हरिद्वार – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी संतसंपर्क अभियानाच्या अंतर्गत दिव्य प्रेम सेवा मिशनचे संस्थापक अध्यक्ष पू. आशिष गौतम यांची भेट घेतली. या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांना समिती करत असलेल्या धर्मप्रसाराच्या कार्याची माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली. ‘हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्मविषयक फलक प्रदर्शनामुळे लाखो भाविकांपर्यंत धर्मरक्षणाचा विषय पोचेल’, असा विश्वास पू. आशिष गौतम यांनी व्यक्त केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तराखंड समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हेही उपस्थित होते.
उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष श्री. प्रेमचंद अग्रवाल यांच्याकडून सनातनच्या कार्याची प्रशंसा !
या वेळी दिव्य प्रेम सेवा मिशनमध्ये एका कार्यक्रमानिमित्त उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष श्री. प्रेमचंद अग्रवाल उपस्थित होते. या निमित्ताने श्री. अग्रवाल यांचीही सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भेट घेतली. ‘हिंदूंना शास्त्रीय भाषेत धर्माचरणाची माहिती दिल्याने तरुण पिढी धर्माचरणाकडे वळू लागली आहे. दळणवळण बंदीच्या काळापासून सनातन संस्थेचे ऑनलाईन सत्संग चालू केल्याने जिज्ञासूंना त्याचा पुष्कळ लाभ झाला’, असे सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी श्री. अग्रवाल यांना सांगितले. त्यावर श्री. प्रेमचंद अग्रवाल यांनी या कार्याची प्रशंसा केली.