आरोग्य तज्ञांची चेतावणी
मुंबई – लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी चेतावणी आरोग्य तज्ञांनी २८ एप्रिल या दिवशी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीच्या संदर्भात दिली. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिली आहे.
१. तज्ञांनी म्हटले आहे, ‘‘भारतात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. तरीही राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा आहे. काही ठिकाणी लसीकरण केंद्रेही बंद करण्यात आली आहेत. एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना लस दिल्यासच कोरोनाचा संसर्ग रोखता येईल.’’
२. राज्याच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले, ‘‘महाराष्ट्रात लस घेण्यासाठी पात्र असणार्या व्यक्तींची संख्या ९ कोटी इतकी आहे; मात्र लसीकरण केवळ दीड कोटी लोकांचे झाले आहे. ही संख्या पुष्कळ अल्प आहे. वेगाने लसीकरण न केल्यास लोक नोकर्या आणि इतर कामांसाठी पुन्हा घराबाहेर पडतील अन् त्यातूनच कोरोनाची तिसरी लाट येईल.’’
३. कोरोनाच्या संदर्भात नेमलेल्या समितीच्या राज्यातील एका सदस्याने सांगितले, ‘‘पावसाळा चालू झाल्यावर पाऊस आणि अन्य समस्या यांच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम राबवणे आव्हानात्मक होईल.’’
४.एका वैज्ञानिकाने सांगितले, ‘‘कोरोनाचा विषाणू अशा पद्धतीने पालटत (म्यूटेड) राहिला, तर लसीकरणाचा लाभ होणार नाही. लसीकरणामध्ये आपण एवढा वेळ घालवला, तर कोरोनाचा नवा विषाणू निर्माण होईल. त्याच्यावर लसीचा काहीच परिणाम होणार नाही.’’