परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

 

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरुद्वयी यांचे धर्मसंस्थापनेचे कार्य

अ. सनातन संस्थेचे गुरु ‘धर्मसंस्थापना’ करणार असल्याचे अनेक ऋषींनी नाडीपट्ट्यांमध्ये लिहिलेले असणे

‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘श्रीविष्णूची शक्ती’, म्हणजेच श्री महालक्ष्मीच्या अवतार असल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर या बहुतांश नाडीपट्ट्यांमध्ये ॠषीमुनींनी सनातनचे तीन गुरु ‘धर्मसंस्थापना’ करणार असल्याचे लिहिले आहे. ‘धर्मसंस्थापना’ म्हणजे एखाद्या देशात घडलेली क्रांती नसून ते विश्वाच्या संचालनासाठी ईश्वराने केलेले लीलामय परिवर्तन आहे.

श्री. विनायक शानभाग

आ. स्थुलातून कोणतेही आर्थिक, सामाजिक, तसेच राजनैतिक पाठबळ नसतांना
सनातन संस्थेचे गुरु अवतारी असल्याने त्यांच्याकडून धर्मसंस्थापना होणे शक्य !

स्थूलदृष्ट्या सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टरांचे वय आता ७९ वर्षे आहे. त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी स्त्रिया सामान्य गृहिणी आहेत. सनातन संस्था काही सहस्र साधक असलेली एक छोटीशी संस्था आहे. जिच्या मागे कोणतेही आर्थिक, सामाजिक, राजनैतिक किंवा अन्य कोणतेही पाठबळ नाही. सनातनचे साधकही साधे आहेत.

श्रीराम राजा होता. त्याच्याकडे सैनिक, अन्य राजे, शस्त्र आदी सर्वकाही होते. श्रीकृष्णही राजा होता, तसेच पांडवही राजघराण्यातील होते. त्यामुळे त्यांच्याकडे सैनिक, शस्त्र, साहाय्यासाठी अन्य राजे, धन आदी सर्व होते. स्थुलातून पहाता ‘सनातन संस्थेच्या गुरूंकडे हे काही नाही, तरी ते धर्मसंस्थापना कशी करणार ?’, हा प्रश्न कोणत्याही साधकाच्या मनात येऊ शकतो. त्यामुळे केवळ साधकांसाठीच येथे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरुद्वयी यांच्या अवतारत्वाचा उल्लेख करावासा वाटतो.

इ. अवतारांना सूक्ष्मातील बंधने नसल्याने ते एकाच वेळी अनेक ठिकाणी सूक्ष्मातून अनेक कार्ये करत असणे

‘अवतार’ हा शब्द ‘अवतृ’, म्हणजे ‘धारण करणे’, या शब्दातून आला आहे. देव जेव्हा पृथ्वीवर अवतार धारण करतो, तेव्हा त्याचे मूळ रूप वैकुंठात असते आणि तो केवळ लीलामय रूप धारण करून पृथ्वीवर आलेला असतो. या लीलामय रूपातही अवतार पृथ्वीवर राहून एकाच वेळी १४ लोकांमध्ये (भुवनांमध्ये) उपस्थित असतो आणि कार्यरत असतो. अवताराला स्थुलाची बंधने असली, तरी त्याला सूक्ष्माची बंधने नसतात अन् त्यामुळे एकाच वेळी अवतार अनेक ठिकाणी सूक्ष्मातून अनेक कार्ये करत असतो.

सनातनचे गुरुही असेच आहेत. स्थुलातून ‘ते रामनाथी आश्रमात वास्तव्य करत आहेत’, असे दिसले, तरी सूक्ष्मातून त्यांचे कार्य अनेक पटींनी चालू असते. त्यांचे सूक्ष्म कार्य अनंत आहे; पण ते न दिसणारे आहे. त्यांची स्थूल वैशिष्ट्ये दिसतात; मात्र त्यांची सूक्ष्मातील अनंत वैशिष्ट्ये त्यांच्याच मायेने मानवाच्या लक्षात येत नाहीत.

