रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवता असण्यामागील विश्‍लेषण

Article also available in :

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधकांच्या संदर्भात प्रीतीस्वरूप व्यापक दृष्टीकोन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम हिंदु राष्ट्राची प्रतिकृती असणे

‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम आस्तित्वात येण्याच्या एक दशक आधी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी वर्ष १९९५ मधे ‘संपूर्ण जगासाठी हा आश्रम हिंदु धर्माचा विश्‍वदीप बनेल’, असा कृपाशीर्वाद दिला होता. ‘हिंदु राष्ट्राची प्रतिकृती’, या भूमिकेतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाची निर्मिती केली आहे. ‘रामनाथी येथील सनातनचा आश्रम हे एक तीर्थक्षेत्र आहे’, असे गौरवोद्गार अनेक संत आणि देवता यांनी काढले आहेत. येथील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा आध्यात्मिक स्तरावर विचार करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हा आश्रम आदर्श बनवला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर होय.


रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर

 

२. संप्रदायाच्या आश्रमात केवळ त्यांच्या उपास्यदेवतेचे चित्र किंवा मूर्ती असणे

हिंदुधर्मात अनेक संप्रदाय आहेत. प्रत्येक संप्रदायात त्या संप्रदायाच्या उपास्यदेवतेची उपासना करण्यास सांगितले जाते. त्यानुसार त्यांच्या आश्रमाच्या किंवा मठाच्या देवघरात प्रामुख्याने त्या देवतेचे चित्र किंवा मूर्ती आढळते. संप्रदायातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या संप्रदायाच्या शिकवणीनुसार ती एकच उपासना करते.

 

३. ‘प्रत्येक साधकाला त्याच्या प्रकृतीनुसार
आवश्यक तत्त्वाचा लाभ मिळावा’, या प्रीतीस्वरूप व्यापक
विचाराने सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवता असणे

कु. प्रियांका लोटलीकर

सनातन संस्था ही संप्रदाय नसून हिंदु धर्मानुसार अध्यात्मशास्त्र सांगते. हिंदु धर्मात देवतांच्या कार्यानुसार त्यांची उपासना सांगितली आहे. या उपासनेच्या माध्यमातून ते ते तत्त्व त्या त्या उपासकाला प्राप्त होते. अनेक जिज्ञासू, हितचिंतक, वाचक आणि साधक आश्रमदर्शन, तसेच साधना करणे यांसाठी सनातनच्या आश्रमात येतात. आश्रमातील ध्यानमंदिर पाहिल्यावर काही जणांच्या मनात विचार येतो की, ‘आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवी-देवतांची चित्रे अथवा मूर्ती का आहेत ?’ या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विचार अत्यंत प्रीतीस्वरूप आणि व्यापक आहे. ते म्हणतात, ‘अनेकातून एकात येणे’ या साधनेच्या मूलभूत तत्त्वानुसार प्राथमिक स्तरावरील साधकांनी अनेक देवतांचे पूजन करण्याऐवजी त्यांना त्यांच्या कुलदेवतेचे (एका देवतेचे) पूजन करायला सांगितले जाते. सनातनच्या आश्रमात २५० हून अधिक साधक साधना करत आहेत. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या साधनेच्या अन्य एका मूलभूत तत्त्वानुसार आश्रमात साधना करत असलेल्या अनेक साधकांपैकी प्रत्येकाची उपास्यदेवता वेगवेगळी असू शकते. त्यामुळे ‘प्रत्येकाला त्याच्या उपास्यदेवतेचे तत्त्व उपलब्ध व्हावे’, यासाठी सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवतांची मांडणी करण्यात आली आहे’. ध्यानमंदिरातील देवतांच्या रचनेच्या या छोट्याशा सूत्रातून परात्पर गुरु डॉ. आठवले ‘प्रत्येक साधकाच्या आध्यात्मिक लाभाविषयी किती सखोल आणि व्यापक विचार करतात’, हे दिसून येते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

Leave a Comment