आयकर परताव्यासाठी येणार्‍या संदेशापासून सावध रहा आणि स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी अशा संदेशाकडे दुर्लक्ष करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

मार्चच्या अखेरपर्यंत आयकर विवरणपत्र भरण्यात येत असते आणि त्यानंतर परतावा (रिफंड) मिळवण्यात येतो. गेल्या काही काळापासून परताव्याचा हक्क सांगण्यासाठी भ्रमणभाषवर एक संदेश येत आहे. अशा संदेशापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे. या संदेशात असलेली लिंक चुकूनही उघडली (‘ओपन’ केली) किंवा त्यावर काही माहिती दिली, तर परताव्याऐवजी बँकेतील रक्कम गायब होण्याची शक्यता आहे. देहली येथील सायबरपीस फाऊंडेशन आणि ऑटोबोट इंफोसिस यांनी ही माहिती उघड केली आहे.

कशी होते फसवणूक ?

भ्रमणभाषवर लघुसंदेशाद्वारे परताव्यासाठी अर्ज करण्याची एक लिंक पाठवली जाते. आपल्याला ही लिंक म्हणजे ‘आयकर विभागाचे ई-फायलिंग पेज’ आहे, असे वाटू शकते. या संदेशात ‘प्रोसिड टू द व्हेरिफिकेशन स्टेप’ (आपली ओळख पटवण्यासाठी पुढच्या टप्प्याला जा) हे बटन दाबण्यासाठी देण्यात आलेले असते. हे क्लिक केले, तर आपले पूर्ण नाव, आधार आणि पॅन कार्ड क्रमांक, पिनकोड, भ्रमणभाष क्रमांक, ई-मेल पत्ता, जन्मदिनांक भरण्यास सांगितले जाते. यानंतर बँक खाते क्रमांक, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक, आय.एफ्.एस्.सी. कोड, सीवीवी, ए.टी.एम्. पिन ही माहिती भरण्यासाठी सांगितली जाते. ही सर्व माहिती भरल्यानंतर बँकेचे खोटे (बनावट) पेज उघडते. येथे ऑनलाईन बँकिंगसाठी ‘यूजरनेम’ आणि ‘पासवर्ड’ भरण्यासाठी सांगितले जाते. ज्या व्यक्ती यामध्ये माहिती भरतात, त्यांना एक प्रश्‍न, त्याचे उत्तर आणि प्रोफाइल पासवर्डसमवेत ‘सी.आय.एफ्. नंबर’ टाकण्यासाठी सांगितले जाते. ‘आय.टी.आर्. व्हेरिफिकेशन’ पूर्ण झाल्यानंतर एक ‘अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते. या अ‍ॅपला ग्रीन डाऊनलोड लिंक, प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर सर्व ‘डिव्हाइस’ला अनुमती देण्यासाठी विनंती केली जाते. मग हे अ‍ॅप डाऊनलोड होण्यास प्रारंभ होते. अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर ज्या व्यक्तीने वरील सर्व गोष्टी पुरवल्या असतील, तिच्या खात्यातील पैसे अनधिकृतरित्या काढता येतात.

फसवणुकीसाठी होतो या अधिकोषांच्या नावांचा वापर !

या फसवणुकीसाठी एच्.डी.एफ्.सी. बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक अशा अधिकोषांची नावे वापरली जात आहेत.

फसवणुकीचा हा प्रकार असल्याचे कसे ओळखावे ?

या संकेतस्थळाच्या मार्गिकेच्या आरंभी https च्या जागी http ‘प्रोटोकॉल’चा (म्हणजेच प्रोटोकॉलमध्ये ‘s’ हे अक्षर नसते.) वापर होतांना दिसत आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती नेटवर्क अथवा इंटरनेट रहदारीचा मागोवा घेऊ शकते आणि फसवणूक झालेल्या व्यक्तींची माहिती चुकीचा वापर करण्यासाठी उपयोगात आणू शकते.

अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवला आणि त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. दोषी सापडण्याचे अन् त्यांना दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे ‘Prevention is better than Cure’ यानुसार वेळीच सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी. स्वत: सतर्क राहून कुटुंबीय आणि मित्र परिवार आदींना सावध करावे.

Leave a Comment