परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत उत्तरेकडील भिंतींवर पडलेल्या डागांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

Article also available in :

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर, तसेच लाद्यांवर पडलेल्या डागांची ११ ते १३.३.२०२१ या कालावधीत छायाचित्रे काढण्यात आली. याच डागांची वर्ष २०१३ आणि वर्ष २०१८ मध्येही छायाचित्रे काढण्यात आली होती. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. (काही डागांची छायाचित्रे वर्ष २०१३ मध्ये काढण्यात आली नव्हती.)

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतीवर वर्ष २०१८ मधील छायाचित्रात पायाच्या हाडाप्रमाणे, तसेच पंजासारखे पांढरे डाग, तर पेन्सिलने रेघोट्या काढल्याप्रमाणे ॐ सारखी आकृती दिसत आहे. वर्ष २०२१ मधील छायाचित्रात त्याच ठिकाणी दोन्ही डाग दिसत नसून ते दोन्ही डाग जणू पुसून टाकल्याप्रमाणे दिसत आहेत. यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये होणारे
चांगले आणि त्रासदायक पालट हे देवासुर लढ्याचे स्थुलातून झालेले प्रकटीकरण !

कु. प्रियांका लोटलीकर

‘प्राचीन काळी ऋषिमुनी यज्ञयागादी विधी करत आणि महाबलाढ्य राक्षस त्यात विघ्ने आणत. ऋषिमुनींना जिवे मारत, तसेच गोमांसभक्षण करत. अशा प्रकारे प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो, तसाच तो कलियुगातही चालू आहे.

सप्त लोकांतील दैवी किंवा चांगल्या शक्ती आणि सप्त पाताळांतील वाईट शक्ती यांच्यात चालू असणार्‍या या लढ्याचे भूतलावरही स्थुलातून प्रकटीकरण झालेले दिसून येते. पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर वाईट शक्तींच्या राज्याची स्थापना करणे, हे सूक्ष्म वाईट शक्तींचे ध्येय आहे. त्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. भूतलावर ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजेच ‘विश्‍वकल्याणार्थ कार्यरत असलेल्या सात्त्विक लोकांचे राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी संत आणि चांगल्या शक्ती कटीबद्ध आहेत. त्यामुळे ‘वाईट शक्तींचे राज्य’ स्थापण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या वाईट शक्तींच्या प्रयत्नांना खीळ बसते; म्हणून त्या समष्टी साधना करणारे संत आणि साधक यांच्या कार्यात, तसेच सेवेत अनेक विघ्ने आणतात. साधकांचे कपडे, शरीर, मन, तसेच त्यांच्या वास्तूतील देवतांची चित्रे, वस्तू आदींवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात. स्थुलातील कार्य दृश्यमान होते; पण सूक्ष्मातून चाललेल्या कार्याविषयी आपण अनभिज्ञ रहातो. त्यामुळे वाईट शक्तींच्या लढ्यामध्ये संत सूक्ष्मातून करत असलेल्या कार्याविषयी आपण पूर्णपणे अज्ञानी असतो. सूक्ष्मातील लढ्याचे काही वर्षांनंतर स्थूल, म्हणजेच दृश्य परिणाम दिसू लागतात.

सूक्ष्म युद्धात कार्यरत असणार्‍या दैवी शक्तीतील चैतन्य जेव्हा सगुण स्तरावर कार्यरत होते, तेव्हा हे चैतन्य पंचतत्त्वांच्या स्तरावर प्रकट होते. पृथ्वी तत्त्वामुळे दैवी सुगंध दरवळतो. आपतत्त्वामुळे लादी किंवा काचेची तावदाने पारदर्शक होतात. तेजतत्त्वामुळे विविध रंगाच्या छटा किंवा विविध प्रकारच्या दैवी आकृत्या उमटतात. वायु तत्त्वामुळे भिंती, लादी किंवा खिडक्यांची तावदाने यांचा स्पर्श अधिक गुळगुळीत आणि मऊ होतो. आकाश तत्त्वामुळे विविध प्रकारचे दैवी नाद ऐकू येतात. दैवी पालटांमुळे देवतेचे तत्त्व कार्यरत होऊन वास्तूमध्ये दैवी शक्ती कार्यरत होते आणि वाईट शक्तींच्या आक्रमणापासून वास्तू तसेच वास्तूत रहाणार्‍या व्यक्ती यांचे रक्षण होते.

हाच नियम त्रासदायक शक्तींना लागू असल्यामुळे जेव्हा त्रासदायक शक्ती सगुण स्तरावर कार्यरत होते, तेव्हा त्यांतील पृथ्वीतत्त्वामुळे दुर्गंध निर्माण होतो. आपतत्त्वामुळे लादी किंवा काच यांची पारदर्शकता न्यून होऊन तेथे ओघळ निर्माण होतात. तेजतत्त्वामुळे ओरखडे, डाग किंवा विविध प्रकारच्या त्रासदायक आकृत्या निर्माण होतात. वायु तत्त्वामुळे भिंती, लादी किंवा खिडक्यांची तावदाने यांचा स्पर्श चिकट, खडबडीत किंवा उष्ण जाणवतो. आकाश तत्त्वामुळे विविध प्रकारचे त्रासदायक नाद ऐकू येतात. वाईट शक्तींनी केलेल्या पालटांमुळे त्रासदायक शक्ती कार्यरत होऊन वास्तूमध्ये त्रास जाणवतो.

– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा

 

१. भिंतीवर वाईट शक्तींनी पायाच्या हाडाप्रमाणे
आकार निर्माण करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

हाडांमध्ये पृथ्वी आणि वायु ही तत्त्वे अधिक प्रमाणात कार्यरत असतात. जेव्हा वाईट शक्ती करणी करण्यासाठी हाडांचा वापर करतात, तेव्हा हाडांच्या माध्यमातून पृथ्वी आणि वायु या तत्त्वांच्या स्तरावरील त्रासदायक मायावी शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्रास देण्यासाठी पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी पृथ्वी आणि वायु या तत्त्वांच्या स्तरांवरील काळ्या शक्तीचे प्रक्षेपण केले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सोडलेल्या एकूण ६० टक्के त्रासदायक काळ्या शक्तीपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतीमध्ये ही शक्ती ५ टक्के इतक्या प्रमाणात शोषली गेली. त्यामुळे खोलीतील उत्तरेकडील भिंतीवर हाडाप्रमाणे दिसणार्‍या आकृत्या निर्माण झाल्या आहेत. उर्वरित ५५ टक्के वाईट शक्तीचा मारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्थूलदेहावर झाला. त्यामुळे त्यांची प्राणशक्ती न्यून होऊन त्यांना पुष्कळ थकवा येणे, पाय दुखणे, अशक्तपणा येणे आणि चक्कर येणे यांसारखे विविध प्रकारचे शारीरिक त्रास झाले.

कु. मधुरा भोसले

 

२. भिंतीवर उमटलेल्या पांढर्‍या पंजाचे मायावी कार्य

भिंतीवर उमटलेला पांढरा पंजा मायावी शक्तीने भारित असून तो आशीर्वाद देणार्‍या मुद्रेत असल्याप्रमाणे भासवतो; परंतु तो प्रत्यक्षात पंचतत्त्वांच्या स्तरावरील त्रासदायक (काळी) शक्ती प्रत्येक बोटातून प्रक्षेपित करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती खेचून घेण्यासाठी कार्यरत झालेला आहे.

 

३. वाईट शक्तींनी पेन्सिलने रेघोट्या काढल्याप्रमाणे
‘ॐ’ सारखी आकृती निर्माण करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

शुक्राचार्य हे शिवाचे उपासक आहेत. त्यांनी शिवाकडून मिळवलेल्या दैवी शक्तीवर तंत्रविद्येचे आवरण आणून तिचे रूपांतर त्रासदायक मायावी शक्तीमध्ये करून ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिशेने प्रक्षेपित केली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतीमध्ये शिवाची निर्गुण-सगुण स्तरावरील शक्ती कार्यरत आहे. शिवाच्या या शक्तीने शुक्राचार्यांनी सोडलेल्या मायावी शक्तीला रोखून धरले. त्यामुळे उत्तरेकडील भिंतीमध्ये शिवाची चांगली शक्ती आणि मायावी शक्ती यांच्यामध्ये भीषण सूक्ष्म युद्ध होऊ लागले. तेव्हा या भिंतीमध्ये कार्यरत झालेल्या मायावी शक्तीने पेन्सिलने रेघोट्या काढल्याप्रमाणे ‘ॐ’ सारखी आकृती धारण करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना फसवण्याचा प्रयत्न केला; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले त्रिकालदर्शी असल्यामुळे त्यांनी या मायावी शक्तीला ओळखले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दृष्टीतून प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीमुळे भिंतीवरील मायावी ‘ॐ’ च्या आकृतीमध्ये साठलेली त्रासदायक शक्ती नष्ट झाली आहे.

 

४. उत्तरेकडील भिंतीवर वर्ष २०१४ मध्ये पंजाची केवळ बोटे दिसणे,
वर्ष २०१८ मध्ये बोटांच्या खालचा पंजाचा भाग दिसणे आणि वर्ष २०२१
मधील छायाचित्रात डाग अस्पष्ट दिसणे यांच्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

वर्ष २०१४ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतीवर उमटलेल्या पंजाच्या बोटांतून सगुण-निर्गुण स्तरावरील त्रासदायक शक्ती कार्यरत झाली. करंगळीतून पृथ्वी, अनामिकेतून आप, मध्यमेतून तेज, तर्जनीतून वायु आणि अंगठ्यातून आकाश या तत्त्वांच्या स्तरांवरील शक्ती वातावरणात प्रक्षेपित होत होती. वर्ष २०१८ मध्ये या पंजातून निर्गुण-सगुण स्तरावर त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होऊ लागल्यामुळे बोटांच्या खालचा पंजाचा भाग दिसू लागला. वर्ष २०१८ ते वर्ष २०२१ पर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या श्रीविष्णूच्या निर्गुण-सगुण स्तरावरील तत्त्वामुळे उत्तरेकडील भिंतीवरील पंजा आणि बोटे यांतील त्रासदायक शक्तीचे प्रमाण अत्यंत न्यून झाले. त्यामुळे वर्ष २०२१ मधील छायाचित्रात डाग अस्पष्ट दिसत आहेत.

 

५. दक्षिणेकडील भिंतीवर उमटलेल्या डागांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर विविध तोंडवळे दिसणे आणि हे सर्व वर्ष २०१४ मध्ये अधिक स्पष्ट दिसणे, तर वर्ष २०२१ मध्ये सर्वाधिक स्पष्ट दिसणे, यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर विविध तोंडवळे दिसतात. या डागांमध्ये मायावी शक्ती वायुतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत असल्यामुळे या डागांतील तोंडवळे सजीव वाटून ‘या डागांतील डोळे आपल्याकडे पहात आहेत’, असे जाणवते. वर्ष २०१३ मध्ये या डागांमध्ये निर्गुण-सगुण स्तरावर त्रासदायक शक्ती कार्यरत असल्यामुळे हे डाग स्पष्ट दिसत नव्हते. त्यानंतर ही त्रासदायक शक्ती न्यून झाल्यामुळे तिची खोलीतील निर्गुण चैतन्याशी लढण्याची क्षमता न्यून होऊन ती सगुण-निर्गुण स्तरावर कार्यरत होऊन प्रकट होऊ लागली. त्यामुळे वर्ष २०१३ मधील छायाचित्रांच्या तुलनेत वर्ष २०१४ मधील छायाचित्रात डाग अधिक स्पष्ट दिसत आहेत. वर्ष २०२१ मध्ये या डागांतील सर्व त्रासदायक शक्ती पूर्णपणे क्षीण होऊन ती सगुण स्तरावर प्रकट झाल्यामुळे या डागांतील तोंडवळे वर्ष २०२१ मध्ये सर्वाधिक स्पष्ट दिसत आहेत.

