१. बळी शब्दाचे अर्थ
अ. ‘देवतेला अर्पण करायचा उपहार किंवा राजाला द्यायचा कर’, असे बलीचे दोन अर्थ आहेत. या दोन्ही अर्थी बली शब्द वैदिक वाङ्गमयात अनेक ठिकाणी आला आहे.
आ. स्मार्त पूजेत देवाला अर्पण करायच्या पूजोपचारांनाही `बली’ असेच म्हणतात.
इ. पंचमहायज्ञांतला जो भूतयज्ञ आहे, त्याला `बलीहरण’ अशी संज्ञा आहे. हा बली वैश्वदेव करून शिल्लक उरलेल्या चरूतून (भात) विविध देवतांना दिला जातो. याला `भूतबली’ अशीही संज्ञा आहे. बली आणि हवन यांतील भेद हा की, हवन अग्नीत केले जाते, तर बली हा भूमीवर ठेवला जातो. शांतीकर्मात अष्टलोकपाल, क्षेत्रपाल इत्यादी देवतांना भाताचा बली दिला जातो. हा बली देतांना भाताचे पिंड बनवतात. त्यात उडीद मिसळतात. त्यावर कुंकवाचे पाणी टाकतात. एक काकडा पेटवून त्यात खोचतात आणि मग यजमान तो बली देवतांना उद्देशून समर्पित करतो.’
हवीची स्थित्यंतरे
‘एतरेय ब्राह्मणात (६.८) यज्ञातील हवीची (अर्पण करावयाच्या वस्तूंची) स्थित्यंतरे पुढीलप्रमाणे वर्णिली आहेत.
पुरुषं वै देवाः पशुमालभन्त तस्मादालब्धान्मेध उदक्रामत् सोऽश्वं प्राविशत्तस्मादश्वो मेध्योऽभवत् ….
अर्थ : प्रथम देवांना `पुरुष’ हाच यज्ञीय पशू म्हणून लाभला; परंतु त्याच्यातील मेध (म्हणजे बली किंवा आहुती म्हणजे यज्ञात अर्पण करायचे तत्त्व) बाहेर पडून अश्वात प्रविष्ट झाला; म्हणून `अश्व’ हा यज्ञीय पशू बनला. पुढे हा मेध बैलाच्या शरिरात शिरला. याच रितीने तो बैलातून मेंढ्यात शिरला, मेंढ्यातून भूमीत आणि शेवटी भूमीतून तांदुळात प्रविष्ट होऊन तिथे स्थिर झाला. त्यामुळे `तांदूळ’ हेच हवी म्हणून योग्य ठरले.’
बळी जाणार्या प्राण्यांचा आक्रोश बुद्धाला ऐकवला नाही; म्हणून त्याने यज्ञातील हिंसेला विरोध केला. पुढे बुद्धकालापासून यज्ञात बळी म्हणून नारळ किंवा पिठाचा हवी द्यायला लागले.
२. हिंदु धर्मविरोधी पशूप्रेमी संघटना आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस)
पशूप्रेमी संघटना आणि अंनिस बळी देण्यामागील शास्त्र वा तत्त्व लक्षात न घेताच ‘जीवहत्या करायला सांगणारा धर्म’ या नावाखाली हिंदु धर्माला बदनाम करायचा प्रयत्न करतात आणि बळीची प्रथा बंद करण्याचे आवाहन करतात. केवळ पशूप्रेमाचा दिखाऊपणा करणार्या अशांना जगभर मांसाहारासाठी मारल्या जाणार्या आणि इस्लाम धर्मातील ‘कुर्बानी’च्या वेळी ‘कत्ल’ केल्या जाणार्या पशूंची मात्र जराही कीव येत नाही !’