मुंबई – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त म्हणजेच २१ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रात ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. प्रार्थना, श्रीरामाचा पाळणा, जयघोष, श्रीरामाची आरती आणि सामूहिक नामजप असे या सत्संगाचे स्वरूप होते. मुंबई जिल्ह्यातील एकूण १५ ठिकाणी घेतलेल्या या सत्संगांत ५२० जिज्ञासूंनी सहभाग घेऊन श्रीरामतत्त्वाचा अनुभव घेतला. या सत्संगाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक जिज्ञासूंना चांगल्या अनुभूती येण्यासह उपस्थित प्रत्येकालाच श्रीरामाचे तत्त्व अनुभवता आले.
जिज्ञासूंचे अभिप्राय
श्रीमती उषा श्रोत्री – श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे मला जाणवले. मी मंदिरात जाऊ शकत नाही; पण देवानेच घरी मला या सत्संगातून दर्शन दिले. श्री गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.
सौ. ज्योत्स्ना भिरुड – आज सत्संगात पाळणा ऐकतांना आणि नामजप करतांना श्रीरामाचे दर्शन झाले. त्यामुळे भाव जागृत झाला.
सौ. संगीता परमार – संपूर्ण सत्संगात भावजागृती होऊन पुष्कळ वेळ आनंदाश्रू येत होते. माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नाहीत.
सौ. वर्षा जाधव – आज श्रीराम प्रत्यक्ष समोर बसलेले अनुभवले. त्यामुळे पुष्कळ आधार वाटून धीर मिळाला.
सौ. सुरेखा मोरे – गुरुदेवांच्या कृपेने घरीच साक्षात् भगवंताचे दर्शन झाले आणि धन्य धन्य वाटले.
काही जिज्ञासू – ‘आजचा सत्संग पुष्कळच वेगळा जाणवला. आनंदाश्रू येत होते. देवच भेटला. ‘आता चिंता नाही’, असे वाटले.
बीड, नगर आणि कोल्हापूर येथील जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती
कु. रक्षंदा बलुतकर, अंबाजोगाई, जिल्हा बीड – सोहळ्यात श्रीरामाची मानसपूजा सांगत असतांना बाल रूपातील श्रीरामाचे दर्शन झाले, तसेच रामरक्षास्तोत्र म्हणत असतांना मोगर्याची फुले जवळ नसतांनाही त्याचा सुगंध येत होता.
सौ. सुरेखा विद्ये, धर्मप्रेमी, नगर – यांच्या बहिणीचे नुकतेच निधन झाले, तरी त्या सामूहिक रामनामसंकीर्तन सोहळ्यात सहभागी झाल्या. बहिणीचे निधन झाल्यानंतर त्यांची मन:स्थिती अस्थिर होती; मात्र रामरक्षास्तोत्र पठण करतांना त्यांचे ध्यान लागले आणि त्यानंतर त्या सकारात्मक झाल्या.
सौ. विमल सरवडे, ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर – जप करतांना भावजागृती झाली आणि शरिरात चैतन्य अनुभवता आले. लाल, पिवळा, हिरव्या आणि नारिंगी रंगाची वलये निर्माण होऊन भावाश्रू वाहू लागले. रामाचा पाळणा ऐकतांना रामराज्यात असल्याचे वाटत होते.
श्री. चंद्रकांत मोरे, कोल्हापूर – या सोहळ्याच्या शेवटपर्यंत भावजागृती होत होती. तसेच सतत भावाश्रुरूपी पुष्पे श्रीरामाच्या चरणी पडत होती.
सौ. मंजुळा ढोकळे, कोल्हापूर – सोहळा चालू असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीराम रूपात दर्शन झाले. प्रत्येक वेळी परात्पर गुरुदेवांचे दर्शन होत होते.
कु. अरुणा कुरणे, वाचक, कोल्हापूर – घरातील वातावरण इतके राममय झाले की, सगळ्यांची तहान-भूक हरपली. जेवणापूर्वी प्रार्थना म्हणतांना रामाचे रूप समोर दिसत होते.
सौ. माधुरी पलसकर, कोल्हापूर – सोहळा चालू झाल्यावर ‘साक्षात् प्रभु श्रीरामचंद्र माझ्या घरी आले असून ते पाटावर उभे आहेत आणि मी त्यांच्या चरणांवर पाणी घालत आहे, तसेच मी त्यांचे ओवाळून स्वागत करत आहे’, असे जाणवले. त्यानंतर नामजप करतांना प्रत्येक पुष्पावर मी करत असलेला जप लिहिलेला आहे आणि प्रभु श्रीराम माझ्याकडे स्मितहास्याने पहात आहेत, असे मला जाणवले.