कोरोना विषाणूने जगातील बहुतेक देशांत पुन्हा एकदा कहर केला आहे. या जीवघेण्या विषाणूची कुठे दुसरी लाट आहे, तर कुठे तिसरी ! जगातील सर्वाधिक शक्तीशाली देश अमेरिकेचा विचार केल्यास त्यानेही या चिनी विषाणूसमोर गुडघे टेकले आहेत. ३३ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील तब्बल सव्वा ३ कोटी लोकांना म्हणजे १० टक्के अमेरिकी नागरिकांना आतापर्यंत या विषाणूचा संसर्ग झाला आहे. या विरोधात अमेरिका उचलत असलेली पावलेही परिणामकारक आहेत. त्यामुळेच गेल्या मासाभरात केवळ २० लाख अमेरिकी नागरिकांना कोरोना झाल्याचे तेथील आकडेवारीवरून लक्षात येते. याचा अर्थ तेथे दिवसाकाठी आता केवळ ६६ सहस्र नागरिकांनाच विषाणूचा संसर्ग होत आहे. अमेरिकेत लस देण्याची मोहीम, तसेच अन्य निर्बंध घातले जात असल्याने संसर्ग होण्याचा आलेख खाली आलेला दिसतो. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १८ वर्षांपुढील ५० टक्के अमेरिकी जनतेला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच ‘जे लोक कोरोना लस घेण्यास इच्छुक नाहीत अथवा ज्यांना कोरोनाविषयी काहीच गांभीर्य नाही, त्यांची मने लस घेण्याच्या दिशेने वळवण्याचा तेथील सरकार आणि प्रशासन युद्ध स्तरावर प्रयत्न करत आहे’, असे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे.
युरोपात नियंत्रण, तर भारतात हाहा:कार !
युरोपीय देशांचा विचार करता तेथेही गेल्या काही मासांत राष्ट्रव्यापी कडक दळणवळण बंदी (लॉकडाऊन) करण्यात आली. त्यामुळे काही तुरळक देश वगळता अन्य देशांमध्ये संसर्गाची स्थिती आटोक्यात यायला लागली आहे. जर्मनी, इटली आदी काही देशांत अजूनही कठोर निर्बंध लागू असले, तरी ग्रीस, डेन्मार्क, इंग्लंड अशा अन्य काही युरोपीय सरकारांनी दळणवळण बंदीस काही प्रमाणात शिथिलता द्यायला आरंभ केला आहे.
भारतात मात्र चित्र याउलट आहे. सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतात थैमान घालायला आरंभ केला आहे. हा संसर्ग भारताच्या कानाकोपर्यात ज्या गतीने पसरत आहे, तो असाच चालू राहिला, तर पुढील २ मासांत भारत अमेरिकेला मागे टाकेल की काय, असे चित्र आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत १ कोटी ६२ लाखांहून अधिक नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. केवळ अमेरिकेशी तुलना करायची झाली, तर अमेरिकेत जिथे प्रत्येक १०० लोकांपैकी १० लोकांना कोरोना झाला आहे, तिथे प्रत्येक १०० भारतीय नागरिकांमागे एकाला या रोगाने ग्रासले आहे. एकूण लोकसंख्या पहाता कोरोनाने अमेरिकेला भारताच्या तुलनेत दहा पटींनी होरपळले आहे, अशी तुलनात्मक आकडेवारी दिसत असली, तरी प्रत्यक्ष आकडेवारी पहाता भारतापेक्षा केवळ दुपटीनेच अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी आहे. याखेरीज भारतातील आरोग्य सुविधांची क्षमता आणि स्तर पहाता कितीतरी ‘कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) केसेस’ समोर येत नसाव्यात, असे म्हणण्यासही अडचण नसावी. भारत जगाला कोरोनाची लस पुरवण्यात सर्वांत पुढे आहे, हे आपण अभिमानाने सांगत असलो, तरी आता असे सांगण्याची वेळ नसून भारतियांच्या जिवावर उठलेल्या या महाभयानक संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारताची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, तसेच आरोग्य सुविधा पुरवण्याची क्षमता आदी निकष पहाता भारताने विविध स्तरांवर तातडीने प्रयत्न करायला हवेत.
भारत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने दिवसेंदिवस नवनवीन विक्रम करत आहे. गेल्या पंधरवड्यात जिथे देशभरात २५ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला, तिथे गेले सलग दोन दिवस ३ लाखांहून अधिक नागरिक कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत अमेरिकेच्या नावाने असलेल्या २ लाख ९७ सहस्र ४३० रुग्णांच्या २४ घंट्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्येला भारताने मागे टाकले आहे. बिहारची राजधानी पाटलीपुत्र येथील ६ रुग्णालयांची स्थिती या आकडेवारीपेक्षा भयावह चित्र उभे करते. येथील अनुमाने ७५० हून अधिक आधुनिक वैद्य आणि परिचारिका आदींना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ‘एम्स्’ रुग्णालयाची वर्णी लागली असून ७५० पैकी ३८४ ही संख्या केवळ या प्रथितयश रुग्णालयाचा आहे. काही आधुनिक वैद्य ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून जनतेला आवाहन करत आहेत की, ‘कुणीही अनावश्यकरित्या बाहेर पडू नये !’ हे सांगत असतांना ते भावनाविवश होत आहेत. ते म्हणत आहेत, ‘याआधी आम्ही कधीच स्वत:ला एवढे हतबल झाल्याचे अनुभवले नाही !’ या दुर्दशेवरून येणार्या काही आठवड्यांत भारतियांच्या पुढ्यात काय लिहून ठेवले आहे, याचा केवळ सरकार, प्रशासन यांनीच नव्हे, तर उत्तरदायी नागरिक म्हणून आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा.
लसीची ‘कूर्म’गती !
कोरोना लसीचा विचार करता आतापर्यंत केवळ १ कोटी ७० लाख भारतियांनाच लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, तर १० कोटी लोकांना लसीचा किमान पहिला डोस मिळाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता लसीची ही कूर्मगती परिणामकारक नसल्याचेच म्हणता येईल. आतापर्यंत केवळ ‘सीरम इन्स्टिट्यूट’ आस्थापनाची ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’ आस्थापनाची ‘कोव्हॅक्सिन’ या लसी जनतेला दिल्या जात होत्या. त्यातही केवळ ‘कोव्हिशिल्ड’चे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाच्या ‘स्पुटनिक’ लसीलाही केंद्रशासनाकडून हिरवा कंदिल मिळणे आणि आता १ मेपासून १८ वर्षांपुढील भारतियांना लस देण्याचे घोषित करण्यात येणे दिलासादायक आहे. यासमवेतच लस देण्याच्या धोरणात पालट करण्यात आल्याने लस देण्याची गती वाढेल, असा दावा सरकारने केला आहे. असे असले, तरी ही गती कितपत परिणामकारक ठरेल ? संसर्ग आटोक्यात येण्याच्या दृष्टीने त्याचा कितपत लाभ होईल ? हे या घडीला सांगता येणार नाही.
गेल्या वर्षी कोरोना विषाणूविषयी अनभिज्ञ असल्याने जे भय आणि अस्थिरता सर्वत्र दिसत होती, ती निश्चितच न्यून झाली आहे. असे असले, तरी या विषाणूच्या विरोधात सर्वांनी आपापल्या घरात राहून पुन्हा एकदा लढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ‘ब्रेक दि चेन’च्या अंतर्गत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षीप्रमाणे भारतभरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात येत असलेल्या नियमांची कठोर कार्यवाही करणे, तसेच लस उत्पादनांत विक्रमी उच्चांक गाठून देशातील नागरिकांचे लसीकरण गतीने करणे, देशभरात जाणवत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा तात्काळ नियंत्रित करणे आणि महत्त्वाच्या औषधांची होत असलेली साठेबाजी अन् काळाबाजार संपवणे आवश्यक आहे, असे समाजहितैषी जनतेला वाटते. असे झाले, तरच लोकांचे नाहक जात असलेले बळी वाचतील आणि भयावह जागतिक ‘विक्रमां’वर आळा बसेल !