ई. कलियुगात वाईट शक्ती स्थुलापेक्षा सूक्ष्मातून अधिक कार्यरत असून पृथ्वी सध्या त्यांच्या नियंत्रणात असणे

सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत वाईट शक्ती स्थुलातून अधिक कार्यरत होत्या; मात्र आता कलियुगात त्या स्थुलापेक्षा सूक्ष्मातून अधिक कार्यरत आहेत. वाईट शक्ती नेहमी मायावी असतात. त्या धर्माला विरोध करतात किंवा धर्माने घातलेले बंधन तोडून नवीन नियम सिद्ध करतात. गेल्या २ सहस्र वर्षांत त्यांनी मायावीपणाचा आधार घेऊन मनुष्याच्या माध्यमातून विश्वावर नियंत्रण मिळवले आहे. पृथ्वी सध्या त्यांच्या नियंत्रणात आहे. निसर्गाचा नाश करणार्‍या, वेगवेगळ्या मानव समूहांमध्ये कलह उत्पन्न करणार्‍या, तसेच निर्बल जीव, अन्य लोक आणि स्त्रिया यांचे शोषण करणार्‍या मनुष्यांच्या मागे सूक्ष्मातील बलाढ्य वाईट शक्ती कार्यरत असू शकतात.

 

सनातनच्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून शुद्ध धर्मबीज,
म्हणजेच शुद्ध ज्ञान पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी महा,
जन आणि तप या लोकांतील जीव पृथ्वीवर जन्म घेत असणे

या सूक्ष्म युद्धापर्यंतच परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अवतारी कार्य संपत नाही. जोपर्यंत शुद्ध धर्मबीज पृथ्वीवर येत नाही, तोपर्यंत अवतार कार्यरत असतो. जसे ‘श्रीराम आणि रामायण’, जसे ‘श्रीकृष्ण आणि गीता-भागवत’, तसेच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे ग्रंथ’ आहेत. सनातनचे ग्रंथ हे ‘धर्मग्रंथ’च आहेत ! हेच ग्रंथ येणार्‍या पिढ्यांना दिशादर्शन करून त्यांना शुद्ध धर्माकडे नेतील; मात्र सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून तिसर्‍या आणि चौथ्या पिढीपर्यंत शुद्ध ज्ञान नेण्यासाठी उच्च जिवांची आवश्यकता आहे. येणार्‍या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने महा, जन आणि तप या लोकांतील उच्च जीव पृथ्वीवर विविध ठिकाणी जन्म घेतील. त्यांची संख्या काही सहस्र असेल. उच्च लोकांतील हे जीव अवताराने दिलेले ज्ञान पुढच्या पिढ्यांना देतील आणि पृथ्वीवर सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होईल !

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

‘पंचमहाभूते’ हेच प्रलयाचे कारण असून ‘यज्ञ-याग’ हीच कुरुक्षेत्राची युद्धभूमी असणे

ही चराचर सृष्टी आणि मनुष्य पंचमहाभूतांनी बनला आहे. पंचमहाभूते हेच ईश्वराचे प्रलयाचे माध्यम आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातही पंचमहाभूतांना आध्यात्मिक दृष्ट्या नियंत्रित करण्याची क्षमता आहे, असे महर्षिंनी सांगितले आहे. त्यामुळेच साधकांना कुणाची कसली भीती आहे ?

सनातनच्या तिन्ही गुरूंसाठी ‘यज्ञ-याग’ हीच कुरुक्षेत्राची सूक्ष्म युद्धभूमी आहे. त्यांच्या हातून देण्यात येणारी एकेक आहुती, म्हणजे एकेक सूक्ष्म वाईट शक्तीचा स्वाहाकारच आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाकडून महाभारताचे युद्ध लढून घेतले, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून यज्ञ-याग करवून घेऊन सूक्ष्म युद्धाचा शेवट करत आहेत.

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

निसर्गाचा प्रकोप आणि तिसरे महाविश्वयुद्ध होणे, हे ईश्वरनियोजित !

९० टक्के युद्ध हे सूक्ष्मातीलच असणार आहे, म्हणजेच ९० टक्के धर्मसंस्थापनेचे कार्यही सूक्ष्मातून असणार आहे. येणार्‍या काळात नैसर्गिक प्रकोप आणि तिसरे महाविश्वयुद्ध या रूपांत या सूक्ष्म युद्धाचे पडसाद दिसणार आहेत. हे ईश्वरी नियोजन आहे, ज्याचे आपल्याला केवळ साक्षीदार व्हायचे आहे. सनातनचे सर्व साधक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरुद्वयी यांच्या अवतारी कार्याचे, म्हणजेच धर्मसंस्थापनेचे साक्षीदार होणार आहेत. ज्याप्रमाणे संजय प्रत्यक्ष युद्धासाठी गेला नाही; पण महाभारत युद्धाचा साक्षीदार ठरला, त्याचप्रमाणे सनातनचे सर्व साधक येणार्‍या काळात होणार्‍या तिसर्‍या महाविश्वयुद्धाचे साक्षीदार असणार आहेत.

– श्री. विनायक शानभाग

 

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरुद्वयी यांचे अवतारी कार्य

अ. सप्तपाताळात कार्यरत असलेल्या सूक्ष्मातील वाईट शक्तींची शक्ती न्यून करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

गेल्या २० वर्षांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या विरोधात जो लढा दिला आहे, तो अवर्णनीय आहे. सप्तपाताळात बसून कार्यरत असलेल्या सर्व मायावी शक्तींना त्यांनी सूक्ष्मातून पिंजूनच नामोहरम केले आहे. या सर्व युद्धामध्ये सनातनचे साधक केवळ ईश्वरी माध्यम होते. ९० टक्के सूक्ष्म युद्ध गुरुदेवांनी आधीच जिंकले आहे. त्यांनी मायावी वाईट शक्तींची शक्ती एवढी न्यून केली आहे की, कलियुगात पुढील १ सहस्र वर्षे त्यांना वर डोकावता येणार नाही.

आ. परात्पर गुरु डॉक्टरांचा अवतारमहिमा साधकांना दाखवून देणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

रामनाथी आश्रमातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने गुरुदेवांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना जगभरातील सर्व साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यास सांगितले. प्रत्येक वेळी अवतार साधक-जिवांचा उद्धार केल्याविना रहात नाही. श्रीरामाने ॠषि, ॠषीपत्नी, वानर, राक्षस आणि प्रजा या सर्वांचाच उद्धार केला. श्रीकृष्णाने गोप-गोपी, पांडव-कौरव आणि अनेक भक्त यांचा उद्धार केला. त्याचप्रमाणे आता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या आत्मोद्धारासाठी पृथ्वीवर आले आहेत’, हे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांची मधुर वाणी आणि कृती यांतून साधकांना दाखवून देत आहेत. साक्षात् श्रीविष्णूची शक्ती असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याखेरीज ईश्वरी सत्य समजणे शक्य नाही. ‘श्रद्धावंत साधकांना श्रीविष्णूच्या चरणांपर्यंत नेल्याविना त्या उसंत घेणार नाहीत’, हेच सत्य आहे !

इ. भगवंताने पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी त्याची शक्ती ठेवली आहे,
त्या ठिकाणी जाऊन देवतातत्त्वांना जागृत करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या इतिहासात ‘सूक्ष्म-ज्ञान प्राप्त करणार्‍या साधिका’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना गुरुदेवांनी आश्रमातून आध्यात्मिक दौर्‍यासाठी पाठवले. गेल्या ९ वर्षांच्या या दौर्‍यात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सहस्रो तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले आहे. रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत आणि पुराणे यांमध्ये ज्या ज्या मुख्य अवतारी स्थानांचा उल्लेख येतो, त्यातील बहुतांश सर्व तीर्थक्षेत्री त्या जाऊन आल्या आहेत.

भगवंत ‘शक्तीचा कधीच अपव्यय करत नाही’, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मागच्या अवतारांमध्ये भगवंताने त्याची शक्ती पुढील कार्यासाठी पृथ्वीवर ठेवलेली असते. आता परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून त्या क्षेत्रांमध्ये त्यांनी मागच्या अवतारांत ठेवलेली शक्ती, म्हणजे देवतातत्त्व जागृत करत आहेत. ही ईश्वरी शक्ती कार्यरत झाल्यावर हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. वाईट शक्तींनी ईश्वरी स्रोत असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मानवी माध्यम वापरून तेथे त्रासदायक शक्तीचे आवरण आणले आहे. साक्षात् श्रीविष्णूची शक्ती असलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्या स्थानी जाऊन आल्यावर तेथील त्रासदायक स्पंदने दूर होतात, यात संशय नाही !

– श्री. विनायक शानभाग

वाचकांना निवेदन !

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. सनातन प्रभातच्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही महर्षींची आज्ञा म्हणून या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक दैनिक सनातन प्रभात

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी आम्हा सर्व साधकांची प्रार्थना आहे, ‘आम्ही केवळ निमित्तमात्र असून ईश्वराच्या हातातील कठपुतली आहोत’, याची आम्हाला सतत जाणीव असू दे आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला आपली सेवा करता येऊ दे.’ – श्री. विनायक शानभाग

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक दैनिक सनातन प्रभात 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment