मागील सत्संगात आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व समजून घेतले होते. प्रत्यक्ष स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला आरंभ करण्यापूर्वी आपण आपल्या वागणे आणि बोलणे याचे निरीक्षण करायचे ठरवले होते. आपले कुठे चुकते ?, हे पहायचे ठरले होते. तसे आपल्याकडून निरीक्षण झाले का ? या आठवड्यात आपल्याला कोणत्या गोष्टींचा ताण आला ? आपल्या कुठल्या कृती किंवा स्वभावदोष आपल्या लक्षात आले ? तसेच मागे ठरल्याप्रमाणे आपल्यापैकी सर्वांनी स्वतःच्या चुकांच्या नोंदी करण्यासाठी वही घातली का ? ज्यांनी घातली नसेल त्यांनी घालूया. प्रक्रियेचे पुढचे पुढचे टप्पे शिकतांना वही घालणे आवश्यक आहे.
स्वयंसूचनांचे महत्त्व
आजच्या सत्संगात आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवतांना ‘स्वयंसूचना’ देण्याचे महत्त्व या सूत्राविषयी जाणून घेणार आहोत.
आपण सगळे समाजात रहातो. समाजात वावरतांना आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती, वेगवेगळ्या परिस्थिती यांचा सामना करावा लागतो. ते करत असतांना बर्याच वेळा आपल्या मनावर एकप्रकारचा ताण असतो. विशेषतः जेव्हा परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल नसते, जेव्हा आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्याला हवे तसे घडत नाही, तेव्हा आपल्या मनाची स्थिती बिघडते. त्यातून निराशा, दुःख आणि निरुत्साह वाट्याला येतो. त्यातून कसे बाहेर पडायचे ?, हे बर्याच जणांना ठाऊक नसते किंवा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न झाला, तरी बहुतांश वेळेला हे प्रयत्न दिशाहीन आणि वरवरचे असतात. बर्याच वेळा व्यक्ती चांगले वागण्याचा किंवा एखादी चांगली सवय लावण्याचा निश्चय करते; पण त्यात यश येण्याचे प्रमाण नगण्य असते. आपणही असे अनुभवले असेल ना ? उदाहरणार्थ, बरेच जण सकाळी व्यायाम करण्याचा निश्चय करतात; पण ठरवल्यानुसार दुसर्या दिवसापासून व्यायाम चालू होतो का ?, तर बहुतांश जणांच्या संदर्भात याचे उत्तर नकारार्थी असते. याचे कारण बहुतेकांचा निश्चय किंवा ताण-तणाव यांवर मात करण्याचे प्रयत्न हे बाह्यमनाच्या पातळीला असतात. आपण मनाला नाही, तर मन आपल्याला नियंत्रित करत असते. या मनाला वळण लावण्याची प्रक्रिया म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आहे. स्वयंसूचना हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे.
ताणतणाव आणि दुःख यांचे कारण स्वभावदोष
आपल्या सगळ्या ताणाचे मूळ आपल्या स्वभावातील दोषांमध्ये असते. आळशीपणा, रागीटपणा, अव्यवस्थितपणा, तुलना करणे, अपेक्षा करणे, इतरांना सतत दोष देणे, एकलकोंडे असणे, भिडस्तपणा, इतरांना समजून न घेणे, स्वतःची मते इतरांवर लादणे अशा प्रकारचे कितीतरी स्वभावदोष, तसेच अहंचे पैलू व्यक्तीमध्ये असतात. या स्वभावदोषांमुळे व्यक्तीला परिस्थिती हाताळता येत नाही आणि अयोग्य कृती घडतात किंवा अयोग्य प्रतिक्रिया व्यक्त होतात. उदाहरणार्थ, आपल्या मताप्रमाणे काही झाले नाही, तर राग येतो आणि तो इतरांवर व्यक्त होतो. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांनी आपल्या कामातील त्रुटी काढल्या की, ‘ते मला जाणीवपूर्वक त्रुटी सांगतात. त्यांचा माझ्यावर राग आहे’, अशा प्रतिक्रिया येतात. मित्राने नवीन गाडी घेतली की, तुलना होते, त्या मित्राचा हेवा वाटतो. चहा पिऊन झाल्यावर स्वयंपाकघरात जाऊन चहाचा कप विसळून ठेवण्याचा कंटाळा येतो. अशा प्रकारच्या चुका दिवसभरात घडतात ना ? हे कशामुळे घडते ?, तर स्वभावदोषांमुळे ! केवळ या जन्मातीलच नाही, तर जन्मोजन्मीच्या स्वभावदोषांचे संस्कार अंतर्मनात असतात. या स्वभावदोषांमुळे व्यक्तीची स्वतःची हानी होते, असे नाही, तर इतरांनाही मनस्ताप सहन करावा लागतो, उदा. व्यक्तीचा स्वभाव संतापी असेल, तर रागीटपणामुळे कुटुंबीय, कार्यालयातील सहकारी यांचीही मने दुखावली जाऊ शकतात. आपल्याला ताणतणाव, दुःख घालवायचे असेल, तर अंतर्मनातील हे स्वभावदोष दूर करणे आवश्यक असते.
हे स्वभावदोष दूर करण्याची शास्त्रीय पद्धत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शोधून काढली आहे. ही प्रक्रिया राबवून कित्येक जण आनंदी, सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगू लागले आहेत. स्वयंसूचना हा या प्रक्रियेचा गाभा आहे.
स्वयंसूचना म्हणजे काय ?
स्वयंसूचना म्हणजे काय, तर स्वतःकडून होणार्या अयोग्य कृती, मनात येणारे अयोग्य विचार, भावना, प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच आपल्या अंतर्मनाला म्हणजे चित्ताला सकारात्मक सूचना देणे. स्वयंसूचनांच्या माध्यमातून आपण नकारात्मक संस्कार घालवण्यासाठी योग्य आणि सकारात्मक सूचना, जेणेकरून कालांतराने तो स्वभावदोष निष्प्रभ होतो.
नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा आवश्यक
मनातील नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी केवळ चिंतन, केवळ सकारात्मक विचार करण्याचा निश्चय पुरेसा नसतो, तर त्यासाठी आध्यात्मिक ऊर्जेची आवश्यकता असते. या प्रक्रियेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत आहे. त्यामुळे प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा चैतन्यमय आहे. त्यामुळे आपण जेव्हा स्वयंसूचना देतो, तेव्हा केवळ शब्द नाही, तर चैतन्यही अंतर्मनात जाते आणि स्वभावदोषांचे निर्मूलन व्हायला गती येते. स्वयंसूचना या थेट अंतर्मनाच्या पातळीवर कार्य करत असल्याने स्वयंसूचनांमुळे अंतर्मनातील स्वभावदोषांचे संस्कार क्षीण होऊ लागतात आणि पर्यायाने स्वभावदोषांमुळे निर्माण होणारा ताण हळूहळू कमी होऊ लागतो. इतके स्वयंसूचनांचे महत्त्व आहे.
स्वयंसूचनांची उदाहरणे
आपण आता स्वयंसूचनांची २-३ उदाहरणे पाहूया.
१. अयोग्य कृती : गाडी ‘पार्क’ केल्यावर गाडी ‘लॉक’ करण्याचे विसरल्याने रात्रभर गाडीला किल्ली तशीच राहिली.
ही चूक ढोबळ वाटत असली, तरी त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येकच चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. यावर स्वयंसूचना कशी होऊ शकेल ?
स्वयंसूचना : जेव्हा मी गाडी ‘पार्क’ करून निघत असेन, तेव्हा मला गाडीला कुलूप लावण्याची आठवण होईल आणि मी गाडी ‘लॉक’ करून किल्ली जागेवर ठेवीन.
२. अयोग्य विचार : मी स्वयंपाक पुष्कळ चांगला करते. माझ्यासारखा शिरा कुणालाच बनवता येत नाही.
या विचारामागे स्वतःला श्रेष्ठ समजणे किंवा इतरांना तुच्छ लेखणे असा अहंचा पैलू कार्यरत असू शकतो. अशा विचारांमुळे व्यक्तीचा अहंकार वाढत जातो. अहंकारामुळे ती व्यक्ती इतरांपासून हळूहळू दुरावली जाते आणि तिचा आनंद हिरावून बसते.
यावर स्वयंसूचना कशी होऊ शकेल ?
स्वयंसूचना : जेव्हा ‘माझ्यासारखा शिरा कुणालाच बनवता येत नाही’, असे विचार येत असतील, तेव्हा हा माझा अहंकार आहे, याची मला जाणीव होईल आणि प्रत्येकाकडेच शिकण्यासारखे काही ना काही असते, हे लक्षात घेऊन मी इतरांचे गुण शिकण्याचा प्रयत्न करीन.
कधीकधी भविष्याची चिंता निर्माण होऊन ताण येतो, उदा.
३. अयोग्य विचार : कोरोना महामारीमुळे यजमानांची नोकरी गेली, तेव्हा ‘आता पुढे कसे होणार ?’, याचा ताण आला.
आपल्याला ज्याची काळजी आहे, चिंता आहे, त्यावर योग्य दृष्टीकोन घेऊन प्रयत्न केले, तर काळजीच्या विचारांवर मात करता येऊ शकतो. आताच्या प्रसंगाचा विचार केला, तर याविषयी स्वयंसूचना कशी होऊ शकेल ?, ते आपण पाहूया.
स्वयंसूचना : कोरोनामुळे यजमानांची नोकरी गेल्यावर ताण येत असेल, तेव्हा देवाने आमच्यासाठी अजून काही चांगल्या संधी ठेवल्या असतील, असा सकारात्मक विचार करून परिस्थिती स्वीकारता येण्यासाठी देवाला प्रार्थना करीन आणि दुसर्या नोकरीसाठी प्रयत्न करीन.
अशा प्रकारे आपल्या मनात येणारे अयोग्य विचार, आपल्याकडून होणार्या अयोग्य कृती, मनात उमटणार्या किंवा व्यक्त होणार्या अयोग्य प्रतिक्रिया यांना आपण स्वयंसूचनांच्या माध्यमातून दिशा देऊ शकलो, तर आपला ताण-तणाव निश्चित कमी होईल.
आजच्या सत्संगात आपण स्वयंसूचनांचे महत्त्व समजून घेतांना आपल्याकडून घडणार्या अयोग्य कृती, मनात येणारे अयोग्य विचार यासंदर्भातील काही प्रसंग आणि त्यावर स्वयंसूचना कशा दिल्या जाऊ शकतात हे समजून घेतले. पुढील सत्संगात आपण स्वभावदोष सारणी कशी लिहायची ? याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी या आठवड्यात प्रतिदिन आपल्याकडून ज्या काही चुका होतील त्याची आपल्याकडील वहीत नोंद करून ठेवूया. स्वभावदोष सारणी लिखाणासाठी चुकांच्या नोंदी करणे आवश्यक आहे.