी सैन्य तळ उभारणे, हे कोणत्या नियमात बसते’, असा प्रश्न इस्रायला विचारतो.

इस्रायलच्या या आक्रमक वृत्तीतून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे. आंतरराष्ट्रीय नीती-नियम पाळण्यात, मानवाधिकारांचा विचार करण्यात भारत धन्यता मानतो; मात्र एवढे करूनही शत्रूराष्ट्रे कुरापती काढायच्या थांबतात का ? अशा वेळी आंतरराष्ट्रीय दबाव आदी गोष्टींचा किती विचार करायचा, हे भारताला ठरवावे लागेल. इस्रायलप्रमाणे एका नागरिकावर आक्रमण म्हणजे देशावर आक्रमण अशी नीती अवलंबून शत्रूराष्ट्रांवर आक्रमण करण्याची नीती अवलंबली, तर भारताला पाकवर किती वेळा आक्रमण करावे लागले असते, याचा विचारही न केलेला बरा. असे आक्रमण केले असते, तर पाक नावाचा देश जगाच्या नकाशावरून एव्हाना लुप्त झाला असता. भारत आणि इस्रायल दोन्ही देश युद्धसज्ज आहेत; मात्र धोरणे वेगळी असल्यामुळे परिणाम वेगवेगळे भोगावे लागत आहेत. भारताने शत्रूराष्ट्रांविषयी धोरणे पालटण्याची हीच योग्य वेळ आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment