तत्त्व आणि गुण यांनुसार ब्रह्मांडातील स्तरांचे कार्य चालू असते. जेव्हा पृथ्वीवरील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा समतोल बिघडतो, म्हणजे सत्त्वगुण न्यून होऊन रज-तमाचे प्रमाण वाढते, तेव्हा पृथ्वीवर नैसर्गिक आणि भौतिक आपत्ती येतात. प्रथम अतीवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामी यांसारख्या वातावरणाच्या संदर्भातील आपत्ती निर्माण होतात. त्यानंतर किडे, कीटक आदींच्या स्तरावर आक्रमणे होतात. कालांतराने पशू-पक्ष्यांच्या स्तरावर उपद्रव होण्यास आरंभ होतो. त्यानंतर मानवी आक्रमणांना आरंभ होतो. यामध्ये शत्रूराष्ट्रांची आक्रमणे, दोन राष्ट्रांच्या आपापसांत लढाया होणे आणि कालांतराने महायुद्ध होणे यांसारख्या संकटांची शृंखला निर्माण होते. साहजिकच ही संकटे मानवाच्या विनाशाला कारणीभूत ठरतात. आतासुद्धा हे घडत आहे !
‘सध्या देश आणि धर्म यांच्या दृष्टीकोनातून आपत्काळ चालू आहे. नैसर्गिक आपत्ती सतत येणे, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे प्राबल्य वाढणे, राजकीय अस्थैर्य निर्माण करणार्या घटना घडणे, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या शुभ कार्यामध्ये विघ्ने येणे इत्यादी आपत्काळाची भौतिक लक्षणे आहेत. अशा काळात सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन संघर्षशील होते !
आपत्काळात वादळ, भूकंप आदींमुळे वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डिझेल यांचा तुटवडा निर्माण होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळत नाहीत वा मिळाल्या तरी त्यांचे ‘रेशनिंग’ होते. आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये उपलब्ध होणे अशक्यच असते. आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
युद्धकाळाची सिद्धता आणि त्याविषयी प्रबोधन करा !
आज अनेक संत आणि अवतारी पुरुष हे भावी संकटकाळाच्या संदर्भात सांगत आहेत. यावरून त्याची तीव्रता लक्षात येईल. गुरुपातळीच्या संतांमध्ये काळाच्या पलीकडे जाण्याची क्षमता असते; म्हणूनच ते काळाची पावले ओळखून समाजाला येणार्या भीषण काळाविषयी जागरूक करत असतात. हेच कार्य शिष्य पातळीच्या भक्तांनी केल्यास गुरूंच्या मनातील जाणून कार्य केल्यासारखे होते. येणार्या महाभीषण युद्धकाळाची सिद्धता करणे, या संदर्भात इतरांचे प्रबोधन करणे आणि या युद्धकाळात समाजबांधवांचे रक्षण करणे, हे गुरूंना अभिप्रेत असे काळानुसार आज्ञापालन ठरणार आहे !
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था
आपत्काळाची भयावहता आणि भक्ती यांचे महत्त्व लक्षात
आणून देणारी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रीतीमय वाणी !
‘तिसर्या महायुद्धात एखादा देश जिंकावा किंवा एखाद्या देशाची हानी होऊ नये’, असा विचार माझ्या मनात येत नाही, तर ‘सात्त्विक व्यक्ती जिवंत राहाव्यात’, एवढाच विचार येतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आपत्काळाची भयावहता जाणून साधना करा !
वर्ष २००० पासूनच ‘कालमहिम्यानुसार लवकरच आपत्काळ येणार’, याची साधना करणार्यांना जाणीव आहेच. आता मंद आपत्काळ चालू असून लवकरच मध्यम आणि नंतर तीव्र आपत्काळाला आरंभ होईल ! वर्ष २०१९ नंतर तिसर्या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. प्रथम ते महायुद्ध मानसिक स्तरावर असेल. कोणत्याही दोन राष्ट्रांमधील महायुद्ध हे आधी मानसिक स्तरावर असते, उदा. कोरिया-अमेरिका संघर्ष, चीन-अमेरिका संघर्ष. त्यानंतर भौतिक स्तरावर आपत्काळ चालू होतो. त्याला आता अत्यंत अल्प अवधी राहिला आहे. ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’, या सिद्धांतानुसार सज्जन, साधक आदींनाही आपत्काळाची झळ बसणार आहे ! ‘आपत्काळातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने साधना आणि धर्माचरण करण्यास प्रवृत्त व्हावे’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! भयावह आणि देशाचा आर्थिक कणा मोडणार्या आपत्काळाचा सामना करण्यासाठी मानवाने प्रत्येक क्षणी सिद्ध रहायला हवे. आपत्काळात टिकण्यासाठी धर्माचरण आणि देवाची भक्ती करण्यावाचून पर्याय नाही !
मानव आणि सृष्टी यांच्या रक्षणासाठी सतर्क करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
त्रिकालज्ञानी संतांनी सांगितलेलेच आहे की, पुढे भीषण आपत्काळ आहे आणि त्यात जगभरातील बरीच लोकसंख्या नष्ट होणार आहे, तसेच अनिष्ट शक्तींचा प्रकोप वाढलेल्या कलियुगात आपत्काळात तिसरे महायुद्ध भडकेल; परंतु आपत्काळाची भीषणता आणि त्यातून तरून जाण्यासाठी सर्व स्तरांवरील उपाययोजना सांगून साधकांसह समाजाला जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था एकमेव आहेत ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मानवजातीच्या रक्षणाची आणि कल्याणाची, तसेच सृष्टीचीही काळजी आहे. त्यामुळे भावी आपत्काळातील संकटांच्या दृष्टीने ते सर्वांना सतर्क करत आहेत. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !