समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य

समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली आणि त्यावर आपल्या विचारांशी एकनिष्ठ असणार्‍या विद्वान, राष्ट्रप्रेमी अन् त्यागी महंतांची मठाधिपती म्हणून नेमणूक केली. त्यांनी सर्व भारतभरात एकूण १ सहस्र १०० मठांची स्थापना केली. ‘हे मठ आणि महंत, म्हणजे समर्थ संप्रदायाचा पाया आहे’, असे म्हटले जाते.

 

१. मोगलांच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या
समाजासाठी प्रत्यक्ष कृती करणारे समर्थ रामदासस्वामी !

भारतभ्रमण करून आल्यावर समर्थांनी मोगली अत्याचाराने ग्रासलेल्या समाजाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.

ऐसें अवघें नासलें । सत्यासत्य हारपलें ।
अवघें अनायेक जालें । चहूंकडे ॥

– दासबोध, दशक ११, समास २, ओवी २४

मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला ।
जो जे मतीं सांपडला । तयासि तेंचि थोर ॥

– दासबोध, दशक ११, समास २, ओवी २५

समाजाची निर्णायकी अवस्था समर्थांच्या लक्षात आली. ‘त्यांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावे’, असे त्यांनी ठरवले. इतर कुठल्याही संतांनी अशा प्रकारे ‘आपल्या दुर्बल समाजासाठी प्रत्यक्ष कृती केली’, असे आपल्या इतिहासात आढळत नाही.

 

२. बलसंपन्न आणि प्रखर देशप्रेमी समाज घडवण्यासाठी
समर्थांनी समाजातील लोकांना बलोपासनेसह मनोपासनाही शिकवणे

देशभर भ्रमण करत असतांना समर्थांनी ते जेथे जातील, तेथे तरुणांना एकत्र करून शरीर सुदृढ करण्यासाठी व्यायाम करण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी अनेक ठिकाणी शक्तीचे प्रतिक असलेल्या हनुमानाची मंदिरे उभी केली. त्यांचे ११ मारुति प्रसिद्धच आहेत; पण नुसते शरीर मजबूत असून चालत नाही, त्याला कृती करण्यासाठी साहाय्य करणारे मनही सुदृढ हवे. सुदृढ शरिरातच खंबीर मन असते ! (साऊंड माईंड इन साऊंड बॉडी !) यासाठी मनाची मशागत करण्यासाठी त्यांनी ‘मनाचे श्‍लोक’ लिहिले.

 

३. समर्थांनी तरुणांचे संघटन करून त्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करणे

समर्थ एका जागी कधीही वास्तव्य करत नसत. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असतांना त्यांनी बलवान, उत्साही आणि राष्ट्रप्रेमी तरुणांचे संघटन उभे केले. त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत केले. त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांची जाणीव करून देऊन मोगल राजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले.

 

४. समर्थांना देशद्रोह्यांविरुद्ध चीड असणे

समर्थांना देशद्रोह्यांविषयी पुष्कळ चीड होती. ती त्यांनी पुढील ओव्यांमध्ये व्यक्त केली आहे.

देशद्रोही जितुके कुत्ते । मारोनि घालावे परते ।
देवासाठी मरावे । मारोनि अवघ्यास मारावे ॥

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥

– दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६

वन्ही तो चेतवावा रे । चेतविताचि चेततो ॥
केल्याने होत आहे रे । आधि केलेचि पाहिजे ॥

 

५. समर्थांची सर्वांगस्पर्शी विपुल ग्रंथसंपदा !

५ अ. अजोड आणि दिव्य प्रतिभा लाभलेला खरा समर्थ कवी !

समर्थांनी प्रचंड वाङ्मयाची निर्मिती केली. जगामध्ये जेवढे विषय मानवी जीवनाशी संबंधित आहेत, त्या सर्व विषयांची चर्चा त्यांनी ‘दासबोध’ या आपल्या अलौकिक ग्रंथात केली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्‍वरांच्या ‘ज्ञानेश्‍वरी’ या ग्रंथाइतकेच महत्त्व ‘दासबोधा’लाही प्राप्त झाले आहे. त्यांनी सर्व देवांची भक्ती आणि स्तुती करण्यासाठी अनुमाने ७७ आरत्या लिहिल्या. मनाचे श्‍लोक आणि करुणाष्टके लिहिली. पोवाडे, भारुडे, गवळण इत्यादी काव्य प्रकारंतही रचना केल्या. तसेच त्यांनी हिंदीतही अभंग लिहिले आहेत. त्यांनी समाजाला नवविधा भक्ती शिकवली.

५ आ. अलौकिक प्रतिभा लाभलेले समर्थ !

समर्थांनी ज्या काळात लेखन केले, त्या काळात आताप्रमाणे कुठलीही लेखन-सामग्री उपलब्ध नव्हती, काव्याच्या नियमांची (वृत्त, अलंकार इत्यादींची) पुस्तके नव्हती, तरीही समर्थांनी आपल्या रचनांनी साहित्यातील सर्व रस आणि अलंकार समृद्ध केले. भक्तीरस तर त्यात ओतप्रोत भरला आहे. त्यांनी लिहिलेले ‘मनाचे श्‍लोक’ हे ‘भुजंगप्रयात’ या एकाच वृत्तात आहेत. कुठलेही काव्य उत्स्फूर्त असते. त्यात भावनांचा अविष्कार असतो आणि ‘ते प्रसवण्यासाठी एकांत लागतो’, असे म्हणतात. ‘आयुष्यात सर्वच क्षेत्रांत इतके प्रचंड कार्य करत असतांना समर्थांना असा एकांत कधी लाभला होता ? तरीही त्यांनी इतकी प्रचंड काव्यनिर्मिती कशी केली ?’, हे सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडचे कोडे आहे.

५ इ. समाजाला ‘योग्य-अयोग्य आणि ते कसे करावे ?’, हे शिकवणारे समर्थ रामदासस्वामी !

समर्थांनी शिवथरघळ येथे मुक्काम करून ‘दासबोध’ या महान ग्रंथाची निर्मिती केली. गुरु-शिष्य संवादाद्वारे त्यांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला. या ग्रंथात त्यांची विद्वत्ता प्रकट होते. समर्थांनी गड, कोट आणि किल्ले यांचे महत्त्व विशद केले. मूर्खांची लक्षणे सांगण्यासह शहाण्यांचीही वैशिष्ट्ये सांगितली. ‘प्रपंच आणि परमार्थ यांची गुंफण कशी करावी ?’, इथपासून ते ‘इमारतीचे बांधकाम कसे करावे ? वनस्पतींचे संवर्धन कसे करावे ? आदर्श व्यवस्थापन कसे असावे ?’, हेही समर्थांनी सांगितले आहे. आजच्या जगात ‘व्यवस्थापन’ (मॅनेजमेंट) या विषयाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आता व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात समर्थांचे त्याविषयीचे विचारही अभ्यासले जातात. आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर १७ व्या शतकात जन्मलेले समर्थ २१ व्या शतकासाठीही एक महान ‘व्यवस्थापन गुरु’ आहेत.

त्यांनी राजकारणावरही स्वतःची मते मांडली आहेत. ‘राजकारण अत्यंत सावधपणे करावे’, असे ते सांगतात. राजकारणाने समाजाचे भले झाले पाहिजे; म्हणून रामराज्याची संकल्पना घेऊन तसे आदर्श राज्य निर्मिणारा राजकारणी त्यांनी अपेक्षिला.

 

६. गुरु रामदासस्वामी आणि शिष्य
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जणू दोन शरिरे असणारा एकच आत्मा !

६ अ. स्वराज्यासाठी झटणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी !

छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी म्हणजे एकाच वेळी अन् एकाच कार्याने भारलेली दोन शरिरे होती, दोन हृदये होती; पण त्यांचा आत्मा एकच होता ! समर्थांना सत्ता मिळवायची नव्हती; पण त्यांनी हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी अनुकूल वातावरण सिद्ध केले. या दोन महान जिवांमुळे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र येऊन महाराष्ट्र धर्माची वाढ

६ आ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जिवापाड प्रीती असणारे समर्थ रामदासस्वामी !

१. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यातील पत्र व्यवहार पाहिल्यावर त्यांच्यातील प्रीतीची कल्पना येते. समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे ‘श्रीमंत योगी, गुणवंत, कीर्तीवंत, ज्ञानवंत, बुद्धीवंत, यशवंत, नीतीवंत आणि सामर्थ्यवंत जाणता राजा’, असे यथार्थ कौतुक केले आहे.

२. ‘शिवछत्रपतींना देवाज्ञा झाली’, असे कळताच समर्थ अतिशय दुःखी झाले. त्यानंतर ३ मास ते कुणालाही भेटले नाहीत कि कुणाशी काही बोलले नाहीत. त्यांनी आहारही जवळपास सोडला होता. कुणी फारच आग्रह केला, तर ते थोडेस दूध घेत’, असे ‘दासायना’त नमूद केले आहे.

 

७. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनीही गौरवलेले समर्थ रामदासस्वामी !

छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज यांना भेटायले गेले, तेव्हा त्यांनीही राजांना समर्थांकडेच पाठवले. ते राजांना म्हणतात, ‘‘तू समर्थांकडे जा. त्यांच्यासारख्या उदार आणि सज्जन संतांची आठवण ठेव. त्यांना विसरू नकोस. बुद्धी ढळू देऊ नकोस.’’ समर्थांवर संत तुकाराम महाराज यांनी एक अभंगही लिहिला आहे.

हुर्मुजी रंगाचा उंच मोतीदाणा ।
रामदासी बाणा या रंगाचा ॥

पीतवर्ण कांती तेज अघटित ।
आवळु शोभत भृकुटीमाजी ॥

रामनाम मुद्रा द्वादश हे टिळे ।
पुच्छ ते वळवळे कटीमाजी ॥

कौपिन परिधान मेखला खांद्यावरी ।
तुंबा कुबडी करी समर्थांच्या ॥

संदर्भ : आनंदी ज्योतिष

3 thoughts on “समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य”

  1. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक गुरू-शिष्य परंपरेचे एक अनोखे उदाहरण आहे.
    महाराजांनी जे काही केले ते समर्थांनी सांगितल्या प्रमाणे. म्हणजे गुरूंनी सांगावे आणि शिष्याने ते तंतोतंत करावे.

    Reply

Leave a Comment