५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीच्या वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रात भिंतीवरील डाग न्यून झाल्याचे दिसण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : वर्ष २०१३ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर वाईट शक्ती दक्षिणेकडून पुष्कळ प्रमाणात आक्रमणे करत होत्या. ही आक्रमणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्थूलदेहावर अधिक प्रमाणात झाल्यामुळे या आक्रमणांचा स्तर सगुण-निर्गुण होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाचे वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या चैतन्यदायी खोलीतील दक्षिणेकडील भिंतीने ही आक्रमणे स्वतःवर झेलली. त्यामुळे दक्षिण बाजूच्या भिंतीवर विविध प्रकारचे डाग उमटले. याच कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर महामृत्यूयोगाचे संकट येऊन त्यांची प्राणशक्ती न्यून होऊ लागली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महामृत्यूयोगाच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी शिवाची शक्ती कार्यरत झाली. ही शिवाची शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिशेने प्रक्षेपित झाली आणि ती त्यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतीमध्ये निर्गुण-सगुण स्तरावर कार्यरत झाली. या भिंतीतून दक्षिणेकडील भिंतीवरील डागांवर शिवाच्या निर्गुण-सगुण स्तरावरील शक्ती आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण झाल्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवरील डागांमध्ये कार्यरत असणार्‍या विघातक त्रासदायक शक्तीचे प्रमाण न्यून झाले. त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवर उमटलेल्या डागांचे प्रमाण न्यून झाल्याचे वर्ष २०२१ मध्ये दिसले. त्याचबरोबर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाभोवती शिवाची शक्ती महामृत्यूंजय कवचाच्या रूपाने कार्यरत झाल्यामुळे त्यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट दूर झाले.’

 

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील उत्तरेकडील
भिंतीवर वर्ष २०१८ मधील छायाचित्रात असलेला डाग वर्ष २०२१
मधील छायाचित्रात न दिसण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

श्री विष्णु हे शिवाचे आराध्य आहेत आणि शिव श्री विष्णूचे आराध्य आहेत. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पाताळातील मोठ्या वाईट शक्ती आणि शुक्राचार्य यांनी केलेल्या सूक्ष्मातील आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी वर्ष २०१३ पासून शिवतत्त्व कार्यरत झालेले आहे. देवासुर संग्रामाच्या तीव्रतेनुसार शिवाचे तत्त्व वर्ष २०१३ पासून वर्ष २०२१ पर्यंत वाढत आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांपासून रक्षण होऊन त्यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट दूर होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्षणासाठी कार्यरत झालेल्या शिवतत्त्वाचे घनीकरण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतीमध्ये झाले आहे; कारण उत्तर दिशेला कैलास पर्वत आहे. उत्तरेकडील भिंतीमध्ये शिवतत्त्वमय चैतन्य उत्तरोत्तर वाढत असल्यामुळे या भिंतीवरील डागांचे प्रमाण न्यून होऊन ते पूर्णपणे नष्ट झाले आहेत. दैवी चैतन्यापुढे वाईट शक्तींची माया अधिक काळ टिकून राहू शकत नाही. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतींवर वर्ष २०१८ मधील छायाचित्रात हाताचे डाग दिसत नाही. हा परिणाम वाईट शक्तींवर दैवी शक्तीने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे.

 

७. ‘खोलीतील उत्तरेकडील भिंतीवर वर्ष २०१८ मधील छायाचित्रात भिंतीवरील
फुगवट्यात तोंडवळा दिसणे आणि वर्ष २०२१ मधील छायाचित्रात तो फुगवटा फुटून तोंडवळा
उद्ध्वस्त झाल्याप्रमाणे दिसणे’, या फुगवट्यातील पालटामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

जेव्हा त्रासदायक शक्ती आप आणि वायु या दोन्ही तत्त्वांवर कार्यरत असते, तेव्हा भिंत, काच किंवा लादी यांवर फुगवटे येतात. फुगवट्यांच्या पृष्ठभागावर तेजतत्त्व कार्यरत होऊन त्यावर विविध प्रकारचे वाईट शक्तींचे तोंडवळे निर्माण होतात. अशा प्रकारे फुगवट्यांतील आपतत्त्वाच्या माध्यमातून सगुण, तोंडवळ्यांतील तेजतत्त्वाच्या माध्यमातून सगुण-निर्गुण आणि वायुतत्त्वाच्या माध्यमातून निर्गुण-सगुण अशा तीन स्तरांवर त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण होते. त्यामुळे सगुण स्तरावर स्थूलदेहातील विविध अवयव, सगुण-निर्गुण स्तरावर देहातील प्राणशक्ती आणि निर्गुण-सगुण स्तरावर वायूरूपी प्राण यांच्यावर त्रासदायक शक्तीचे आक्रमण एकाच वेळी चालू होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्रास देण्यासाठी पाताळातील अघोरी वाईट शक्तींनी शुक्राचार्यांच्या संकल्पशक्तीच्या आधारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आपतत्त्वाच्या साहाय्याने सगुण, तेजतत्त्वाच्या साहाय्याने सगुण-निर्गुण आणि वायुतत्त्वाच्या साहाय्याने निर्गुण-सगुण अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी आक्रमणे करण्यासाठी त्यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतीवर फुगवटे निर्माण केले. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शारीरिक स्वास्थ्य बिघडून त्यांना विविध प्रकारच्या व्याधी झाल्या. त्याचप्रमाणे त्यांची प्राणशक्ती न्यून होऊन त्यांचे प्राणहरण करण्यासाठी त्यांच्यावर महामृत्यूयोगाचे संकट आले. उत्तरेकडील भिंतीमध्ये कार्यरत असणार्‍या महामृत्यूंजय स्वरूप शिवतत्त्वातील प्रकट शक्तीने भिंतीवरील फुगवट्यांतील आप आणि तेज या तत्त्वांच्या स्तरांवरील त्रासदायक शक्तीशी सगुण आणि सगुण-निर्गुण स्तरांवर सूक्ष्म युद्ध करून त्यांचे विघटन केले. जेव्हा शिवतत्त्वमय चैतन्याने फुगवट्यातील वायुतत्त्वाच्या स्तरावरील त्रासदायक शक्तीशी निर्गुण-सगुण स्तरावर सूक्ष्म युद्ध केले, तेव्हा फुगवट्यातील वायुतत्त्वमय काळ्या शक्तीमध्ये मोठा स्फोट होऊन त्याचे पूर्णपणे विघटन झाले. त्यामुळे वर्ष २०२१ मध्ये या फुगवट्यातील तेजतत्त्वाच्या स्तरावरील काळ्या शक्तीने बनलेला तोंडवळा फुटून उद्ध्वस्त झाल्याप्रमाणे दिसत आहे. ‘भिंतीवरील फुगवटा आणि त्यावरील त्रासदायक तोंडवळा उद्ध्वस्त होणे’, हे वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. आता उत्तरोत्तर चांगल्या शक्तीचा विजय होणार असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले, सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि देशविदेशातील विविध साधकांची घरे यांमध्ये वाईट शक्तींमुळे निर्माण झालेले ओरखडे, डाग, फुगवटे आणि विविध प्रकारच्या आकृत्या पूर्णपणे नष्ट होणार आहेत. जेव्हा हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा वरील सर्व ठिकाणी दैवी चिन्हे उमटणार आहेत.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२१)

वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात अनेक बुद्धीअगम्य घटना घडत असतात. त्यामध्ये एक आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर २०१३ ते वर्ष २०२१ पर्यंत उमटलेल्या विविध आकृत्या आणि त्यांमध्ये आपोआप झालेले पालट ! ‘भिंतीवर अशा आकृत्या उमटण्याचे वैज्ञानिकदृष्ट्या कारण काय आहे ? त्यामध्ये आपोआप पालट कसे होतात ? त्याचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करायचे ?’ या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, ई-मेल : [email protected])

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment