तिसरी धोक्याची घंटा !

मागील वर्षीपासून भारतात शिरकाव केलेला कोरोना विषाणू आता लाटांच्या रूपात थैमान घालत आहे. पहिली लाट ओसरली. तिच्यातून काही प्रमाणात आपण सावरत नाही, तोच दुसरी लाट आली. ‘ही लाट नसून एकप्रकारे सुनामीच आहे’, याचा प्रत्यय प्रतिदिन येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भीषण आणि तितकीच भयावह आहे; कारण या लाटेतील मृत्यूदर आधीच्या लाटेपेक्षा पुष्कळ अधिक आहे. त्यामुळे ‘मृत्यूचे थैमान’ आदी शब्दही अपुरे पडतील. भारतातील प्रत्येक राज्याला ही दुसरी लाट भारी पडली आहे. ती अजून संपलीही नाही आणि त्यात आता समोर येऊन ठेपली आहे तिसरी लाट ! गेल्या काही दिवसांतील वृत्ते पहाता ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे’, असे तज्ञांनी म्हटले आहे.

 

 

अस्थिर आणि असुरक्षित भारत !

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमुळे जीवितहानी अन् वित्तहानीही झाली. त्यामुळे देशासमोर कोरोनापेक्षाही मोठे आर्थिक संकट उभे ठाकले. ‘दळणवळण बंदीत व्यवसाय, नोकरीधंदा यांचे आर्थिक चक्र कोलमडले, तर कोरोनामुळे आरोग्ययंत्रणाही मोडकळीस आली आहे’, असे आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘फिच’ने म्हटले आहे. ‘तिसर्‍या लाटेत तर आणखी काय काय कोलमडेल’, याचा विचारही करू शकत नाही, इतकी सध्याची परिस्थिती विचित्र आणि तितकीच धोकादायकही आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ब्रिटन आणि श्रीलंका या देशांनी भारतीय प्रवाशांवर बंदी घातली आहे. अमेरिकेत महामारीमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यामुळे तेथील भारतीय बेरोजगार होऊ लागले आहेत. अशा भारतियांसाठी दळणवळण बंदीपेक्षा ही बंदीच जीवघेणी आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ठरत आहे. अब्जावधी लोकसंख्या असणार्‍या भारतातील कोरोनाची सद्य:स्थिती पहाता देशाची आर्थिक पुनर्उभारणी होणे कठीणच आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, खाटांची अनुपलब्धता, तसेच रुग्णालयातील व्यय यांसह अशा अनेक समस्या आज भेडसावत आहे. काही रुग्णालयांमध्ये तर क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण भरलेले असल्याने रुग्णालयाचे प्रवेशद्वारच बंद करून उपचारांसाठी फिरणार्‍या रुग्णांना मरणाच्या दारात लोटून दिले जात आहे. कर्नाटकमध्ये एका कोरोनाबाधित पत्रकाराने ‘ऑक्सिजन बेड मिळाला नाही तर…’, या चिंतेने घाबरून ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली. दुसर्‍या लाटेतील या घटना हृदयद्रावक आहेत. असे आहे, तर तिसर्‍या लाटेत आपल्याला आणखी काय काय पहावे लागेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जीवघेणी ठरणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकही चिंताग्रस्त आहेत. संपूर्ण देशात अराजक, अस्थिरता आणि असुरक्षितताच आहे. ‘विज्ञान म्हणजे सर्वकाही’, असे अनेकांना वाटते. विज्ञान अतीप्रगत झाले असल्याने त्याच्या आधारावर माणूस काहीही करू शकतो. अगदी हृदय किंवा मेंदू अशा नाजूक अवयवांची शस्त्रकर्मेही विज्ञानामुळेच यशस्वी ठरतात; पण कोरोनाच्या बळींची संख्या रोखण्यात हेच विज्ञान अपयशी ठरत आहे.

तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वत्र जाणवणारा लसींचा तुटवडा दूर करून लसीकरण प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबवणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना घंटोन्घंटे ताटकळत उभे रहावे लागते. यापेक्षा घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम का राबवली जात नाही ? सध्याच्या काळात ती निश्चितच लाभदायी आणि सुरक्षितही ठरू शकते. कोरोनाला थोपवण्यासाठी सर्व राज्य सरकारे प्रयत्नरत आहेत; पण कोरोनाच्या वाढत्या संख्येपुढे हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे अनेक राज्यांतील न्यायालयांवर सरकारची कानउघाडणी करण्याची वेळ येत आहे, तर काही सरकारांना दळणवळण बंदी करण्याचे आवाहनही करावे लागत आहे. वाढत्या संकटाचा सखोल अभ्यास करणे न्यायालयाला जमते, तर सर्व यंत्रणा हाताशी असणारी सरकारे तो का करू शकत नाही ? याचा सर्वत्रच्या सरकारांनी विचार करावा.

 

ईश्वरभक्तीच तारणार !

 

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भविष्यवाणी चालू असतांना एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे साधारणतः ४०० वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये होऊन गेलेल्या नॉस्ट्रॅडॅमस या प्रसिद्ध द्रष्ट्याने म्हटले होते, ‘भविष्यात होणारे तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर असेल की, तुम्हाला पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील !’

त्याने याआधी वर्तवलेली भविष्ये तंतोतंत खरी ठरली. त्याने पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांविषयी जसे सांगितले होते, तसेच प्रत्यक्षातही घडले. नॉस्ट्रॅडॅमसची तिसर्‍या महायुद्धाची भविष्यवाणी आणि आतापर्यंत अनुभवलेल्या कोरोनाच्या २ लाटा पहाता आगामी तिसरी लाट यांवरून भयावह आपत्काळाची कल्पना करू शकतो. सध्याच्या काळात जिवंत रहाणे महत्त्वाचे आहे. वरील सर्वच घडामोडी पहाता ‘आपत्काळात विज्ञानच काय, तर सरकार किंवा आधुनिक वैद्यही आपल्याला वाचवू शकणार नाही’, हे लक्षात येते. केवळ आणि केवळ ईश्वरभक्तीच मनुष्याला या आपत्काळातून तारू शकते. आजपर्यंत द्रष्टे किंवा संत यांनी जे सांगितले, त्यावर विश्वास ठेवून अध्यात्माची कास धरणेच श्रेयस्कर आहे.

 

विश्वगुरु भारत !

कोरोनाच्या आपत्तीत भारताने अनेक देशांना लसींच्या माध्यमातून साहाय्य केले. अमेरिकेतील हार्वर्ड स्कूल आणि पब्लिक हेल्थचे प्राध्यापक डॉ. जेसी बम्प यांनी भारताचे कौतुक करतांना अन्य देशांना आवाहन केले आहे, ‘‘भारतातूनच लस तयार करण्याचे योग्य तंत्रज्ञान जगाला मिळाले आहे. त्यामुळे जर तुम्हाला लस मिळत असेल, तर भारताचे आभार माना !’’ ‘आजपर्यंत अनेक अत्याचार सहन करूनही भारताने आपल्याला पुष्कळ काही दिले; पण आपण भारताला काय दिले? याचा सर्व देशांनी विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. युनिसेफने आवाहन केले आहे, ‘कोरोनाच्या संकटात अडकलेल्या भारताला साहाय्य करा, अन्यथा जग संकटात सापडेल.’ या आवाहनावरून लक्षात येते की, आज संपूर्ण विश्व भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे ‘भारत असेल, तर विश्व आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भविष्यातील सर्वच संकटांतून तावून सुलाखून बाहेर पडून विश्वसंस्कृतीचे उगमस्थान असणारा भारत एक दिवस ‘विश्वगुरु’ पदावर विराजमान होईल, हे निश्चित !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment