‘ऑनलाईन’ विशेष बालसंस्कार वर्गास पाल्य आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली – मुलांना आपण भौतिक सुख देतो, तसेच आपले पाल्य चारचौघात उठून दिसावे यांसाठी आपण अहोरात्र धडपड करतो. असे करतांना आपण त्यांना रागवत नाही किंवा ते उलट बोलल्यास हसण्यावारी नेतो. लहान म्हणून अनेकवेळा त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो; मात्र आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करणे आणि त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता असून ते पालकांचे मुख्य कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना थोरात यांनी केले. त्या ‘ऑनलाईन बालसंस्कार वर्गाच्या विशेष भागा’त बोलत होत्या. प्रारंभी कु. श्रुती दामले हीने बैठकीचा उद्देश सांगितला.
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी १/२ गुणांसाठी दु:खी बनतात. ही विचारधारा पालटण्यासाठी त्यांच्यावर नामजप, चांगल्या सवयी, स्वभावदोष निर्मूलन यांचे संस्कार करून त्यांच्यातील आत्मबळ वाढवण्यात पालकांचे दायित्व महत्त्वाचे असल्याने २१ मार्च या विशेष बालसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गात ९४ पालक आणि बालक उपस्थित होते. आतापर्यंत याचे ४४ भाग पूर्ण झाले आहेत.
या वेळी पूजा मराठे, अवधूत जगताप, देवर्षी कुलकर्णी, अर्जुन, गौरव खटावकर यांसह काही बालसाधकांनी ते करत असलेल्या प्रयत्नांविषयी प्रांजळपणे सांगितले. या वेळी पालकांनी त्यांच्या पाल्यांमध्ये चिडचिडेपणा अल्प होणे, एकाग्रता वाढणे, स्थिरता येणे, साहाय्य करण्याचा भाग वाढणे, हट्टीपणा अल्प होणे असे पालट झाल्याचे सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन कु. ऐश्वर्या जोशी हिने केले.
विशेष – या वेळी ‘चांगल्या सवयी’ याविषयी ‘स्लाईड शो’ दाखवण्यात आला.