पोट साफ होण्यासाठी रामबाण घरगुती औषध : मेथीदाणे

Article also available in :

अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. या समस्येमुळे अनेक शारीरिक तक्रारी उद्भवतात. कित्येकजण प्रतिदिन पोट साफ होण्यासाठी औषधे घेतात. यांतील बहुतेक औषधांमुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा उत्पन्न होतो. यामुळे पोट साफ न होण्याची समस्या बळावत जाते.

वैद्य मेघराज माधव पराडकर

१. मेथीचे दाणे खाण्याची पद्धत

‘मेथीचे दाणे हे पोट साफ होण्यासाठी रामबाण औषध आहे. रात्री झोपतांना किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर अर्धा चमचा मेथीचे दाणे थोड्याशा पाण्यासह औषधाची गोळी गिळतो त्याप्रमाणे न चावता गिळावेत. याने सकाळी उठल्यावर पोट साफ होते.

 

२. मेथीच्या दाणे असे कार्य करतात

मेथीचे दाणे पोटात गेल्यावर फुगतात आणि त्यांच्यातील बुळबुळीतपणामुळे ते आतड्यांतील मल पुढे ढकलतात. आतड्यांमध्ये आवश्यक तेवढे पाण्याचे प्रमाण मेथीच्या दाण्यांमुळे राखले जाते. यामुळे आतडी कोरडी पडत नाहीत. मेथीदाणे वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांचे शमन करतात. मेथी हा आहारातील पदार्थ आहे. त्यामुळे अनेक दिवस मेथीदाणे प्रतिदिन घेतले, तरी कोणताही अपाय होत नाही. मेथीदाणे खाल्ल्याने नैसर्गिकरित्या शौचाला होते. जुलाब होत नाहीत. मेथी शक्तीवर्धकही आहे. त्यामुळे नियमित मेथीचे दाणे खाल्ल्याने थकवाही न्यून होतो.

 

३. कोठ्यानुसार मेथी दाण्यांचे प्रमाण

प्रतिदिन अर्धा चमचा मेथीचे दाणे खाऊन ते लागू पडले, तर दुसर्‍या आठवड्यामध्ये त्यांचे प्रमाण अल्प करून पहावे. न्यूनातिन्यून जेवढ्या प्रमाणात ते लागू पडतात, तेवढे प्रमाण नेहमी चालू ठेवावे. काही जणांचा कोठा अधिक क्रूर (जड) असतो. अशांना अर्धा चमचा मेथीदाणे खाऊन पोट साफ होत नाही. अशा लोकांनी मेथीदाण्यांचे प्रमाण प्रतिदिन अर्ध्या चमच्याने वाढवून पहावे. जे प्रमाण लागू पडते, ते नियमित घ्यावे. काहींना एका वेळेस ३ ते ४ चमच्यांपर्यंत मेथीदाणे घ्यावे लागू शकतात.

 

४. मेथीचे दाणे धुऊन वापरावेत

इतर पोट साफ होण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांपेक्षा मेथीदाणे कितीतरी स्वस्त आहेत. बाजारात जे मेथीचे दाणे मिळतात, त्यांवर रासायनिक फवारणी केलेली असू शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत वर्षभर पुरतील एवढे मेथीदाणे आणून धुऊन नीट वाळवून हवाबंद डब्यात भरून ठेवावेत आणि आवश्यकतेनुसार वर्षभर वापरावेत.’

 

५. मेथी वात, कफ आणि ज्वर (ताप) यांचा नाश करते

मेथिका वातशमनी श्‍लेष्मघ्नी ज्वरनाशिनी ।

– भावप्रकाशनिघंटु, वर्ग १, श्‍लोक ८५

अर्थ : मेथी वात, कफ आणि ज्वर (ताप) यांचा नाश करते. मेथीला ‘पित्तजित्ज’ म्हणजे ‘पित्तावर विजय मिळवणारी’ असेही म्हटले आहे. याचाच अर्थ मेथी ही वात, पित्त आणि कफ हे तीनही दोष वाढले असतील, तर त्यांना न्यून करते.

दोषा एव हि सर्वेषां रोगाणामेककारणम् ।

– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय १२, श्‍लोक ३२

अर्थ : वात, पित्त आणि कफ हे तीन दोषच सर्व रोगांचे कारण आहेत.

‘कोणताही रोग वात, पित्त किंवा कफ यांची दुष्टी झाल्याविना (म्हणजे वात, पित्त किंवा कफ यांच्यामध्ये विषमता आल्याविना) होऊच शकत नाही’, हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांमध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. त्रिदोषांमध्ये संतुलन राहिले, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्रतिदिन रात्री थोडे मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्याने तीनही दोषांचे शमन (संतुलन) होते. यामुळे चालू उपचारांना बळ मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मेथीदाणे हा आहारातील घटक आहे आणि तो प्रतिदिन आपल्याला लागू पडेल एवढ्याच प्रमाणात घ्यायचा आहे. त्यामुळे मेथीदाण्यांचे सेवन केल्याने कसलेही दुष्परिणाम होत नाहीत.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment