तलाव फुटल्यास येथील नद्यांना पूर येण्याचा शास्त्रज्ञांचा दावा !
नवी देहली – जगात गेल्या काही वर्षांपासून ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे बर्फाच्छादित डोंगर वितळत आहेत. भारतातील हिमालयातही हीच स्थिती आहे. यामुळे येथील तलावांमधील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच त्यांचा आकारही वाढत आहे. यामुळे येथील नद्या असणार्या क्षेत्रांत आता पुराचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच ब्रिटन, ऑस्ट्रिया, पेरू आदी देशांतील विविध विश्वविद्यालयांतील शास्त्रज्ञांकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून त्यांनी वरील चेतावणी दिली आहे. चीन, नेपाळ आणि भारत यांना यावरून सतर्क केले आहे.
१. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, बर्फ वितळत असल्याने पुढील ३० वर्षांत बर्फाच्छादित डोंगर असणार्या भागातील तलावांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक होणार आहे.
२. या शास्त्रज्ञांनी चीन, नेपाळ आणि भारत येथे बर्फ वितळल्यामुळे निर्माण होऊ शकणार्या ३ सहस्र ६३४ तलावांचा शोध लावला आहे. यांतील सर्वाधिक २ सहस्र ७० तलाव केवळ नेपाळमध्ये आहेत. कोशी, गंडकी आणि कर्णाली नद्यांच्या खोर्यांत हे तलाव आहेत. यामुळे येथील रहिवासी भागांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
३. चीनच्या कह्यातील तिबेटमध्ये १ सहस्र ५०९ तलाव आहेत, तर भारतात ४५ तलावांची माहिती मिळाली आहे.
४. ब्रिटनमधील एक्सटर विश्वविद्यालयातील हवामान तज्ञ प्रा. स्टीफन हॅरिसन यांनी सांगितले की, काही तलाव अत्यंत धोकादायक स्तरावर पोचले आहेत. त्यांचा अंदाज वर्तवणेही अशक्य आहे. हे तलाव कधीही फुटू शकतात आणि मोठ्या प्रमाणात हाहाःकार माजवू शकतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात