आपल्याला होणारे बहुतांश आजार, हे शरिरातील त्रिदोषांच्या असमतोलामुळे होतात. आहाराचे संतुलन बिघडण्यात रिफाईंड तेल बर्याचदा कारणीभूत ठरते. रिफाईंड तेल निर्माण करण्यासाठी ‘गॅसोलिन’, ‘सिंथेटिक’, ‘अॅन्टिऑक्सिडंट’, आदी प्रकारची रसायने उपयोगात आणली जातात. ‘रिफाईंड’ तेलाचा अजिबात वास येत नाही; कारण त्यात एकही प्रकारचे जीवनसत्त्व शेष रहात नाही. त्यातील चिकटपणाही नाहीसा झालेला असतो; कारण त्यातील ‘फॅटी अॅसिड’ आधीच बाहेर काढले जाते, तसेच या तेलात ‘व्हिटॅमिन ई’ आणि ‘मिनरल्स’ही नसतात. ‘रिफाईंड’ तेल हे मानवी शरिरास अत्यंत हानीकारक असते. तसेच त्यात मानवी शरिराला घातक घटक असतात. ‘रिफाईंड’ तेलामुळे मानवी शरिरात ‘एल्.डी.एल्.’ नावाचा घातक घटक निर्माण होतो. यामुळे मानवी शरिरामध्ये ‘ब्लॉकेजेस’ निर्माण होऊन हृदयविकारासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. ‘रिफाईंड’ तेल पहिल्यांदा ३०० आणि दुसर्यांदा ४६४ डिग्री सेल्सियसला उकळवले जाते. त्यामुळे ते अधिकच विषारी बनते.
याउलट लाकडी घाण्याचे तेल हे अत्यंत शुद्ध, रसायनेविरहित आणि आरोग्यास हितकारक असते, तसेच ते नैसर्गिक अन् शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण केले जाते. त्याला शुद्ध तेलाचा वास येतो आणि ते चिकटही असते; कारण त्यामध्ये ४-५ प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. लाकडी घाण्यात तेल काढतांना अत्यल्प घर्षण झाल्याने त्यातील एकही नैसर्गिक घटक नाश पावत नाही. यासह तेल काढतांना त्याचे तापमान ४० ते ४५ डिग्री सेल्सियस असल्याने त्यातील नैसर्गिक घटक नष्ट होत नाहीत. त्यामुळे शरिराला आवश्यक असणारा ‘हायडेन्सिटी लिप्रोप्रोटीन’ हा घटक आपल्या यकृतामध्ये निर्माण होतो. शुद्ध तेलामुळे वात दोष संतुलित रहातो. त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत. मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, अर्धांगवायू यांसारख्या गंभीर आजारांत लाकडी घाण्याचे तेल गुणकारी आहे. शेकडो वर्षांपासून आपले पूर्वज लाकडी घाण्याचे तेल उपयोगात आणत असल्याने ते निरोगी आणि दीर्घायुषी होते. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या लाकडी घाण्याच्या तेलाचा उपयोग करून दीर्घायुष्यी जीवनाचा समतोल साधूया !