भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस

नवी देहली – भारत कोविड-१९ च्या भयानक लाटेविरोधात लढाई लढत आहे. रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. स्मशानात मृतदेहांची रांग लागली आहे. ही परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांचे कुटुंबीय रुग्णालयांमध्ये खाटा आणि ऑक्सिजन यांच्या व्यवस्थेसाठी सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ करत आहेत. राजधानी देहलीमध्ये एका आठवड्याची दळणवळण बंदी लावावी लागली आहे. यावरून या गंभीर परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी संवेदना व्यक्त केली आहे.

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे. संयुक्त राष्ट्रांची आरोग्ययंत्रणा भारताला ऑक्सिजन कंसंट्रेटर आणि रुग्णालयांसाठी आवश्यक साहित्य यांचा पुरवठा करत आहे.

 

मोदी आणि बायडेन यांच्यात दूरभाषवर चर्चा

डावीकडून जो बायडेन आणि नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये दूरभाषवर चर्चा झाली. बायडेन यांनी मोदी यांना म्हटले की, जेव्हा अमेरिका कोविड-१९ मुळे अडचणीचा सामना करत होती, तेव्हा भारताने त्यास पूर्णपणे साहाय्य केले होते. आता अमेरिकेची पाळी आहे. चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे साहाय्यासाठी मी त्यांचे आभार मानले. आम्ही लसीचा कच्चा माल आणि औषधांची पुरवठा साखळी प्रभावी होण्याविषयी चर्चा केली. भारत आणि अमेरिका यांची ‘हेल्थकेअर पार्टनरशिप’ जगात कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करू शकते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment