‘ऑनलाईन’ सत्संग म्हणजे सामाजिक आरोग्यासाठी आशेचा किरण ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित
‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त पार पडला ‘कृतज्ञता सोहळा’ !

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला संदेश !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सध्या केवळ आपला देशच नव्हे, तर संपूर्ण विश्‍व संक्रमण अवस्थेतून जात आहे. या प्रतिकूल काळात ‘ऑनलाईन’ सत्संगाद्वारे समाजाला धर्म, अध्यात्म, साधना, नैतिक मूल्य आदींविषयी मार्गदर्शन मिळणे अतिशय भाग्यदायी आहे. ‘ऑनलाईन सत्संगांच्या माध्यमांतून अनेकांना आध्यात्मिक विषयांचा तात्त्विक भाग समजला आहे; परंतु काही जणांनी सत्संगांमध्ये सांगितल्यानुसार साधनेलाही आरंभ केला आहे, काहींनी साधना करून आध्यात्मिक अनुभूतीही घेतल्या आहेत, तसेच काही जण प्रत्यक्ष धर्मकार्यात सहभागी होऊन सक्रीय झाले आहेत, हे कौतुकास्पद आहे. ही ‘ऑनलाईन’ सत्संगांची फलनिष्पत्तीच म्हणावे लागेल. या कार्याला मिळालेल्या ज्ञानशक्तीमुळेच या क्षेत्रातील अनुभव नसतांनाही, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ अल्प असूनही हे ‘ऑनलाईन’ सत्संग प्रभावीपणे अन् अविरतपणे चालू आहेत. ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीच्या या सप्ताहाला ‘कृतज्ञता सप्ताह’ म्हणायला हवे. येणारा काळ अधिक भीषण, तसेच युद्धकाळ आहे. या काळात ‘ऑनलाईन’ सत्संगांतून मिळालेले ज्ञान समाजातील सर्वच वयोगटातील जिवांना संजीवनीसारखे सिद्ध होईल. येणार्‍या काळात ज्ञान, भक्ती आणि संस्कार यांचा प्रसार अशाच पद्धतीने अखंड होवो, तसेच या कार्यात सहभागी होणार्‍या सर्वांचीच आध्यात्मिक प्रगती होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

श्री. चेतन राजहंस

पुणे – सध्या ताणतणावामुळे आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत बहुतेक लोक दूरदर्शन पहाणे, सामाजिक माध्यमांवर अधिक वेळ घालवणे, असे करतात; परंतु हे सर्व करायला मर्यादा आहेत आणि याचे घातक दुष्परिणामही आहेत. लोकांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादामुळे ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले. सत्संगातून संत आणि सद्गुरु मार्गदर्शन करत असल्याने त्यांच्या वाणीतील चैतन्य अन् संकल्प यांमुळे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शक्तीचा लाभ प्रेक्षकांना होत आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या कुटुंबियांमध्येही पालट होत असल्याचे सांगितले. यावरून सत्संगाची परिणामकारकता लक्षात आली. अनेक जिज्ञासूंची भीती, चिंता, ताण दूर झाला आणि ते आनंदाची अनुभूती घेत आहेत. आपत्काळामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चालू झालेल्या या विशेष सत्संगांमुळे समाजात सकारात्मक परिणाम दिसणे, हा सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने आशेचा किरण आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर, हिंदु जनजागृती समितीच्या संस्कारवर्गसेविका सौ. गौरी कुलकर्णी, सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु यांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

 

असा झाला ‘ऑनलाईन’ कार्यक्रम

कार्यक्रमाच्या आरंभी सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या आशीर्वादात्मक संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ‘ऑनलाईन’ सत्संगांविषयी अन्य संतांनी दिलेले आशीर्वाद, तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या शुभेच्छा यांचे वाचन करण्यात आले. उपस्थित संत आणि मान्यवर यांनी सत्संगांमुळे समाजाला होणारे लाभ विशद केले.

 

कार्यक्रमासाठी संतांचे आशीर्वाद आणि प्रेक्षकांच्या शुभेच्छा !

पू. भागीरथी महाराज यांनी ‘हे कार्य निरंतर चालू रहावे’, यासाठी आशीर्वाद दिले. अमरावती येथील पू. रामश्री रामप्रिया यांनीही प्रतिकूल परिस्थितीतून कार्य करणार्‍या, भारतीय गुरु-शिष्य परंपरेला पुढे नेणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कौतुक केले. मुरैना (मध्यप्रदेश) येथील पू. योगेशशास्त्री, कागल (कोल्हापूर) येथील शिवसेना शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी, मुंबई येथील श्री. संघटन शर्मा यांसह अन्य प्रेक्षक, तसेच काही वाहिन्यांचे संपादक यांनी कार्याला शुभेच्छा दिल्या.

विशेष : ‘ऑनलाईन’ सत्संग निर्विघ्नपणे पार पडावा, तसेच अधिकाधिक लोकांना या सत्संगांचा लाभ व्हावा’ यासाठी देशातील विविध मंदिरांमध्ये संत आणि साधक यांनी देवतांना साकडे घातले. वाराणसी येथील सारंगनाथ मंदिरात पू. नीलेश सिंगबाळ यांनी, तमिळनाडू येथील आनंदेश्‍वर मंदिरात सौ. लक्ष्मी नायक यांनी, तसेच हरिद्वार येथील दक्ष प्रजापती मंदिरात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साकडे घातले.

 

सत्त्वगुणी समाजाच्या निर्मितीसाठी
जिज्ञासूंनी धर्मकार्यात योगदान द्यावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘ऑनलाईन’ सत्संगाच्या मालिकेतून धर्म, ज्ञान आणि संस्कृती यांचा प्रसार व्हावा, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सत्त्वगुणी अन् धर्मनिष्ठ पिढीची निर्मिती व्हावी, या कार्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, यासाठी हरिद्वार येथील दक्षेश्‍वर महादेवाच्या चरणी आम्ही प्रार्थना केली. माझे सर्व जिज्ञासूंना आवाहन आहे की, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक सत्त्वगुणी समाजाच्या निर्मितीसाठी या कार्याद्वारे धर्मकार्यात योगदान द्यावे.

 

प्रेक्षकांमध्ये होणारे पालट ही नामसत्संगाची फलश्रुतीच ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधव

प्रेक्षकांच्या स्वभावामध्ये होणार्‍या पालटामुळे ज्या उद्देशाने हा नामजप सत्संग चालू करण्यात आला, तो उद्देश निश्‍चितच यशस्वी झाला, असे म्हणता येईल. नामसत्संगात सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या स्वरातील नामजप चालू असतो. याचा चांगला परिणाम पहायला मिळाला. ‘नामजपामुळे मनाला शांती मिळते’, असे अनेकांनी अनुभवले. काहींनी असेही सांगितले की, नामजप सत्संग घरामध्ये मोठ्याने लावल्याने घरातील सर्वांना लाभ झाला, तसेच वास्तूतील वातावरणातही चांगला पालट झाला. नामजप सत्संगांना पहिल्यापासून आतापर्यंत जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी अभिनंदन करतो. सत्संगांची सिद्धता करतांना, तसेच सेवा करतांना आम्हालाही अनेक अनुभूती आल्या. एप्रिल आणि मे मासामध्ये अतिशय ऊन असल्याने, तसेच हॅलोजनच्या प्रकाशात आम्हाला पुष्कळ घाम यायचा; परंतु प्रेक्षकांचा प्रतिसाद, त्यांचे प्रेम आणि गुरुदेवांच्या कृपेने आम्ही ही सेवा निर्विघ्नपणे करू शकलो. विशेष म्हणजे या सत्संग सेवेत असलेल्या कोणत्याही साधकाला शारीरिक अस्वस्थतेमुळे सेवा जमली नाही, असे झाले नाही.

 

धर्मसंवादामुळे अनेकांमध्ये धर्मासाठी
कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली ! – पू. नीलेश सिंगबाळ

पू. नीलेश सिंगबाळ

भारताची लाखो वर्षांची गुरुकुल परंपरा इंग्रजांनी बंद पाडून पाश्‍चात्त्य संस्कृतीप्रमाणे शिक्षणपद्धती आणली. त्यामुळे समाज पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब करू लागला. स्वातंत्र्यानंतरही यात पालट न झाल्याने हिंदु हे शरीराने हिंदु; पण मन, बुद्धी आणि आचरणाने ख्रिस्ती आहेत. धर्माला न जाणणारेच धर्माची चिकित्सा करू पहात आहे. सर्वधर्मसमभावाची भ्रामक संकल्पना आणून हिंदु धर्माची इतर पंथांशी तुलना केली जात आहे. हे सत्य समोर आणण्यासाठी धर्मसंवादाचे आयोजन केले. धर्मसंवादातील प्रत्येक विषयाचा आधार धर्मशास्त्र आहे. हे करत असतांना धर्म व्यापक होण्यासाठी कुणाच्या काही सूचना असल्यास त्या नम्रपणे स्वीकारून समाजासमोर ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. प्रेक्षकांनी कार्यक्रमाचे कौतुक करत ‘धर्मसंवाद’ कार्यक्रम पाहिल्याने मनाची विचार प्रक्रिया व्यापक झाली आणि धर्मासाठी कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली, असेही कळवले आहे.

 

बालसंस्कारवर्गाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रासाठी
आदर्श पिढी निर्मितीची प्रक्रिया चालू ! – सौ. गौरी कुलकर्णी

सौ. गौरी कुलकर्णी

अनेक भविष्यवेत्ते आणि संत यांच्या भाकितानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र्राची स्थापना होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याप्रमाणेच हिंदु राष्ट्र्रातही सर्व व्यवस्था असतील. अशा आदर्श राष्ट्र्रासाठी नागरिकांनीही आदर्श होण्याची आवश्यकता आहे. आजची मुले येणार्‍या हिंदु राष्ट्र्राचे नागरिक होतील; म्हणूनच लहानपणी त्यांच्यावर सुसंस्कार होणे आवश्यक आहे. आदर्श हिंदु राष्ट्रातील पिढी सुसंस्कारी असेल. यासाठीच ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग चालू केले. या वर्गातील शिकवणीनुसार बर्‍याच मुलांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया नियमितपणे करण्यास आरंभ केला. या वर्गाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रासाठी आदर्श पिढी निर्मितीची प्रक्रिया होत आहे.

 

प्रेक्षकांना भावाची अनुभूती येणे ही भगवंताचीच कृपा ! – सौ. क्षिप्रा जुवेकर

सौ. क्षिप्रा जुवेकर

संतचरित्र, पराक्रमी हिंदु राजे आणि भक्तीमार्गातून देवतांना प्रसन्न करणारे अनेक भक्त यांची माहिती भावसत्संगातून सांगितल्याने अनेकांना त्यातून प्रेरणा मिळाली. ‘भाव तिथे देव’ या उक्तीनुसार भावच महत्त्वाचा आहे. संसारात राहूनही साधना कशी करू शकतो ? याचे संपूर्ण ज्ञान परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समाजासमोर ठेवले. भावसत्संगांमुळे ‘देव सतत माझ्याजवळ आहे’, असा भाव स्वतःमध्ये निर्माण झाल्याचे अनेक प्रेक्षकांनी कळवले. केवळ श्रीकृष्णाची कृपा आणि संतांचा संकल्प यांमुळे प्रेक्षकांना भाव म्हणजे काय, ते अनुभवायला येत आहे.

 

केवळ जन्महिंदू नव्हे, तर कर्महिंदू होऊन
हिंदु राष्ट्रासाठी योगदान द्या ! – गुरुराज प्रभु

श्री. गुरुराज प्रभु

आज हिंदूंमध्ये धर्माभिमान लोप पावत चालला आहे. याचे मूळ कारण म्हणजे धर्माची अथवा ईश्‍वराची अनुभूतीच नसणे होय. धर्मशिक्षण नसल्यानेच धर्माचरण नाही आणि त्यामुळे ईश्‍वराची अनुभूती घेता येत नाही. धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था संयुक्त विद्यमाने धर्मसंवादाचे आयोजन करत आहे. याचा सर्वांनी लाभ घेऊन धर्मसंवादाची माहिती अन्य हिंदूंना सांगा. केवळ जन्महिंदू नव्हे, तर कर्महिंदू होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योगदान द्या.

 

प्रेक्षकांचे प्रेरणादायी अनुभव

सौ. अंजली कुलकर्णी – पूर्वी मला नामजप करणे शक्य नाही, असे वाटायचे. आता सत्संगामुळे नामजप चांगला होतो. मनात निर्माण होणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे सत्संगातून आपोआप मिळतात, अशीही अनुभूती आली.

श्री. भूपेश भानुशाली – टिळा लावणे, आसनावर बसून भोजन करणे अशा अनेक धर्मशास्त्रीय कृती शिकायला मिळाल्या आणि त्या आचरणातही आणत आहोत.

सौ. रूपाली सपकाळ – माझ्या गर्भाशयात गाठ होती. डॉक्टरांनी शस्त्रकर्म करायला सांगितले. मला सत्संगातून प्रार्थनेचे महत्त्व लक्षात आल्याने मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच प्रार्थना करायला आरंभ केला. काही दिवसांनी गाठ नष्ट झाली आणि शस्त्रकर्माची आवश्यकता नाही, असे समजले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

श्री. एम्. ईश्‍वर राव, बंगाल – धर्मसंवाद कार्यक्रमातून आपली संस्कृती किती महान, व्यापक आणि समृद्ध आहे, हे समजले. मी कितीही व्यस्त असलो, तरी हा कार्यक्रम पहाण्यासाठी वेळ काढतो.

आचार्य योगेश शास्त्री, गुजरात – आमचा स्वत:चा आश्रम आहे आणि अनुयायीही आहेत. ज्या गोष्टींचे ज्ञान आम्हाला व्हायला हवे, ते या सत्संगांतून मिळत आहे. सत्संगातील प्रत्येक विषयांचा आम्ही स्वतःहून प्रचार करतो.

श्री. परेश नाईक, रायगड – धर्मसंवादातून मिळणारी माहिती नवीन आहे. अशी माहिती इतरत्र कुठे मिळत नाही.

हा कृतज्ञता सोहळा यू ट्यूब, तसेच फेसबूकच्या माध्यमातून १९ सहस्र ९१ जणांनी प्रत्यक्ष पाहिला.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment