दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !

Article also available in :

आज कित्येक वर्षे संपूर्ण भारत भरात किरकोळ निमित्त काढून विशेषत: हिंदूंच्या सणांच्या वेळी दंगली घडवून आणत आहेत. बाबरी मशीद पाडल्यावर मुंबईत झालेली दंगल, धुळे दंगल, आझाद मैदानातील दंगल, सीएए कायद्यावरून झालेल्या आंदोलनानंतर देहलीत झालेली दंगल आणि शेतकरी आंदोलनानंतर २६ जानेवारीला झालेली दंगल ही काही उदाहरणे आहेत. दंगलींमध्ये होणार्‍या हत्या, जाळपोळ, मारहाण, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांवरील जीवघेणी आक्रमणे आदी पाहिल्यावर सर्वसामान्यांच्या उरात अक्षरशः धडकी भरते. ‘येणार्‍या आपत्काळातही पूर्वनियोजित दंगली होऊ शकतात’, या विचाराने ताण येऊ शकतो.

पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी सर्वत्र विध्वंस होणे, आग लागणे, गल्लोगल्ली मृतदेह पडलेले असणे यांसारखी स्थिती समोर असते. अशा घटना पाहून वा ऐकून अनेकांना मन अस्थिर होणे, ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात. बर्‍याच जणांना भविष्यकाळात येऊ शकणार्‍या अशा आपत्तींच्या कल्पनेनेही वरील प्रकारचे त्रास होतात, तसेच नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. अशा प्रकारचे त्रास होऊ नयेत, म्हणजेच मनाचे संतुलन ढळू न देता प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘स्वयंसूचना’ घेऊ शकतो. आपत्काळातील अशा भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !

 

१. स्वयंसूचना सत्र म्हणजे काय आणि ते कसे करावे ?

स्वभावदोषांवर आवश्यक ती सूचना बाह्यमनाने अंतर्मनाला देण्याच्या प्रक्रियेला ‘स्वयंसूचना सत्र’ म्हणतात. उपास्यदेवता किंवा गुरु यांना ‘स्वयंसूचना माझ्या अंतर्मनापर्यंत पोचू दे’, अशी प्रार्थना करावी. मन एकाग्र होण्यासाठी २ मिनिटे नामजप करून स्वयंसूचना द्यावी आणि शेवटी कृतज्ञता व्यक्त करावी. ही सूचना ५ वेळा एकाग्रतेने वाचावी किंवा मनात म्हणावी. अशी सूचनेची ५ ते १० सत्रे करावीत. अल्पावधीत मनावरील ताण दूर झाल्याचे लक्षात येईल.

 

२. ‘स्वतःच्या घराजवळ दंगल होईल’, या विचारामुळे
आलेला ताण दूर होण्यासाठी द्यायच्या स्वयंसूचना

२ अ. उदाहरण १

‘आपत्काळाची तीव्रता आता वाढतच जाणार आहे. त्यामुळे पुढील १ – २ वर्षांत माझ्या घराजवळ दंगल होईल आणि तिची झळ मला अन् माझ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात बसेल’, या विचाराने श्री. प्रभाकर यांना ताण येतो.

स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘माझ्या घराजवळ दंगल होईल आणि तिची झळ मला अन् माझ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात बसेल’, असे विचार येतील, त्या वेळी ‘मी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेतले आहे; त्यामुळे मी दंगलखोरांना रोखू शकेन, एवढा आत्मविश्‍वास मला आला आहे. आम्ही कुटुंबीय करत असलेल्या साधनेमुळे देवाचे संरक्षक-कवचही आमच्याभोवती आहे’, याची मला जाणीव होईल. हे सर्व लक्षात घेऊन मी माझ्या साधनेवर लक्ष केंद्रीत करीन.

 

२ आ. उदाहरण २

‘माझ्या घराजवळ दंगल झाली तर…’ या विचारवरील स्वयंसूचना

स्वयंसूचना

१. काल शहरात चालू झालेल्या दंगलीचे पडसाद आमच्या गल्लीत उमटू लागले आहेत. आमच्या घराजवळ दंगल चालू झाली आहे.

२. मी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेतले आहे; त्यामुळे मी दंगलखोरांना रोखू शकेन, एवढा आत्मविश्‍वास मला आला आहे.

३. आम्ही आमच्या घराचे प्रवेशद्वार, तसेच अन्य दरवाजे आणि खिडक्या बंद करून घेत आहोत.

४. माझा मोठा भाऊ पोलिसांना दूरभाष करून दंगलीविषयी कळवत आहे.

५. संकटनिवारणासाठी नामजप, स्तोत्रपठण यांसारखे जे जे प्रयत्न करणे शक्य आहे, ते ते सर्व मी करत आहे.

६. ‘संकटकाळी देव नेहमीच माझ्या समवेत असून तो माझी आणि माझ्या कुटुंबियांची काळजी घेणारच आहे’, ही माझी श्रद्धा वाढत आहे.

७. देवाच्या कृपेने दंगलखोरांचे लक्ष आमच्या घराकडे गेलेले नाही.

८. थोड्या वेळाने ‘पोलीस तेथे आले आहेत’, असे जाणवत आहे.

९. काही वेळातच पोलीस दंगल नियंत्रणात आणत आहेत.

१०. ‘देवाने दंगलीची झळ आम्हाला लागू दिली नाही, तसेच माझे आणि माझ्या कुटुंबियांचे रक्षण केले’, यासाठी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.

 

३. दंगल चालू असतांना घ्यायची स्वयंसूचना

जेव्हा मी रहात असलेल्या शहरात दंगल चालू होईल, तेव्हा हे आपत्काळ चालू झाल्याचे लक्षण आहे आणि केवळ साधनाच माझे रक्षण करू शकेल, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी आवश्यक ती सुरक्षेची उपाययोजना करून भावपूर्ण नामजप करीन.

 

४. नातेवाइकांमध्ये भावनिकदृष्ट्या न अडकण्यासाठी स्वयंसूचना

१. प्रसंग : भविष्यात होणार्‍या तिसर्‍या महायुद्धाच्या काळात माझ्या कुटुंबियांचे काय होईल ?, असा विचार केल्यामुळे मला चिंता वाटते.

आणीबाणीच्या काळात घ्यायची स्वयंसूचना

स्वयंसूचना १ : जेव्हा माझे कुटुंबीय तिसर्‍या जागतिक महायुद्धात/ युद्धात वाचतील का ?, या विचाराने मला चिंता वाटेल, तेव्हा मी त्यांना यापूर्वीच युद्धकाळात घ्यावयाची काळजी आणि साधनेचे महत्त्व यांविषयी सांगितले आहे, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी शांतपणे स्वतःच्या साधनेचे प्रयत्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीन.

स्वयंसूचना २ : जेव्हा माझे कुटुंबीय तिसर्‍या जागतिक महायुद्धात/ युद्धात वाचतील का ?, या विचाराने मला चिंता वाटेल, तेव्हा कुटुंबियांनी साधना केल्यास देवच त्यांचे रक्षण करेल, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी त्यांना हे सूत्र सांगीन आणि माझे साधनेचे प्रयत्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीन.

 

२. प्रसंग : माझे कुटुंबीय पूर येणार्‍या भागात रहात असल्यामुळे पूर आल्यास त्यांचे काय होईल ?, या विचाराने मला चिंता वाटते.

आणीबाणीच्या काळात घ्यायची स्वयंसूचना

स्वयंसूचना : जेव्हा माझे कुटुंबीय रहात असलेल्या भागात पूर येईल, तेव्हा त्यांचा जीव आणि आवश्यक वस्तू वाचवण्याविषयी सांगून तेथील स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करायला सांगणे, हेच माझ्याकडून त्यांना होणारे सर्वोत्तम साहाय्य आहे, याची मला जाणीव होईल आणि मी तसे करीन, तसेच मी त्यांना नामजप करण्याविषयी प्रोत्साहित करीन.

 

३. प्रसंग : शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाचे माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही, याचा मला ताण येतो.

प्रसंग घडतांना घ्यायच्या स्वयंसूचना

अ. जेव्हा शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाविषयी माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही आणि त्यामुळे माझ्या मुलीला त्रास सहन करावा लागू शकतो, याचा मला ताण येईल, तेव्हा याविषयी पुनःपुन्हा सांगितल्यास संघर्ष निर्माण होईल, याची मला जाणीव होईल आणि मी माझ्या मुलीला आवश्यक ती सिद्धता करायला सांगीन/ आपत्काळात टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारी साधना करायला सांगीन.

आ. जेव्हा शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाविषयी माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही, या विचाराने मला ताण येईल, तेव्हा मी त्यांना याविषयी माहिती देण्याचे कर्तव्य केले आहे आणि देव त्यांच्यासाठी जे योग्य आहे, तेच करेल, याची मला जाणीव होईल अन् मी शांतपणे माझे इतर आवश्यक प्रयत्न चालू ठेवीन.

इ. जेव्हा शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाविषयी माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही, या विचाराने मला ताण येईल, तेव्हा मी त्यांना याविषयी माहिती देण्याचे कर्तव्य केले आहे, याची मला जाणीव होईल आणि त्यांनी काय करावे ?, हा त्यांचा निर्णय असेल, असा विचार करून मी मला आणि माझ्या कुटुंबियांना येणार्‍या काळाला तोंड देता यावे, यासाठी आवश्यक ते प्रयत्न करीन.

 

५. परिस्थिती पालटणे अशक्य असल्याने प्रसंगाकडे
तत्त्वज्ञाच्या भूमिकेतून पहाणे, यानुसार द्यावयाच्या स्वयंसूचनांची उदाहरणे

दंगल होत असतांना द्यायची स्वयंसूचना

अ. ज्या वेळी मी रहात असलेल्या भागात मोठी दंगल होत असेल, त्या वेळी सध्या समष्टी पाप वाढल्यामुळे अशा नकारात्मक घटनांत वृद्धी होत आहे आणि या समष्टी प्रारब्धातून देवच आम्हाला सोडवणार आहे, याची मला जाणीव होईल अन् मी श्रद्धेने आणि भावपूर्ण नामजप करीन.

(वरील स्वयंसूचनांच्या धर्तीवर मित्रमंडळी, शेजारी इत्यादींमध्येही भावनिकदृष्ट्या अडकू नये, यासाठी स्वयंसूचना बनवता येतील.)

आ. आपत्काळाच्या विचाराने मनाची अस्वस्थता पुष्कळ वाढल्यास मनाला आपत्काळाच्या संदर्भात स्वयंसूचना स्वीकारण्याच्या सकारात्मक स्थितीत आणण्यासाठी करायचे उपाय : काही जण अती भावनाशील वा मनाने पुष्कळ दुर्बल असतात. पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी संकटे पाहून ते गर्भगळीत होतात. त्यांना या आपत्काळाच्या संदर्भातील स्वयंसूचना देणेही नको वाटते. काहींचे मन अस्वस्थ असल्यामुळे त्यांना स्वयंसूचना देेण्याची आठवणही रहात नाही. अशा व्यक्तींच्या मनाला आपत्काळाच्या संदर्भात स्वयंसूचना स्वीकारण्याच्या सकारात्मक स्थितीत आणण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या प्रोत्साहनपर स्वयंसूचना आणि आपत्कालीन स्थितीतून तरून जाण्याकरता गुरु किंवा देव यांच्यावरील श्रद्धा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारी काही प्रेरक वाक्ये सनातनचा ग्रंथ आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर करायच्या सिद्धता यात दिली आहेत.

अधिक माहितीसाठी संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक, आध्यात्मिक स्तरांवर करायच्या सिद्धता’

Leave a Comment